स्कंध ९ वा - अध्याय २३ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१८१
ययातीचा अनु तया तीन पुत्र । ज्येष्ठ सभानर, कालनर त्या ॥१॥
सृंजय, जनमेजय, महाशील । महामना, उशीनर त्यासी ॥२॥
तितिक्षु तयासी होता अन्य पुत्र । उशीरनरा पुत्र शिबिआदि ॥३॥
वृषादर्भ, मद्र, सुवीर, कैकेय । शिबीसी हे चार पुत्र जाण ॥४॥
तितिक्षूचा रुशद्रथ तया हेम । सुतपा, बलि जाण दीर्घतमा ॥५॥
तया अंग, बंग, कलिंग तैं सुम्ह । पुंड्र, आंध्र जाण पुत्र षटक्‍ ॥६॥
पूर्वभारती या नांवें त्यांचे देश । वासुदेव ख्यात म्हणे जनीं ॥७॥

१८२
खनपान अंगा तया दिविरथ । धर्म चित्ररथ, रोमपाद ॥१॥
दशरथाची त्या दत्तक ते शांता । तेणें ऋष्यशृंगा दिधली तेचि ॥२॥
विभांडकासी तो हरिणीच्या ठाईं । पुत्र एक होई आश्चर्य तें ॥३॥
गंगेमाजी त्याचें उर्वशीदर्शनें । पतन पावलें तेज कामें ॥४॥
मृगीनें तें जऴसेवितां प्राशिलें । पुत्ररत्न झालें तिजसी प्राप्त ॥५॥
वासुदेव म्हणे तोचि ऋष्य़शृंग । महा पुण्यवंत ऋषि जगीं ॥६॥

१८३
रोमपादराज्यामाजी अवर्षण । पडतां ब्राह्मण कथिती तया ॥१॥
विभांडकपुत्रा आणिसील जरी । वृष्टि होई तरी राज्यामाजी ॥२॥
केंवी हें घडावें राव हें चिंतितां । स्वीकारिती वेश्या कार्य त्याचें ॥३॥
विभांडक मुनि नसतां आश्रमीं । तेथ जाऊनि नृत्यादिकीं - ॥४॥
मोहूनि पुत्रासी घेऊनियां येती । राज्यांत तैं वृष्टि होत असे ॥५॥
पुत्रकामेष्टीही रोमपादें केली । कामना पुरली तदा त्याची ॥६॥
वासुदेव म्हणे दशरथातेंही । पुत्र चार होती याचि मार्गे ॥७॥

१८४
रोमपादपुत्र नामें चतुरंग । पुढती पृथुलाक्ष, बृहद्रथ ॥१॥
बृहन्मना जयद्रथ तो विजय । धृति धृतव्रत, सत्कर्मा तो ॥२॥
अधिरथ त्याचा पुत्र पुत्रहीन । पेटिका त्यालागून गंगातीरीं - ॥३॥
गवसली, कर्ण होता त्या पेटींत । वृषसेन पुत्र ख्यात त्याचा ॥४॥
वासुदेव म्हणे कर्ण कुंतिपुत्र । जपतां सूर्यमंत्र लाभला जो ॥५॥

१८५
ययातीचा द्रुह्यु, बभ्रू, सेतु, क्रमें । आरब्ध, तो जाणें गांधार त्या ॥१॥
धर्म, धृत, दुर्मना तो त्याचा पुत्र । प्रचेता तयास पुत्र होई ॥२॥
शत पुत्र तया उत्तरेसी ज्यांचे । राज्य, म्लेच्छ जेथें होते बहु ॥३॥
ययातिपुत्र जो तुर्वसु तयाचा । वन्ही, भर्ग त्याचा भानुमान ॥४॥
त्रिभानु पुढती करंधम श्रेष्ठ । दुष्यंता मरुत पुत्र मानी ॥५॥
पुरुवंशज तो होता राज्यलोभी । वासुदेव कथी पुढती ऐका ॥६॥

१८६
यदुनामें ययातीचा ज्येष्ठ पुत्र । ऐकें त्याचा वंश परीक्षिता ॥१॥
अवतीर्ण झाले कृष्ण ज्या वंशांत । श्रवणें पापमुक्त होईं त्याच्या ॥२॥
सहस्त्रजित्‍ तो क्रोष्टा तैं अनल । रिपु ऐसे चार यदुपुत्र ॥३॥
सहस्त्रजितासी शतजित्‍ सुपुत्र । महा-वेणुहय, हैहय हे ॥४॥
पुत्र तया तीन, हैहयाचा धर्म । नेत्र कुंति जाण सोहंजि तो ॥५॥
महिष्मान्‍, भद्रसेन, दुर्मद तैं । धनक ते पाहीं पुत्र दोन ॥६॥
कृतवीर्यादिक धनका पुत्र चार । म्हणे वासुदेव पुढती ऐका ॥७॥

१८७
कृतवीर्याचा अर्जुन । कार्तवीर्य तया नाम ॥१॥
सप्तदीपांचा अधिप । स्तविला जेणें गुरुदत्त ॥२॥
तेणें मेळविल्या सिद्धि । तेंवी सकल ऐश्वर्यही ॥३॥
पंचाशिति सहस्त्राद्ब । त्याच्या इंद्रियां सामर्थ्य ॥४॥
इच्छिलें तें न लाभलें । ऐसें कदाही न झालें ॥५॥
होई नष्टवस्तुस्लाभ । स्मरतां तया ऐसी साक्ष ॥६॥
वासुदेव म्हणे पुत्र । तयालागीं दश सहस्त्र ॥७॥

१८८
भार्गवयुद्धीं ते सर्वही निमाले । जिवंत राहिले केवळ पंच ॥१॥
जयध्वज, शूरसेन तैं वृषभ । मधु, तो ऊर्जित, पंचमही ॥२॥
जयध्वजा तालजंघ, तया शत - । पुत्र, तालजंघ याचि नांवें ॥३॥
वीतिहोत्र मात्र एक अवशिष्ट । इतरांचा नाश सगरें केला ॥४॥
वीतिहोत्रा मधु तया पुत्र शत । तयांमाजी ज्येष्ठ वृष्णि नामें ॥५॥
वृष्णि माधव तैं यादव हीं नामें । प्राप्त यादवांतें याचि योगें ॥६॥
वासुदेव म्हणे सहस्त्रजिताचा । निवेदिला ऐसा वंश नृपा ॥७॥

१८९
यदुपुत्र क्रोष्टा वृजिनवान्‍ त्या । श्वाहि, रुशेकु त्या चित्ररथ ॥१॥
शशबिंदु त्याचा पुत्र तो अजिंक्य । संकल्पसिद्ध तो योगी होता ॥२॥
गज, अश्व, रथ, ललना, शर, पुष्प । निधि, वृक्ष, वस्त्र, शक्ति, पाश ॥३॥
मणि, छत्र, विमान हीं चतुर्दश । महारत्नें नित्य तयापाशीं ॥४॥
कांता तयाप्रति त्या दशसहस्त्र । पुत्र लक्ष लक्ष प्रत्येकीसी ॥५॥
पृथुश्रवादिक षट्‍क तें प्रसिद्ध । ज्येष्ठाचा तो पुत्र धर्म नामें ॥६॥
शतमखकर्ता उशना तयासी । पुत्र रुचकासी पंच होते ॥७॥
वासुदेव म्हणे पुरुजित्‍ रुक्म । रुक्मेषु तो जाण पृथु, ज्यामध ॥८॥

१९०
‘शैब्या’ ज्यामघाची कांता होती वंध्या । तियेचेंही सदा भय तया ॥१॥
अन्य स्त्री तियेच्या भयानें न केली । एकदां आणिली कन्या एक ॥२॥
जिंकूनि शत्रूसी, भोज्या तिज नाम । रथीं ते पाहून शैब्या क्रुद्ध ॥३॥
म्हणे ते त्वद्रथीं माझ्यावीण कोण । राव तैं भिऊन म्हणे स्नुषा ॥४॥
वंध्या मी, सपत्नी म्हणे ते न मज । केंवी स्नुषा एथ प्राप्त होई ॥५॥
वासुदेव म्हणे ऐकूनि तें राव । होई भयाकुल कंप पावे ॥६॥

१९१
कांपत कांपत म्हणे तुज आतां । सुत जो हे कांता तयाप्रति ॥१॥
बोलून यापरी स्तवी विश्वेदेवां । तथास्तु ते तदा वदले वाणी ॥२॥
रजोत्पत्ति तेणें होऊनि शैब्येसी । दिवस लोटती आश्चर्य हें ॥३॥
विदर्भ नामक पुत्र गुणवंत । जाहला तियेसे योग्यवेळीं ॥४॥
पुढती वयांत येतां तया भोज्या । अर्पियेली कांता आणिली ते ॥५॥
वासुदेव म्हणे इतिहास ऐसा । पहा तरी कैसा नवलकारी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP