स्कंध ९ वा - अध्याय ६ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


४०
विरुप तो केतुमान्, शंभु ऐसे । पुत्र तीन होते, अंबरीषा ॥१॥
विरुपासी पृषदश्व नामें पुत्र । तया ‘रथीतर’ पुत्रहीन ॥२॥
प्रार्थिलें तयानें अंगिरा मुनींसी । ब्रह्मतेजें त्यासी पुत्र दश ॥३॥
आंगिरस नामें विख्यात ते जनीं । अन्य पुत्रांहूनि श्रेष्ठत्व त्यां ॥४॥
वासुदेव म्हणे प्रसाद थोरांचा । लाभतां न्यूनता नसे तेथें ॥५॥

४१
शिंकेपासूनि मनूच्या । इक्ष्वाकूसी जन्म, राजा ॥१॥
शत पुत्र झाले त्यासी । वडिल त्यांमाजी विकुक्षी ॥२॥
तया अष्टकाश्राद्धार्थ । वनीं आणावया मांस ॥३॥
पाठवितां इक्ष्वाकूनें । पशु संहारिलें तेणें ॥४॥
तेथ होऊनि क्षुधार्त । भक्षीयेला एक शश ॥५॥
अवशिष्ट सर्व मांस । येई घेऊनि गृहास ॥६॥
वासुदेव म्हणे कर्म । सहज चुकतांही बंधन ॥७॥

४२
प्रोक्षणसमयीं जाणूनि वसिष्ठ । मांस हें उच्छिष्ट वदले नृपा ॥१॥
शशभक्षणानें उच्छिष्टता येई । ऐकूनि हें होई क्रुद्ध राव ॥२॥
विरुद्ध क्रिया ते पाहूनि पुत्रासी । राज्यांतूनि हांकी शासनार्थ ॥३॥
वेदान्तश्रवण तेंवी योगाभ्यास । करुनि कृतार्थ राव होई ॥४॥
विकुक्षी पुढती येऊनियां राज्य । करी, त्या ‘शशाद’ म्हणती जन ॥५॥
वासुदेव म्हणे भक्षियेला शश । म्हणूनि, ‘शशाद’ नाम त्यासी ॥६॥

४३
विकुक्षीतें पुत्र पुरंजय नामा । इंद्रवाह संज्ञा ककुत्स्थही ॥१॥
नामें तया ऐसीं लाभलीं कां ऐकें । एकदां देवांतें विघ्न येई ॥२॥
पुरंजयावीण नव्हता त्यां त्राता । यास्तव प्रार्थितां तयाप्रति ॥३॥
इंद्रासी तो म्हणे होसी तूं वाहन । तरीच येईन साह्यास्तव ॥४॥
विष्णुबोधें तदा इंद्र होई वृष । बैसे पुरंजय तयावरी ॥५॥
युद्धामाजी ऐसें हरिलें दैत्यांसी । वासुदेव कथी पुढती ऐका ॥६॥

४४
वृषाच्या वशिंढीं बैसूनि नृपति । सकवच हातीं बाण घेई ॥१॥
प्रवेशला अंगीं तदा भगवान । तेणें दीप्तिमान दिसे बहु ॥२॥
विक्रम तयाचा पाहूनियां दैत्य । पातालाचा मार्ग धरुनि गेले ॥३॥
सोडवूनि ऐसें वैभव देवांचें । अर्पिलें इंद्रातें पुरंजयें ॥४॥
इंद्ररुपी ऐशा वृषाचें वाहन । इंद्रवाह नाम तेणें तया ॥५॥
वासुदेव म्हणे ककुदीं बैसला । ‘ककुत्स्थ’ तयाला म्हणती तेणें ॥६॥

४५
अनेना तैं पृथु, विश्वरंधि, चंद्र । पुढती युवनाश्च, शाबस्त त्या ॥१॥
कुवलयाश्वक तोचि धुंधुमार । धुंधूचा संहार करिता झाला ॥२॥
दृढाश्च तयाचा हर्यश्व पुढती । निकुंभ क्रमेंचि बर्हणाश्व ॥३॥
कृशाश्व, सेनजित्‍, युवनाश्व ऐसे । वंशज एकातें एक होती ॥४॥
वासुदेव म्हणे युवनाश्ववृत्त । ऐकावें रोचक बोधप्रद ॥५॥

४६
युवनाश्वा स्त्रिया शत । परी न होईचि पुत्र ॥१॥
तदा स्त्रियांसवें वनीं । राव जातसे निघूनि ॥२॥
वनीं पाहूनियां तया । मुनीलागीं येई दया ॥३॥
ऐंद्रीइष्टि ते करविती । लीला अगाध दैवाची ॥४॥
यद्यपि ते दक्ष मुनि । दैव न टळे परी जनीं ॥५॥
वासुदेव म्हणे ऐका । नवल जाललें जें तदा ॥६॥

४७
तृषाक्रांत नृप होई एका रात्रीं । सर्व निद्रेमाजी असतां मग्न ॥१॥
पाहूनि तें निद्रा न मोडो कोणाची । दक्षता नृपाची ऐशापरी ॥२॥
घेऊनि उदक कलशींचें एका । प्राशूनियां राजा तृप्त होई ॥३॥
अभिमंत्रूनि तें ठेवियेलें होतें । द्यावया राणीतें प्रात:काळीं ॥४॥
अन्यदिनीं सर्व येऊनियां ध्यानीं । दैवगति मुनि म्हणती श्रेष्ठ ॥५॥
पुत्रोत्पादनाची शक्ति त्या उदकीं । योजियेली होती मंत्रबळें ॥६॥
वासुदेव म्हणे मंत्रबळें पुत्र । जाहला नृपास योग्यवेळीं ॥७॥

४८
दुग्धप्राशनार्थ बाळ तो आक्रंदे । प्राशील कोणातें म्हणती मुनि ॥१॥
सदय तैं इंद्र म्हणे हा ‘मान्धाता’ । म्हणजे प्राशिता होवो मज ॥२॥
बोलूनि तर्जनी दिधली वदनीं । स्त्रवे जियेंतूनि अमृतस्त्राव ॥३॥
वासुदेव म्हणे युवनाश्वपुत्र । पुढती विख्यात त्याचि नामें ॥४॥

४९
युवनाश्व कूस भंगतांही वांचे । मुनि देवही ते रक्षिती त्या ॥१॥
पुढती तो तपें सिद्धि संपादूनि । कृतार्थ जन्मूनि होई ऐसा ॥२॥
‘त्रसद्दस्यु’ नाम मांधाता पावला । त्रस्त तो दस्यूंला करी बहु ॥३॥
सार्वभौम राव जाहला विक्रमें । यज्ञ-यागकर्मे ख्यात होई ॥४॥
शशबिंदुकन्या ‘बिंदुमती’ प्रति । मुचुकुंद त्यासी पुत्र होई ॥५॥
महाभक्ता तया कन्या पंचाशत । सौभरि मुनींस वरिती सर्व ॥६॥
वासुदेव म्हणे सौभरीचें वृत्त । देऊनियां चित्त ऐका आतां ॥७॥

५०
यमुनाडोहांत बैसूनि सौभरि । तपश्चर्या करी घोर तेथें ॥१॥
रतिसौख्यमग्न जळीं त्या मुनीनें । पाहिलें मत्स्यातें एकावेळीं ॥२॥
उत्कट तैं तया इच्छा तेचि होतां । मुनि मुचकुंदा कन्या मागे ॥३॥
ऐकूनि तें राव योजीतसे युक्ति । वरी जे तुजसी म्हणे कन्या ॥४॥
अर्पीन ते तुज ऐकूनि सौभरि । जाणूनि अंतरीं हेतु त्याचा ॥५॥
तपोबळें रुप धरुनि मोहक । कन्यांच्या समीप प्राप्त झाला ॥६॥
वासुदेव म्हणे तपाचें सामर्थ्य । जगीं अलौकिक न कळे मूढा ॥७॥

५१
योगसामर्थ्याचें रुप तें अद्भुत । जाहल्या मोहित सकल कन्या ॥१॥
हा माझा, हा माझा, ऐसा तैं कलह । वरिती सकल अंतीं तया ॥२॥
तदा सौभरीनें निर्मिलीं मंदिरें । जेथ विराजलें सकलैश्वर्य ॥३॥
सभोंवती रम्य उद्यानें तयांच्या । दास दासी शय्या अलंकार ॥४॥
तोषवी सकलां करुनि विलास । मांधाताही थक्क पाहूनियां ॥५॥
योग्य धृतें दीप प्रदीप्तचि राही । शांति नच येई मुनिसी तदा ॥६॥
वासुदेव म्हणे पुढती एकदां । विवेक मुनींचा प्रबळ झाला ॥७॥

५२
म्हणे हाय हाय घातकींहो माझा । मत्स्यसंगतीचा परिणाम हा ॥१॥
मोक्षेच्छूनें जनीं विषयासक्तांची । कदाही संगती धरुं नये ॥२॥
इंद्रियें जिंकूनि व्हावें ध्यानमग्न । इच्छितां सज्जनसंग व्हावा ॥३॥
तपस्वी मी रुपें घेऊनि इतुकीं । पुत्र प्रत्येकीसी दिधले शत ॥४॥
ऐसा पुत्रादिक रुपें मी नटलों । परी न पावलों समाधान ॥५॥
अंतीं पश्चात्तपें गेला तो वनासी । मामोमाग जाती सकल स्त्रिया ॥६॥
तेथ तपश्चर्या करुनि सौभरि । पावले अंतरीं समाधान ॥७॥
अग्नि शांत होतां ज्वाला शांत होती । कृतार्थता तैसी स्त्रियांतेंहीं ॥८॥
वासुदेव म्हणे विवेकी जो तोचि । जिंकी इंद्रियांसी तपोबळें ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP