स्कंध ९ वा - अध्याय १६ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


११६
पितृवचन मानूनि । रमला राम तीर्थाटनीं ॥१॥
ऐसें लोटे एक वर्ष । तदा येई आश्रमांत ॥२॥
पुढती एके दिनीं माता । जाई गंगेसी उदका ॥३॥
गंधर्व तैं चित्ररथ । जलक्रीडा करी तेथ ॥४॥
स्त्रियांसवें पाही क्रीडा । रेणुकेंते कामबाधा ॥५॥
होमसमय विसरुनि । रमली क्षणभरी त्या स्थानीं ॥६॥
वासुदेव म्हणे माता । पुढती नेसते उदका ॥७॥

११७
मुनींच्या सन्निध ठेऊनि उदक । करुनियां स्मित कर जोडी ॥१॥
अंतरींचा दोष जाणिला मुनींनीं । पुत्रांतें वाहूनि वदले क्रोधें ॥२॥
तत्काल मातेसी वधावें म्हणती । परी न धजती बाहू त्यांचे ॥३॥
पाचारुनि तदा परशुरामातें । वधीं सकलांतें म्हणती मुनी ॥४॥
पित्याचें सामर्थ्य जाणूनियां राम । सकलां वधून चरणां वंदी ॥५॥
संतोषूनि मुनि म्हणती वर माग । सकलां जिवंत करा म्हणे ॥६॥
तेंवी हें स्मरण न राहो कोणासी । तयास्तु बोलती तदा मुनि ॥७॥
वासुदेव म्हणे तदा तीं तत्काळ । जाहलीं सकळ पूर्वीसम ॥८॥

११८
सहस्त्रार्जुनाचे पुत्र पितृवधें । बहु दु:खी होते परि न बळ ॥१॥
रामपराभव होता त्या अशक्य । अनुकूल एक वेळ तयां ॥२॥
बंधूंस घेऊनि राम जाई वनीं । पाहूनि आश्रमीं दुष्ट येती ॥३॥
समाधिनिमग्न जमदग्नि तदा । पाहूनि तद्वधा प्रवर्तले ॥४॥
व्याकुळ रेणुका पाहूनिही शिर - । घेऊनियां क्रूर निघूनि गेले ॥५॥
धांव धांव रामा, कोठें रे, तूं जासी । ऐसी रेणुकेची आर्त हांक - ॥६॥
वासुदेव म्हणे कानीं येतां राम । धांवूनि आश्रम जवळी करी ॥७॥

११९
भयंकर दृश्य पाहूनि आश्रमीं । परशु खेंचूनि धांव घेई ॥१॥
माहिष्मतीवरी चाल करी वेगें । कर्म दुर्जनांचें भोंवले त्यां ॥२॥
जमदग्निशिर घेऊनि जों येती । गर्जना रामाची तोंचि आली ॥३॥
दशसहस्त्र त्या भ्याडांचीं मस्तकें । छेदूनियां तेथें रचिला ढीग ॥४॥
रुधिरें त्या पूर येई नर्मदेसी । ईशेच्छाचि होती ऐसी तदा ॥५॥
उन्मत्त क्षत्रियसंहार जाहला । एकवीस वेळां रामहस्तें ॥६॥
स्यमंतपंचकीं रुधिरें तयांच्या । भरियेलें डोहां पंच सख्य ॥७॥
वासुदेव म्हणे भूमिभार ऐसा । हरुनियां भक्तां रक्षी देव ॥८॥

१२०
निवेदिती शुक पितृशिर राम । आणूनियां यज्ञ करिता झाला ॥१॥
धडासी तें शिर लावूनियां यज्ञें । परितुष्ट केलें ईश्वरासी ॥२॥
ऋत्विजांसी सर्व भूमि देई दान । कश्यपप्रधान सकल मुनि ॥३॥
सरस्वतीतीरीं अवभृथस्नान । करितांचि भस्म सकळ पापें ॥४॥
जमदग्नितेंही पूर्वदेहप्राप्ति । सप्तऋषींमाजी स्थान लाभे ॥५॥
रामही सावर्णि मन्वंतरीं सप्त - । ऋषींमाजी एक पुढती ऋषि ॥६॥
सर्वसंगत्यागें महेंद्रपर्वतीं । राहिला अद्यापि असे तेथें ॥७॥
वासुदेव म्हणे परशुरामवृत्त । ऐसें, रोमांचित करी देह ॥८॥

१२१
गाधिसुत विश्वामित्रवृत्त आतां । शुकोक्त तें ऐका पुढती हर्षे ॥१॥
तप:सामर्थ्ये तो जाहला ब्रह्मर्षि । एकाधिक त्यासी पुत्र शत ॥२॥
शुन:शेपही तो अजीगर्त सुत । मानीयेला पुत्र विश्वामित्रें ॥३॥
द्रव्याशेनें तो बांधिला स्तंभासी । स्तवूनि देवांसी मुक्त झाला ॥४॥
रक्षिलें देवांनीं तेणें देवरात । नाम कथी त्यास वासुदेव ॥५॥

१२२
विश्वामित्र तया नेऊनि सदनीं । स्वपुत्रांलागूनि वदला ऐका ॥१॥
ज्येष्ठबंधु तुम्हीं मानावें याप्रति । रुचे न हे उक्ति सकलां परी ॥२॥
न रुचे तयांसी शापी विश्वामित्र । मूढहो, व्हा म्लेच्छ अधार्मिक ॥३॥
मधुच्छंदा पुत्र मानूनि ते आज्ञा । बंधु ऐसी संज्ञा देई तया ॥४॥
पाहूनियां मुनि तुष्ट होई मनीं । वंश वाढो जनीं तुमचा म्हणे ॥५॥
आज्ञाधारकांचें यापरी कल्याण । जाहलें जे अन्य पतन तयां ॥६॥
वासुदेव म्हणे विश्वामित्रकथा । ऐकूनियां चित्ता तोष वाटे ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP