या स्कंधांत अनेक बोधप्रद कथा आणि वंश, क्रमानें सांगितले आहेत. वैवस्वत-मनु, मनुपुत्र दिष्ट, तृणबिंदु, अंबरीष, पुरंजय, माधाता, रोहित, भगीरथ, राम-लक्ष्मणादि बंधु, कुश, सोम, पुरुरवा, पुरु, भरत, दिवोदास, ऋक्ष, ययाति, अनु, द्रद्यु,तुर्वसु, यदु, इत्यादींचे सविस्तर वंश सांगितले आहेत. तो तो वंश व त्या वंशांतील महत्त्वाच्या कथा, पुन: वंश, पुन: त्यांतील कथा असा क्रम हें या स्कंधाचें वैशिष्टय आहे. त्यांत इला-सुद्युम्नवृत्त, सुकन्या-च्यवन, रेवती-बलरामविवाह, नाभाग, दुर्वासाची सुदर्शनापासून मुक्ति, इक्ष्वाकु व विकुक्षीची कथा, पुरंजय, युवनाश्च, सौभरि, त्रिशंकु, हरिश्चंद्रकथा, सगरकथा, गंगाप्राप्ति, कल्माषपाद, खट्वांगकथा, रामकथा, बुधजन्म, पुरुरवा-उर्वशीभेटा, त्यांचा वियोग, वेदत्रयीचा उद्गम, सत्यवतीविवाह, जमदग्नी-परशुराम वृत्त, रेणुकावध वपुन:र्दर्शन, विश्वामित्रकथा, शुन:शेपवृत्त, ययाति, शर्मिष्ठा, देवयानी यांचें रम्य कथानक व ययातीला तारूण्यलाभ होतो, तरीहि विषयतृष्णा भोगानें कधींच शमत नाहीं असा अनुभव येतांच ययातीला वैराग्य उत्पन्न होतें. अशा अनेक चित्तवेधक कथा या स्कंधांत आलेल्या आहेत. यानंतर दुष्यंतानें शकुंतलेचा स्वीकार केला, परंतु तो कण्वांच्या आश्रमांतच केल्यामुळें लोकरुढीला भिऊन पुढें तो ती गोष्ट नाकारुं लागला. तेव्हां आकाशवाणी होऊन शकुंतलेचा त्यानें स्वीकार केला. या वेळीं शकुंतलेला पुत्र झालेला होता. त्या भरताचा लौकिक त्याचा प्रजाहितदक्षतेमुळें सर्वत्र झाला. ही कथा थोडक्यांत पण मार्मिकतेनें या स्कंधांत गाइली आहे. नंतर भरताला भरद्वाज नांवाचा पुत्र लाभला. या भरद्वाजाचा जन्म व त्याचें वृत्त मोठे आश्चर्यकारक आहे. भरताच्या खुंटलेल्या (वितथ) वंशाचा वंशज म्हणून भरद्वाजाला वितथ असेंही म्हणत. याच्या वंशांत पुढें परम विरागी रतिदेव हा प्रसिद्धीस आला. अठ्ठेचाळीस दिवस सहकुटुंब उपोषित असलेल्या रतिदेवानें एकूणपन्नासाव्या दिवशीं त्याला मिळालेलें अन्नही क्षुधाकुल अतिथींस दिलें. त्याचें सत्व पाहाण्यास अतिथिवेषानें देवच आले होते. रतिदेवाची निष्ठा पाहून ते संतुष्ट झाले व त्यांनीं त्या सर्वांचें कल्याण केलें. नंतर पुढील वंशकथन करुन ऋष्यशृंगाची कथा निवेदून यदूचा वंश सांगितला. व शेवटीं कृष्णावताराचें कारण आणि संक्षेपानें श्रीकृष्णचरित्र सांगून हा स्कंध संपविला.