स्कंध ९ वा - अध्याय २ रा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य



तपानें मनूसी होती दश पुत्र । अष्टम पृषध्र कथिलें पूर्वी ॥१॥
गुरुगृहीं धेनुरक्षणाचें कार्य । निवेदिती आर्य गुरु तया ॥२॥
खड्गधारी बाळ रजनीमाझारी । धेनूंतें सांभाळी दक्षतेनें ॥३॥
पर्जन्य वर्षतां एकदां गोठयांत । प्रवेशूनि व्याघ्र धेनु हरी ॥४॥
धेनुहंबरडा ऐकूनि धांवला । वार एक केला परम त्वेषें ॥५॥
वासुदेव म्हणे अंधकार घोर । होई विपरीत तयावेळीं ॥६॥


व्याघ्राचा तैं कर्ण परी धेनुमान । तुटली, जाणे कोण दैवलीला ॥१॥
व्याघ्रचि मरण पावला मानूनि । पृषध्र जाऊनि बसला स्वस्थ ॥२॥
प्रात:काळीं वृत्त कळतां गुरुसी । शाप पृषध्रासी शूद्रत्वाचा ॥३॥
शांतपणें शाप स्वीकारुनि बाळ । पाळी ब्रह्मचर्य अत्यानंदें ॥४॥
सर्वसंगत्यागें ईश्वरस्मरण । करुनि, भ्रमण करी सदा ॥५॥
वेडा बधिर वा मानिती त्या लोक । अंतीं वनव्यांत शिरला एका ॥६॥
वासुदेव म्हणे परब्रह्मरुप । पावला तो दग्ध होऊनियां ॥७॥


विरक्तिचि होता कवि । राज्यइच्छा न त्या पाहीं ॥१॥
ध्यानें जाहला पावन । वनीं पावे परब्रह्म ॥२॥
करुषकाचे कारुष । उत्तरेसी करिती राज्य ॥३॥
धार्ष्टपुत्र ते धृष्टाचे । विप्र होती स्वसामर्थ्यें ॥४॥
नृगालागीं तो सुमति । पुत्र तया भूतज्योति ॥५॥
वसु तया एक पुत्र । वसूलागीं तो प्रतीक ॥६॥
ओघवान्‍ ओघवती । कन्या पुत्र तया होती ॥७॥
वासुदेव म्हणे पुत्र । ओघवाना नाम तेंच ॥८॥


मनुपुत्र नरिष्यंताप्रति पुत्र- । ‘चित्रसेन’ त्यास नाम होतें ॥१॥
दक्ष, मीढ्‍वान, कूर्च, इंद्रसेन ऐसे । पुत्र-पौत्र साचे प्रपौत्रही ॥२॥
वीतिहोत्र, सत्यश्रवा, ऊरुश्रवा । क्रम हा जाणावा तत्पुत्रांचा ॥३॥
देवदत्त ‘अग्निवेश्य’ ते पुढती । गोत्र या नामेंचि पुढती एक ॥४॥
वासुदेव म्हणे शुक परीक्षिता । निवेदिती आतां दिष्टवंश ॥५॥

१०
दिष्टासी नाभाग, तया भलदन । वत्सप्रीति जाण पुत्र तया ॥१॥
प्रांशु, प्रमति ते खनित्र, पुढती । चाक्षुष, विविंशति, रंभ पुढें ॥२॥
खनिनेत्र, करंधम, आवीक्षित्‍ । मरुत्त विख्यात यज्ञकर्ता ॥३॥
दम, राज्यवर्धन, सुधृति । नर, केवलासी बंधुमान्‍ ॥४॥
वेगवान्‍, बंधु ऐसी वंशवेल । तृणबिंदु पुत्र बंधुलागीं ॥५॥
वासुदेव म्हणे आलंबुषा नामें । अप्सरा वरी प्रेमें ॥६॥

११
विशाल तैं शून्यबंधु, धूम्रकेतु । पुत्र वंशसेतु तियेठाईं ॥१॥
इडविडा नामक कन्या विश्रव्यासी । दिधली, तियेसी धनद पुत्र ॥२॥
विशालाचा वंश चालला पुढती । वैशाली नगरी रम्य ॥३॥
पुत्र हेमचंद्र, धूम्राक्ष तयाचा । संयमन साचा धूम्राक्षासी ॥४॥
कृशाश्व, देवज पुत्र त्याचे दोन । कृशाश्वासी जाण सोमदत्त ॥५॥
यज्ञकर्ता तोही सुमति तयासी । जनमेजय त्यासी पुत्र एक ॥६॥
वासुदेव म्हणे तृणबिंदुवंश । ऐसा कीर्तिमंत पुढती झाला ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP