स्कंध ९ वा - अध्याय २१ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
१५७
कुंठित वंशांत दत्तक म्हणोनि । वितथा त्या जनीं नाम लाभे ॥१॥
वितथासी मन्य, तया पंचपुत्र । त्यामाजी नरास संकृति तो ॥२॥
गुरु आणि रंतिदेव ते तयासी । रंतिदेवकृति ख्यात जनीं ॥३॥
कुटुंबपोषणयत्नासी न वरी । निर्वाह तो करी यदृच्छेनें ॥४॥
असेल गृहीं ते अर्पी अतिथींसी । यातना आप्तांसी तेणें बहु ॥५॥
वासुदेव म्हणे एकदां प्रसंग । पातला गृहांत तोचि ऐका ॥६॥
१५८
कणही धान्याचा नसतां गृहांत । यत्न रंतिदेव करीचिना ॥१॥
अष्टचत्वारिंशद्दिन तो एकदां । निरन्न उदकावीण राही ॥२॥
एकोनपंचाशद्दिनीं तया कोणी । दिधलें आणूनि घृत, क्षीर ॥३॥
तेंवी शिरा आणि उदक दिधलें । पाहूनि हर्षले कुटुंबीय ॥४॥
अन्नावीण त्याच्या शरीरासी कंप । सुटला होता तोंच दिसलें अन्न ॥५॥
आनंदें भक्षाया बैसती जों तोंचि । पातला अतिथि एक तेथें ॥६॥
वासुदेव म्हणे तयासी पाहूनि । संतोषला मनीं रंतिदेव ॥७॥
१५९
सन्मानूनि तया अतिथीसी तेणें । अन्न वाढियेलें अत्यानंदें ॥१॥
पुढती वांटूनि सकलांसी देई । इतुक्यांत येई शूद्र एक ॥२॥
सर्वांभूतीं सम होता रंतिदेव । उच्चनीच भाव तेथ कैसा ॥३॥
तोषूनियां शूद्र जाई जों निघूनि । येई तयास्थानीं तोंचि अन्य ॥४॥
जवळी तयाच्या होते बहु श्वान । वाढीं म्हणे अन्न सकलां आम्हां ॥५॥
ऐकूनि सदय रंतिदेव त्यांसी । सकलही वाढी उरलें अन्न ॥६॥
वासुदेव म्हणे ईश्वर अतिथि । मानूनि त्या वंदी रंतिदेव ॥७॥
१६०
अवशिष्ट आतां उदकचि होतें । रंतिदेवादि तें अवलोकिती ॥१॥
तोंचि एक येई चांडाळ त्या स्थानीं । पातले लोचनीं प्राण त्याचे ॥२॥
उदकास्तव तो व्याकुळ होऊनि । पाजा म्हणे पाणी कोणी मज ॥३॥
पाहूनि द्रवला मनीं रंतिदेव । उदक सकळ अर्पी तया ॥४॥
वासुदेव म्हणे दात्याचा आनंद । तुच्छ ब्रह्मानंद लेखीतसे ॥५॥
१६१
अन्नोदक तें संपतां । ऐका रंतिदेववाचा ॥१॥
देवा, अणिमादि सिद्धि । नको अर्पूं तूं मजसी ॥२॥
नको अर्पूं मजसी मोक्ष । घडो सर्वांभूतीं वास ॥३॥
दु:खें भोगावी सकलांचीं । प्राणिमात्र होवो सुखी ॥४॥
ऐसें करीं मज देवा । दीन जनांचा विसावा ॥५॥
तृषार्तासी उदक देतां । हरली माझी सकल व्यथा ॥६॥
वासुदेव म्हणे संत । ऐसे देवाहूनि श्रेष्ठ ॥७॥
१६२
शुकमहामुनि बोलती नृपासी । होते ते अतिथि सकल देव ॥१॥
रंतिदेवाचें तें पाहूनियां सत्त्व । मानूनि विस्मय मनामाजी ॥२॥
याहूनि न छळ करवे तयाचा । प्रगटूनि वाचा वदले काय ॥३॥
जाहलों प्रसन्न रंतिदेवा, आम्हीं । इच्छिसी जें मनीं तेंचि मागें ॥४॥
नमस्कार मात्र करी रंतिदेव । आसक्ति न लव तया कोठें ॥५॥
वासुदेव म्हणे मागितलें नाहीं । रंतिदेवएं कांहीं देवांप्रति ॥६॥
१६३
वंदूनि तयांसी राहिला निश्चल । काय हे अपूर्व निरिच्छता ॥१॥
गुणमयी माया त्यागूनियां अंतीं । परब्रह्मरुपीं लीन झाला ॥२॥
संगतींत त्याच्या होतीं जीं सकल । पावलीं अचलस्थान तींही ॥३॥
ऐसा रंतिदेववृत्तान्त कथिला । बोधप्रद झाला वासुदेवा ॥४॥
१६४
आतां मन्युपुत्र नराचा तो वंश । निवेदितों ऐक म्हणती शुक ॥१॥
मन्युपुत्र गर्ग, पुत्र त्याचा शिनि । सुत गार्ग्य जनीं ख्यात तया ॥२॥
असूनि क्षत्रिय ब्रह्मकुलकर्ता । महावीर्य त्याचा बांधव जो ॥३॥
‘दुरितक्षय’ त्या तया तीन पुत्र । त्रय्यारुण्यादिक विप्रत्व त्यां ॥४॥
मन्यूचा जो श्रेष्ठ पुत्र बृहत्क्षत्र । हस्ती तया पुत्र सुविख्यात ॥५॥
वासुदेव म्हणे वसविलें तेणें । हस्तिनापूर तें नगर श्रेष्ठ ॥६॥
१६५
अजमीढादिक तया पुत्रत्रय । अजमीढा होय बृहदिषु ॥१॥
बृहद्धनु, बृहत्काय, जयद्रथ । विशद नामक पुत्र त्याचा ॥२॥
सेनाजित् पुढती रुचिराश्व साचा । प्राज्ञ पुत्र त्याचा पृथुसेन ॥३॥
पार, नीप तया शत पुत्र होते । तेंवी अन्य स्त्रीतें ‘ब्रह्मदत्त’ ॥४॥
शुकाची ते कन्या कृत्वी तिज नाम । न होईं ऐकून चकित ऐसा ॥५॥
वासुदेव म्हणे कन्या ते शुकाची । केंवी तें कथिती शुक स्वयें ॥६॥
१६६
राया, बालपणीं पित्यासी सोडूनि । निघतां मागूनि येती व्यास ॥१॥
छायामय तदा केला अन्य शुक । योजूनि तो तेथ निघूनि गेलों ॥२॥
राया, छायामय शुकासी ते कन्या । माता तेच धन्या ब्रह्मदत्ता ॥३॥
विष्वक्सेन जैगीषव्याचा तो शिष्य । रची योगतंत्र उपकारक ॥४॥
उदक्खन तया पुढती भल्लाद । बृहदिषुवंश ऐशापरी ॥५॥
वासुदेव म्हणे द्विमीढनामक । हस्तीपुत्रवंश परिसा आतां ॥६॥
१६७
यवीनर, कृतिमान्, सत्यधृति । दृढनेमि त्यासी सुपार्श्व तो ॥१॥
तयाचा सुमति सन्नतिमान् त्या । पुढती कृती ज्या सामज्ञान ॥२॥
नीप,अ उग्रायुध, क्षेमा तैं सुवीर । रिपुंजय पुत्र, बहुरथ ॥३॥
अजमीढाचिया नलिनी कांतेसी । पुत्रनील, शांति पुत्र तया ॥४॥
सुशांति पुरुज अर्क तैं भर्ग्याश्व । तया पंचपुत्र मुद्गलादि ॥५॥
पंचदेश रक्षणासी अलं, तेणें । पंचालाभिधानें प्रसिद्ध ते ॥६॥
वासुदेव म्हणे मुद्गला, मौद्गल्य - । नामें ब्रह्मकुल जनीं ख्यात ॥७॥
१६८
मिथुन जाहलें मुद्गलासी एक । पुत्र दिवोदास अहल्या ते ॥१॥
गौतमापासूनि तिज शतानंद । सत्यधृति त्यास पुत्र एक ॥२॥
शरद्वान् तया पुत्र, त्याचें वीर्य । दर्भांत द्विविध रुप धरी ॥३॥
उर्वशीदर्शनें पतन पावूनि । कृप-कृपी जनीं विख्यात तीं ॥४॥
वासुदेव म्हणे द्रोणाचार्यपत्नी । विख्यात ते कृपी हेचि जाणा ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : December 02, 2019
TOP