स्कंध ९ वा - अध्याय ३ रा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१२
वेदतत्त्वज्ञ तो शर्याति मनूचा । पिता सुकन्येचा यज्ञप्रिय ॥१॥
वनविहारार्थ एकदां शर्याति । जातां वनमाजी सैन्यासवें ॥२॥
सुकन्याही कन्या होती तयासवें । हिंडे सख्यासवें काननीं ती ॥३॥
वारुळ तियेनें पाहियेलें एक । ज्योतिद्वय स्पष्ट पाही छिद्रीं ॥४॥
काय तें पहावें म्हणोनि कंटक । घेऊनि करांत टोंची तेथ ॥५॥
भळभळां वाहे पाहूनि रुधिर । म्हणे वासुदेव कन्या भ्याली ॥६॥

१३
मल-मूत्र तदा कोंडे सैनिकांचें । चिंता नृपाळातें ऐकूनियां ॥१॥
राव म्हणे कोणी भार्गवमुनींचा । अवमान साचा केला वाटे ॥२॥
इतुक्यांत कन्या निवेदी वृत्तांत । वारुळासन्निध घडला तोचि ॥३॥
ऐकूनि तें राजा काननीं मुनीतें । क्षमावें कन्येतें ऐसें प्रार्थी ॥४॥
मुनि म्हणे वय कथावें कन्येचें । अर्पिली कोणातें तेंवी वदें ॥५॥
जाणूनि आशय मुनींचा, शर्याति । अर्पूनि मुनींसी कन्या धाला ॥६॥
वासुदेव म्हणे तामसी मुनीतें । बाला सच्चरित्रें तोष देई ॥७॥

१४
ऐसें कांहीं दिन लोटतां वनांत । अश्विनीचे सुत प्राप्त झाले ॥१॥
पूजूनि तयांसी आदरें च्यवन । मागती तारुण्य, रुप, वय ॥२॥
अर्पितां यज्ञांत सोमाचे अधिकारी । व्हाल हें अंतरीं दृढ धरा ॥३॥
अश्विनीकुमार बोलले मुनींसे । सिद्ध डोहामाजी करितां स्नान - ॥४॥
पुरतील हेतु, परी मुनि वृद्ध । जाणें त्या अशक्य डोहावरी ॥५॥
वासुदेव म्हणे यास्तव मुनींसी । धरुनियां नेती कुमारचि ॥६॥

१५
मुनींसवें डोहामाजी । कुमारही घेती बुडी ॥१॥
ऐसा जातां कांहीं वेळ । तिघेही ते येती वर ॥२॥
दिव्य रुप त्यांचें सम । माला कुंडलें समान ॥३॥
सूर्यासम तेज:पुंज । वाटे सुकन्येसी तेज ॥४॥
पति कोण तें कळेना । कन्या प्रार्थी कुमारांना ॥५॥
जाणूनियां सतीभाव । संतोषले मनीं देव ॥६॥
वासुदेव म्हणे पति । दावूनियां देव जाती ॥७॥

१६
ऐसी पतीसवें वसतां सुकन्या । एकदां त्या स्थाना येई राव ॥१॥
मुनि न दिसतां लावण्यसंपन्न । पुरुष पाहून क्रुद्ध होई ॥२॥
वंदितांही कन्या न होईचि शांत । कुलासी कलंक म्हणे माझ्या ॥३॥
म्हणे जगद्वंद्य मुनींसी त्यागूनि । दुष्टे, हें काननीं करिसी काय ॥४॥
उभय कुळांतें लोटिसी नरकीं । हांसोनि तैं कथी सकल कन्या ॥५॥
ऐकूनि तें वृत्त शर्याति तोषला । हृदयीं कन्येला धरी प्रेमें ॥६॥
वासुदेव म्हणे शर्यार्तियज्ञांत । मुनि कुमांरांस अर्पी सोम ॥७॥

१७
वर्ज्य कुमारांसी अर्पितांचि सोम । कराया शासन सजला इंद्र ॥१॥
परी च्यवनाच्या तपानें तयाचें । कुंठितचि साचें बळ सर्व ॥२॥
पाहूनियां सोम अश्विनीकुमारां । अर्पिण्याचा झाला नियम तदा ॥३॥
मान्यता सकळ देतांचि मोकळा । देवेंद्र जाहला क्षणामाजी ॥४॥
वासुदेव म्हणे तपाचें सामर्थ्य - । दावितां, अशक्य काय जनीं ॥५॥

१८
निवेदिती शुक शर्यातीचे पुत्र । राया, नामें ऐक कथितों त्यांचीं ॥१॥
उत्तानबर्हि, तो आनर्तही दुजा । भूरिषेण तिजा पुत्र तया ॥२॥
आनर्ताचा पुत्र ‘रेवत’ विख्यात । कुशस्थळीं वास करी मोदें ॥३।
शत पुत्र तया ‘ककुशी’ वरिष्ठ । रेवती तयास कन्या एक ॥४॥
वासुदेव म्हणे चिंतूनियां वर । ब्रह्मलोकीं राव कन्या नेई ॥५॥

१९
ब्रह्मदेवाप्रति कन्या हे अर्पावी । इच्छा हेचि पाही मनीं त्याच्या ॥१॥
परी सभेमाजी चाललें गायन । पाहूनियां क्षण एक राहे ॥२॥
संपतां तें राव विनवी ब्रह्ययासी । हांसूनि विरंची वदला तया ॥३॥
म्हणे सत्तावीस चौकडया लोटल्या । जा आतां स्वस्थळा सत्वरी तूं ॥४॥
कृष्ण नारायण बळराम शेष । भूमंडळीं देख प्राप्त झाले ॥५॥
यास्तव रामासी अर्पी जा कन्येसी । ऐकूनि नृपासी परम हर्ष ॥६॥
वासुदेव म्हणे रेवती-बलराम । विवाहानें धन्य पुढती झालीं ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP