स्कंध ९ वा - अध्याय ४ था

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


२०
नभगपुत्र तो नाभाग । गुरुगृहीं विद्याभ्यास ॥१॥
ब्रह्मचर्ये बहुत दिन । करी, बंधू तें पाहून ॥२॥
मानिती हा न येईचि । म्हणूनि संपदा वांटिती ॥३॥
म्हणती येतां नाभागातें । पिता देऊं तव वाटयातें ॥४॥
ऐकूनि तो पित्यालागीं । सर्व वृत्तांत निवेदी ॥५॥
वासुदेव म्हणे पिता । कथी काय तेंचि ऐका ॥६॥

२१
द्रव्यासम नसें भोग्य मी नाभागा । भेटें जा अंगिरा करिती यज्ञ ॥१॥
षडहकर्मी त्यां सर्वदा संदेह । ‘इदमित्था सूक्त’ शिकवी तयां ॥२॥
तेणें अवशिष्ट द्रव्य यज्ञांतील । देऊनि जातील स्वर्गांत ते ॥३॥
ऐकूनि नाभाग जाई यज्ञामाजी । अंगिरा मुनींसी शिकवी सुखें ॥४॥
तदा मुनि तया अवशिष्ट द्रव्य । अर्पूनियां स्वर्ग गांठिताती ॥५॥
काळपुरुष तैं म्हणे नाभागासी । द्रव्याचा तुजसी अधिकार न ॥६॥
वासुदेव म्हणे वृत्तांत नाभाग । कथितांचि रुद्र म्हणे ऐका ॥७॥

२२
जाईं रे, पित्यासी पुसेनियां येईं । कथितां तो देई द्रव्य माझें ॥१॥
अवशिष्ट द्रव्य सकल रुद्राचें । यज्ञाचा हा असे नियम जाणें ॥२॥
ऐकूनि नाभाग जाऊनियां पुशी । पिता म्हणे कथी सत्य रुद्र ॥३॥
दक्षयज्ञामाजी झाला हा नियम । तेंवी सर्व धन रुद्राचेंचि ॥४॥
ऐकूनि नाभाग शरण रुद्रासी । जाऊनि तयासी अर्पी धन ॥५॥
पाहूनि सद्‍वृत्त संतोषला रुद्र । कथी वासुदेव पुढती ऐका ॥६॥

२३
नाभागा, पित्यानें तव केला योग्य न्याय ।
पुत्रलोभेंही नाहींचि वरिला अन्याय ॥१॥
ऐकूनि तो न्याय तूंही वागलासी तैसा ।
पाहूनि हें वृत्त तव पावलों संतोषा ॥२॥
यास्तव अर्पितों धन संतोषें हें तुज ।
मज जाणसीच आतां होवो ब्रह्मबोध ॥३॥
कथूनियां ऐसें रुद्र पावे अंतर्धान ।
पुण्यप्रद पढेल जो नित्य हें आख्यान ॥४॥
शिवप्रसादें त्या मंत्र तेंवी ब्रह्मबोध ।
म्हणे वासुदेव होई जाणा हा सिद्धांत ॥५॥

२४
शुकमहामुनि कथिती नृपासी । अंबरीष जगीं भाग्यशाली ॥१॥
अन्यथा न कदा होई विप्रशाप । परी अंबरीष अपवाद त्या ॥२॥
परीक्षिती म्हणे ब्रह्माही समर्थ । नसे, अंबरीष तरला केंवी ॥३॥
वृत्त तें सकळ मुने, मज सांगा । तुम्हांविण वक्ता कोण जगीं ॥४॥
वासुदेव म्हणे रायाप्रति शुक । निवेदिती तेंच कथितों ऐका ॥५॥

२५
शुकमहामुनि कथिती नृपासे । अंबरीष जगीं भाग्यशाली ॥१॥
दुर्लभ जें नरा ऐश्वर्य तें त्यासी । भासे तो भ्रमचि परी तया ॥२॥
अंकित तयाच्या सप्तद्वीपा पृथ्वी । मृत्तिकाचि त्यासी परी धन ॥३॥
ईश, ईशभक्तांवरी त्याचें प्रेम । गाई त्याचे गुण वासुदेव ॥४॥

२६
सर्वकाल ज्याचें मन ध्यानरत । श्रीकृष्णचरित्र चिंतीतसे ॥१॥
ईशगुणगानीं दंग ज्याची वाणी । हस्त, सेवाकर्मी सदा रत ॥२॥
निवृत्तिप्रधान कथा रुचे कर्णां । आवडे लोचना कृष्णमूर्ति ॥३॥
ईश्वरभक्तांसी आलिंगी शरीर । निर्माल्य सुगंध घ्राणेंद्रिया ॥४॥
प्रसादभक्षणीं लांचावे रसना । पाद तीर्थाटना सिद्ध सदा ॥५॥
वासुदेव म्हणे भक्त - भगवंत - । वंदना, मस्तक नम्र त्याचें ॥६॥

२७
सदा परमेश्वरार्पण । बुद्धीनेंचि करी कर्म ॥१॥
सर्वांठायीं भरला ईश । हेचि भावना जयास ॥२॥
विप्रआज्ञा ते ईशाची । मानूनियां राज्य भोगी ॥३॥
वसिष्ठादि मुनिद्वारा । विविध यज्ञांत रंगला ॥४॥
देव मानव समान । यज्ञामाजी त्याच्या जाण ॥५॥
देवांसम मानवांचें । यज्ञांत त्या न लवे पातें ॥६॥
वासुदेव म्हणे ऐसे । प्रेक्षणीय यज्ञ त्याचे ॥७॥

२८
आश्रितही त्याए मुंकुंदाचे भक्त । स्वर्ग तया तुच्छ भक्तीहूनि ॥१॥
अंतीं सर्वसंगत्यागयुक्त भक्ति । करुनि ईशासी प्रिय राव ॥२॥
दुष्टनिवारक भक्तसंरक्षक । अर्पी प्रभु चक्र तयालागीं ॥३॥
ईश्वरतोषार्थ साधनद्वादशी । करी राव चित्तीं धरुनि भाव ॥४॥
कांतेसवें एक अब्द केलें व्रत । श्रवणीय वृत्त कथितों ऐकें ॥५॥
वासुदेव म्हणे बोलूनियां ऐसें । वृत्तांत नृपातें कथिती शुक ॥६॥

२९
व्रतसमाप्तीसी कार्तिक दशमी । द्वादशीच्या दिनीं एकभुक्त ॥१॥
एकादशीप्रति करी उपोषण । यमुनेचें स्नान मधुवनीं ॥२॥
अभिषेक पूजा करी श्रीहरीची । विरागी भक्तांसी तेंवी पूजी ॥३॥
ज्ञात्या विप्रांप्रति षड्रस भोजन । तेंवी इच्छेसम दक्षिणाही ॥४॥
सुस्वभावी अल्पवयाच्या दुधाळ । अर्पी त्यां नृपाळ धेनु बहु ॥५॥
सालंकृत साठ कोटि धेनु ऐशा । झुलींसवें त्यांच्या सदनीं धाडी ॥६॥
वासुदेव म्हणे सांगता व्रताची । करावया ऐसी शक्ति तया ॥७॥

३०
विप्राज्ञा घेऊनि पारणासी सिद्ध । पातले दुर्वास तोंचि तेथें ॥१॥
पाहूनि तयांसी अत्यादरें पूजी । भोजनार्थ प्रार्थी विनयें तयां ॥२॥
करुनि तें मान्य कालिंदी तटाकी । आन्हिकासी जाती मुनिश्रेष्ठ ॥३॥
स्नानसंध्यादिक चाललें मुनींचें । चिंता नृपाळातीं वाटे बहु ॥४॥
घटिका एकचि राहिली द्वादशी । व्रतभंगभीति मनीं वाटे ॥५॥
वासुदेव म्हणे शास्त्रार्थ विप्रांसी । अत्यादरें पुशी नृपश्रेष्ठ ॥६॥

३१
आमंत्रित विप्रा त्यजूनि भोजन । करितां अवमान होई त्याचा ॥१॥
व्रतपूर्ति तेंवी सन्मान विप्राचा । प्राशितां उदका होई वाटे ॥२॥
विप्रही तयासी निवेदिती तेंचि । पारणा जलेंचि करी राव ॥३॥
इतुक्यांत येती दुर्वास त्या स्थानीं । सकळ जाणूनि क्रुद्ध होती ॥४॥
आधींच कोपिष्ट त्यांत क्षुधाकुल । कांपे थरथर अंग त्यांएं ॥५॥
वासुदेव म्हणे क्रोधाकुल मुनि । अपमान जाणूनि उठले वेगें ॥६॥

३२
म्हणती मदांध जाहला हा राजा । करी अतिथीचा अपमान ॥१॥
पाचारुनि मज वागला हा ऐसा । प्रभाव तपाचा पाहो आतां ॥२॥
बोलूनियां जटा उपटिली एक । निर्मी भयानक कृत्या तेणें ॥३॥
धांवली ती क्रोधें राजावरी क्रौर्ये । करीं तळपलें खड्‍ग तिच्या ॥४॥
महाभयंकर पाहूनिही कृत्या । लेश न भयाचा नृपाळासी ॥५॥
वासुदेव म्हणे ईश विश्वाधार । जयासी आधार निर्भय तो ॥६॥

३३
संकटापूर्वीचि योजितो उपाय । देव भक्तांस्तव कनवाळु ॥१॥
आधींचि प्रेरिलें होतें सुदर्शन । कृत्या बलहीन झाली तेणें ॥२॥
क्रुद्ध सर्प जेंवी अंगावरी यावा । तोंचि गवसावा वणव्यामाजी ॥३॥
तैसीच ते कृत्या होई भस्मसात । मुनीमागें चक्र धांव घेई ॥४॥
दशदिशा धांव घेती तदा मुनि । त्रैलोक्यीं त्यां कोणी संरक्षीना ॥५॥
मुनि ब्रह्मदेवा विनवितां तोही । सामर्थ्य तें नाहीं मजसी म्हणे ॥६॥
वासुदेव म्हणे दुर्वास शिवासी । विनवितां त्याची वाणी ऐका ॥७॥

३४
दुर्वासा, अनंतकोटि ब्रह्मांडांचा । चालक जो त्याचा प्रभाव हा ॥१॥
मोठमोठे आम्हीं देव महादेव । करणार काय विष्णूपुढें ॥२॥
यास्तव शरण जाईं तूं त्यासीच । वैकुंठीं दुर्वास तदा जाती ॥३॥
अपराध केला म्हणती भक्तीचा । दया करीं आतां तूंचि देवा ॥४॥
भगवंता, तव महिमा अगाध । कांहींचि अशक्य नसे तुज ॥५॥
वासुदेव म्हणे भक्तपराधीन । बोले भगवान काय ऐका ॥६॥

३५
विप्रा, तुझ्या रक्षणार्थ । जाण नसें मी स्वतंत्र ॥१॥
मजसाठीं सर्व त्याग । करिती तयांचा मी दास ॥२॥
पतिव्रतेसी जैं पति । रक्षी, तेंवी मी भक्तांसी ॥३॥
मुक्ति घेऊनियां चारी । उभा तयाच्या मी द्वारीं ॥४॥
परी मजवरी प्रेम । त्याचें, मोक्षही त्यजून ॥५॥
इच्छिती जे माझी सेवा । सांभाळणें भाग तयां ॥६॥
वासुदेव म्हणे देव । सेवकही भक्तांस्तव ॥७॥

३६
अभिमानत्याग करिती तयांचा । अभिमान साचा धरणें लागे ॥१॥
भक्तांसी संतोष तेंचि माझें सुख । मी त्यांच्या हृदयांत, तेही माझ्या ॥२॥
दुर्वासा, तूं जरी इच्छिसी कल्याण । छळासी कारण तेथेंचि जा ॥३॥
प्रभाव आपुला दावी जो सज्जना । तयाचीच दैना होई जगीं ॥४॥
तपश्चर्या विद्या मोक्षद विप्रासी । योजितां कुमार्गी महाभय ॥५॥
अंबरीषइच्छा नसतांही मज । प्रतिकार तुज करणें प्राप्त ॥६॥
भक्तचि सामर्थ्य आंवरिती माझें । यास्तव भक्तांतें शरण जाईम ॥७॥
वासुदेव म्हणे बोले भगवान । नित्य पराधीन भक्तांच्या मी ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP