स्कंध ९ वा - अध्याय ७ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


परीक्षिता, मांधात्यासी अंबरीष । तया यौवनाश्व पुत्र होई ॥१॥
पुरुकुत्साप्रति ‘नर्मदा’ नामक । अर्पिताती नाग स्वभगिनी ॥२॥
नागांस्तव तेणें वधिले गंधर्व । नसे सर्पभय स्मरणें त्याच्या ॥३॥
त्रसद्दस्यु तया, तया अनरण्य । हर्यश्व, आरुण पुढती क्रमें ॥४॥
तया त्रिबंधन, सत्यव्रत तया । नांव त्रिशंकु त्या जनीं रुढ ॥५॥
वासुदेव म्हणे त्रिशंकूचें वृत्त । ऐकूनि चकित व्हाल आतां ॥६॥

५४
विवाहसमयीं विप्रकन्या एक । त्रिशंकु उन्मत्त हरुनि नेई ॥१॥
‘चांडाळ हो’ ऐसें विप्र तया शापी । विश्वामित्र त्यासी चढवी स्वर्गी ॥२॥
ढकलूनि देती परी तया देव । ऊर्ध्व चरण शिर खालीं होई ॥३॥
तैसाचि त्या ठाईं तया विश्वामित्र । रक्षी, अद्यापि तो दिसतो नभीं ॥४॥
पुत्र त्याचा हरिश्चंद्र नामें ख्यात । विश्वामित्रें राज्य हरिलें त्याचें ॥५॥
वासुदेव म्हणे यज्ञदक्षिणार्थ । हरुनियां राज्य छळिलें नृपा ॥६॥

५५
ऐकूनि तें कुलगुरु नृपाळाचे । शापिती मुनींतें पक्षी होई ॥१॥
वसिष्ठांही परी शापी विश्वामित्र । मुने होईं बक वदला क्रोधें ॥२॥
ऐसे होऊनि ते पक्षी बहु काल । होती परस्पर युद्धमग्न ॥३॥
संतानार्थ राव प्रार्थी वरुणातें । पुत्र दे मी त्यातें हविन यज्ञीं ॥४॥
‘रोहित’ नामें त्या तदा पुत्र होई । यज्ञरत होईं वरूण म्हणे ॥५॥
वासुदेव म्हणे हरिश्चंद्र तदा । म्हणे शुद्ध होतां हवन करुं ॥६॥

५६
दश दिन ऐसे जातां म्हणे राव । होईल पवित्र दंत येतां ॥१॥
पुढती ते येतां म्हणे राव याचे । पडतां दुग्धाए दंत शुद्धि ॥२॥
पडतां ते दंत, म्हणे नूतनाची । प्राप्ति होतां शुद्धि पुत्राप्रति ॥३॥
नूतनही येतां म्हणे हा क्षत्रिय । लेईल कवच तदा शुद्धि ॥४॥
ऐसी टाळाटाळ करी हरिश्चंद्र । वृत्त रोहितास कळलें तदा ॥५॥
घेऊनि धनुष्य गेला तो काननीं । क्रुद्ध तें पाहूनि वरूणदेव ॥६॥
अंतीं हरिश्चंद्रा होई जलोदर । म्हणे वासुदेव पुढती ऐका ॥७॥

५७
परिसूनि वृत्त वनीं तें रोहित । यावयासी सिद्ध होई ग्रामीं ॥१॥
पाहूनि तें इंद्र निवारी तयासी । पांच वेळ ऐसी घडली कृति ॥२॥
अंतीं अजीगर्तपुत्र शुन:शेष । घेऊनियां क्रीतपुत्र येई ॥३॥
पाहूनि तयासी तोषला वरुण । रोगनिवारण केलें क्षणीं ॥४॥
यज्ञांत त्या इंद्रें सुवर्णाचा रथ । अर्पिला रायास अत्यानंदें ॥५॥
वासुदेव म्हणे यज्ञाचें त्या वृत्त । कथितील शुक समयीं पुढें ॥६॥

५८
सत्यव्रत त्याचें पाहूनि संतुष्ट । होई, विश्वामित्र ज्ञान अर्पी ॥१॥
पुढती वैभव भोगिलें नृपानें । आत्मानात्मज्ञानें कृतार्थ तो ॥२॥
स्वस्वरुपीं स्थिर जाहला ध्यानानें । पृथिव्यादि क्रमें लीन होई ॥३॥
अहंममतत्वीं पाही ज्ञानकला । ब्रह्मरुपीं झाला स्थिर ऐसा ॥४॥
वासुदेव म्हणे जाळूनि अज्ञान । ज्ञानामाजी लीन होई ज्ञाता ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP