॥प्रसंग॥ ११८
एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले.
॥श्रीरामसमर्थ॥
(राग कामोद धाटी लाऊनिया०) ॥पद॥ नावरे निरंतर हें अनावर । अवरी सत्वर देवराया रे॥धृ०॥
माझीच पारखी मज । म्हणोनि शरण तुज । शरणागताची लाज राख रे रामा ॥ तुझीया रंगणीं मन । धरितें अभिमान ।
तयासि निर्वाण करि देवा रे ॥२॥
रामीराददासी भाव । धरितां प्रगटे देव । मनाचा स्वभाव पालटावा रे ॥३॥
॥वोवी॥ धन्य भक्ताचें सप्रेम लक्षण । श्रीरामाविण नेणती आन । ह्मणोन सर्वदां असे प्रसन्न । इछिले आर्थाते पुरवितु ॥१॥
देव भक्ताचें अभेद सख्य । येरयेरां नावडे आणिक । भक्तां भक्तीचें थोर हरिख । सांगणें सुख दु:ख त्यासी च ॥२॥
मागणें रिझवणें करणें सत्ता । संकटीं किंवा संतोखीं असतां । उठतां चालतां खातां बोलतां । देवाजीला न विसंबती ॥३॥
दासमहाराज पुण्यश्लोकी । येकदां असतां कृष्णातटाकीं । उगें चे वाटलें रमोन विखीं । मन हें जालेंसे अनिवार ॥४॥
तेणें देवाचें मांडिलें स्तवन । वळोन मनाला केलें लीन । सप्रेम स्थितीचें कीजे व्याख्यान । तरि विलोका सधर पदान्वईं ॥५॥
ह्मणाल दासतो निजनिर्विकार । नेणती मनपणा नाहीं विकार । सत्य हो तुमचा भावार्थ थोर । परि भक्तिप्रियकर श्रीराम ॥६॥
अपेक्षूनिया स्तवनभातुक । भक्ता गाजविती पाहूं कौतुक । जैसें सुखसेजीं असतां बाळक । उठवोन मायेनें लाड पुरवी ॥७॥
धन्य ज्ञानी ते निजनिष्कळंक । जेथ मन ना साध्य ना साधक । येरवीं मनाचें लक्षण आसक । अनावरचि इतरासी ॥८॥
॥श्लोक॥ मननिं मन भरेना चित्स्वरुपीं मुरेना । विषयधन उरेना वासना हे पुरेना । भवजळ सतरेना मी पणें मी तरेना । जनमदु:ख सरेना मृत्यु माहा हरेना ॥१॥
॥अभंग॥ करीतां साधन नाटोपे चि मन । गुरुकृपेंवीण कांहीं केल्या ॥१॥
वायु बांधवेल योगाचेनि बळें । नभीं वेंघवेल ध्यानयोगें ॥२॥
साधितां औषधी क्षुधाग्री शमेल । न मागवें जळें तरु खातां ॥३॥
सोडुनिया भूमी राहूं ये निराळीं । घट्ट ब्रह्मटाळी लाविजेल ॥४॥
असाध्य कर्तृत्व करामत सित्धी । अनेक उपाधी साधवेल ॥५॥
परि हें नाटोपे मानस दुर्गम । जरि आत्माराम साह्य नाहीं ॥६॥
॥वोवी॥ मनें चि मायाविस्तार सकळ । मनाचेनि सर्व ही दिसाव जालें । फिरुन मनाचें पाहतां मूळ । कांहीं च नाहीं नाहीं नसे ॥९॥
॥अभंग॥ मनें चि तारक मनें चि मारक । सर्वही चाळक होये मन ॥१॥
मनांवाचुनिया न घडे चि क्रिया । परि मिथ्या माया जाणिजे हे ॥२॥
सित्धाचें बोलणें स्वानुभवसुख । आरुष साधक काय जाणे ॥३॥
आत्मारामकृपा जरि होय लक्ष्य । घडेल हा लाभ परमार्थ ॥४॥
॥वोवी॥ श्रीरामकृपेचें लाहुनि वैभव । स्वरुप अनुसंधानप्रभावें । पाह्तां मनाचा नुरे चि ठाव । यद्यपी सुमना भय काय ॥१०॥
इनप्रकाशीं न मिरवे शसी । आप्तवर्ग रुसण सन्यासासी यद्यपी मन हें सज्ञानियासी । उपासनारुपें दे गोडी ॥११॥
येकदां सद्गुरुसमर्थस्वामी । निवोन निवळले अंतर्यामीं । तरी ही रिघोन साधकधर्मी । प्रार्थिले श्रीरामा मनास्तव ॥१२॥
ऐकोन भक्ताचें सप्रेम स्तवन । हिरतिलें मनांत श्रीमनमोहन । कांहींच नुरवितां भेदभयभान । सख्यत्व निधान दाविलें ॥१३॥
तें सौख्यदायक वरदवचन । कल्याणजीनें ठेविलें लिहून । येक्या अवसरीं साधक प्रवीण । पातला शरण स्तवित भावें ॥१४॥
जयजया जी सद्गुरुसमर्था । जय अनाथनाथा मोक्षदाता । भवभयाची नुरविसी वार्ता । शरण आलिया पदपद्मा ॥१५॥
काय सांगूं मी माझी अवस्था । नाटोपे मन हें अनिवार सर्वथा । नाडवित जी देखत देखतां । हडबडलों फार वळेना ॥१६॥
झडी उडी पडी वोढी मन हे । दृष्टीस नाणी हितमितुसोय । करणें असेल तरी करा उपाय । नातरी शब्द ठेऊं नका ॥१७॥
ऐसें ऐकतां अधैर्यवचन । नाभीकार तया देऊनि सज्जन । देवविले अभंग ते लिव्हवोन । पारायण करित जा ह्मणतिलें ॥१८॥
धरुन हातीं ते करितां पठण । तात्काळ पावला समाधान । लिहितों अभंग ते करा श्रवण । जानकीरमण पावेल ॥१९॥
॥अभंग॥ (पतीतपावना जानकीजीवना । वगैरे अभंग पाच-पहा तिसरा भाग अभंग ३०७-३११)
॥वोवी॥ ऐसी जयाची अद्भुतकरणी । तयाचे वंशावळींत सद्गुणी । शिवरामस्वामी भक्त सज्ञानी । कल्याणस्वामीचा प्रियशिष्य ॥२०॥
मागिल्याध्याईं त्याचें कथन । भक्तजनाला करीत पावन । अपचंदामाजीं राहिलें येऊन । पुढें चरित्र अवधारा ॥२१॥
निर्मळ जयाची करणें महंती । भले जाणते ते आज्ञा इछिती । विस्तार जाली चहुंकडे कीर्ति । विरक्ती ज्याची क्रमयुक्त ॥२२॥
भले साधु ते मानिले हरिख । कपटसंताच्या अंतरीं दु:ख । मी ज्ञानी ह्मणवितो विप्र येक मूर्ख । तळमळे थोरिव न पाहवे ॥२३॥
लसलसीत पाहतां तुळसीवृक्ष । दुर्मद अविंधा वाटे तुछ । सन्मुखी पाहतां निस्पृही दक्ष । उठे ज्याराचें डोचक ॥२४॥
रटकल्लगावीं असतां गुरुनाथ । तेथ पातला कुटिळ विरक्त । तळमळे देखुनि स्वामिरायात । दंशिलें वृश्चिक जेवि गुदीं ॥२५॥
प्रयोग मांडला न करी कहर । छळणा कुचेष्टा न मिळे ठौर । पोटीं प्रवेशतां भंगिजे कळिवर । विखप्रयोग तेसा करुं पाहे ॥२६॥
दरिद्रिणी असे येक महतारी । स्वामिराजकृपा फार चि तिजवरी । सेविता तीहातीं लोणीभाकरी । पुन्हां न सेविती कांहीं मिळो ॥२७॥
ठेऊन केलेला झाकूनि पाक । गेली आई ते आणूं उदक । इकडे नष्टांनीं लोण्यांत विख । मिळविलें मारक तात्काळीं ॥२८॥
विखमाव कळलें उचलितां ग्रास । कळवितां वृत्धेचें विटेल मानस । नैवेद्य समर्पिला असे देवास । ह्मणोन सेविलें पोटभरी ॥२९॥
संरक्षिता श्रीरघुनंदन । परी स्थूळदेहशक्ती जाली क्षीण । येवढी तरि बाधा होऊं कारण । मनें भक्तानिं अंगिकारिलें ॥३०॥
बळत्कार न करिती देवांनीं तेणें । नाहीं जयाला औषध सेवन । वैद्यादि करुं येतां प्रयत्न । किमपि न घेती मनावरी ॥३१॥
रामनामकथा जयाचें वखद । न बाधी तेणें तनुखेदभेद । सज्जनगडयात्रा करुं आनंद । घेऊन समुदाव चालिले ॥३२॥
अपचंद्रग्रामीं मठ जो केला । शिष्यसमुदाउ तेथें राहिला । न विसंबती उपासनेला । सर्वदा साह्य मारुती ॥३३॥
पुत्रासिष्यदोरुपी येक रामचंद्र । पांच वरषाचे पूर्ण योगेंद्र । घेऊन प्रीतीनें स्वारीवर । अध्यात्मविद्या सिकविती ॥३४॥
सप्रेमभावें करविती भजन । सांगून स्वरसंज्ञा गाविती गाण । एवं पाहत पाहत देवभक्तस्छान । डोमगावासि पातले ॥३५॥
कळतां जालेलें संतअगमन । गुरुबांधवादि साधुसज्जन । आले निवाले होत संतर्पण । करिती कीर्तन ऐकती ॥३६॥
मेखळादि करुन सर्व साहित्य । गुरुसमाध पूजिलें यथाविध्युक्त । सगुणरुपी जडोन चित्त । व्याकूळ हो पाहतां ते क्षणीं ॥३७॥
जालें गुरुचें साक्षात दर्शन । गुरुदास ऐसा लाडका पूर्ण । सर्वत्राची आस्था जाणून । केलें कीर्तन प्रेमभरें ॥३८॥
॥पद॥ साधू देखतां मानसे नीचे सप्रेम दुणावें । सहज नासती भवभ्रम यावे । निजपदवी फावे ॥धृ०॥
मिथ्या मायेचा विचार सारा । कळला उपचारा । जैसा जळधीचा मृगांबु सारा । हा दृश्य पसारा ॥१॥
ऐसा सद्गुरु योगीराजा तो स्वामी माझा । स्मरतां कल्याण तरला सहजा । शिव घाली पैजा ॥२॥
॥वोवी॥ मग सर्वत्राचा निरोप घेऊन । माहुलीकडे करितां प्रयाण । संतसखा जो रखुमाईरमण । बाहिलें स्वप्नीं पंढरीसी ॥३९॥
तंव चालिले अडवे होऊनि तुकाई । नेतां मूळपीठा आले निस्पृही । संपादूनिया यात्राविध तेही । पंढरीस आले मिरवत ॥४०॥
संपादूनिया यात्राविधान । सप्रेमभरे केलें कीर्तन । पुसावें नलगे करुं प्रयाण । बाहवया येती सन्मानिती ॥४१॥
मुमुक्षु भल्यांनीं घेती उपदेश । कळवोन घेती परमार्थरहस्य । सत्पुरुषांनीं इच्छिती सहवास । पावती संतोषें अन्नार्थी ॥४२॥
संग्रहीं शाहणे सांप्रदाई । कीर्तन करिताती उतरले ठाई । वळिती अक्षरें अर्थ नेणतेही । पूसती करिती पाठांतर ॥४३॥
॥पद॥ नमन गणराया मति दे माधवगुण गाया ॥४३॥ मंगलमूर्ती मंगलकीर्ति मंगळविद्या मज दे स्फूर्ती ॥१॥
सर्वारंभीं पूजिती गणपती । श्रुतिपरात्पर तुजला गाती ॥२॥
चिंतामणी भय चिंता वारी । विघ्नाविनाशन दुरित निवारी ॥३॥
मोरिश्वरा तूं कल्याणदाता । दे वर श्रीवर उत्तम गाता ॥४॥
रंगीं येई माते शारदे बुत्धि देई माते माते शारदे ॥धृ०॥
हरिहरांतर सकळिक अंतरीं । व्यापक अंतरीं जीवनकळा ॥१॥
रघिविरवरदा कविवरवरदा कल्याणवरदा योगलीळा ॥२॥
मैना ज्यानो अजेब तुमारे खेल गुरुजी । घटमे गयबकी जोत जगावे बिनबत्ति बिनतेल गुरुजी ॥१॥
रावहि रंक क्षणमे हो रहे । साहेब कर्त्ता मेल गु०॥२॥
मानपुरी प्रभु सद्गुरु द्वारें । ले मन बास फुलेल गुरुजी ॥३॥
॥वोवी॥ प्रसन्न जयाते जनकजावाई । वानवेल किती हो लीळानबाई । पावतां पावले संभयागांवीं । केलें नैवेद्य कीर्तन ॥४४॥
ऐकणार भोळे प्रज्ञावंत । बोलणें जालें वेदांत सित्धांत । सेवटी शिवाचें वानिलें चरित । गुरुवचनावरुन अगाध ॥४५॥
॥पद॥ देवाधिदेवा चंद्रमौळी ॥धृ०॥ वृषभारुढ जाला । कैलासाहुनि आला ॥१॥
गळा रुंडमाळाऊर्ध्वदंड टीळा ॥२॥
चिताभस्म आंगीं । जटाधारी जांगी ॥३॥
त्रिशूलडमरु करीं । करीं खापर घरी ॥४॥
ग्रंथ शोधुनि करी । तो त्रैलोक्या वाटेकरी ॥५॥
॥वोवी॥ कीर्तनीं तोषले जनसंतवृंद । चालिले पुढारी ब्रह्मानंद । नाहीं द्रव्याशा भोजनीं वेध । कां गुंततील सांगा लौकिकीं ॥४६॥
राहुनियां माहुलीसंगमीं । मानपान पावोन सातारग्रामीं । समीप पातली माघवद्यनौमी । ह्मणोन पातले गडावरी ॥४७॥
आहो श्रोतेनो उल्हासलहरी । येतां संदर्भु राहिला दुरी । आतां दृष्टीते करुन माघारीं । सिंहावलोकन करा हो ॥४८॥
अपचंदाहून सद्गुरुमूर्ती । करित यात्रा ते पुढतपुढतीं । पातले गोदेच्या उगमाप्रती । विलोकिलें सर्व रामलीळा ॥४९॥
निघावें यात्रा संपली तेथुनि । विनविते जाले क्षेत्रद्वितांनीं । अक्रावे दिवसीं सिंहपर्वणी । असे गंगेंचें आगमन ॥५०॥
येताती पर्वाला भले दुर्होन । रामदासादि दीधलेम मान । तुह्मी तों जाणता सर्व महिमान । जें विहित दिसेल तें करा ॥५१॥
ऐसे ऐकतां धरामरवाणी । अवस्य ह्मणतिलें श्रीमोक्षपाणी । गंगोद्भवस्थानापासी येऊनि । उभे राहिले स्तवनकरित ॥५२॥
जय त्रितापशमने गंगाबाई । मुनिमोहने प्रसन्न होई । ऐसें बहु स्तविलें तयें समयीं । तद्वत वाखाणूं स्वल्प ऐका ॥५३॥
॥पद॥ जय जय श्रीगंगे । भवभंगे । वोपिसी दीना श्ल्लाघ्य ॥धृ०॥
स्मरतां कृपेन । पावोन करिसी पुण्यवान ॥१॥
ब्रह्माहरिहर सुरवर । तव स्तवनीं सादर ॥२॥
तीर निवासी जे होती । पावती उर्ध्वगती ॥३॥
महिमा वांनाया समुळीं । ऐसा कोण बळी ॥४॥
घेतां तव नाम सप्रेम । तोषे आत्माराम ॥५॥
॥वोवी॥ वर्णोन यापरी वदले सेवटीं । जय दीनमाउले ऐक येक गोष्टी । घेऊं जातसो गुरुराजभेटी । नायके प्रेम अवधीला ॥५४॥
गुरुपुत्रावरी तुमची प्रीत । तरी ये च समई पुरविजे हेत । न ठेविजे भक्ता आळ निमित्य । सत्ता असोन कां कृपणता ॥५५॥
ह्मणावे शास्त्री नियम प्रमाण । तरी बहुतां बहुवेळीं दिल्हें दर्शन । भक्तजनाला होऊं प्रसन्न । माय ग मर्यादा कायसी ॥५६॥
ऐसें ऐकतां सद्भाववाणी । भागीरथीचें वाहवले पाणी । कर्तृत्व विलोकूं मिळाले द्विजगणीं । स्नानदानकराया सित्ध जाले ॥५७॥
कोणी सांगूं लागले संकल्प । हें कळतां धावलें लोक अमूप । जान्हवीगंगेचें वळखून आप । नमिती गुरुदेवा स्तवस्तवो ॥५८॥
यापरी लोटला सवा प्रहर । मग करितां भल्यांनीं अग्रहो फार । स्नान करुनि निघतां भवहर । अदृश्य जाली देवगंगा ॥५९॥
जन सर्व गेले करीत स्तवन गुरुधण्यांनीं केलें प्रयाण । तीर्थक्षेत्रादि पाहत त्वरेनें । सज्जनगडासी पातले ॥६०॥
प्रतीपदापासून पुण्यतिथीला । आरंभ केलें हो होतसे सोहळा । हरिदासाचा मिळाला मेळा । दाटले जनवृंद मानकरी ॥६१॥
लक्ष बेलपूजनीं झांकला शूळी । तेवि जन दाटले पर्वतमौळी । पडलेति सर्व ही पदार्थसुकाळी । पूर्वोपाधीसी नाठविती ॥६२॥
वेळेवरी होतसे भोजन । अहोरात्रीं ते धंदा कीर्तन । तरी च हरिदासी जनाला मान । पावती कीर्ती वाखाणिती ॥६३॥
दासप्रसादीं जन्मण ज्यासी । छत्रपतीराजा शाहु उदासी । पुण्यतिथउत्सावीं अहोनिशीं । सानकूळ करित फिरतसे ॥६४॥
जंव पाहिला चाफळीं मन पारखूनि । गेले महंत ते न टिकले कोणी । नृपवरामानसीं तधीपासुनी । न रुचती संत रामदासी ॥६५॥
वदतु वस्त्राला मान द्याव । वंदाया असे हो समर्थनांव । परमार्थाचें लाहिलें वैभव । न भेटती हो रामदासी ॥६६॥
समर्थस्वामींनीं मार्गशुत्धसित्ध । करुनि वोपिले असतां निजपद । केउता गेला तो अगाधबोध । स्थितीसंपन्न न भेटती ॥६७॥
मुख्य राजाचे हृदई भाव । समान वाटावे त्या रंकराव । सोंग न कीजे मेळऊम द्रव्य । चिन्हें असावीं दासबोधीची ॥६८॥
अहो बोलणें तयाचें सत्य चि आहे । क्रियावरुनि निंद्य ठाव होय । परि प्रपंचीकांनीं निवडूं नये । येरवीं क्रियाकारण ॥६९॥
॥पद॥ रामदासी तो न म्हणावा । अप्रिय जो गुरुदेवा ॥धृ०॥
ज्ञानध्यानासी जो नेणें । कीर्ती ते जघन्य ॥१॥
पोट भराया करी ढोंग । न फिटे संगपांग ॥२॥
दावी जनिं माव अभाव । देखुन भुलतो विभद ॥३॥
क्रिया अंतरे सिंतरे । भलत्याभरीं भरे ॥४॥
स्वरुपीं रमेना विश्राम । नेणें स्वात्मसुखधाम ॥५॥
॥वोवी॥ चिरड जे बैसली राजयामनीं । डोळा न दिसती रामदास कोणी । सोडऊं ह्मणण तें दाखऊं नयनीं । केलें विचित्र मारुतीनें ॥७०॥
पुण्यतिथ नव हि दिवसांमाजीं । न टिके राजा तो न बैसे सेजीं । फिरफिरोन संताच्या वृत्तीस राजी । ठेवितो कथा ही कां होईना ॥७१॥
हें असो अपेक्षा सकळा मानसीं । शिवाजीबावा ज्ञानैकरासी । कीर्तन करावें नवमी दिवसीं । ह्मणोन प्रार्थिलें बहुतापरी ॥७२॥
बावा वदती हो हे अपेक्षा होती । उभे राहवेना मंदली शक्ती । येरु बदती ते श्रीगुरुभक्ती । येक पद तरी ह्मणावें ॥७३॥
मग चौघे साह्यानें उभे केलें । चिंतोन सद्भावें समर्थ पाउलें । मंगळाचरणांती सोडा ह्मणतिलें । आश्रय कुबडीचा करुनी ॥७४॥
पद येक ह्मणतां कुबडी राहिली । उल्हास भरला जो हृदयकमळीं । वक्तृत्व करिती तै तटस्थ मंडळी । परी टाळ धरीना धृवपदी ॥७५॥
संगिका ठावा किं न करती कथा । कार्य आपुलें ही नाहीं पाहतां । चौघे चहुंकडे जाले आसतां । येकायेकीं हें काम पडिलें ॥७६॥
समर्थमहाराजा आली करुणा । टाळधरु जाला कपिराणा । टाळ वाजे परि कोणी दिसेना । वर्म हें कळलें ज्ञानियासि ॥७७॥
न टिकतां राजा स्थाना धरुन । हिंडत असावें हें त्याचें लक्षण । ते दिवसीं न स्फुरे तयासि आन । बसला जो बसला सेवटवरीं ॥७८॥
उदयाचळीं प्रगटला आदित्य । हें खबर चि नाहीं कवणा ही तेथें । स्वयें बावांनीं होऊनि विस्मित । दत्तोबापुत्रा अवलोकिलें ॥७९॥
ह्मणतिलें मम गुरुवंशिक तुह्मी । लळितमानकरी असतां ये ठाई । काय किं स्मरण आलें हृदईं । नेणवे करणी समर्थाची ॥८०॥
राघोबा विनवी जालें ठीक । आह्मी तुह्मी मुळी असो कीं येक । संप्रदाय धीर ते होऊं ठाउक । दाविलें विचित्र मारुतींनीं ॥८१॥
मग हांसोन स्वामींनीं वोपिला वीणा । बैसले पुनरपी उठवेना । आरत्यादि संपली तो नृपाच्या मना । आश्चिर्य थोर वाटलें ॥८२॥
ह्मणे मूढ मी नेणोन महिमान । रामदासी नाहींत वदलों भुलोन । कोण कैसे ते स्थितीसंपन्न । कोण कोण स्छळीं असती कीं ॥८३॥
वृत्ति जाची असे निर्मळ । केले असती जे परमार्थ सुकाळ । तेथेंचि त्याला समर्थदयाळ । पावोन सुखवित असतील ॥८४॥
येत असतील येथें ही दर्शना । पाहवया आमुची दृष्टी उघडेना । तंव संतलोक वदती हे पुण्यवाना । भेटले भेटती स्वामीकृपें ॥८५॥
॥अभंग॥ दासमहाराज केले बहु क्षेत्र । वागती सत्पात्र ठाई ठाई ॥१॥
कांहीं च नेणती यापरी दिसती । मूढासि तारिता हेळामात्रें ॥२॥
असती कोण कैसे संपूर्ण कळेना । मित्र कपिराणा ज्याच्या घरीं ॥३॥
होऊनिया वस्तु नांदती संभ्रम । देव आत्माराम साह्य सदा ॥४॥
॥वोवी॥ येक भल्यांनीं वर्ततां नीट । तेणें बहुतांचीं उजळती मुखवट । यास्तव त्यजूनि कर्म जे खोट । सन्मार्गी च भरावे ॥८६॥
॥अभंग॥ भल्यानो हें ऐका वाहूं नका धोका । धरा क्रम चोखा नीट वर्ता ॥१॥
क्रिया अप्रमाण पाहतां जनांनीं । बोलती निंदुनि वडिलासी ॥२॥
दोषावरी दोष घडे हा ही येक । विचळति लोक तीजा दोष ॥३॥
तरोन आपण तारावें आनासी । धन्य मान्यवंशीं म्हणवावें ॥४॥
जेणें आत्माराम होय साहकारी । वर्तावे यापरी गुरुकृपें ॥५॥
॥वोवी॥ ऐसें ऐकतां तोषले सर्वी । मग बावाजीला नृपवरु विनवी । ते चि अपेक्षा महंतादि जीवीं । राहिले चैत्रापावतों ॥८७॥
अपेक्षा सर्वाची करुं पूर्ण । प्रसन्न जाले दासभगवान । जंव उभे ठाकती करुं कीर्तन । दुखण्याचें नांव न राहे ॥८८॥
कीर्तनरसाची लागोन गोडी । राजादिकीं राहिले सज्जनगडीं दासकाव्यभरणा । दाऊन उघडी । केलें परवडीं त्रय कीर्तन ॥८९॥
पंचकर्णाची प्रचीत दाऊन । महावाक्याचें करुन विवर्ण । वानुनि सज्ञाना संतम हिमान । स्वानुभवखूण दाविलें ॥९०॥
त्रयोदशीला यात्रा फुटली । महंतादि आले राहिले चाफळीं । शिरगांवाप्राती घेऊन मंडळी । शिवरामस्वामी पातले ॥९१॥
मेजवान्यादि आदरमान । पाहोन तेथें केलें कीर्तन । मग येऊनि चाफळीं रहिले त्रयदिन । गंगाधरस्वामीअनुमतें ॥९२॥
करविलें महापूजा संतर्पण । संतोष पावला श्रीरघुनंदन । दुसरे दिवसीं महारुद्रपूजन । करविलें महंता तोषविलें ॥९३॥
दूरदुर्होन येती ऐकों कथा । किती ही ऐको न पुरती आस्था । ग्रंथ वाढेल होतें सर्व सांगतां । संज्ञावरुन वोळखा ॥९४॥
सगुणनिर्गुण मिश्र करुन । तो हा मुनिमानसहर्ता व्याख्यान । रुप रामरायाचें पद म्हणोन । श्रोतेजनासी मानविलें ॥९५॥
पाठांतर । चौर्याऐसी हजार । त्याचा करावा काययेक विस्तार । सेवटीं स्वकवनीं केलें स्तोत्र । येकीं अनेक अवधारा ॥९६॥
॥पद॥ मज पावावें राघवा । पतितोत्धारक देवा ॥धृ०॥ उडपति नाशकुळीकुळटिळका । सकळिकपाळक देवा ॥१॥
अननिजावर सुरवरध्यानी । ध्यातो सदाशिव शिवा ॥२॥
श्री कल्याण करि तंवकृपा । अंकित मागत सेवा ॥३॥
॥वोवी॥ आरत्यानंतरीं केलें गजर । नमोन महंता भेटले आदरें । प्रसादविडे पावल्यानंतर । गेले स्वस्थानीं विसावले ॥९७॥
दासकृत अकरामारुतीदर्शन । कराया चालिले सर्वा पुसोन । करिती फावलें तें अन्न संतर्पण । रात्रौ कीर्तन होतसे ॥९८॥
वेदांतबोलाचा सरतां प्रसंग । रामायणींचा वोढवून रंग । मारुती प्रतापु सांगती सांग । सर्व तें पद ऐका येकदां चि ॥९९॥
॥पद॥ राग काफी धाट राजी राखो रे ॥ आनंदरुप वनारी रे तो आ० ॥धृ०॥
सुरवरनरमुनिजन मनमोहन । सकळ जना सुखकारी रे ॥१॥
अचपळ चपळ तनुसडपातळ । दास ह्मणे मदनारी रे तो० ॥२॥
॥राग कल्याण ॥ बंधन पावलों जाजावलों । देव ह्मणती कावलो ॥१॥
दयाळा रामा सोडवी आह्मा । हरहृदयविश्रामा ॥धृ०॥
यातना हे नाना । कांहीं च चालेना ॥ दु:ख जाहलें मना ॥२॥
सीणावरी सीण । होतसे कठीण । थोर मांडलें निर्वाण । कर्कउतरी नित्य मारामारी । धावे होऊन कैवारी ॥४॥
दास चौताळला त्रिकूट जाळिला । थोर आधार वाटला ॥५॥
॥डफगाणी॥ नवल अवचित देखिलें । फळ ह्मणुनि झेंपावलें । मंडळ सूर्याचें गिळिलें बाळपणीं ॥१॥
सेना उदंड मारिली । लंका जाळूनि होळी केली । शुत्धि सीतेची आणिली । ख्याती जाली ॥२॥
धन्य मारुती निधान । लक्षुमणा जीवदान । सकळियाचें समाधान । हें महिमान ॥३॥
कटी सोन्याची कासोटी । घंटाघागरियाची दाटी । घेतो उड्डाण जगजेठी । च्यारी कोटी ॥४॥
द्रोणगिरी उत्पाटिला । लागवेगें झेंपावला । प्राण सकळाचा राखिला । धन्य जाला ॥५॥
गिरीवर गर्व केला । पर्वत मैनाक वाढला । शून्य मंडळ भेदूनि गेला । तो मारुती ॥६॥
रघुनाथाला सोडविले । पाताळदेव तें मारिलें । सिंधुर सर्वांगी चर्चिलें । तैंपासुनी ॥७॥
हा तो ईश्वरी अवतार । भीम सकळासी आधार । रामध्यानीं निरंतर । भक्तराज ॥८॥
मुहूर्त रावणें पाहिलें । रघुनाथाला पाचारिलें । अरिष्ट स्वामीचें घेतलें । आपणावरी ॥९॥
राम गेले वैकुंठासी । तैं निरविले हनुमंतासी । तुंवां माझियाभक्तांसी सांभाळावें ॥१०॥
रामदासाचा सारथी । विघ्नें चळचळां कापती । पावे संकटीं मारुती । भर्वशानें ॥११॥
॥पद॥ कैपक्षी भीमराया । निगमांतर विवराया । ब्रह्मानंद वराया चंचळमन अवराया ॥१॥
संकट दुष्ट हराया । मारकुमार कराया । गुरुपदरेणु धराया । भाविक जन उत्धराया ॥२॥
रघुपतीचा कैवारी । दुर्घट विघ्ननिवारी । भजन पुजन मंदवारीं । कल्याण जन हितकारी ॥३॥
प्रताप वदला रे वद्ला न वचे कोणा ॥धृ०॥
राघवशुत्धि जाउनि बुत्धि मगरीसुत वरदानी । राक्षस मारुनि दधिनिधी लंघुनि महिकावतीये सदनीं ॥१॥
नाटकरुपी शक्तिस्वरुपी आपण चि होउनि राघव आणुनि बंदविमोचन केला । महिविर मर्दुनि भोपा रगडुनि चरणी पिष्टचि केला ॥२॥
तडफड तडफड राक्षस मेला । नगरलोक हडबडिला ॥३॥
लत्ताप्रहर कपाट फोडुनि बाहेर राम विराजे । पळा रे पळा हनुमान आला अद्भुत बोंब गाजे ॥४॥
राक्षस वरदी शोधुनि हरदी अळिकुळमारित आला । अहिरावण तो बाणी जाळुनि राघव विजई जाला ॥५॥
अहिमहि मारुनि वान्नर घेउनि मारुति रघुपति आले । बिभिषण सुग्रिव तल्लिन होउनि कल्याण प्रेम भरले ॥६॥
॥सुंदर कर्कशरुपी धगधग दिव्य स्वरुपी ॥ अद्भुत रुद्र प्रतापी । दानवदंडण पापी ॥१॥
मंद्रातुल्य प्रतीमा । मुखारविंदीं उपमा । निशिपति राजित महिमा । अतुळ न तुळे सीमा ॥२॥
कांचनचिरलंगोटी । घंटा किंकिणि दाटी । सामर्थ्याच्या कोटी । रुळती चरणांगुष्टीं ॥३॥
प्रगटत भुभु:कारें । राक्षस ह्मणती बा रे । कलिमल नं थरे थारे । कल्याण हृदयस्था रे ॥४॥
॥भीमराया रे सखया भीमराया रे ॥ राघव प्रिया सकळावर्या वारी मम माया ॥धृ०॥
तनुसकुमारा कामा मारा केला कपिवीरा ॥ वायो कुमरा संकटहारा पावे उदारा ॥१॥
तूं रणधीरा गुणगंभीरा दंडिसि असुरा । रजनीचरा दशमुखनिकुरा मारिसि बनकरा ॥२॥
भुमिज्या शोधूनि सिंधू लंघुनि भेटति बलभीमा । अठरा पद्में आनंद जाला मानिसि विश्रामा ॥३॥
जयजयकार सकळ हि गर्जति भेटति श्रीरामा । मारुति श्रीगुरु कल्याणांकित लक्षित पदप्रेमा ॥४॥
॥भूपाळी॥ प्रभात जाल्या उठोनि चिंतन करिता भीमाचें । सकळ हि दुरितें नासति दंडण चुकेल येमाचें ॥१॥
ठकारठाण मंडितकाया कास कनकाची । प्रतापशक्ती तुळणा करितां नहिं त्या जनकाची ॥२॥
कुंडलमंडित गंडयुगवरी देखोनि रविशसी लोपती । त्रिभुवनपीडकमदनदमन हा करितो कपिपती ॥३॥
तरणोमंडळ गिळोनि राहो पुछें दंडिला । तेत्तिस कोटी सुरवर मघवा त्याचा मान खंडिला ॥४॥
सुग्रिव सख्या करोनि ऐक्या हरिविर मेळविले ॥ सीता शोधूनि लंका जाळुनि राक्षस मोक्षा बोळविले ॥५॥
पर्वत आणुनि वानर उठउनि सुमित्र जिववीला । लक्षुमणाचा प्राणदाता नाम त्रिभुवन गर्जविला ॥६॥
कल्याण राघव चौघे बंधु जनकाची दुहिता । सन्मुख मारुति लक्षितसे शिव । आपुल्या हीता ॥७॥
रामदासकृत रामायण ॥ पद॥ (राग कल्याण । धाट अरे नर सा०॥) राघवा देईं तुझें भजन ॥धृ०॥
कीर्तन करावें जन उद्धरावें । अंतरिं लागो ध्यान ॥१॥
अनुताप त्यागवरी भक्तियोगें । मानती हे सज्जन ॥२॥
दास ह्मणे मन आत्मनिवेदन । सगुण समाधानें ॥३॥
अपराधाच्या कोटी हे चि माझी कोटी । फेरे फिरलो जन्मकोटी ॥१॥
शरण आलों श्रीगुरुराया । हा भवजळनदी उतराया । दावी आपुल्या पाया । राहे काया निववाया ॥धृ०॥
विधिहरसुरवर ध्याती । नारदतुंबर गाती संतवृद गर्जताती धन्य सद्गुरुमूर्ति ॥२॥
नलगे द्रव्यदारा । मज नलगे पसारा । माईक लटिका सारा घेऊं नेदी उपसारा ॥३॥
अगणित सद्गुणग्रामा सुदरनामा ॥अपार सुखधामा रामा ॥१॥
सीता विराजितवामा पूरितकामा । उमेसजप नामा ॥२॥
हरसुर इछिती हेमा । तव पदप्रेमा । अनंत धरि नेमा ॥३॥
॥वोवी॥ सकळा ठायीं करित आनंदु । सत्सिष्यजनाला करित प्रबोधु । सद्भक्ता वोपीत वरप्रसादु । धन्य धन्य साधु ह्मणविलें ॥१००॥
चाफळाहून रामघळादि । कोल्हापूर कोंकण लवणनिधी । पाहून परतले नसे अवधी । उत्साव चैत्रीचा पातला ॥१॥
मार्गी जालें हो येक विचित्र । देखिलें सिंगीनादईश्वर । किनिमित्य नाम हें ह्मणतां भवहर । सांगती लोकांनीं मूळकथा ॥२॥
श्रावणमासीं सोमवारदिनीं । सिंगीनाद उठतां पिंडीतुनी । नाम हें महाराज पडलें या जनीं । सत्पुरुष तुह्माला विदित सर्व ॥३॥
योगींद्र पातला माघ येक । स्तविता तयांनीं भाळला त्रिंबक । खंड न होता सुशब्द चोख । प्रहर परियंत जाला जी ॥४॥
ऐसें ऐकतां भक्तिरहस्य । उपजला विलोकूं थोर उल्हास । स्नान करुनी नमोन देवास । स्तवोन सन्मूखी ठाकलें ॥५॥
आया बे जोगी आया सुशब्द । देव हरे महादेव पद । वदतां दासाच सिंगीनाद । तुष्टला स्वर उमटला ॥६॥
फाकोन चहुंकडे वृत्तांत । विलोकूं पातले जनलोक बहुत । नमोन स्तविती ह्मणती अद्भुत । सवा प्रहर लोटला ॥७॥
निघोन स्वामींनीं केले प्रयाण । नाद निनादीं होसरल लीन । हें असो चाफळीं राहोन सुखघन । उत्साव सांग विलोकिलें ॥८॥
स्वामीरायाची देखोन स्थिती । विचित्र लीळा ऐकोन कीर्ती । राज राजगुरुअ संतोष मानिती । आश्चिर्य करिती जन सर्व ॥९॥
स्वयें नृपांनीं करुन विनवणी । येतां क्षेत्राला उतराया लागुनी । स्थळ येक तेथें दिधलें नेमुनी । महाद्वार चढतां उजवेकडे ॥११०॥
तारगांव नांदगांवीं मिळोन । दिधले चावर इनाम लिहून । कृष्णातटाकीं रम्यस्थळ पाहून । अंगिकार केलें निस्पृही ॥११॥
संतोष वाटला सकळिकात । राहणार सातारगडावरुत । सत्सिष्य स्वामीचा दादोपंत । जिंमा केले हो तयाच्या ॥१२॥
देखोन स्वामीची निशक्त स्थिती । सिष्यवर्गानीं केली विनंती । सेवा करीत मी अहोरात्रीं । राहिन जी समागमीं ॥१३॥
स्वामिराज वदती कळला रे भाव । रुप तें सर्वदा हृदई ध्याव । अदृश्य होता घट हा होता स्वभाव । प्रत्यक्षदर्शन देऊं तूतें ॥१४॥
ऐसें ऐकतां प्रसन्नवाणी । संतोष मानिला सद्भक्तांनीं । मग राजादिकाला प्रसाद वोपुनी । पुसोन पुढारी चालिले ॥१५॥
पाली सिरगांव माहुली तीर्थ । सज्जनगडादि दैवता पर्वत । संतसाधूचें स्थानमान पाहत । वाईप्रतीं पातले ॥१६॥
स्वामिरायाचें तें जन्मस्थान । देशपांडे गिरीचें असे वतन । त्यजोन सर्व ही उदासीन । यास्तव सर्वासी वंद्य जाले ॥१७॥
ह्मणती जन्म हा जाला तारक । गोत्रज सोयरे मानिले हरिख । सगट सर्वत्रा सांगुनि विवेक । कृष्णाउगमासी पातले ॥१८॥
कन्यारासीस पातला सुरगुरु । कन्यागत गंगेचा पर्वकाळ थोरु । प्रथम दिवसापासून भवहरु । पांच दिवस कर्मिले ॥१९॥
मग पुसोन भल्याला निघाले त्वरित । तीर्थक्षेत्रविधी मार्गी सारित । अपचंदाप्रती पावोन गुरुनाथ । केलें सर्वत्रां सुखी बहु ॥१२०॥
आणीक ऐका कथा वर्तली । चैत्री पोर्णिमा करुन चाफळीं । मार्ग आक्रमितां घेऊन मंडळी । नृसिंहजयंति दिवस आला ॥१२१॥
ग्रहस्थ येक भेटला थोर विश्वासी । करुन प्रार्थना गुरुरायासी । ठेऊन घेतला तया दिवसीं । उपास्यकीर्तन करावें ॥२२॥
परि पाठ नाहीं प्रल्हादचरित्र । सिष्य येक सन्निधीं होता सत्पात्र । तयाप्रती हा सांगतां विचार । नमोन ह्मणे जी दयाळा ॥२३॥
वहीमाजि किंवा ग्रंथाभीतरी । वोपिजे ते कथा असेल तरी । प्रात:समयाहून सायंकाळवरी । पाठ घट्ट करीन येकांतीं ॥२४॥
नसल्यास ल्याहवें काव्य नूतन । भरणासहित पाठ करीन । संशय नसे जी अधिक उण । मुख्य लिहिलेल असावें ॥२५॥
संतोषूनिया श्रीगुरुनाथ । ते वही वोपितां वरदयुक्त । धन्य भाविक तो सायमपरियंत । वोव्या सिकोन त्रयशत ॥२६॥
यथासांग रात्रौ जालें कीर्तन । प्रल्हादवरदु जाला प्रसन्न । पावोन बहु तेथें आदरमान । परमार्थ पंथीं चालिले ॥२७॥
तधीहून सिष्याला फळला वर । कथा असो कां लाहन कीं थोर । सायंकाळपावतों पाठांतर । करुन धृवपद संपादितो ॥२८॥
हें असो येऊनि सद्गुरुनाथ । अपचंदामाजीं राहिले स्वस्थ । सरंजाम जाला सांगसाहित्य । कल्याणस्वामीपुण्यतिथीसी ॥२९॥
आषाढ शुत्ध त्रयोदश दिनीं । चेंद बहु केला प्रजन्यानी । बेणीतोरीला महापूर पाणी । वाहे वृष्टी ते खंडेना ॥१३०॥
मिष्टान्नाची आस्था धरुन । तैलंगदेशीचे पातले ब्राह्मण । प्रसाद इछिती सिष्यभक्तजन । नदीपैलाड गुंतले ॥३१॥
कळतां गुरुदेवा वर्तमान । तटाकीं ठाकले स्वयें येऊन । संकटीं पावोन पवननंदन । उतार करितसे झडकरी ॥३२॥
खंड न होये पाहतां प्रजन्य । परि उतार जालें गंगेचें जीवन । आर्तवंत ते पायवाटेन । आले सर्वस्व सुखावले ॥३३॥
ससांग जालें अन्नसंतर्पण । रात्रौ जालें लळितादि कीर्तन । जे ते वानिती गुरुमहिमान । योग्य असतां कीं सर्वापरी ॥३४॥
गुरुबांधवाचें दर्शन होतां । मुलुकगिरीची पुसती वार्ता । मार्गी जालेल चरित्र सांगता । तोषोन कळविती येरयेरा ॥३५॥
जालें शमनाचें पाहडदर्शन । यवतेश्वराचें घडलें दर्शन । समर्थलीळेचें अगाधस्थान । संतसज्जन दृष्टी पडले ॥३६॥
दासबोधांतील कठिणरहस्य । अंतरार्थभरितकोडवाक्य सरस । भलेभल्यांनीं पुसिलें त्यास । समित्छा पुरविलें स्वामींनीं ॥३७॥
समर्थसमाधिसन्निधानीं । बैसले असतां स्वामीरायांनीं । सत्पुरुष मिळाले तेथें येउनि । लीळा वानिती दासाची ॥३८॥
धन्य भक्ति ते पडला प्रकाश । रुप स्वामीचें जालें सादृश्य । नमिलें नसमाय तो संतोष । मग बोलत बैसले स्थितीगत ॥३९॥
तंव समय आला दीपदर्शन । करितां स्वामिला साष्टांग नमन । वर्ज हें गुरुपुढें ह्मणोन व्याख्यान । करुन सर्वत्रा समजाविलें समुदाव आपुला घेउनि ॥४१॥
होते तरि सिष्याचे सिष्यसिष्य । धन्य तयाचें वर्तणूक सरस । अवघे ही दीसती दासाचे दास । भाव प्रत्यकीं न दाविती ॥४२॥
समर्थ देखतां साष्टांग नमन । पूजन सेवा कीं तीर्थ सेवन । सरोकतीनें क्रम दुजा दावणें । स्वे स्वे गुरु ह्मणोन न होता ॥४३॥
यद्यपी वर्तती मर्यादेनें । मूळगुरुधर्मि न पडे नुन्य । यावरी श्रीगुरुआज्ञा प्रमाण । समाधान पावले हें ऐकता ॥४४॥
श्रीरामगुरुचे दोनि उत्सावीं । बहुत मिळाले होते गोसावी । नवाजिले स्वामीला बहुत चि त्याहीं । हें ऐकोन वार्ता संतोषले ॥४५॥
आणीक सांगती समाचार । रामचंद्र जो वरदपुत्र । पाहोन तयाला भले सत्पात्र । योग्य बहु होईल ह्मणताती ॥४६॥
जाणोन स्वामिंनीं जन्मांतर । गुरुत्व वोपाया करुणाकर । समर्थसमाधी पूजुनि आदर । उपदेश दिधले ससांग ॥४७॥
योगपट दीधलें स्वयें लिहून । पूर्णत्वपणाचें वोपिले वरदान । आणिखी जाला तो वृतांत सांगून । वर्तते जाले सुखरुप ॥४८॥
कल्याणस्वामीचें कृपाळुपण । दास माहराज जाले प्रसन्न । सांभाळ करितसे पवननंदन । रामदासी धन्य शिवबावा ॥४९॥
॥अभंग॥ मी तो समर्थाच्या घरीं भगवान । जालो हा पाळण करु क्रम ॥१॥
सिष्टासि पोषण ते स्तुति नमन । भ्रष्टासि निंदण निंदावाक्य ॥२॥
युगायुगी ते ची पदोपदीं प्रेम । येतां तो संभ्रम अवतार ॥३॥
नावडे वैकुंठ येकांती निजणें । संता तोषवणें हा स्वभाव ॥४॥
निरालंबस्थानी बैसोनि निश्चळ । दाही द्वारीं खेळ दशजन्म ॥५॥
स्वात्मानंदसुख दावीन भक्तासी । दाता सद्गुरुसी स्मरोनिया ॥६॥
॥वोवी॥ दासविश्रामधाम सुंदर । गंगातटीच मुलुक थोर । घेऊन संगीं स्वजनपरिवार । आत्माराम नांदतसे ॥१५०॥
इति श्री श्रीरामकृपा । तारक परमार्थ सोपा । शिवरामस्वामिचरित्र । सज्जनगडादि यात्रा । मध्य मध्य इतिहास । प्रसंग । येकसेहे अठरा ॥११८॥
N/A
References : N/A
Last Updated : March 05, 2019
TOP