॥वर्ग॥ ११३

एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले.


श्रीरामसमर्थ

पद॥ (राग कानडा । धाटी कष्ट करी) ॥ परतर अंतर वेधें । मग न लिंपेसि खेदें ॥ध्रु०॥ सांडुनिया घर गेले देशांतर । मेलों हें मिथ्या उत्तर ॥१॥
व्यक्ति भिन्न भिन्न समान दर्शन । सज्जन जाणती ज्ञान ॥२॥
भक्त जरी होणें तरि समजणें । चुकवि जन्ममरण ॥३॥

॥वोवी॥ आतां श्रोतेनो पदाचा अनुभव । उघडा चि आहे समजा भाव । दासमहाराज महानुभाव । वर दीधलासे आईता ॥१॥
धन्य जगीं या अंतरवेधी । सभोवती त्या वळगे समाधी । न सांपडे तो सुखदु:खसंबंधीं । स्वानंदपदीं विराजे ॥२॥
ऐसियापरी बोलत हितमित । सज्जनगडीं राहिले समर्थ । आछादूनिया सगुणरुपांत । गुप्तरुप राहूं ईछिले ॥३॥
धन्य दासाचे योग समुदे । भक्ति ज्ञान वैराग्य जेथें नांदे । वाक्यें जयाचे सवें च वेधे । परमार्थाकडे मंदही ॥४॥
इछामरणाची दाऊन प्रचिती । धन्यत्व संपादी भीष्में जगती । तैसें चि दयाळु दासगुरुमूर्ती । दाविल्या प्रगट कमाई ॥५॥
सिद्धादिसिद्धाचा अवतार सत्य । सिद्ध क्रिया होती अपरमित । आणि निर्विघ्नेसिं भक्ति सुपंथ । मोकळा केले भाविका ॥६॥
येकांत स्थानीं वसती समर्थ । समुदाई आसती वाट पाहत । निघतां बाहेरी अकस्मात । कृतकृत्य जालों भाविती ॥७॥
येकदां स्वामिंनीं बीज केले । सत्सभागारीं विराजले । परमार्थी नीट होते जे निवडले । तयांस बाहिलें सन्निधी ॥८॥
मनुशवेशाची दाखऊं रीत । स्वचित्ता केल्या परी स्वस्छ । ठसो सर्वत्रा आर्थ प्रशस्थ । पुढिलाचा किंत हरावया ॥९॥
स्वल्पांत कळाया अन्वय व्यतिरेक । समजोन काळाचा फिटाया धाक । नरतनु श्रेष्ठतर अमोलिक । जाणता तो येक धन्य जनीं ॥१०॥
प्रसंगीं बोलिले होते माग । ते चि ह्मणाया पदश्लोक अभंग । शिष्यवर्गासी भक्तभवभंग । संज्ञीता ह्मणतिलें ऐका हो ॥२१॥

॥पद॥ (सद्गुरुसवी०) । गगनीं जाहला पवन पवनिं अग्न अग्नी जाला जीवन जीवनीं भुवन ॥धृ॥च०॥३॥
॥पद॥ (धाटी डफगाणें) काळ वेडा कीं शाहणा । काळ निळा कीं सावळा । काळ दुरी कीं जवळा । कैसा आहे ॥१॥
काळ उंच कीं शाहणा । काळ पैसा आहे जाणा । प्रचितीनें ॥२॥
काळ मायेमध्यें आला । किं तो निराळा राहिला । याचा प्रत्ययो पाहिला । ह्मणिजे बरें ॥३॥
काळज्ञान ताळज्ञान । तत्वज्ञान पिंडज्ञान । साधु मुखें समाधान । बरें पाहा ॥४॥
दास मौजेन बोलिला । किं तो उगा च चावळला । चित्त द्यावें त्याचे बोला । श्रोतेजनीं ॥५॥

॥अभंग॥ देहे हे असार कृमीचें कोठार । परि येणें०॥च०॥१६॥

॥वोवी॥ या समग्र बोधाचा होऊनि ग्राहिक । सर्वत्राप्रती सौख्य । वाटे गडयात्रा पातले हरिख । उदास विवेक निज दाऊं ॥१२॥
नित्याधीक होतसे पक्वान्न । न पडे विधानीं कांहीं नुन्य । संतुष्ट पावती देवभक्त ब्राह्मण । जनदाटी होत चालिली ॥१३॥
कनात राहुटी चांदण्या देती । मांडवे बरुचे घातले आसती । शंभुराजा तो सहसैन्यसंपती । सरदारसहित सित्ध आसे ॥१४॥
येकामागें येकेक मानस्थ । करिती शक्तिनुसार । मुख्य श्रीगुरुचें प्रेमवाक्य सार । जे ठाई भुलले श्रीराम कपिवर । तेणें सर्वातर मोहिलें ॥१६॥

॥पद॥ (धाटी धन्ये तो ) कथा करीन आवडी रे राघवा कथा करीन आवडी ॥धृ॥
टाळाचे खणखण मृदांग दणदण ॥१॥
छंद प्रबंध गीता गाईन संगीत ॥२॥
दासाचे जीवन पतीतपावन ॥३॥
(गौडी धाटी सजना) मन माझें मन माझें गुणरंगी मन माझें । अखंड चिंतन तुझें ॥धृ०॥
प्रसंगमानें मान तुफानें कळतसे समजानें ॥१॥
कविप्रबंधें बहुविधछंदे । संगीतरंगविनोद ॥२॥
गौल्यरसाळें आर्थ विषाळें । सार्थकचि सर्वकाळ ॥३॥
भर भरानें वर वरानें । समजतसे विवरानें ॥४॥
दास ह्मणे हे गायनकळा । आवडीचा जिव्हाळा ॥५॥

॥अभंग॥ देवा मज आतां वाटे तुझी चिंता । पवाडे वर्णिता०॥३॥

॥वोवी॥ ऐस येका च जाल कीर्तन । व्याख्यानीं होतसे मन निमग्न । धन्य दासाची पत्धत्या विधान । सर्व ही वर्तती सावध ॥१७॥
दुसरें दिवसीं सांग सर्वात । फराळ करविलें बारा घडयांत । सभा घनवटली साधुसंत । दिवसा कीर्तन आरंभिलें ॥१८॥
देवभक्तभाविका सकल जनाला । कथासगजरीं संतोष जाला । शिष्य दासाचा मग उभा ठाकला । बोलिला सप्रेमें वरवाक्य ॥१९॥
बोलिला तयांनीं प्रमाणपूर्वक । हृदयस्थस्वामीच हें जाणा वाक्य । सत्य चि तैं वाटे बोलतो देशिक । भाव जाणां हो स्वल्पांत ॥२०॥

॥पद॥ (राग काफी धाटी राजी राखो रे ) सकळ जन सांभाळितो सांभाळितो पाळितो ॥धृ॥
करित आहे दिसत नाहीं । तो चि विवंचुनपाही ॥१॥
करित गेला नाहीं देखिला । धन्य येकला भला भला ॥२॥
दास ह्मणे तो जवळी आहे । गुरुमुखें करुनि पाहे ॥३॥

॥पद॥ (राग कामोद धाटी) लावोनिया लोचन । नेणोनि जाणतेपण तेणें गुणें नागवण तयासी हरिविण नाहीं रें ॥धृ०॥
सावध होउनि पाहे भुलला आहेसी काये । तुझें आयुष्य निघोनि जाय रे ॥१॥
ह्मणे रामीरामदास । ठाईं पाडी जगदीश । जननीजठरवास खोट रे ॥२॥

॥श्लोक॥ विध्योक्त वर्ता भजनीं प्रवर्ता । हा पंथ वर्ता उतरा विवर्ता । नेणें अपूर्ता पूर्ता । अयंत धूर्ता वचनीं मधुर्ता ॥१॥
धर्माभिमानी सुरसाभिमानी । कैवल्यदानी प्रगटे निदानीं । रघोत्तमानी जगदोत्तमानी । उन्मत्तमानी । वधिले गुमानी ॥२॥
मोठया बळाचा बहुता दळाचा । नानाकळाचा वर तो खळाचा । अंतर्पिळाचा धिर कुटिळाचा । नाना मुळाचा कपटी कुळाचा ॥३॥
देवें भुपाळें सुरलोकपाळें । केली दयाळें कपाळें । उद्दीत काळें रमणीयभाळें । पदीं सुकाळें सुरनाथपाळें ॥४॥
तो चालवितो मन घालवितो । आनंदवीतो सुख पाठवीतो । लवालवीतो सिण मालवीतो । कृपानवीतो करितो कवीतो ॥५॥

॥वोवी॥ ऐसियापरी केलें कीर्तन । रात्रौकाळीं जाल भोजन । माघ वद्य नौमीचा पातला दिन । सावध होठेले समर्थ ॥२१॥
सर्वत्रा कळविलें दयाघन । प्रात:काळीं स्नानादि सारुन । येथानुशक्ती दानधर्म करुन । भोजन सारावें झडकरी ॥२२॥
मग गुरुराजयाचे आज्ञा प्रमाण । होऊनि वर्तती सावधान । तंव लेऊन पादुका गुरु दयाघन । येऊन बैसले सभेंत ॥२३॥
जिकडे तिकडे विमान छाया । अमरवृंद दाटले येऊनिया । रत श्रीरामीं ह्मणोनिया । दास चि भासले राघव ॥२४॥
उठतसे चहूंकडे जयघोषनाद । मंजुळस्वरानें होतसे वाद्य । दास श्रीगुरु सच्चिदानंद । केलें अवलोकन दाही दिशा ॥२५॥
आन न भासे स्वरुपाविण । स्वयें होठेले निजनिर्वाण । तरि ही आवडोन रुप सगुण । मांडिलें स्तवन ऐका कस ॥२६॥

॥अभंग॥ उतावेळ चित्त भेटीचें आरत । पुरवी मनोरथ ॥च०॥५॥

॥वोवी॥ हे स्तुती निधानीं तुष्टला राम । नावरतां दासासि आला प्रेम । निवेदीन आर्ति आर्त निष्काम । गूज ते ऐकती सुकृती ॥२८॥
लोकापरिनें सेवट अवाई । कमाईसहित कळविलें निस्पृहीं । नाना कष्टते अंतकाळसमई । आधीं च व्हावें सावध ॥२९॥

॥अभंग॥ धन्य अंतकाळीं सावध जो राहे । तो चि येक होये महाधीर ॥१॥
विस्मृतीची वेळ वासना प्रसंग । सर्व रंग भंग होत आहे ॥२॥
लंगोटि इछिती परनरा वांछिती । अध्यास धरिती पशुपक्षी ॥३॥
यद्यपी प्रपंचविषई सावध । होती खेद मोद भुलीभर ॥४॥
मुसाफरीवणी सावरुं पाहती । समंध चि होती भ्रांतीलुब्ध ॥५॥
भक्ति ज्ञान ध्यान वैराग्य नेघती । आत्माराम प्राप्ती कैंची मग ॥६॥

॥वोवी॥ याकारणें कमाईवंत । वश्य करुनि देवरायात । तरोन तारिले दाविले चरित । ऐका हो वचन दासाचें ॥३०॥

॥अभंग॥ जन्मोनिया तुज भजेलों या चि बुत्धीं । प्राणत्यागसंधी सांभाळिसी ॥१॥
उचीता न चुके अंतिच्या श्रीरामा । आपुल्या रुपीं आह्मां ठाव देई ॥२॥
जन्मवरी तुज धरिले हृदई । आतां ये समई पावावें त्वां ॥३॥
निष्कामता तुज सेवी या चि आशा । अंतीं रामदासा सांभाळावें ॥४॥

॥वोवी॥ ऐकोन ऐसी सप्रेम स्तुती । विस्मावोन स्वयें बोले रघुपती । सांग सख्या रे अपेक्षा चित्तीं । असेल ते हेत पुरवीन ॥३१॥
येरु नमनमो जोडिले कर । वाहिला देवा कीं त्वां सर्व भार । न राहिलें मागणें कांहीं अणुमात्र । कहीं स्वतंत्र मी नव्हे ॥३२॥
मग दयाळुवा श्रीरघुनंदन । कुर्वाळूनिया पाहिलें वदन । न टाकी ह्मणतिला देवभक्तपण । निर्विकार आहेसी आईता ॥३३॥
तंव दयाब्धीस आला सप्रेमलोट । दासपण मागणें जें सेवटीं सेवट । तें आर्त कळविलें वचन गोमट । श्रवण करा हो पूर्ववाक्य ॥३४॥

॥पद॥ बहुगुणी आं देवा तुज कल्याण मागणें ॥धृ०॥ तूं जगजीवन तूं मनमोहन । कोण आहे तुजविण ॥१॥
आह्मी हरिजन तूं जनपावन । बोलती वेदपुराण ॥२॥
देव ही आले भक्त मिळाले । आनंद तुझियेनि गुणें ॥३॥
भक्त सुखी देवराव ही सुखी । दास ह्मणे मज देणें ॥४॥

॥वोवी॥ परोपकाराच्या ह्या ऐकोन गोष्टी । डोलो लागला भीम जगजेठी । श्रीराम भावि हे शोधितां सृष्टी । भक्तराज ऐसा न देखो ॥३५॥
हरषोन ह्मणे बा हें चि मम कृत्य । मी तूं चि तरी आतां काय भेद मात । दाविसी पुढारी लीळा बहुत । गुप्तरुप स्वयें राहुनी ॥३६॥
श्रवणीं संचरतां हें वरद उत्तर । उरो न दीधला कोपीनभार । जाले स्वरुपीं स्वरुपाकार । लाविले नेत्र महायोगी ॥३७॥
श्रीराम मारुती ना देव जन । जगदाकार ना सभा भाषणें । कांहीं च दिसेना तंव मोठयानें । जय जय राम ह्मणतिलें ॥३८॥
श्रीरामरुपीं विरालें ध्यान । प्राणनाथपदीं मिळाला प्राण । तंव केलें देवांनीं वरषावसुमन । नाद नसमायें अंबरीं ॥३९॥
सुवास फाकला मगमगीत । मंद सीतळ सुटला वात । जय जय राम श्रीरघुवीरसमर्थ । घोषें ऊठिला स्वयें चि ॥४०॥
मग स्वामीरायाचें पाहती वदन । पालट दिसेना सुदिव्यचिन्ह । तंव योगीजन वदती विराला प्राण । निर्गुणस्वरुपीं मिळाले ॥४१॥
मिनले तद्रूपीं होठेले गुप्त । जीव प्राण गेला मृत्यु बहु युक्त । बोलण्याची यापरी रीत । येरवी ज्ञानी निजीं निज ॥४२॥
देहाचेनि योगें नानाविध । बोलावें लागे करुनि विषद । विदेहिया कैंचा देहसमंध । मृगजळवत ज्या मायामय ॥४३॥
वात योगियाच मरणचिन्ह । ज्या देहद्वारीं प्रयाण प्रमाण । नयनवाटेनें निघतां प्राण । स्थूळातून गेला ह्मणताती ॥४४॥
तोंडातून काढितां पवन । तो लिंगदेहापासून प्रयाण । वायु निघालिया गुदवाटेनें । कारणांतून तो गेला ॥४५॥
आतां तयाच निवासस्थळ । मृत्य लोक आणि स्वर्ग पाताळ । महाकारणापासूनि जाणें बळें । ब्रह्मरंध्र किंवा कानांतुनी ॥४६॥
ते स्वरुपानंदीं खेळोन फिरती । सौख्यभोगाच्या काया पावती । धन्य ज्ञानी ते तन्मय होती । यद्यपी प्राणत्याग ऐका ॥४७॥
मुळीं च आसती ते तदाकार । वितळोन जाये समीरीं समीर । तुर्याज्योति जे ज्ञानैक्य सुंदर । समरसे द्रष्टा आत्म्यांत ॥४८॥
जन्ममृत्यु ना वासना येणें । पुण्यांश तयाचा घेतसे पूजन । स्वयमेव वस्तु ते ज्ञानीं निधान । रामदासासारिखे ॥४९॥

॥अभंग॥ जन्मा यावे तरी करावें सार्थक । इहपर सौख्य लाभा खाले ॥१॥
घेतां ज्याच नाम पावती सद्गती । संतती संपती घर रिघे ॥२॥
जयाचें वचनीं हरे धोका चिंता । लीळा ते ऐकतां लाभे स्थिती ॥३॥
मुख्य आत्माराम वस्य होय तया । पुढती ही चर्या होत जाय ॥४॥

॥वोवी॥ हें आसो महाबळी भक्तसमर्थ । देहासि करितां संकल्परहित । पाहोन कितेकीं पडले मूर्छित । नाठवें कितेका कांहीं पुढें ॥५०॥
रुदती लोळती तळमळोन । ह्मणती राजारे तूं पुण्यवान । सांप्रदाई गेले आधीं च सुखानें । कारण ऐसें हें न पाहतां ॥५१॥
तंव धीरजन वदती कायसें भाषण । समान सर्वदागुरुदयाघन । प्रत्यक्ष करिती कीं मनोरथ पूर्ण । गेले म्हणावें कां वाया ॥५२॥
गुरु ब्रह्म मेलिया तारिता कोण । प्रपंचरीतीचें नसे कारण । तनु त्याग होतां आच्छादे सगुण । तरि भावितील तेथ सिद्ध असे ॥५२॥

॥अभंग॥ जन्मा यावे तरी करावें सार्थक । इहपर सौख्य लाभा खाले ॥१॥
घेतां ज्याच नाम पावती सद्गती । संतती संपती घर रिघे ॥२॥
जयाचें वचनीं हरे धोका चिंता । लीळा ते ऐकतां लाभे स्थिती ॥३॥
मुख्य आत्माराम वस्य होय तया । पुढती ही चर्या होत जाय ॥४॥

॥वोवी॥ हें आसो महाबळी भक्तसमर्थ । देहासि करितां संकल्परहित । पाहोन कितेकीं पडले मूर्छित । नाठवें कितेका कांहीं पुढें ॥५०॥
रुदती लोळती तळमळोन । ह्मणती राजारे तूं पुण्यवान । सांप्रदाई गेले आधीं च सुखानें । कारण ऐसें हें न पाहतां ॥५१॥
तंव धीरजन वदती कायसें भाषण । समान सर्वदागुरुदयाघन । प्रत्यक्ष करिती कीं मनोरथ पूर्ण । गेले म्हणावें कां वाया ॥५२॥
गुरु ब्रह्म मेलिया तारिता कोण । प्रपंचरीतीचें नसे कारण । तनु त्याग होतां आच्छादे सगुण । तरि भावितील तेथ सिद्ध असे ॥५३॥

अभंग ॥ गुरुसिष्यवर्ग इतरा न कळे । सळाया खवळे देहबुद्धी ॥१॥
मर्तो ह्मणे गुरु सिष्य रडों पाहे । स्वहिताचि सोय न घडे चि ॥२॥
ऐसे सांसारिक प्रपंचा झोंबती । लोभी होती पदार्थाचे ॥३॥
प्रेमाचा जिव्हाळा न कळे तयासी । उपासना कैसी आतुडेल ॥४॥
धन्य स्वात्मानंदीं दोघे ऐक्य पूर्ण । क्रमाचें विधान सांभाळिती ॥५॥

॥वोवी॥ घेतला हरीनें अवतार बौध्य । भक्तासि पावती संकटीं सद्य । आत्माचि गुरुदेवो कां धरावा भेद । सर्वसाध्य भावनापासीं असे ॥५४॥
पुण्यभावफळाची सत्ता ऐसी । न विसंबती किमपी भक्तासी । तंव श्रोतेजन पुसती वक्तयासी । जाणते गहिंवरती कां सांगा ॥५५॥
जी आठवोन लीळा गणरुप सगुण । पावल्या खुणाचें वर्म बिंबोन । श्रवती प्रेमाश्रु पूर्णभावनेनें । मग समाधान पावती ऐक्यत्वीं ॥५६॥
फळाशा कामना वासना नसे । लोभ क्षोभ क्षोभ गोवा संकल्परोषें । ज्या प्रेमानें इतरा सद्गती गवसे । गुरुज्ञानिया असे हें विदित ॥५७॥
धन्य योगी ते भक्तलोक हेत । धरितां पुरविती असोन गुप्त । ऐसे माहराज दाससमर्थ । लीळा विचित्र दाविलें ॥५८॥
तिकडे भक्तांनीं केले साहित्य । पंडीत जाणते मिळाले बहुत । भजन कीर्तन मांडिलें भक्त । जेथें साह्यार्थी जगदात्मा ॥५९॥
केले पैलाड परसांत स्थळ । काष्ट ते श्रीगंध तुळसी बेल । केले अंतिच्या तनुशय्या निर्मळ । वानिती चरित्र आठवलें तें ॥६०॥
आरंभ केलें इकडे पूजन । निर्मळोदकें करविलें स्नान । सप्रेमभावें पाय धुवोन । तीर्थ साचून ठेविलें ॥६१॥
त्रिपुंड्रनाम लाविले बारा । वरि शोभविले श्रीराममुद्रा । कुबडीझोळयादि सरंजाम सारा । आणोन ठेविला सन्निधीं ॥६२॥
लाऊन कपाळीं उडविती परिमळ । गळ्यांत घालिती सुमनमाळ । ससांग पूजा करुनि सुफळ । केले सर्वांनीं नामघोष ॥६३॥
रामदासमाहराजकि जय जय वदोन । जयजयकार केला प्रेमें ते क्षणीं । सुमनादि प्रसाद ठेविती साचुनी । प्रदक्षणा नमन होसरले ॥६४॥
उचलोन श्रीगुरुकळेवरात । नेऊन ठेविलें समभूमिकेंत । तंव जाली सर्वाची व्याकुळ चित्त । दिव्यदेह विटेल ह्मणोनी ॥६५॥
कोणी भाविती प्रार्थुनि राघवा । किंवा खर्चुनि सुकृतठेवा । घट चि येथें गुप्त करावा । जिंदाफकिर नाम आसे ॥६६॥
ज्याच्या कृपेनें जाले विख्यात । विदेह नित्य जीवन्मुक्त । भूमींत सिरले जाले गुप्त । दाविलें विचित्र हा तो प्रभु ॥६७॥
कोणी ह्मणती हो ऐका येक । बिंबोन जयाचें महावाक्य । सिष्यजन स्वरुपीं होती ऐक्य । हा नि:संग योगे संन्यासी ॥६८॥
तरि भूविवरामाजि ठेऊनि घट । बुजुन टाकावी दृढतरा वाट । हे निंद्यकरामत योजिता खटपट । अश्रायणी वदे तव मंजुळ ॥६९॥
काय गुरुराया हें होत अटक । करुन दाविती काय काय येक । संपादुं इछिलें तशांनीं लौकिक । हा संकल्पात्मक कामा नये ॥७०॥
स्वयें ते आसती निजनिष्कळंक । मिळेल केव्हां ही भूतीं भूतात्मक । होईल आपसया चरित्र कौतुक । कर्ता रघुनायक सर्व ही ॥७१॥
ऐकोन पष्ट हा आकाश शब्द । सारुन तेथील विधीस शुत्ध । पुढील क्रिया ते येथाविध । संपादिती परमार्थी ॥७२॥
विख्यात लीळा सर्वा विदित । पुण्यतिथ कळाया त्यांत भक्तांत । गत अब्दाची कळो परिमित । श्लोकार्थ येक मनीं धरा ॥७३॥

॥श्लोक॥ आत्म०॥सोळाशें त्रय माघ वद्य नवमी मंदवारीं अहो ते । नामें वत्स दुर्मती तयिं असे पश्चिमेसी आदित्य । बोधूनि सकळासि नाम स्मरत संतर्पणा सारुनी । राहीले निजदास सज्जनगडी पुण्येतनु स्थापुनी ॥१॥

॥अभंग॥ संत आले संत गेले । ऐसें जनांनीं भाविलें ॥१॥
परि ते आले ना मुकले । लीळा पावन दाविले ॥२॥
तनु त्यागुनि पुण्यांश । भासे तेथें चि केले वास ॥३॥
करिती गुप्तरुपें राहटी । भक्ता पावती संकटीं ॥४॥
होऊनि आत्मारामु स्वयें । दाविती ईहपर सोये ॥५॥

॥वोवी॥होऊं त्वरेनें समाधि देऊळ । साधून नीट ते करिती स्थळ । तंव शय्या मंदिरीं दास दयाळ । सेकीत बैसले असती ॥७४॥
पाहिले कळविती येकमेकासी । पाहूं धांवले तो सत्कृपारासी । गुप्त होठेले पडोन दृष्टीसी । खूणखाण सर्व असती ॥७५॥
न कळे हो ह्मणती लीळा विचित्रा । समाधि करवा ह्मणती सत्वर । द्रव्य खर्चाया होती उदार । नेमाया मंदिर स्वामिसी ॥७६॥
जिकडे भक्तांनीं असती चिंतित । तेथें तयाला भेटती समर्थ । परमार्थी ज्याला असे बहु प्रीत । प्रगटोन कथिती सांभाळिती ॥७७॥
कांहीं चूकतां सेवा विधान । अरडोन सांगती मंदिरांतून । कोणी आणिती वर्तमान । रामघळांत वागती ॥७८॥
सिष्यवर्गानीं तीसरे दिनी । चिदाभस्म भरित बैसले सद्गुणी । सोज्वळ समाधी पडतां शयनीं । तटस्थ बैसले वानित ॥७९॥
वाटलें सर्वत्रालागि आश्चिर्य । ससांग समाधी पूजिली आहे । थोर चिंता हे श्रीरघुवर्य । परिहार केलें ह्मणताती ॥८०॥
शुद्ध अकर्मी समाधिकरण । तारक तीवरी भलत्यांनीं लिहिणें । प्रशस्थ न होते हो भक्तराज पूर्ण । पावले पावन करावया ॥८१॥
ह्मणाल श्रोतेनो भस्मीं आणून । कोठील समाधी ठेविली कोण । अक्षर तीवरी लिहिलें काशानें । तरि ऐका भक्तिचा प्रशांश हा ॥८२॥

भक्तसाहकारी वायुनंदन । दीपांतरीच अघडपाषाण । आणोन लिहिलें स्वकरें नखानें । बारीकवर्ण याहेतु ॥८३॥
सत्ता पुण्यांश नेमादि तपफळ । स्वामीरायाचें जें होत अचळ । ते पाषाणीं ठेविलें श्रीगुरुदयाळ । आकार साक्षात गुरुचा च तो ॥८४॥
गरज योग्याचें आखुड पुण्य । पूजा बहु घेती दोन चार दिन । वंदनापाठीं च लागे निंदण । तैसी नव्हे हो दाससत्ता ॥८५॥
असे जंवरी श्रीरामकीर्ती । जंवरी भूतटीं वागे मारुती । तंवरी लीळा भक्ता दे सद्गती । प्रत्यक्षास दे प्रमाण कासया ॥८६॥
समाध ठेविली ते शय्यासदनीं । इकडे यात्रेचे लोक मिळोनी । चिदाभस्म घेती पुदी बांधुनी । भाऊनि सौख्यदायक ॥८७॥
कोणी सर्वांगी चर्चिती हरिखे । कोणी कपाळीं लाविती टिळक । सेवटीं भक्तांनीं उरली राख । कृष्णाजीवनीं मिळविले ॥८८॥
पुरोहिताचे अनुमत्तेकरुन । खर्चित द्रव्यांत उदारमन । अंतेष्टीच सारिलें विधान । संतर्पणादि ससांग ॥८९॥
धनधान्य सुवस्तु वस्त्र पात्र । ज्या योग्य जें अर्पिलें त्यांत । चहुकडे पसरली धन्यत्व मात । गेले वानित जाणारे ॥९०॥
शाहुराजा जो छत्रपति भाविक । सादर बहु असे विश्वासिक । परी पाहून स्वामीचा निस्पृह दंडक । आश्विर्य मानिती मनांत ॥९१॥
पूर्ववत भाविकी भिक्षाबळें । ससांग समाधी करविलें देउळ । साहित्य करुनि ससांग सकळ । समाध स्थापिली गुहांतरीं ॥९२॥
पादुका होते जे सेवटीं चरणीं । स्छापना केलेसे सन्निधानीं । धन्य स्वामीची अद्भुत करणी । लीळा अपार न वर्णवे ॥९३॥
पाहिलेल पादुका पाहा टाकळींत । येक जोड रामाजीबावामठांत । सेवटील राहिला गडावरुत । येक तो पूजितु वासुदेव ॥९४॥
पादुका वोपिला जो ब्रह्मसुत । कोठें किं कवणा नसे विदित । यापरी बहु लीळा असती गुप्त । सर्वांशसार गडावरी ॥९५॥
पंचरसि मूर्त्या ज्या पाहिल्या समर्थ । ते स्छापिल्या देउळीं सीतारामात । संतर्पणादि केलें विधानयुक्त । होतसे पूजनें आनंदें ॥९६॥
रचनादि सांगतां विस्तारपूर्वक । वाढेल ग्रंथ हा त्रासतील भाविक । यास्तव सूचितों सूचनावाक्य । रहस्यामाजीं बहु माना ॥९७॥
यद्यपी कवी जो अनंत गोसावी । सुचविलें असती कीर्तनसमई । ऐकोन तो अर्थु धरा जीवीं । जाऊन विलोका येकवेळीं ॥९८॥

॥श्लोक॥ अनंतकवीकृत ॥ शय्याद्रिगिरिचा विभाग विलसे मंदारशृंगापरी । नामें सज्जन जो नृपें वसविला ऊर्वसियेचे तिरीं । आयोध्यादिपती कपी भगवती हे देव ज्याचें सिरी । तेथें जाग्रत रामदास विलसे जो या जना उद्धरी ॥१॥
निर्माणस्थळ गौतमी महा कृष्णातिरीं जो वसे । कांतांसंग नसे प्रपंच हि नसे आशा दुराशा नसे । ज्याला उत्तम रामदास ह्मणती त्रैलोक्य वंदीतसे । ऐसा सद्गुरु जो अनंतकविचा बत्धासि तारीतसे ॥२॥
वस्त्रे हुर्मुजि भर्जरी पटकुळी माथा चिरायी असे । काया सुंदर गौरवर्ण लघुसें भाळीं अवाळु असे । वाणी उद्धट दासबोध वरदें हें काव्य केले असे । ऐसा सद्गु० ॥३॥
ज्याची पूर्ण समाधि सज्जनगडी गुप्तप्रकारें वसे । पादुकावरी शेष शोभत असे दोहींकडे आरिसें । ज्याची पुण्यतिथीस दीन नव ही उत्छाह होतो बरा । ऐसा सद्गुरु जो अनंतकविचा जो निस्पृहाचा तुरा ॥४॥
जेणें सात्विकराजसादिक तिन्ही आत्मस्छिती आणिले । ॐकारादि करुनि अष्टविध हे देहा निराकर्षिले । विज्ञानें भवसिंधु पार तरला जिंकोनि साही धुरा । ऐसा सद्गुरु जो अनंतकविचा जो निस्पृहाचा तुरा ॥५॥

॥वोवी॥ ऐशा परीनें हें जालें चरित । कळेल पुढारी येकेक वृत्तांत । धन्य गुरुराज दाससमर्थ । पावती भक्तातें दयाकर ॥९९॥

॥अभंग॥ पाहूं चला वेगीं सज्जनगडासी । भेट भाविकासी देती दास ॥१॥
विलोकूं समाधि पादुकासि नमूं । मानीत संभ्रमु पूजूं गाऊं ॥२॥
झरोकेमधून ऐकूं रामनाम । नाद ऐकूं प्रेमें बैसुनिया ॥३॥
शय्यासबसदनासी करुनि नमन । विजयाकारणें भस्म घेऊं ॥४॥
लीळा अपूर्वता ऐकूं जनमुखें । नाना ते कौतुकस्छान पाहूं ॥५॥
रामघळा जाऊं चाफळांत राहूं । हरि रुप पाहूं फिरोनिया ॥६॥
विलोकूं उत्साव कीर्तन पूजन । मानस्था भेटुन गुज बोलूं ॥७॥
होईल साहकारी देव आत्माराम सकळीत जन्म करुं सुखें ॥८॥

॥वोवी॥ येकदां विचित्र जालें अद्भुत । समाधिस्थ जाल्यावरी समर्थ । ऐकोन पादशा खवळला बहुत । सर्दारासवें दे फौजा ॥१००॥
सांगे हिंदु जो असे जीवंत । तव्वरी चालती करामत । तो भीवोन ठेविला देह गडांत । आश्रय नृपाचा ही मोडला ॥१॥
भीड न धरितां गडा जाउनी । धुणकारालागीं तोफा लाउनी । समाध तेथील टाका काढुनी । पूजकासि दवडावा निकुरानें ॥२॥
जा खबर कळवीत जाली खरी । पुस्त पुन्हा धाडु वरचेवरी । हें ऐकोन कुयुक्ती दुराचारी । सैन्यसह बाहेरी निघाला ॥३॥
ढालावरते बैसली घारी । कावळा पळाला टोंचून सिरीं । अपशकुन होती नानापरी । अभाळी वात सूटला ॥४॥
पात्छासि कळवितां हा जाला विसंच । जा ह्मणे लंडी छी भय कासयाच । हें ऐकता रोषें कूच दरकूच । गडासि लागले येऊनि ॥५॥
देशांत जाली धांदली फार । पळापळ सूटला जाली कहर । बंधान करिती होऊनि हुशार । गडकिल्लेसि सांभाळितो ॥६॥
पेचांत पडला कीं नृपती आळसी । सौख्यकर होय केवि जनासी । विपरीत घडल्या सावरायासी । न होय सत्ता असतां ही ॥७॥
लागल जंव इकडे लष्कर । दास तो चि मारुती मूर्तिसुंदर । उभी राहिली कटकासमोर । तोफाच्या गोळ्या झेलित ॥८॥
रागें भिरकाविता लष्करांत । हाय हाय वदती पडती मूर्छित । हल्ला कशाची वाचउं प्राणात । नाना प्रयत्न करिताती ॥९॥
झुडूपाखालें लपती कितेकी । पळपळों जाती ठाकती उदकी । पाषाणवृक्षाला घेऊन सन्मुखी । टकमका पाहती लोळती ॥११०॥
त्रासोन अविचारी कल्पी अंतरीं । करामत दिसती ह्मणोन भारी । सावरीत परतला उतरला दुरी । तंव अविद्या संचरली लत्त देउं ॥११॥
शाबास सिरपाउं प्राप्तीकारण । पादशा तो व्हावया मेहरबान । सर्वत्रास सांगे खर्ची प्राण । त्या बाजूनें हल्ला आजि असे ॥१२॥
पराधीनपण अवस्य ह्मणती । अंतरींच अंतरी कुसमुसोन रडती । मोठया तबकानें चालोन येती । हल्ला चढावी गडावरी ॥१३॥
तंव पैलाडबेटीं देत भुभु:कार । प्रगटले कितेकीं थोर थोर वान्नर । पाहतां दडुं पाहती अविंधकिंकर । तरि ही अभिमान खवळतु ॥१४॥
भिरकाविती बाले ढेपे उचलोन । टाकिती बंडे वृक्षपाषाण । घाबरोन तेधवा वाचउं प्राण । पलायमान मांडिलें ॥१५॥
पाछासि कळवितो कोण वृतांत । न पुसती घाबिरें येकमेकांत । वान्नरदळ दिसे आल्यावत । दचकती जाती पाहत मागें ॥१६॥
खाविंदापासी गेले रडत । थरथरा कापती सांगत वृत्तांत । ऐकतां मुख्यांनीं जाला तटस्छ । जिंदाफकीर सत्य ह्मणे ॥१७॥
वर्तती ज्या देशीं महानुभाव । तया देशाच नाव न घ्याव । हें असो कळला तो महिमाप्रभाव । भक्तजन नांदती सुखरुप ॥१८॥
छेत्रपती तो आधीं च भावार्थी । वरिवरि ऐकतां गुरुराजकीर्ती । जाली तयाची उदास वृत्ती । परि वरप्रभावें सावध असो ॥१९॥
ह्मणे स्वामीचा हा राज्यभार । परि सेवा न घडली कहीं अणुमात्र । मानोन शोधितु सनदपत्र । जे होती लिहिलेली दप्तरी ॥१२०॥
येकदां जालें हो वर्तमान । जयसिंगराजा पत्र लिहुन । ब्राह्मणासि करितां कैस पाळण । कळवाव ह्मणतिला शाहुसी ॥२१॥
देवविला येरु तयासि उत्तर । धर्मासि वोपिला राजसंभार । करुनि तयाचा प्रसाद स्वीकार । करित गुरुभजन सुखी असो ॥२२॥
ऐसा धर्मात्मा वरपुत्र श्रेष्ठ । गुरुपूजन चालाया नीट । करील सद्भावें पुढें खटपट । कपटविपट ज्याला नावडे ॥२३॥
पुढील कथेच अनुसंधान । भक्तास होती दास प्रसन्न । सुपंथा लागती हीनदीनजन । करावें श्रवण आदरें ॥२४॥

॥अभंग॥ मी तों गुरुघरीं होय आदिशेष । गुप्तस्छळीं वास साधावया ॥१॥
शांतीसेज करुं दास भगवान । कराया शयन सदोदीत ॥२॥
बाहुं सदाण सीरीं लीळा भूमिभार । होऊं प्रीतीपात्र विखहर्त्या ॥३॥
दिनानाथ आत्मारामासि बांधव । होउनिया भावें मान पाउं ॥४॥

॥वोवी॥ दासविश्रामधाम सुंदर । जेथें नांदती संतयोगेंद्र । सांभाळित तयाला निरंतर । आत्मारामप्रभु नांदे ॥१२५॥
इतिश्रि श्रीरामकृपा । तारकपरमार्थ सोपा । अंतरवेध सौख्य । अवतारकृत्य संपादून । विधानयुक्त । समर्थ समाधिस्छ जाले । परसैन्यपीडानिवारण । नानाविचित्रचर्या । निरुपण वर्ग येकशेहे तेरा ॥११३॥
जय जय राम ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP