॥सोपान॥ १११

एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले.


श्रीरामसमर्थ

॥पद॥ (धाटी ॥ सद्‍गुरु सेवी रे जना ॥) कथाकीर्तन उपाये । सकळ जना । होय तरणोपाये ॥धृ०॥
सांडावी सकळ लाज देवालागीं । व्हावें तेणें निर्लज्ज ॥१॥
लज्जा राखतां देव । करिल काय जीव बापुडें मानव ॥२॥
दास ह्मणे लोकासी । आपुला भार घाला वेगीं देवासी ॥३॥

॥वोवी॥ भवनिस्तराया बहुतापरीं । साधनें सांगती जगाभीतरीं । परंतु हित साध्य होय झडकरी । कथाकीर्तन कलयुगीं ॥१॥
भाळो आपणा जगन्नायक । वेगीं जन्माचें होऊं सार्थक । विद्यासंपादना कीजे अनेक । भाव हाव तवक धरुनिया ॥२॥
तरि जगदात्मा कीर्तनीं नाचे । मोक्षसाज करिं बांधुनि खाचे । धरुं धावती स्वर्गस्छीं पाय त्याचे । मग कटावभाषण कासया ॥३॥

॥अभंग॥ पावना पावन कल्याणा कल्याण । ज्ञानाचें संधान निजकथा ॥१॥
बत्धासी चेववी मुमुक्षा जीववी । साधका साजवी सत्य कथा ॥२॥
सित्धाचें जीवन ऐक्यता अंजन । भवाचें भंजन प्रेमकथा ॥३॥
शुद्रवैश्यक्षेत्रीं होवो का ब्राह्मण । कीर्तनश्रवणें धन्य होती ॥४॥
जो कां करी कथा सर्वदां निष्काम । मानी आत्माराम सखा त्यासी ॥५॥

॥वोवी॥ सांभाळा हो स्छितिगती आपुली । कथाकीर्तनीं लाज ते वोंगळी । घालोन रगडी पायातळीं । केल्या न केल्या करि सरी ॥४॥

॥श्लोक॥ (आत्मा०) ॥ लज्जा पापिणी भक्तवैरिणि करी विस्कट भक्तिभावा । दापी अंतरिं गुप्तरुप बसुनी भाउं नेदी सुदेवा । संसारीं विषयांत गर्व धगडा साजवी मोकळेनें । रंका रंक करुन नर्कगति दे मर्जिजे भावनेनें ॥१॥

॥वोवी॥ लज्जा पापिणी येतां आडवेसी । धैर्यलत्तेनें पळविजे तिसी । कीजे आपुलासा देवरायासी । संग लाजफाज झुगारुनी ॥५॥
जनलोक सोयरे हा ह्मणोन वेडा । निंदोन घालितां रागद्वेषधोंडा । बिगाडु भावना करितां रगडा । सत्कथाकीर्तना न विसंबीजे ॥६॥
कैवारी होतां येक देवराय । बापुडे मानवी करणार काय । अमृतपानिया करुं अपाय । कामदुधादुग्ध दिल्ह्यापरी ॥७॥
आपुली असतां येक दृढ भक्ती । जे निंदिती ते चि वंदों लागती । येऊनि अनकूळा वानिती कीर्ती । धन्य उपाय कीर्तन ॥८॥
सर्व भार आपुला देवावरी । घालोन विश्वासु धरावा अंतरीं । दाता येक आह्मा देव कैवारी । सांगती हो संत ऐसे चि ॥९॥
एवं कथेचें धन्य ऐश्वर्य । गातां साहित्य रसमाधुर्य । वर्मज्ञ जाणते होती तन्मय । जगदानंदकंदा सौख्य वाटे ॥१०॥

॥श्लोक॥ खणखणित खणाणी ताळकल्लोळ जेव्हां । दणदणित दणाणी चंग मृदांग तेव्हां । झणझणित झणाणी सप्तरागें प्रसंगें । चणचणित चणाणी वीण जे रागरंगें ॥१॥

॥वोवी॥ थोरीव कथेचें सत्य चि आहे । परंतु मजुरी कामाची नव्हे । अश्रत्धावंता न गवसे सोय । दंभाचारलौकिकलौभ्य खोटा ॥११॥
करुनि कथेच आडपडदा । सावकाश करुं लागे निंदा । उफराटे त्याला च होय बाधा । जेवि मंत्रित्या अंतीं छळिती भूतें ॥१२॥

॥पद॥ (कामोद चाल-लावोनिया लोचन ॥) कथेचें करुनि मीस निंदा करी सावकाश । तया जगदीश अंतरला रे ॥धृ०॥ धावण नागवी त्यासी विष घेतां वैद्यापासीं । जाऊनि तीर्थासी दोष केले रे ॥१॥
अमृतसागरीं मेला पोहतां चि बुडाला । आनंदी असोनि जाला दु:खी रे ॥२॥
पशु गेले वर्‍हाडे तयापुढें काबाडें । सज्जना निंदिते वेडे जाण रे बापा ॥३॥
रामीरामदास ह्मणे हरिकथानिरुपणें । स्वहित करणे सर्वकाळ रे ॥४॥

॥वोवी॥ कथाकीर्तनें हरती संकट । जिये प्रभावें निरसती कष्ट । वोसरे लौकरी सद्वाट श्रेष्ठ । स्छितिसंपन्नपेठ दृष्टी पडे ॥१३॥
परंतु न शोभे भावनाखेट । कृत्रिम धरणें तें खोटें चि खोटें । कांहींबाय पुण्य ह्मणणें हळुवट । क्रिया थेट ते नसल्या हो ॥१४॥
सांगोन शहाण्यांनीं लोका फळश्रुती । तोंड पसरितो मदांधाप्रती । उफराटे त्याला होय फजिती । येथ हि तेथ यमापुढें ॥१५॥

॥पद॥ कथा करितो गोड लोक पडाया भीड । दीनें वासितो तोंड । गर्व्यापासीं ॥१॥
बहुलाघव आसे सांगे थोर स्ववंश । ते हे वदे आमुचे सिष्य । द्रव्य मेळऊं ॥२॥
जळों त्याचें धिग जिणें बोले लाजिरवाणें । काबाडी होय पूर्ण कुटुंबाचा ॥३॥
कथेचें करुनि मीस । निंदा करी सावकाश । देवसंतांचा विश्वास । नसे मानसीं ॥४॥
अनसरता कामधाम दुर्‍हावला आत्माराम । जळो वरपांग प्रेम । भक्ता न मने ॥५॥

॥वोवी॥ जळो ऐशाची वृथा चावटी । बोलणें येक तो भाव येक पोटीं । सुधरेना तरी कोणी हि गोष्टी । ताठा अभिमान सांडीना ॥१६॥

॥अभिमानपंचक अभंग ॥ संसाराच दु:ख आलें । गाणें अवघें चि बुडालें ॥१॥
आतां आठवेना कांहीं । पडिलों चिंतेचे प्रवाहीं ॥२॥
गाणे नाचणें सुखाचें । जिणें जालें दु:खाचें ॥३॥
ह्मणे रामीरामदास । कोण करीतो सायास ॥४॥१॥

॥१॥ नानाप्रकारीचें गाणें । मी च बाळपणीं जाणें ॥धृ०॥ काय जाहलें कळेना । येक तें हि आठवेना ॥१॥
मज पाठांतर होतें । इतुकें कोणासी नव्हे ते ॥२॥
रामदास ह्मणे आतां । जीव जाला दुश्चिता ॥३॥२॥

॥आतां गाती नाना परी । परी ते नये माझे सरी ॥१॥
माझें गाणें कोणीकडे । काय गातील बापुडे ॥धृ०॥
आतां पडिला विसरु । आठवेना काय करुं ॥२॥
दास ह्मणे भक्ति कैंची । ऐसी जाती अभिमानाची ॥३॥३॥

॥गाणें कांही च येईना । तरि अभिमान जाईना ॥धृ०॥ आलें निकट मरण । तरी सोडीना मी पणें ॥१॥
देह जाले पंजर । ह्मणे होतों मी सुंदर ॥२॥
रामदास ह्मणे रितें । वेडें अभिमान धरितें ॥३॥४॥

॥वोवी॥ सांगे जनाला वृथा मी गाजी । काळ दवडितो अहंतामाजीं । स्छिरोन निवेना सुशांतसेजीं । जे बरी नव्हे वाजी ते चि धरी ॥१७॥
ऐसें न करितां आळस क्षणमात्र । कथाकीर्तनीं व्हावें सादर । देवावरी आपुला सर्व ही भार । घालोन स्वस्छ होइजे ॥१८॥
पातेजला जो देवरायासी । वाया न गेला आणा मनासी । भर्वसा यापरी बहुत लोकासी । रामदासांनीं सांगितलें ॥१९॥
देवपण आणि भक्तपण दोनी । शोभिवंत होऊं येक्या स्छानीं । रामदास ऐसें नाम ठेउनी । संपादविती द्वयकार्य हि ॥२०॥
सत्संगाचें फळ तें रोकडें । नाम किल्याचें सज्जनगड । राहणें स्वामींचें जेथें अखंड । चरित्र बहु गोड जयाचें ॥२१॥
नसे जयाला लौभ्यता आस । ज्याचेनि कटाक्षें तुटे भवपाश । करुनि गडाच्या भोंवितीं वास । पातले अक्षयींझ गृहाप्रती ॥२२॥
ठळक सिष्यजना जाला निरोप । राहिले महंतीमाजीं सुखरुप । परंतु वेणुबाईचा संकल्प । गुरुपदापरौता न होये ॥२३॥
लाडकीस नुपजे थोरिव आस । महंती कीजे हा नसे चि सोस । अखंडित जिला थोर हव्यास । सेवा करावी गुरुसन्निधीं ॥२४॥
बहुपरी कथितां निरोपविषईं । न रुते चि वाक्य तें अबळाहृदईं । वदे समाधी श्रीगुरुपाई । माझी होणें हा निश्चय ॥२५॥
वळखोन तियेची भावना दृढ । योजिलें स्वामींनीं धाडिजे पुढें । तों अवचट बाईला उठिली आवड । करामतवार्ता ऐकुनियां ॥२६॥
सुकृतबळानें सत्पुरुषांनीं । विघरोन जालें पाण्यांत पाणी । तेजीं समरसलें होऊन अग्नी । वार्‍यांत वारें होठेले ॥२७॥
अदृश्य होठेलें देखतां दृष्टी । कोणी कमाई करोन मोठी । जाऊनि बैसले नीट वैकुंठीं । किंवा कैलासीं तनुसगट ॥२८॥
घटसहित वैकुंठा जाऊं कारण । श्रीरामचंद्रा मी हि प्रार्थीन । तदनंतरीं समर्थाआज्ञा प्रमाण । मिळेन शामळ हरिरुपीं ॥२९॥
कारण धैर्यासी भक्तिभावानें । गुरुदत्त पट्टाभिरामपूजन । करुनि विनवितां नानापरीनें । संभाषण करितसे ॥३०॥
साजिरी जियेची अनन्य भक्ति । मनुजापरी बोले धातुमूर्ति । धगधगित पुण्याला उपमिजे ज्योति । तरि काजळचिन्ह दिव्यामस्तकीं ॥३१॥
अग्निज्योतीवरी धूम्रअंकूर । विद्युल्लताआंगीं ताप तीव्र । न साजे भूताचा जेथ प्रकार । निर्विकारीं गुरुकृपें या हेतु ॥३२॥
ज्ञानध्यानातें जिरवोन प्रेमीं । वास्तव्य केलीसे वैराग्यधामीं । तोंड न दावी ज्ञातृत्वउर्मी । जिव्हाळा श्रीरामीं जियेचा ॥३३॥
नमोन येकदां पुसे देवासी । अघटित हेतु उपजल्या मानसीं । पुरविसील कीं आर्त निश्चयेंसीं । येरु वदतसे तथास्तु ॥३४॥
या भरवसेनें कायासहित । जाऊं वैकुंठा उपजला हेत । प्रसन्नसमयीं असतां समर्थ । नमोन अपेक्षा निवेदी ॥३५॥
जी देवाधिदेवा दीनवत्छला । तव करुणाकटाक्षें दुर्बळाला । येकदां चि वोळे त्रैलोक्य सोहळा । लागे पायाला काळ तो ॥३६॥
हेतु उपजल्या अघटमान । अप्रयासी तो होईल पूर्ण । तरि असे वैकुंठीं काय वर्तमान । आणीन तनुसहा जाउनी ॥३७॥
सफळित व्हावया येवढी वासना । आज्ञा द्यावी जी करुनाघना । पत्तही पडलीसे मागें भावना । धरुन बहुतेकीं हें केलें ॥३८॥
हे सदृढभक्तीची ऐकोन मात । अंतरीं च अंतरीं तोषले समर्थ । भाविलें कासया हे करामत । तदाकारसौख्यातें टाकुनी ॥३९॥
सगुणसौख्य हें नाशिवंत । ह्मणोन दाविजे जरि शुत्धप्रांत । तरि अंतसमयींचा विटोन भावार्थ । दचकोन होईल मध्येस्छी ॥४०॥
मोक्षपदवीचा घेऊनि लाभ । तनु गुप्त कराया नसे विळंब । मग परमार्थ दावाया करुनि सुलभ । कां होईना बाई ह्मणतिलें ॥४१॥
मग पाहोन काळाला केले आज्ञा । न येई येथ बाहिल्याविन्हा । तो काळ गुप्त जाला करुनि प्रार्थना । मग बोलते जाले बाईप्रती ॥४२॥
जाण केव्हां ही आहे निश्चय । त्याची तातडी आतां च काय । पक्वान्न कराया जे विदित आहे । परवडी येकेक दावी करी ॥४३॥
तव हातीं च गोडगोड भोजन । नित्य येकपरी करवी येथून । सस्वरुपीं होतां लीनतल्लीन । हें सौख्य मागुती मग कैंचें ॥४४॥
सत्य आहे हें स्वामीजे बोलणें । जे कराव तें असतां प्राण । तनुत्यागामागें सौख्य पावेन । कल्पणें मूर्खता जाणिजे ॥४५॥

॥अभंग॥ सत्य माना गोष्टी तनुत्यागापाठीं । कल्पील जे पोटीं न घडे चि ॥१॥
कोण योन्यामाजी कोण कोठें जाती । जाणीजे प्रचिती काशावरुनी ॥२॥
येक्याठाई रमूं भोगूं पुण्यफळ । योजिती सप्रेम होय कैसे ॥३॥
वाक्य हे कर्मणी गहना गति: ऐसें । होणें आहे कैसें न कळे चि ॥४॥
मुक्त होतां दोघे पुन्हा न भेटती । बत्धमुक्तास्छिती क:समंध: ॥५॥
दोघे अनाचारी चौर्‍यासींत पडतां । भेट उभयतां न होये चि ॥६॥
काय कीं कर्मानें पडल्या ही गांठ । न कळे चि स्पष्ट मागें केलें ॥७॥
कळतां मागील प्राप्तीसी येईना । मूढाची कल्पना भ्रांतिरुप ॥८॥
चारिलक्ष योनी मानव ह्मणती । येकयेकाप्रती भेटी नोहे ॥९॥
नरदेहीं स्वामित्व युत्तयाघात आहे । येका चि न साहे क्रिया येका ॥१०॥
येक्या योनिमाजी नानामत्तभेद । अन्यासी समंध सोसे केवी ॥११॥
यास्तव देवानीं बहुदेसीं टापात । स्छळ मानवांत भिन्न केले ॥१२॥
साहतील तितुकी योन्या येक्याठाईं । बद्धानें वर्तवी ते ही टूकी ॥१३॥
मागील पुढील भ्रमासि टाकुनी । या जन्मीं ये क्षणीं व्हावें सुखी ॥१४॥
यास्तव होउनि सद्‍गुरुसेवक । स्वात्मानंदीं ऐक्य व्हावे स्वथा ॥१५॥

॥वोवी॥ हें असो ऐकतां गुरुराजवाक्य । लोटलें सुनेत्रीं प्रेमउदक । ह्मणे दयाळा अविवेक मूर्ख । वोढिता अडराणीं विस्मावलें ॥४६॥
मस्तकीं असतां कैवल्यनिधान । लोकाकोकवासाचे भाकिते दैन्य । टाकुनि सेवेचें अमृतपान । घटगुप्तकांजी इछिले ॥४७॥
अपराध क्षमा करुनि दयाळा । बळें चि लाविल सन्मार्गाला । पुढें ही कृपेनें सांभाळ केला । पाहिजे किंकरा माउलीये ॥४८॥
ऐकोन यापरी करुणास्तवन । हास्यवदन केले तेणें सज्जन । तेव्हां बाईला कळली खूण । काळासि कृपेनें पर्तविलें ॥४९॥
रामानंदस्वामी ज्ञानदेव । वटेश्वरचांगा नागदेव । असंख्य ऐसे जे महानुभाव । केलें कर्तृत्व तैसें च हें ॥५०॥
सद्‍गुरुपाई जयाचा प्रेम । सेवा करी जो निजनिष्काम । तयास मानिती अंतक येम । सखा होय परम काळ तो ॥५१॥
मग बाईनें लाऊनि चित्त । साहित्य केलें विधानयुक्त । पक्वान्न करितसे नित्य नित्य । नूतन येकेक परवडी ॥५२॥
पोळया कानवले फेण्या घीवर । सिरि पुर्‍यादि करंजा खीर । सुवासित खिचडया मांडे कचुर । पंचभक्ष परमान्न भात फळें ॥५३॥
चुर्मा बुंदेलाडु कोडवळ्या सोजी । अनारसी अपाल अतिरसें भाजी । जे करावें प्रभातीं जें व्हावें सांजीं । तें करुन अर्पितां संतोषती ॥५४॥
तूप गूळ शर्करा मैदा तांदुळ । दहींदुग्धसायमदराबदाळ । हिंगसुंट्टजिर्‍यादि सर्वानुकूळ । सयपाकालागीं सित्ध असे ॥५५॥
भोजन येकांतीं करिती सज्जन । पंक्तिकर होतो अंजनीसूत । तुष्टतां प्रसाद सेविती मागुन । कांहीं दिवस लोटले यापरी ॥५६॥
दिसोड स्वामींनीं भोजनाअंतीं । पूर्वोपाधीची पातलों वृत्ती । सच्छिष्यीणीला प्रबोध करिती । कळाया कायामाया मृषा ॥५७॥
येकेक भूतीं पंचभूतराहटी । भूतांतरीं ते गुण ही त्रिपुटी । अष्टधापासून सकळ ही सृष्टी । वेष्टी समेष्टी मायामय ॥५८॥
सगुण मुक्ति ते नाशिवंत । निर्गुण सायुज्यगती शाश्वत । जाणें येणें तें काय कशांत । अविद्यावासनारुप कैसें ॥५९॥
नामासी रुपरुपासी नाम । नामरुपातीत परब्रह्म । दृश्याकाराचा निरसतां भ्रम । स्वयमेव वर्म कळलिया ॥६०॥
कोठें कां पडेना कळेवर । संकल्पक्षयो मोक्ष: विचार । आत्मस्वरुप तें निजनिर्विकार । हा कळविलें अवग्र वृतांत ॥६१॥
श्रवणीं संचारतां येकेक प्रमय । वांटे बाईला तॄणसमा देहे । स्छानमानप्रतिष्ठा मनास नये । तन्मयीं तन्मय होठेली ॥६२॥
पिंडब्रह्मांड करुनि ऐक्यता । ब्रह्मानंदीं तें ही निरसितां । तनु नसे वस्तु चि भासे तत्वता । भेदभ्रमवार्ता नुरे चि ॥६३॥
जाणोन सरलें पक्वान्न करणें । चिंतावलें तैं अंतरीं सज्जन । इछिलें बाळांनीं आतां प्रयाण । तरी येकादशी पर्व जवळी असे ॥६४॥
ह्मणोन सन्निधीं वाहोन निस्पृही । ह्मणतिलें ऐक गे वेणुबाई । वाचिसी प्रेमानें येकांतठाई । सीतासैंवर प्राकृत ॥६५॥
तें काव्य स्वकृत आह्मापासी । लाजोन ह्मणाया मर्यादा धरिसी । आतां वसवोन निर्भय मानसी । करी ससांग ते कीर्तन ॥६६॥
नमोन येक वदे तथास्तु । केले पाठादि सांग साहित्यु । सभेसी मिरवतां करुणावंतु । जनलोक मिळाले दाटी जाली ॥६७॥
मीनले निस्पृही विरक्त भाविक । कवेश्वर गवाई पुराणिक । जे पान करणारे ज्ञानपीयुख । ब्रह्मवेत्ते भजनकर्ते ॥६८॥
हरिदास साबडे योगी ध्यानी । पुरश्चरणी जपी तपी मौनी । प्रपंचिक पदज नार्‍या सद्गुणी । कीर्तन श्रवणासी पातले ॥६९॥
नेणो पडलीसे मोहनमुद्रा । जेथें न वागती आलस्य निद्रा । घडिघडी लक्षिती करुणासमुद्रा । उल्हास मुखाब्जीं पसरलासे ॥७०॥
धृवपद्या कथा करणारेसी । समस्त श्रोते ऐकणारेसी । पुरें करावें हे न वाटे मानसीं । कथा बहुगोड या हेतु ॥७१॥
धन्य गुरुपुत्री प्रसादवाणी । उघड केलीसे परमार्थखाणी । रात्रीं न गणिती न हालती कोणी । धन्य लाघव या नांव ॥७२॥
कोण ऐकतो नित्यनित्य कथा । ऐसें न वदती कोणी सर्वथा । कीर्तननेमाचा समय होतां । न बाहतां मिळती येउनी ॥७३॥
निरुपणाचा विस्तार आसका । लिहितां न होयेल ऐको अवांका । यास्तव भाव तो साधुनि निका । श्रवण करा हो सैंवर ॥७४॥
प्रत्यक्षाला कासया प्रमाण । आदरें करावें श्रवणमनन । मुख्य सद्गुरुकृपा वरदान । महदलाभकारक ॥७५॥
(येथें मुळांत वेणाबाईकृत सीतास्वयंवर उतरलेले आहे.)

॥वोवी॥ मग कौलसिंहासन कथन सुरस । उपदेशादिक वर्णितां रहस्य । संतोष मानिलें श्रीरामदास । सकळिका उल्हास वाटला ॥७६॥
मग वाईदे सकळा च होईल येणें । ह्मणोन अनुमानीं पडले सज्जन । अर्पोन श्रीरामा तनुमनधन । पुज्यमान फळ न होतां बरें नव्हे ॥७७॥
वदले वेणूला जाई आतां । विघडपणाची न वाही चिंता । मी व्यापोन आसेन सबाह्यता । पूज्यस्छान येक जा साधी ॥७८॥
मानेल तितुके दिवसपरियंत । करोन महंती स्वस्छ चित्त । वाढऊनिया हित परमार्थ । गुप्त करी घटा मानेपरी ॥७९॥
येरु बाईची भावना दृढ । लक्ष लाऊनि चरणाकडे । वंदोन बोलिली वाक्य गोड गोड । श्रीचरणीगंगा मम कीर्ति ॥८०॥
या पदाब्जी कराब्ज मुखाब्ज ठेऊन । समाधी साधितां अर्पून प्राण । साधिलें सहजीं लक्षपूजन । फळप्राप्ती तेणें समरस ॥८१॥
ऐसें ऐकतां प्रेमरसवाक्य । धन्य हा भावो भाविले देशिक । शरण आपणाला आलासे येक । वर्मज्ञ भाविक विश्वासी ॥८२॥
जाणोन सिष्यिणी सन्निधीं येक ही । प्रस्तुत निर्व्हाका करणार नाहीं । यास्तव उमेदिया बाहोन निस्पृही । अभयवरदान वोपिलें ॥८३॥
मग बोलिले मी च ते वेणुबाई । ससांग तियेचा सिष्य तुं होई । कृपा करील जनकजाबाई । साह्य होईल भीमराये ॥८४॥
येरु तथास्तु वदे भाविक । वेणुस हि कथोन विवेक । स्वयें सांगुनि विधान असक । उपदेश सांग देवविलें ॥८५॥
मग वेणुकडे लक्षोन समर्थ । उदईक करावें ह्मणतिलें लळित । वदली तथास्तु घडिघडी नमित । पसरला पूर आनंद ॥८६॥
कर्मउपासना नेमनेमक । सारुनि ससांग भोजनादिक । लळितकथेचें अनुभऊं सौख्य । सभा घनवटली स्वयें चि ॥८७॥
साह्य जियेला श्रीरामसमर्थ । भीड जियेची हणुमंताते । ऐकतां जियेची येकेक मात । तटस्छ होती सभाजन ॥८८॥
येकिकडे आसती समर्थ । सन्निधीं तिष्ठती सिष्यसद्भक्त । अंतेष्टी च सकळ साहित्य । करविते जाले सर्वज्ञ ॥८९॥
तुळसीचंदनकाष्टादि आणुनि । सरण रचाया ठेविलें नेउनी । चित्ति ही ठेविलें सित्ध करुनी । व्यंग न पडावें कर्मात ॥९०॥
जे निर्जिविया करणें कर्तृत्व । पाहोन लोकाला वाटे विपरीत । विदित जयाला स्वामीमहत्व । चाकाटोन ह्मणती काय कीं ॥९१॥
डगमगुं आसे जयाचे चित्तीं । भ्रमभरें महिमा विसरोन जाती । कां हो अपशकुन दावाव वदती । वृत्धाप्यचर्या योगमस्ती ॥९२॥
वदे दुजयांनीं हें केल्यावरी । मृत्यु पावेल हो कोणीतरी । पिसाटदशा ते परतली भारी । आसतां कांतारी जे होती ॥९३॥
द्वाड भ्याड ते भीऊं लागले । चेले मस्तान जरी चौताळले । धरुनि जीवंता जाळिले पोळिले । कोण गती सांगांवें कोणापुढें ॥९४॥
वेघले अधंत्री योचनाहुडे । निवांत आसती केव्हां हि निधडे । स्वामिरायांनीं हासती तिकडे । धन्य भाव सदृढ बाईचा ॥९५॥
जीवेन घट हा राहो शाश्वत । होईल वेधना पातला मृत्य । हा राम ते जन द्वैत अद्वैत । हें भान कांहीं न धरी बया ॥९६॥
कथांतीं जाला आरती गजर । हरिनामटाळी जयजयकार । भजन करित बाईनीं मंजुळ स्वर । सद्गुरुपासीं पातलीं ॥९७॥
वोपूनि विणा तो सद्गुरुकरीं । वाहुनि मस्तकु पदाब्जावरी । प्राणज्योतिते काढूनि झडकरी । सद्गुरुहृदई मिळविली ॥९८॥
आधीं च होती ते वस्तु च पूर्ण । तेथें मिळणें ना येणें जाणें । चर्या जाली हे अपूर्व सगुण । उपासनागुणें गुरुकृपें ॥९९॥
जनलोक वदती गेला जीव । कुडी ते उचलिली स्वयें गुरुराव । करविलें तेथील विधान सर्व । अधिकारी सिष्याकरानें ॥१००॥
गुरुराज वदती धन्य पुण्यखाणी । कैवारी जियेचा कोदंडपाणी । अन्य नरस्पर्श जन्मापासुनी । न जाला जाली कृतार्थ ॥१॥
धन्य कृपाळु माहराज सज्जन । वंशावळी ते पुढती वाढून । पूजाराधना होऊं कारण । सिष्यिणीसिष्या प्रबोधिलें ॥२॥
कर्मधर्म सारुनि कृष्णातटीं । समाधी तेथ करुन गोमटी । पूजा ठेऊन तेथील मठीं । राहिला महंत तो सुखरुप ॥३॥
गुरुबांधवादि साधुसंत । वेणुबाईला जे करणार हितमित । रामांनीं त्याची पुरविली आर्त । रुप वेणूचें दाउनी ॥४॥
पुण्यतिथीदिनीं जालें चोज । देखिलें बहुतांनीं स्वरुप निज । ऐसे कृपाळु दासमहाराज । होती प्रसन्न भक्तासी ॥५॥
पुढील कथेचें अनुसंधान । भक्ताभिमानी भूजारमण । पावोन दासाला दिव्यमहिमान । दावील श्रवण करावें ॥१०६॥

॥अभंग॥ दासविश्रामधाम सुंदर । रम्य सुदिव्य टेकडी थोर । विसावला योगीनाथेश्वर । स्वात्मानंदसुख दावित ॥१०७॥
इति श्री श्रीरामकृपा । तारकपरमार्थसोपा । कथा साधन सुलभउपाय । वेणुबाईभक्तिनिकट । पक्वान्नकरण । सीतासैंवरादि कथा करणें । मोक्षसित्धी । सोपान । येकसेहे अकरा ॥१११॥
संपूर्ण । जयजयराम ॥
(मुळांत येथें वेणाबाईकृत रामगुहकसंवादाचे ४४ श्लोक व कौलाचे २६ उतरलेले आहेत.)

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP