॥वर्ग॥ ११०

एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले.


श्रीरामसमर्थ

॥पद॥ (कामोद धाट लावोनि लो०॥) हरित दुरित कथा रामाची पावन । श्रवण मनन करी करी रे । धृ०॥ येक येक अक्षर तारी भवसागर । धरावें अंतर भविष्याचें रे ॥१॥
कथेचें आरत पोटीं धरितां पूर्वज कोटी । उत्धरती उठाउठी जाण रे ॥२॥
रामदास ह्मणे साचें अंतर सदाशिवाचें । सर्वकाळ वाचें राम राम रे ॥३॥

॥वोवी॥ जे वोपी झडकरी स्वहितफळ । जे दावी अनयासी जीवाचें मूळ । जे दुरितकानना दावानळ । ते कथा रसाळ रामाची ॥१॥
जें सत्य त्रिसत्य पतीतपावन । जेणें भवाचें होय निरशन । तें केलें चि करावें श्रवण मनन । श्रीरामकथन सद्भावें ॥२॥
अखंड वाचितां हे दिव्यलीळा । वश्य होठाके श्रीराम सगळा । जेणें योगें येतसे मुखाला । श्रीरामनाम घडिघडी ॥३॥
ह्मणाल काय तें नाममहिमान । तरि ऐका श्रोतेनो कथिलें सज्जन । कहीं विलोका या रामनामेंविण । मुक्तिदायक आन नसे ची ॥४॥
हो सित्ध ज्ञाता योगी ध्यानी । नानामंत्राचे पुरश्चरणी । तराया तया सांब निर्वाणीं । तारक ची सांगे मोक्षपुरी ॥५॥

॥अभंग॥ कथापं०॥ सकळसाधनाचें फळ । रामनाम चि केवळ ॥धृ०॥
जप तप अनुष्ठान । अंति नाम चि प्रमाण ॥१॥
नाना मंत्र यंत्रावळी । सोडवीना अंतकाळी ॥२॥
महापातकी पतित । नामें तारिले अनंत ॥३॥
नाम साराचें हें सार । नाम सकळासी आधार ॥४॥
दास ह्मणे सांगों किती । नामेंविण नाही गती ॥५॥

॥वोवी॥ कथेंत आसे हे दिव्यनामसार । ह्मणोन रिझला आसे शंकर । अहो कथेचें येकैक अक्षर । करी संहार महापातक ॥६॥
न वदवे हो कथेचें थोरिव । अन्यत्र साधनीं श्रमतां भाव । फळ प्राप्त न होय ऐसी सावेव । बोलिलासे शिव यापरी ॥७॥
योगसौख्य तें होय येकातें । स्वयें सुखाचें वैराग्यस्छ । स्वर्गी आरुढे स्वयें दीक्षित । मुलेंबाळातें टाकुनी ॥८॥
कर्म सांग केल्या होईल शुत्ध । हृदय निर्मळ करिल वेद । करितां ही कृपेनें ज्ञान ध्यान बोध । जाणतील येकाहुनी येक ॥९॥
तपतां येकानीं होईल नृप । ह्मणवील सभागी करितां व्याप । व्रतनेममौन्य तीर्थक्षेत्रजप । साधनें फळ निवडक ॥१०॥
ऐसी नव्हे कीं श्रीरामकथा । जे श्रवणीं भेदाची नसे वार्ता । बत्धमुक्ताला येक चि प्राप्तता । सगट सर्वत्रा मोकळीक ॥११॥
धन्य ते ऋषिच्या भविष्यगोष्टी । आरत कथेचें जो धरी पोटी । तरतील तयाचे पूर्वज कोटी । उठाउठीनें सत्य हे ॥१२॥
अनेक योनिमाजि जन्मला । ते सकळ ही पूर्वज होय तयाला । त्या सकळासी होय मोकळा । सार्थक पेटेचा सुपंथ ॥१३॥

॥अभंग॥ रामनाथकथागंगा । श्रवणें पावन करी जगा ॥१॥
तीस प्रेमपूर आला । शंकर हृदयी सामावला ॥२॥
रामदासाची माउली । आळशावरुन गंगा आली ॥३॥

॥वोवी॥ थोरिवा थोरिव वदाव काय । श्रीरामकथा हे सुलभ होय । कळिमाजी तो सुगमोपाय । पावनकारक चरित्रें ॥१४॥

॥श्लोक॥ कळीमाजि भूमंडळीं सार आहे । हरिकीर्तनें दोष कोठें न राहे । पवित्रें चरित्रें रघुनायकाचीं । धरावीं मनीं आदरेसी फुकाची ॥१॥
हरिकथाश्रवणें हरि सांपडे । सकळ सार कथाश्रवणीं पडे । परम दुल्लभ तें पाहणें घडे । अहंमता ममता मग विघडे ॥२॥

॥अभंग॥ धन्य त्याचा जन्म धन्य त्याचें कूळ । जो करी सुकाळ रामभक्ती ॥१॥
श्रीरामचरित्र अखंड गातसे । तल्लीन होतसे प्रेमरंगीं ॥२॥
आला लाभ हाता सांबाचें ठेवणें । भविष्यभूषण ल्याला स्वयें ॥३॥
श्रीरामावाचुन नेणेंचि तो आन । श्रवणमनन रामकथा ॥४॥
होउनिया स्वयें देव आत्माराम । सदा जपे नाम ऐके कथा ॥५॥

॥वोवी॥ तरणोपायार्थ साधन सुलभ । सोपें चि परि घडतो महालाभ । स्वानंदकंदा फुटे कोंभ । परमार्थ स्वयंभ कीर्तन ॥१५॥
रामकथेचें लाहतां वैभव । उभा च विरे तो अहंभाव । पाठीराखीत फिरे देव । वोळगती मुक्त्यादि नवल काये ॥१६॥
दुर्लभ ची परि ते जाली सुलभता । वर्म जाणेल तो धन्य सज्ञाता । सार साराचें रघुनाथकथा । सद्भक्तजीवनीं भ्रमहर्ती ॥१७॥
ऐसियापरी प्रबोध करित । सज्जनगडींख राहिले समर्थ । जे पूसती सद्भावें अपेक्षावंत । पुरऊन समक्षा बोलती ॥१८॥
पुसतां येकांनीं कथापद्धती । बोलिले तेणें तुष्टला सुमती । तें चि वचन तुह्मा ऐकवीन श्रोतीं । मानसीं धरावें आदरें ॥१९॥

॥पद॥ (गवडि धाट नदिचा उगम ॥) बंद प्रबंद बहुविध छंद । कीर्तनघमंडी करावी । निरुपणश्रवणमनननिजध्यासें । पावन वाट धरावी ॥१॥
तरि च जन्म हा सफळ । नाहिंतरी सकळ निर्फळ ॥धृ०॥ जड चंचळ निश्चळ वोळखावें । सारासार चि शोधुनि घ्यावें । मूळापासून सेवटवरी । माईक सकळ तजावें ॥२॥
पुस्तकज्ञानें होत चि नाहीं । प्रत्यय नीट पाहावा । दास ह्मणे समजेल विचारें । तेणें तुटेल गोवा ॥३॥

॥वोवी॥ आणिकास बोलिले बुद्धिवाद निका । कथाविषईचा आदरें ऐका । एवं अवतरले दीनजनसखा । अनुग्रह करिती बहुता रितीं ॥२०॥

॥पद॥ (श्रीराम हरहर देव आप० ।) भक्ष भात परमान्न नसतां साधन । तैसें हरिकथा जाण भावार्थेविण ॥१॥
चुनासुपारीपान । रंगेना कातेविण । तैसी हरिकथा जाण आवडीविण ॥२॥
दास ह्मणे जीवन सकळा समाधान । तैसी हरिकथा ज्ञानेविण ॥३॥

॥वोवी॥ बिंबतां हृदईं हें प्रसादवचन । तात्काळ तयाला बाणली खूण । शुत्ध भावार्थ आवडी ज्ञान । युक्त कीर्तन करुं लागला ॥२१॥

॥पद॥ धन्य बोला तयाला । ज्याची दिव्य लीळा । आशापाशादिक तोडून टाकी । न गुंते लौकिकी ॥१॥
वेगी विषयावरी हाणुनिया लात । मना करी स्वस्छ ॥२॥
सुकाळ ज्या ठाई जाला परमार्थ । न करी काळ व्यर्थ ॥३॥
बोलणें चालणें प्रत्यय ज्याचें । भजन करी साचें ॥४॥
कर्मउपासनाज्ञान तें रम्य । तंतु तो आत्माराम ॥५॥

॥वोवी॥ ऐसे माहराजकृपेचे बळें । योग्यवंत ते जाले पुष्कळ । ज्याचेन दर्शन होतसे फळ । पुण्यसीळ करुं पुढारी ॥२२॥
धन्य तें सज्जनगिरीचें मौळ । वास्तव्य केलें जेथ दयाळ । उदासवृत्तीनें कंठिती काल । कथापीयुष प्रासित ॥२३॥
कपिलाषष्ठीहून विशेष । पुण्यपर्वचा आला दिवस । स्नानदान करुं धनवान पुरुष । तीर्थक्षेत्रासि जाताती ॥२४॥
बोलके जाणते मिष्टगोष्टराहटी । धावती धनाशें तयाचे पाटीं । देखोन दरिद्री भाविती पोटीं । धिग जन्म आपुला पर्व काय ॥२५॥
जाणते ससांग शास्त्र पुराण । पर्वपुण्याचें टाकुनि भान । भाटवत तयाचें करिती स्तवन । निंदिती सत्पुरुषा अधंत्रीं ॥२६॥
एवं पर्वासि त्रिविधजन । भेडियाचालाचे मिळाले येऊन । वर्मिष्ट ही श्रीहरीआइना मानून । जनासारिखे पातले ॥२७॥
योगांत योगी ते रमती सुख । नेणती पर्व ना विधी ना मूर्ख । गुरुभक्तप्रतापी पुण्यश्लोक । सेवाविण अगत्य नसे तया ॥२८॥
हिंदुस दूषिती मुसलमीन । समुद्रवासी त्या वदती हीन । येकमेकीं मछर धरोन । साभिमान परमार्थी सावध या हेत । वदती मानस्छ जगद्‍गुरु ॥३०॥

॥अभंग॥ ऐसा व्हावा जनीं सद्भक्त सज्ञानी । वदिजे पुण्यखाणी योग्यवंत ॥१॥
नाहीं सुस्ती मस्ती उदासी वैराग्य । तप अनुराग क्षमावस्य ॥२॥
कर्मधर्म शुत्ध क्रिया ही नेमक । करुन लौकिक लिप्त नोहे ॥३॥
निंदाभकाध्येसी जेथें नाहीं ठाव । तो चि होय देव आत्माराम ॥४॥

॥वोवी॥ वसती येकांती दासदयाळ । जाणोन आला थोर पर्वकाळ । न घेतां सवें वसन ना कांबळ । कवणा ही श्रृत न करितां ॥३१॥
रात्रौ उठोन चालिले समर्थ । कवणा ही वार्ता न जाली विदित । भेटला विप्राचा मेळ मार्गात । सातरेहुनि जात असतां ॥३२॥
धरामर होते अलोचनी । कोणीकडे जावें येथुनी । द्रव्य देणार कोणता धणी । कोणत्या घाटीं मिळेल ॥३३॥
तो होऊन स्वामींनीं ध्यानीं निमग्न । चालिले त्वरेनें करित रामचिंतन । वळखिलें अधींच शाहणें ब्राह्मण । संगमासी जाती निश्चय ॥३४॥
करितीअलोचना मिळोन सर्वी । आतां धनाची आस्छा त्यजावी । स्नानास चालिले दासगोसावी । संकल्प सांगु चला हो ॥३५॥
येक ह्मणे तो काय देईल । सत्वहाणी तरि होईल । हिणोन बोलाया ह्मणोन जालें स्छळ । संकटीं तरी पडेल कीं ॥३६॥
नाहीं त्याजवळी कांहीं च देऊं । कां राजगुरु जाला ह्मणोन हिणाऊं । येक ह्मणे हो तपस्वी बहु । श्राप देईल येखादा ॥३७॥
निष्ठूर करीना धरा कीं धैर्य । स्नान तरि आह्मां होईल पर्व । सातारा काय तो दूर आहे । येऊं स्वस्छळा विनोदुनी ॥३८॥
तरूणपणाचा आंगीं ताठा । विद्याचतुराई गर्व मोटा । एवं मिळेल त्या प्रताप साटा । निंदास्मरणाच्या उदमीनें ॥३९॥
मग लवडसवडी पातले ब्राह्मण । तो स्वामींनीं करु लागले स्नान । श्री गोविंद गोविंद चहुकडोन । वदत आरंभिले संकल्प ॥४०॥
शाहणपणाचा दाऊं प्रशांश । ससांगमंत्राचा करिती घोष । उबग मानिना किमपी दास । ब्रह्मण्यावरी प्रीत मोटी ॥४१॥
बाहेरी पातले करुनि स्नान । तंव दक्षणा द्यावी जी ह्मणती ब्राह्मण । रघुविराचें करुनि चिंतन । मांडीलें स्तवन कृष्णेचें ॥४२॥
गंगे कर्ते तूं अघनग चूर्ण । सुकृत दुणावें तव दर्शन । जाले होती पातकी पावन । मिरासी त्याला वैकुंठीं ॥४३॥
विधी हरि हर ऋषि मुनि अमर । राहो ईछिती धरुनि तीर । व्यासादिकांनीं महिमा अपार । वानिलें मानवीं पाड किती ॥४४॥
बाई ग तव उदरा आलों कारण । तृष्णा सर्व ही जाली निरशन । आतां ही आई कृपा करुन । धरामराते तोषवी ॥४५॥
श्रमत दूर आले धरुनी आस्छा । संकल्प तयाचा न करी वृथा । थोर थोर यजमाना लक्षा नाणिता । कीर्ति फळ वोपू पातले ॥४६॥
जेणें परदेशिया येईल मान्यता । वाटेल उल्हासु सिखीया चित्ता । राखोन नामाते दाखवी सत्ता । ह्मणोन उतरले पाण्यांत ॥४७॥
ब्राह्मणास ह्मणतिलें धरा विश्वास । न्यहल करिल हो बाई तुह्मास । बोलोन यापरी लागले तळास । धांडोळून गोटे काढिले ॥४८॥
पावसेर अछेर सवासेर । अधीकउणे ही सेर दोन सेर । पद्मपरिसकरें धीर उदार । येकेक वोपिलें येकेका ॥४९॥
दगडदक्षणा कां दिल्हें ह्मणोनी । कुचेष्टा कीजे जरि द्विजांनी । तटस्छ ठेले भय संचरोनी । देखोन उग्रता गुरुमुखीं ॥५०॥
दगड स्वर्ण कसं भरोन नेत्रीं । उग्ररुप दाविलें कोदंडधारी । किं प्रवेशून कृष्णेनें वदनजाउदरी । निंदामळ क्षाळितां घाविरले ॥५१॥
भाविलें केलिया मना कडुवट । होईल तात्काळीं आमुचें तळपट । ह्मणतिलें कवणा ही कृत्रिम खोट । सत्पुरुषा किमपी छळों नये ॥५२॥
घेऊन गोटे ते चालिले मौन्य । विकल्प करिती दुरी जाऊन । अभाविकी ते भावोन पाषाण । फेकोन दिधले चहुंकडे ॥५३॥
जंव दक्षणा देऊं लागले समर्थ । चहुंकडील सिखी ते आले पळत । दगड देतां ही विटेना चित्त । मानिले चोज उल्हास ॥५४॥
तत्काळ तयाला भंगार भासे । ते विदित न करितां येकमेकास । स्वस्छळास गेले पावले हरुष । आतां इकडिल वृत्तांत ॥५५॥
विश्वासी ते धरुनि भाव । ह्मणतिलें संतांनीं वोपिलें ग्राव । पूजावेंख घरीं हो त्रिसत्य देव । उर्जीत होईल फार ची ॥५६॥
ऐकिल्या सित्धाच्या अघटित करणी । गाती ऐकती भाविकी कीर्तनीं । हा माहराज ही दाविलें विचित्र जनीं । कां धरावी मनीं अश्रत्धा ॥५७॥
भाविलें मध्यस्छीं कां सांडिजे येथ । नेऊन टाकूं आपुल्या घरांत । वदोन नेले ते आतां वृतांत । काय जाला तो ऐकिजे ॥५८॥
पूजुं भावार्थी काढितां गोटे । सुवर्णाचे जालेति लाटे । देखोन तयाला ऐसें वाटे । फीटलें दैन्य जन्माचें ॥५९॥
अंगणांत ज्यांनीं टाकिले धोंडे । पाहती तंव ते सोन्याचे उंडे । नेले त्वरेनें देव्हाराकडे । लपलपोन ठेविले ॥६०॥
राणांत भिरकाविले जे पाषाण । लखलखा झळकती होऊनि सोन । पाहतां गुराखी हें काय ह्मणोन । वेचोन घेतलें येकेक ॥६१॥
मायबापाला दावितां नेऊन । फाकलें तें हें सर्व वर्तमान । धावले दरिद्र होऊं विछिन्न । भांडूं लागले येकमेकीं ॥६२॥
येकेक गोटयाला येक दो ती जण । चारपांच झोंबती समजले भीऊन । ह्मणती धरिल तें घेऊं वाटुन । तंव धावले द्विजांनीं कळोन हे ॥६३॥
माझें माझें ह्मणोन तवकें । माराया धावती वासिती मुख । भांडण तुटेना आशावत्धक । राजद्वारासि पातले ॥६४॥
करिती पाचांनीं पंचायती । दगडभाव्याला कायसी फळश्रृती । गोवळ्यासवे वादणें फजिती । कुमती कोठें ही भली नव्हे ॥६५॥

॥अभंग॥ टिकेल निर्वाणीं तो ची धीर । लक्षमाजिं मोहरा तो चि येक ॥१॥
धनासि पाहतां न विटे वैराग्य । आल्या ही सौभाग्य नये गर्व ॥२॥
होऊन सिष्यीण सेवा करि नारी । विकल्प अंतरीं जागो नये ॥३॥
असंतुष्ट द्विजीं नसावें किमपी । सित्ध योगी कोपी तापी नोहे ॥४॥
क्रिया न पालटे संकटीं न चळे । ज्ञान तें न बोले आशासाठीं ॥५॥
पढल्यावरी चाले प्रत्ययानें बोले । स्वात्मानंदीं खेळे गुरुकृपें ॥६॥

॥वोवी॥ मग जाणोन स्वामीची करणी अद्भुत । साह्य दिनाला होय समर्थ । राजा ह्मणे हे गोष्टी येथार्थ । तेणें ब्राह्मण दचकले ॥६६॥
सद्‍गुरुपासीं पातले पळत । सन्मानितां केलें जालें तें श्रृत । भाव आसावा ह्मणतां यथार्थ । नाडलों ह्मणोन तळमळिती ॥६७॥
करूणाकरु तैं भाळोन देशिक । वदले कृष्णेनें दाविलें कौतुक । स्वाधीन नाहीं कीं कांहींयेक । पुन्हां पर्व तो कोठें पां ॥६८॥
माना ह्मणोनि स्वल्प विशेख । मोहरा देवविलें येकेका येक । वानित सुकीर्ति मानीत कौतुक । जेवोन स्वस्छळाप्रती गेले ॥६९॥
वाढोन चहुंकडे पसरली कीर्ति । नामधारक ते सुखें मिरवती । अणुमात्र नुन्यता कोठें न वदती । सर्वमान्यक्रिया ह्मणोनी ॥७०॥
सकळामाजि ब्राह्मण श्रेष्ठ । वंदिती जयाचे हरी नीलकंठ । परि बुद्धि ते धरुनि कूईट । फट्ट पडूनि येरा नाडविती ॥७१॥
पाहा येकदां दाससमर्थ । भद्राचळासी जात जात । राहणें घडलें हो सारंगपुरात । उपासना वाढली ॥७२॥
सिष्य ही जाले भोळे भाविक । भक्ति करुं लागला शाहणा द्विज येक । देखों न सकती त्यास इत्यादिक । ह्मणती सत्पुरुष कर्महीन ॥७३॥
शुत्ध चालतां ही वदती वाईट । आपण तों अधर्मी वागती भ्रष्ट । असो सिष्य तो जोडूनि करपुट । प्रार्थितां स्वामींनीं हासीले ॥७४॥
कर्मयुक्त उदास क्रिया सद्गती । कळोन वागाया त्यास गुरुमूर्ती । अभंग वोपिलें लिहोन त्याप्रती । तुष्टले विप्र ते ऐका तुह्मी ॥७५॥

॥अभंग॥ (कर्मकांडाचे) ॥ तुजसाठीं वाटे व्हावे बा उदास । रात्र आणी दिवस हा विचार । परि मना विघ्नें चतुर्दशा मोठीं । केव्हां घडे भेटी देवाची ते ॥२॥
मध्यें चि गवसिती विघ्नाच्या अडचणी । चुकताती दोनी कर्म धर्म ॥३॥
ह्मणुनि सुचवितो विचारि तूं चित्तीं । न जाल्या फजिती दुणी होये ॥४॥
रामदास ह्मणे सावध तूं चित्ता । विघ्नें तुज आतां निरोपितो ॥५॥१॥

॥कीर्तन करितां कुटाळी करिती । न धरावा चित्तीं त्याचा राग ॥१॥
आत्मरुपीं नाहीं निंदा आणी स्तुती । देहासी निंदिती ते तों निंद्य ॥२॥
दुसरीया आर्थ चित्त ने उदासी । तेणें हृषीकेशी मुखीं येतो ॥३॥
निंद्येचें तें ऐसें सहन करावें । शांतत्व धरावें चित्तीं दृढ ॥४॥
रामदास ह्मणे मना तूं विचारी । कोणता संसारीं वरा लोक ॥५॥२॥

॥आचरीतां कां न पाहिला विचार । आतां कां अंतर खोचवलें ॥१॥
करितां हरुषता मानिलासि चित्तीं । होता ते फजिती कां कोपसी ॥२॥
यमाचे आघात येथेचि चुकती । जोडेल श्रीपती येणें नेम ॥३॥
जनाची वैखरी शोधी रे तूं बरी । नाहीं नाहीं खरी कां ऐकसी ॥४॥
मानसीं विचार सार तेथें आहे । रामदासीं राहे हा चि नेम ॥५॥३॥

॥बोले बहु त्याला ह्मणती वाचाळ । बोलेना तो खळ मैंद ह्मणती ॥१॥
बळकट धश्चोट ते काय व्यसनीं । कर्मठ जो प्राणी तो पोंचट ॥२॥
होईना संसार ह्मणोन संन्यासी । हासती तयासी ऐशा रीती ॥३॥
थोडभक्षी ह्मणती नाहीं दैवी अन्न । निस्पृहीया हीनमति वदती ॥४॥
रामदास ह्मणे बरवें पाहणें । जनाचें बोलणें कोठवरी ॥५॥४॥

॥तारुण्यवयांत जरि लागे साधनीं । करावा तो कोणी संसार हा ॥१॥
संसारांत सर्व ह्मणती घडते । सर्वस्व बुडतें हें न कळे ॥२॥
ताटीस संचाया चाले वर्षभर । नाहीं हें उत्तर याचकासी ॥३॥
यीहीयांत घडे कुटुंबाचा नाश । पाप न दिल्यास गाठी पडे ॥४॥
रामदास ह्मणे सूक्ष्मदृष्टी पाहे । संसारीं जो राहे तो पाषांडी ॥५॥५॥

॥टाकोनि जनासी आरण्यीं जे जाती । पूर्ण ते होती कल्पांतरीं ॥१॥
आरण्या गेल्यानें जनोक्ती सहन । न जाल्या अभिमान केवि जाये ॥२॥
ज्या स्छळी प्रतिष्ठा त्या स्छळीचे जन । निंदिल्या वचन न साहती ॥३॥
तयासि सोसावें थोर हें साधन । होईल तो पूर्ण तेणें करुनी ॥४॥
रामदास ह्मणे ऐसे जे निश्चयी । माथा त्याचे पाई ठेविलासे ॥५॥६॥

॥संसारांत सुखी कोण हो विचारी । दु:ख घरोघरीं येकयेका ॥१॥
येका घरी नाहीं संतानाचे मुख । येक ते विन्मुख राजद्वारीं ॥२॥
कोणी वृत्तीहीन कोणी वित्तहीन । रोगार्णवीं मग्न जाले किती ॥३॥
ऐसे ही असोनी साधक निंदिती । जोडणी करिती पापाची ते ॥४॥
यासाठी मना हें मानूं नको खरें । आपुल्या विचारें राहे बापा ॥५॥
रामदास ह्मणे सुख रामपाई । तेथें तूं कां राही निश्चळता ॥६॥७॥

॥लोकांत राहोनी कैसें तें नसावें । साधन हें ठावें करितो तुज ॥१॥
बोलणें सवेंचि श्रवण करावें । मनांत धरावें मनन तें ॥२॥
ज्ञान पक्षीं सर्व लाउनिया घ्यावें । तदर्थ टाकावें जनीं तोची ॥३॥
आपुलिया देशीं भिक्षार्थसहनार्थ । राहोनि अनर्थ चुकवावे ॥४॥
रामदास ह्मणे ऐसें तूं ह्मणसी । कां न दूरदेशीं जावें सांगा ॥५॥८॥

॥तरी ऐके बापा तीर्थिची जे जोडे । सहज तें घडे ऐसें करी ॥१॥
नानाविधबुत्धीप्रकारीचे जन । तयालागीं खूण सांगूं नये ॥२॥
बाहेरी भजन अंतरीं संसार । कुटीळ कठोर वेषधारी ॥३॥
नमस्कार त्यासी मुखें न बोलावें । त्यासवें न जावें देहें मनें ॥४॥
रामदास ह्मणे भजन ऐकती । करोनी श्रीपती करी सखा ॥५॥९॥

॥कोणत्या उद्योगीं नाहीं घडे पाप । संसारीं निष्पाप कोणता ची ॥१॥
होउनिया पांगे दूरदेशीं जावें । अनाथा लुटावें हा धर्म कीं ॥२॥
श्रीमंताचे आह्मी सेवक ह्मणावें । गर्वानें तंडावे येणें धर्म ॥३॥
कमावीस द्यावी अन्याय शोधावे । येणें देव पावे कैसा सांग ॥४॥
रामदास ह्मणे राजाश्रई लोक । तयालागीं नर्क नाहीं नाहीं ॥५॥१०॥

॥वृत्ध ते ह्मणती संसार करावा । जनाहातीं घ्यावा ह्मणुनी बरें ॥१॥
ह्मणताती बरें जन ते कोणाला । बुडविती त्याला ऐशा बोधी ॥२॥
वैश्वदेव दान अतीथी तो घडे । टाकि एकिकडे केले दोष ॥३॥
मूर्ख तो ह्मणावा काय जी वाल्मिक । टाकितां सकळिक मुक्त जाला ॥४॥
रामदास ह्मणे कथिलें जे वेदीं । तया मात्र वंदी इतर थोर ॥५॥१२॥

॥संसारीं न होतां काय तो जनक । ह्मणती विवेक न करितां ॥१॥
सत्ययुग आणि आयुष्यभरवसा । याज्ञवल्क्याऐसा उपदेशिता ॥२॥
ऋषेश्वर नित्य येती जाती घरीं । तेणें वनांतरी कां जावें हो ॥३॥
आसे तुह्मा काय ऐसें अनकूळता । मूर्ख नाश थिता कां करिता ॥४॥
रामदास ह्मणे कलयुगीं हे ची ॥ वाट साधनाची बरी सोपी ॥५॥१३॥

॥मुनेश्वराऐसे न करा नियम । जनकासि सम कां करा रे ॥१॥
ज्या गोत्रीचे तुह्मी तया ऋषेश्वरीं । केलें तया करीं आचरण ॥२॥
प्रथम साधका लक्षणें इतुकीं । पुढें आतां भाकी सिद्धि चिन्ह ॥३॥
सांगोनि लक्षण कथीन आचरण । पूर्णासि जे विघ्नें तीं ही सांगो ॥४॥
रामदास ह्मणे साधन जें केलें । पुढिले चुकविले जन्मफेरे ॥५॥१४॥

॥व्हावया तो योगी कैसा अधिकार । तयाला साचार प्राप्ती होय ॥१॥
पाहिजे अनुताप तापलों मी फार । विश्रांतीला थार नाहीं नाहीं ॥२॥
नरदेहीं जन्मुनीं विषईक जालों । स्वार्थासि चूकलों हें चि शोधी ॥३॥
ऐसा अनुताप नित्य तो वाहतां । वैराग्य ये हाता त्या प्राण्याच्या ॥४॥
रामदास ह्मणे त्रिविध वैराग्ये । भोगोनि आरोग्य केले देहा ॥५॥१५॥

॥सात्विक राजस तामस त्रिविध । वैराग्याचे भेद योगी वदती ॥१॥
देवीमत्त करी मनधर्णी मासाचे । टाकी ब्राह्मणाचे नेमधर्म ॥२॥
होऊनि गोसावी लाविती कौपीन । दयाक्षमाज्ञानहीन राख ॥३॥
मठातें बांधोनी व्यवहार करिती । कल्पांत्या श्रीपती न भेटेल ॥४॥
रामदास ह्मणे देव तो समीप । गाठी ऐसें पाप जोडा परी ॥५॥१७॥

॥देऊळाचें मिसें द्रव्य तें जोडावें । गाठीचे मोडावें पुण्यधन ॥१॥
येर्‍हवी तें काय न घडे प्राण्याला । लय करण्याला आग लागो ॥२॥
राजाज्ञें हें वाचे कवन करावें । धन्य ह्मणवावें लोकाहाती ॥३॥
राजसा तामसा राघवाची भेटी । गेल्या जन्म कोटी जरी नाहीं ॥४॥
रामदास ह्मणे करितो निवाड । सोडवितो खोड मान तुझा ॥५॥१९॥

॥पश्चात्ताप जाला संसार करितां । अथवा देखतां पर:दुख ॥१॥
तेव्हां पूर्वि तुज जनोक्ति कथिल्या । पाहिजे सोसिल्या त्या आधि बा ॥२॥
कितेकासी बोध तयाचा ही होतो । संसारीं पडतो मागुता ची ॥३॥
नाहींतरी मग राजसतामसी । वैराग्याची फासी गळा पडे ॥४॥
रामदास ह्मणे सवसारी मुक्ती । सांगो तुजप्रती ऐक ते रे ॥५॥२१॥

॥गुरुसी शरण जावें जीवभावें । वेदांत ऐकावें तन्मुखानें ॥१॥
यावत्काळ जाली नाहीं ते पूर्णता । तंवरी अनंता अर्जावें हो ॥२॥
साधकाणी सित्ध पूर्ण तो तीसरा । लक्षण अवधारा त्याचीं मनें ॥३॥
जनोक्ती साहोनी साधनीं लुब्धला । साधक तो जाला योगापेक्षी ॥४॥
रामदास ह्मणे सित्धाची लक्षणें । ऐकतां ची ध्यान लागो ध्यासा ॥५॥२२॥

॥ न व्हावें सन्यासी बाह्यवेषधारी । भार्या असुनी करी भिक्षुधर्म ॥१॥
विष्ठामूत्र करुनि क्षाळी हस्तपाद । मुखवाचा शोधे गंगेतटीं ॥२॥
घटिका येक रात्र राहे तयावरी । ऐसें नित्य करी नेमालागीं ॥३॥

घालोनि आसन बरवें बैसावें । स्तवन करावें जान्हवीचें ॥४॥
रामदास ह्मणे अजपा संकल्प । करा नाशी पाप केलें तुमचें ॥५॥२३॥

॥योगाभ्यास मग यथाशक्त्या करी । तुटे कर्मदोरी ज्या सेवनें ॥१॥
ईडामार्गी वायु यथाशक्त्या वोढी । दडपावी गाढी तो कुंभक ॥२॥
पिंगळेच्या मार्गे सांडावें निश्वास । सुषुम्ना वेळ नाश होय जात ॥३॥
पिंगळें करावें युक्तीनें पूरक । होईल कुंभक तितुका कीजे ॥४॥
रामदास ह्मणे करावें रेचक । जेणें जाला येक प्राणायाम ॥५॥२४॥

॥ऐसे चढवितां चढे विशुत्ध जेव्हां । तुटे सर्व तेव्हां कर्मबंध ॥१॥
करावें ते स्नान वेदोक्तमंत्रानें । त्रिपुंडधारण आष्ट स्छानीं ॥२॥
भुशुत्धी भूतशुद्धी मात्रुकेची न्यास । आरंभ संध्येस मग कीजे ॥३॥
शतत्रय जप गायत्रीचा कीजे । सहस्त्र जपीजे गुरुमंत्र ॥४॥
रामदास ह्मणे यथाशक्ती मतीं । पुजावें श्रीपती मनीं मूर्ती ॥५॥२५॥

॥करोनि पूजन वाचावें पुराण । श्रेष्ठ रामायण भागवत ॥१॥
स्त्रोत्र पाठ कीजे भिक्षेला मागतां । प्रीय तो अनंता येणे नेमें ॥२॥
आरंभ भिक्षेचां प्रहराचे वरी । मागावी घटिका चारी ग्रामामाजी ॥३॥
आणोनि तें अन्न भार्येसि अर्पावें । माध्यान्हीका जावें तीर्थावरी ॥४॥
रामदास ह्मणे माध्यान्हीची विधी । आचरतां सित्धी होय प्राण्या ॥५॥२६॥

॥जाउनिया तीर्थी स्नानासि करावें । त्रिपुंड्र धरावे द्वारावतिनें ॥१॥
आसन मृगचर्म पात्र तो भोपळा । योगीयाची कळा ऐसा धरिजे ॥४॥
माध्यान्ह संध्याणि सूर्यउपस्छान । जाल्या ब्रह्मयज्ञ मग कीजे ॥३॥
प्रतीक लक्षावा निर्मळ आकाशीं । पुष्टीं गभस्तीसी करोनिया ॥४॥
रामदास चिन्हें सांगे पुरुषाची । अवधी काळाची समजे तेणें ॥५॥२७॥

॥षण्मास मरण काळा तो पुरुष । होय देख त्यास निश्चयानें ॥१॥
नानावर्ण भासे उद्वेग होईल । पिवळा रोगील भय लाली ॥२॥
दक्षण भुजहीन धर्मीचा तो नाश । थोडक आयुष्य राहिल तो ॥३॥
वामभुजाहीन स्त्री षण्मासि जात । शिरहीन होत मरण मासी ॥४॥
रामदास ह्मणे प्रतीक लक्षण । पाहोनि अवधान ठेवि काळा ॥५॥२८॥

॥इकडे भार्यानें अन्न सिजउनि । ठेवावें झाकुनी पती येतो ॥१॥
माध्यान्ह सारोनि आश्रमासि यावें । देवासी करावें धूपदीप ॥२॥
नैवेद्ये दावावें पदार्थ जो केला । श्रीवैश्वदेवाला मग कीज ॥३॥
अतिथी पूजावा प्राप्त जालें द्वार । नाहीं हें उत्तर तीया न कीजे ॥४॥
रामदास ह्मणे प्रमाण सूत्राचें । घेतलें लोकाचें खंडनार्थ ॥५॥२९॥

॥गोग्रास काढोनी कीजे भाग तीने । अतिथी आपण दोन घ्यावे ॥१॥
तिसरा तो भाग भार्येसि अर्पावा । अतिथी तर्पावा आर्थतेन ॥२॥
ग्रासोग्रासी राम ह्मणत जेवावें । अचंऊनि घ्यावें तुळसीदळ ॥३॥
सरली ते भिक्षा स्तोत्र जे उरली । पढावी त्या काळी शांतचित्तें ॥४॥
रामदास ह्मणे बुद्धिचा निश्चये । या ठाई च होय तो धन्य ची ॥५॥३०॥

॥करावें स्तवन ऐकावें पुराण । शेष घडी तीन दिन राहतो ॥१॥
क्षाळुनि पद हस्त संध्या आरंभावी । सरस्वती घ्यावी ब्रह्मदेवी ॥२॥
गभस्तीमंडळ नेत्रानें लक्षावें । मरण पाहवें येणें आपुलें ॥३॥
वर्ते उणे भासे षण्मासी मरण । तळी जरी नुन्य मास तीन ॥४॥
रामदास ह्मणे दक्ष्णभागी उण । दोमासी मरण हा नेम हो ॥५॥३१॥

॥वामभुजा कोरहीं न दिसे जेव्हां । येकमासी तेव्हा मरण हो ॥१॥
मध्य छिद्र देखे उरले दाहा दिन । सधुम्रदर्शन उरलें पाच ॥२॥
ज्वाळा निघे ऐसा गभस्ती अस्तासी । अवधी मरणाची प्रहर आठ ॥३॥
द्विशत गायत्री नियम पढावी । मग ते ह्मणावी रामरक्षा ॥४॥
रामदास ह्मणे सायंकाळी कर्म । अतिप्त अति वर्म तेथिल हो ॥५॥३२॥

॥वोवी॥ येकदां येकांतीं आसतां गुरुपासीं । दर्शनासि पातला नृप पुण्यरासी । नमनादि जालियावरी तयासी । पुसिलें स्वामिंनीं हासत ॥७६॥
पुराणीं ऐकिल राजधर्म रिती । स्फुरण होत कीं स्मरल्या चित्तीं । विभव आशानें डगमगु वृत्ती । होत नाहिं कीं सुजाणा ॥७७॥
देहत्रयाचा साक्षी होऊन । घडल आहे कीं स्वरुपीं ध्यान । आशाममतादि तृणसमान । मानोन श्रीरामीं रमतोस कीं ॥७८॥
परमार्थामाजीं कांहीं नुन्य । आसलिया सांग पांतें वळखोन । कृपा करुन श्रीरघुनंदन । वोपील आयुष्य पाहिजेल ॥७९॥
येरु बोलिला जोडूनि कर । नामरुप स्वामीचें अहोरात्र । स्मरतां आठवितां उण अणुमात्र । न दिसे जालों कीं पूर्णकामी ॥८०॥
आरे गुप्त केलिया आह्मी घटाते । सावरसि कीं हा परमार्थ । ऐकतां यापरी पडला मूर्छित । देहभान नसे बोलावया ॥८१॥
देखोन तयाची ऐसी अवस्छा । पद्मकरानें कुर्वाळितां । उठोन ह्मणतिला हे सद्‍गुरुसमर्था । हे न घलावी वार्ता कानांत ॥८२॥
मज दीनासी धाडिजे पुढें । गमनस्छा तें करीन चोकड । मोक्षद्वार तें करुनि उघड । बैसेन मार्ग प्रतिक्षित ॥८३॥
मुक्तिस मुक्तता हा चि मोक्षनिका । ठाव पदकमळीं द्यावा रंका । राहोन मग हृदईं दीनजनसखा । पुढील कार्य संपादिजे ॥८४॥
जेथ सामावला ब्रह्मगोळ अवघा । तें त्वदृपीं माते द्यावी जागा । विनवितां ऐसें भक्तभवभंगा । करूणा उपजली मोक्ष वोपु ॥८५॥
ह्मणतिलें आतां सावध होई । चित्त आसो दे श्रीरामपाई । संशयान सरणु न करी कांहीं । जाली कमाई पूर्ण तुझी ॥८६॥
उदासीनता धरुन हृदई । वासना गुंतों न देई कहीं । आयुष्य उरले जें स्वल्प तें ही । सार्थककारणी घाली पां ॥८७॥
प्राणवासनाच्या अंत:पाती । होऊनयेते ज्ञानात्मज्योती । स्वरुप चि आहे निज आदि अंतीं । जाण ना येणें आत्मस्छिता ॥८८॥
प्रपंचादिहीं स्छूळ समंध । बंधान याचें ही कीजे सावध । अंतकाळींचा न धरीजे खेद । व्यवहार संपतां वेळ ते ॥८९॥
कीर्ति उरवावी अगाध माग । धर्म अदरणा कीजे ससांग । पूर्वी जाले जे राजे अनेग । मर्यादा त्याची ऐकतोसी ॥९०॥
धर्म अंतींचा जो आसे पुराणीं । तो सांग संपादीं पुण्यखाणी । आह्माजवळीं राहाणें येथुनि । मनापासूनि करावें ॥९१॥
सगुणापेक्षें धाऊन येसी । तरि आमुचि स्छिती होईल उदासी । विचित्रलीळा देखोन दचकसी । हुरहुर वाटेल ऐकतां ॥९२॥
यास्तव संभाजीपुत्राकारण । नीट सर्व ही आया करुन । राजभार अवघा त्याला सोपून । मुक्तदशाते अपंगी ॥९३॥
शंभुदेव तुझा कुळदैवत । राजमार्गानें जाऊनि तेथ । दानधर्मादि आचरुन समस्त । देवब्राह्मणा मानवी ॥९४॥
वरषासन अग्रारनेम क्षेत्र । पुष्ठी करी पुर्विचे चालूं थोर । नूतनादि विधींत करुन साजिर । स्वरुपसमरसीं होई पां ॥९५॥
बुद्धिवाद कथितां ना ह्मणवेना । करोन घडिघडी नमनप्रदक्षणा । आठवीत लीळा मानोन आज्ञा । ढाळीत प्रेमाश्रृ उभेला ॥९६॥
जावयाविषईं हो ह्मणो नये । परंतु कृपेनें सद्‍गुरुराय । तीर्थप्रसादु वोपितां अभय । समाधान । जालें गेला तो ॥९७॥
काय राजाला उणें सांगा हो । अधीं च गुरुकृपें निसरला मोहो । ह्मणोन गुरुपदीं मिळाला ठावो । जगदंबिकेचे वरदानें ॥९८॥
करुन घेतला जन्मसार्थक । धन्य धन्य ह्मणतिलें हा पुण्यश्लोक । आतां इकडील कथाकौतुक । राहिले देशिक गडावरी ॥९९॥
सिष्य जे होते जाणते शांत । कळवोन तयाला स्वहित परमार्थ । महंती कराया धाडिलें त्यातें । राहिले कितेक संग्रही ॥१००॥
देशांतरी होते जे सर्वज्ञ । ते सिष्यजन पातले भेटीकारण । कां ह्मणाल तयाला विदित गुरु करणें । अनकूळ जाले ते आणिले ॥१॥
त्यासवें दर्शना आले कितेकी । तैसे चि पातले भोळेभाविकीं । कितेकां स्वामिंनीं गुंतले भाकी । होते स्वप्नीं त्या बोलाविलें ॥२॥
न मागतीच कोणास कांहीं । स्वपजि आणितां अश्रत्धा नाहीं । भंडारीं भरपूर आसे सर्वही । लक्ष्मीवराचे कृपेनें ॥३॥
दर्शनास येती जाती लोक । शस्त्राज्ञ पंडित पुराणिक । कितेकीं जन्माचे होऊं सार्थक । अनुग्रह घेऊं येताती ॥४॥
न ह्मणतां भणगु मूर्ख सान थोर । सर्वज्ञाप्रती करिती आदरें । भेद जेवि न धरी गंगानीर । हिमकरुसुधा ज्यापरी ॥६॥
येकदां येक्या भावीक सद्गुणी । हृदई ठसाया बोधसार वाणी । आर्थभाव पूसतां मुळापासुनी । रहस्य कळविलें अभंगीं ॥६॥
श्रवण करा हो चालूनि चित्त । बोलणें संताचें सप्रचीत । धन्य दासाचें अवतारकृत्य । वरदाय समर्थ श्रीराम ॥७॥

॥अभंग॥ पहिले प्रथम मुळीं परब्रह्म । व्यापक सुगम जेथ तेथें ॥च०॥४॥

॥वोवी॥ आर्थसार बिंबतां त्याचे मानसीं । उल्हास वाटला बहुत दासासी । गुजगुह्य सर्व ही कळवोन तयासी । केलें कृतार्थ कृपेनें ॥८॥
आणिक येक भक्तिवंतांनीं । पुसतां समजाऊं श्रीमोक्षदानी । बोध ठसाया त्या हृद्भुवनीं । सहजांत सौख्य घडते आहे । अभंगीं अभंग होठाकिजे ॥११०॥

॥अभंग॥ जे पंचभूतीक ते सर्व माईक । बोलती विवेक संतजन ॥च०॥२०॥

॥वोवी॥ ऐकतां तो ही निवाला पूर्ण । स्वस्छळासि  गेला करित स्तवन । अनुग्रह यापरी करिती सज्जन । नाहीं अनुमान कृपणता ॥११॥
पुढील कथेसी अवधान द्यावें । भक्तिरहस्य आहे बरवें । विचित्र दाविती दासगुरुराव । ऐकोन सद्भावें व्हा सुखी ॥१२॥

॥अभंग॥ दासमहाराज श्रीभोळाशंकर । जालों मी कुबेर त्याचा घरीं ॥१॥
राखितो ठेवणें न कळे किती काये । चाड गुरुराय न धरी च ॥२॥
भंडारामाजील स्वल्पधनमानें । जाले भाग्यवान जगामाजीं ॥३॥
सरी ह्मणोनिया हाव जे धरिती । सकामीं गुंतती हाय नाहीं ॥४॥
ज्याचें द्रव्य त्याला अर्पण चि आहे । थोरिवाचें काय काज येथें ॥५॥
तनुमनधन त्याचें त्या अर्पुनी । सर्वदां भजनीं व्हावें मग्न ॥६॥
धन तें न नाशे जैस तैस राहे । कार्य होत आहे उद्धारक ॥७॥
आत्मारामसखा दाता होय पूर्ण । सांभाळी कृपेने न्याहाल करी ॥८॥

॥वोवी॥ दासविश्रामधाम सुंदर । कामनाथेश्वरी पुण्य क्षेत्र । भक्तसंत वागती निरंतर । स्वात्मानंदसौख्य पावती ॥११३॥
इतिश्री श्रीरामकृपा तारक परमार्थ सोपा । रामकथा पावन विशेष । दगड दक्षणा । शिवाजीनृपास निरोप । बुद्धिज्ञानकथण । वर्ग समास येकसेहे दाहा ॥११०॥
जय जय राम ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP