ज्येष्ठ वद्य १०
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
आगरकर याचें निधन !
शके १८१७ च्या ज्येष्ठ व. १० रोजी महाराष्ट्रांतील थोर समाजसुधारक, बुध्दिवादी पुरुष, ‘सुधारक’ पत्राचे संपादक गोपाळ गणेश आगरकर यांचे निधन झालें.
अत्यंत दारिद्र्यांत त्यांनीं आपलें शिक्षण पूर्ण केलें. त्यांची तडफ लहानपणींहि दिसून येई. शाळेंत येण्यास उशीर झाल्यावर शिक्षक ‘तुम्ही असेच मागें पडणार’ असें म्हणाले. त्यावर यांनीं उत्तर दिलें, “तुमच्यासारखा एम्. ए. होईल तरच नांवाचा आगरकर !” आणि आर्थिक परिस्थितीशीं तोंड देऊन इतिहास व तत्त्वज्ञान हे विषय घेऊन ते एम्. ए. झाले. त्याच्या अगोदरच यांनीं आपल्या जीवितध्येयाबद्दल स्वत:च्या आईला लिहिलें “आपल्या मुलाला मोठया पगाराची चाकरी लागेल असें तूं समजत असशील, पण तुला सांगोन टाकतों कीं, विशेष संपत्तीची, विशेष सुखाची हांव न धरतां मी फक्त पोटापुरत्या पैशांवर संतोष मानून सर्व वेळ परहितार्थ खर्च करणार !”
आगरकरांचें शिक्षण पूर्ण झाल्यावर ते चिपळुणकरांच्या नेतृत्वाखालीं निघणार्या ‘केसरी’, ‘मराठा’ या पत्रांना येऊन मिळाले. आणि दुसर्याच वर्षी त्यांना व टिळकांना प्रसिध्द अशी ‘डोंगरीच्या तुरुगांतील एकशें एक दिवसांची शिक्षा’ झाली. पुढें ‘केसरीकारां’शीं यांचे मतभेद झाल्यावर यांनीं सन १८८८ मध्यें ‘सुधारक’ पत्र काढून त्यांत निर्भीडपणें आपले सामाजिक सुधारणेसंबंधीं विचार मांडण्यास सुरुवात केली. अर्थातच ठार मारण्याची धमकी, खोटी प्रेतयात्रा, यांसारखा त्रास आगरकरांना सहन करावा लागला. तरीसुध्दां या त्यागी वृत्तीच्या पुरुषांत फरक पडला नाहीं. होळकर सरकारची दरमहा पांचशें रुपयांची नोकरी नाकारुन यांनीं बाणेदार वृत्ति प्रकट केली. १८९२ सालीं आगरकर फर्ग्यूसन काँलेजचे प्राचार्य झाले. शेवटीम दारिद्रय, दमा आणि देशकार्य यांनीं जीर्ण झालेल्या यांच्या शरीराचा अंत ज्येष्ठ व. १० या दिवशीं झाला. मृत्युनंतर यांच्या पेटींत उत्तरकार्यासाठीं म्हणून ठेवलेली रुपयांची पुरचुंडी सांपडली. महाराष्टाचा निर्भय समाजसुधारक गेला म्हणून सर्वानाच हळहळ वाटली.
- १७ जून १८९५
N/A
References : N/A
Last Updated : September 23, 2018
TOP