ज्येष्ठ वद्य ३
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
“महाराष्ट्र धर्म रक्षावा !”
शके १६१३ च्या ज्येष्ठ व. ३ रोजीं छत्रपति राजाराममहाराजांनीं हणमंतराव घोरपडे यांना सरंजाम दिला.
संभाजीच्या वधानंतर मोंगली सत्तेविरुध्द प्रक्षुब्ध झालेल्या महाराष्ट्रानें व्यवस्था रामचंद्रपंत, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, शंकराची नारायण, इत्यादि कर्त्या पुरुषांवर सोंपवून, राजाराममहाराजांनीं जिजीकडे प्रयाण केलें. जिंजीस पोंचतांना राजारामाबरोबरच्या मंडळींना बराच त्रास झाला. प्रल्हाद निराजी व खंडो बल्लाळ या स्वामिभक्तांनीं अनेक हाल अपेष्टा सोसून जिंजी गांठली. राजारामानें त्यांचा योग्य तो सत्कार केला. जिंजी हें राजधानीचें ठिकाणच झालें. सर्वत्र थोडें स्थिरस्थावर झाल्यावर राजाराममहाराजांनी अष्टप्रधानांच्या नेमणूका करुन राज्यकारभारहि चालू केला. त्यांनीं स्वत:छत्रपतिपद व राजचिन्हें धारण केलीं होतीं, परंतु विधिपूर्वक राज्याभिषेक समारंभ मात्र झाला नाहीं. कारण राज्याचा खरा मालक शाहू हा अटकेंत होता याची जाणीव राजारामाला पुरेपूर होती. “चिरंजीव शाहू कालेकरुन तरी श्री देशीं आणील; तेव्हां संकटीं जीं माणसें उपयोगी पडलीं त्यांच्या तसनसी आम्हीं करविल्या, याचा चित्ती व्देष करावा हें तरी अविचाराचें कलम. शाहू सर्व राज्यास अधिकारी, आम्ही करतो तें तरी त्यांच्यासाठीच आहे. प्रसंगास सर्व लोकांस त्यांजकडेच पाहणें आहे. हें कारण ईश्वरेंच नेमिलें आहे.” अशी भावना राजारामाची होती. याच भावनेस अनुसरुन निरनिराळे प्रधान नेमण्यांत आले. औरंगजेबाचा सर्व उद्योग हाणून पाडण्याचा डाव मराठयांनीं रचिला होता. ज्येष्ठ व. ३ रोजीं राजाराममहाराजांनीं हणमंतराव घोरपडे यांना सरंजाम ठरवून देऊन त्यांत लिहिलें, “महाराष्ट्र धर्म पूर्ण रक्षावा हा तुमचा संकल्प जाणून तुम्हांस जातीस व फौजा खर्चास सहा लक्ष होनांची नेमणूक चालवण्याचा निश्चय करुन दिधला असे.” याखेरीज आणखीहि कार्यकर्ते होते, त्याचा योग्य तो सन्मान राजारामानें केला. तिमाजी पिंगळे, सुंदर बाळाजी, परसोजी भोसले, आदि वीरपुरुषांचा सत्कार करण्यांत आला होता.
- ४ जून १६९१
N/A
References : N/A
Last Updated : September 20, 2018
TOP