ज्येष्ठ शु. ९
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
परशुरामपंत प्रतिनिधींचें निधन !
शके १६४० च्या ज्येष्ठ श. ९ रोजीं औंध संस्थानचे मूळ संस्थापक परशुराम त्र्यंबक प्रतिनिधि यांचें निधन झालें.
सातारा जिल्ह्यांतील वर्धनगडाखालील किन्हई गांवाचे हे कुलकर्णी होत. वयाच्या चौदाव्या वर्षी कुलकर्णीपण सोडून हे विशाळगडी गेले व तेथें निळो सोनदेव अमात्य यांच्या पदरीं यांनीं नोकरी पत्करली. राजाराममहाराज जिंजीकडे गेले त्या वेळेस त्यांनीं यांना सरदारकी देऊन ‘समशेर बहादरजंग’ अशी पदवी दिली. मोंगलांना तोंड देण्यासाठीं यांची योजना झाल्यावर मोठया पराक्रमानें मोंगलांपासून यांनीं पन्हाळा घेतला; आणि मिरजेपासून रांगण्यापर्यंत सारा मुलूख सोडविला. शौर्याबरोबरच यांच्या अंगीं भगवद्भक्तिहि उत्कटपणें वास करीत होती. स्वत: चागले संस्कृतव्युत्पन्न असून कीर्तन करीत. त्यांची थोडीबहुत काव्यरचनाहि आहे. त्यांना राजाराममहाराजांनीं प्रतिनिधिपद शके १६२१ मध्यें तात्पुरतें दिलें; त्यानंतर त्यांना पेशवेपदहि देण्यांत आलें होतें. शाहूमहाराजांनीं पुन्हा पंतांना प्रतिनिधिपद, “एकनिष्ठपणाची सीमा केली, महत्कार्य करुन राज्यरक्षण केलें, म्हणून वंशपरंपरेनें वतनी करुन दिलें.” ताराबाईनें शाहूच्या विरुध्द राजनिष्ठ राहण्याबद्दल ज्यांच्याकडून शपथा घेतल्या होत्या त्यांपैकीं ते एक होते. त्यासाठीं त्यांना तुरुंगवासहि भोगावा लागला. परंतु खटावकारांवर केलेल्या स्वारींत त्यांच्या मुलानें चांगला पराक्रम केल्यामुळें यांची मुक्तता होऊन प्रतिनिधिपद यांना पुन: मिळालें. शके १६४० मध्यें यांचा मृत्यु सातारा येथें झाला. यांचें व यांच्या पत्नीचें वृंदावन संगम माहुलीस आहे.
याच्या चिरंजीवांनीं कोल्हापूरकरांचा पक्ष स्वीकारल्यामुळें शाहूची प्रतिनिधींवर इतराजी झाली. शाहूच्या सांगण्यावरुन त्याला ठार करणार इतक्यांत खंडोबल्लाळ तेथें आले व त्यांनीं प्रतिनिधींचा जीव वांचविला. या वेळेपासून प्रतिनिधींच्या घराण्यांत श्राध्द होई त्या वेळेस इतर ब्राह्मणांबरोबर खंडोबल्लाळ चिटणिसाच्या घराण्यांतील एका प्रसिध्द मनुष्यास आमंत्रण होत असे.
- २७ मे १७१८
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2018
TOP