ज्येष्ठ वद्य १
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
रणजितसिंगांचें निधन !
शके १७६१ च्या ज्येष्ठ व. १ रोजी पंजाबांतील शीख लोकांचा शूर, मुत्सद्दी व युध्दशास्त्रांतील जाणता महाराजा रणजितसिंग यांचें निधन झालें.
महासिंगानंतर वयाच्या तेराव्या वर्षी रणजिंतसिंग गादीवर आला. आपल्या पराक्रमानें वयाच्या एकोणिसाव्या वर्षी शीख राजांचें आधिपत्य त्यानें आपणांकडे घेतलें. स्वत:स ‘राजा’ ही पदवी घेऊन १७२४ मध्यें त्यानें अमृतसर जिंकलें. इंग्रज अधिकारीहि त्याला भिऊन वागत असत. इंग्रज नमतें घेऊन त्याला आपला जिवलग दोस्त म्हणवींत असत. त्यानें चाळीस वर्षे सतत परिश्रम करुन शीख लोकांत लष्करी सामर्थ्य उत्पन्न केलें. त्याचें निधन झालें तेव्हां दिल्ली, आग्रा, अलाहाबाद आदि इंग्रजांच्या मुख्य छावणींतून त्याच्या वयाच्या संख्येइतक्या एकूणपन्नास तोफांची सलामी देण्यांत आली होती. सर लाँवेल ग्रिफीन याच्यासंबंधी लिहितो, “रणजितनें आपलें राज्य लष्करी दरार्यावर व शिस्तीवर स्थापन केलें; त्याचा राज्यकारभार व्यवस्थित होता.” त्यानें शीखांच्या सैन्यांत उत्तम पायदळ, सुव्यवस्थित घोडदळ व चांगला तोफखाना यांची भर घातली. त्याच्या सैन्यांतील वेंचुरा, अलार्ड व आँव्हिटे बिलो हे तीन सेनापति प्रसिध्द नेपोलियनच्यां हाताखालीं शिक्षण घेतले होते.
रणजितसिंग अटक नदी उतरुन पलीकडे जाऊं लागला तेव्हां त्याचा गुरु येऊन म्हणूं लागला कीं, ‘अटकेच्या पलीकडे जाण्यास हिंदूंना मनाई आहे.’
तेव्हां त्यानें उत्तर दिलें कीं,
“सब भूमि है गोपालकी, इसमें अटक कहाँ ।
जिसके मनमें खटक रही, वोही अटक रहा”
“सर्व पृथ्वी देवाची असून तिच्या पाठीवर कोठेंहि जाण्यास हरकत नाहीं. ज्याच्या मनांत संशय आहे तोच थांबून राहतो.”
त्याच्या जन्माच्या वेळीं पंजाबांत लहान लहान लहान राज्यें निर्माण झालीं होतीं. त्यांच्यांत वारंवार तंटे लागत असत; परंतु रणजितसिंगानें सर्वाना आपल्या सत्तेखालीं आणून त्यांना योग्य दिशा दाखवली.
- २७ जून १८३९
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2018
TOP