ज्येष्ठ शु. १५
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
ज्येष्ठ शु. १५
महात्मा कबीरांचा जन्म !
शके १३२१ च्या ज्येष्ठ शु. १५ ला उत्तर हिंदुस्थानांतील विख्यात संत आणि धर्मसुधारक कबीर यांचा जन्म झाला.
चौदह सौ पचपन साल गए, चंद्रवार एक ठाट ठए ।
जेठ सुदी बरसायत को, पूरनमासी प्रगट भए ॥”
असा एक दोहा कबीरांच्या जन्मासंबंधीं प्रसिध्द आहे. भारतीय इतिहासांत कबीरांचें स्थान अत्यंत महत्त्वाचें आहे. चौदाव्या शतकांत सामाजिक विषमता वाढून बाह्याचारामुळें हिंदु - मुसलमानांत तीव्र मतभेद निर्माण झाले होते. विद्येचे मालक ब्राह्मण बनले असून इतर समाज अज्ञानग्रस्त झाला होता. धर्माच्या नांवावर अधर्म सुरु होऊन सर्वत्र कलह माजून राहिला असतांना बहुजन समाजाला योग्य मार्ग दाखविण्याचें कार्य कबीरांनीं केलें. दोनहि धर्मातील सत्याचें कठोर रुप कबीरांनीं स्पष्ट करुन पाखंडी व ढोंगी लोकांच्यावर प्रहार केले. सरळ जीवन, सत्यता आणि स्पष्ट व्यवहार असा यांचा उपदेश होता. कबीरांचें काव्य ‘बीजक’ नामक ग्रंथांत एकत्रित केलें आहे.
कबीरांच्या जन्मासंबंधीं अनेक मतभेद आहेत. दंतकथा अशी आहे कीं, रामानंदांच्या आशीर्वादानें एका विधवा ब्राह्मण स्त्रीस जो मुलगा झाला तोच पुढें कबीर म्हणून प्रसिध्दीस आला. जनलज्जेस भिऊन त्या स्त्रीनें आपल्या मुलाचा त्याग केल्यावर नीरु नांवाच्या कोष्टयानें कबीरांचें पालनपोषण केले. लोई नांवाच्या स्त्रीशीं त्यांचा विवाह होऊन कमाल व कमाली अशीं दोन अपत्येंहि यांना झालीं होतीं. कबीरांचे तात्त्विक सिध्दांत फारच उच्च दर्जाचे आहेत.त्यामध्यें गूढवादाची छाया असून परमेश्वर हा प्रियतम व जीव ही पत्नी अशा भावनांवर त्यांचें तत्त्वज्ञान साकार झालें आहे. कबीरांच्या सत्यभक्तीमुळें त्यांना फारच त्रास सहन करावा लागला. त्या वेळच्या सिकंदर लोदीनें त्यांचे हातपाय जखडून त्यांना गंगेंत फेकून दिलें होतें, परंतु परमेश्वराच्या कृपेनें ते जगले. कबीरांचा जातिभेद, उपासतापास या कर्मकांडावर बिलकुल विश्वास नव्हता. आपल्या तत्त्वाच्या प्रसारासाठीं त्यांनीं सर्व हिंदुस्थानभर प्रवास केला.
- २० मे १३९९
--------------
ज्येष्ठ शु. १५
शहाजी राजांची सुटका !
शके १५७१ च्या ज्येष्ठ शु. १५ रोजीं शहाजी राजे यांची विजापूरकरांच्या कैदेंतून सुटका झाली.
अदिलशाहींतील सरदार मुस्तफाखान यानें २५ जुलै १६४८ या दिवशीं शहाजीस कैद केलें होतें. बादशहास ही हकीकत समजल्यावर अफझलखान आणि महंमदखान यांना शहाजीला आणण्यासाठीं बादशहानें जिंजीस रवाना केलें. खान महंमदानें मोठा विजय मिळवून शहाजीस विजापूर येथें आणिलें. शहाजीबद्दल दरबारांतहि तूर्त अनुकूल वातावरण नव्हतें. कर्नाटक प्रदेश जिंकून तेथें स्वामित्व स्थापिण्यास शहाजी विरोधी आहे, तो हिंदूंचा कैवारी आहे, बंगलोर येथें स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा त्याचा हेतु आहे, इत्यादि कागाळया बादशहाच्या कानावर होत्याच. इकडे शिवरायांनाहि याविषयीं चिंता होतीच. माघार न घेतां सुटका करण्याचा प्रयत्न त्यांनीं चालू केला. शहाजीबद्दल कर्नाटकांत सर्व ठिकाणीं आदर आहे, मावळांतील शिवाजीचें कर्तृत्व वाढत आहे, या स्थितींत शहाजीशीं नमतें घ्यावें असा विचारहि बादशहा आतां करुं लागला होता; आणि त्या दृष्टीनें वाटाघाटी सुरु झाल्या. ‘कोंडाणा, बंगलोर व कंदापिली हीं ठिकाणें शहाच्या ताब्यांत यावींत; आणि शहाजीनें निष्ठेनें सेवा करावी’ असा सूर होता. शहाजीनें वरकरणी मान्यता देऊन म्हटलें, “माझी व कुटुंबाची अब्रूनें उद्योग करण्याची व्यवस्था लावून द्यावी; म्हणजे आम्ही इमानें - इतबारें सेवा करण्यास तयार आहोंत; बंडाळी करुन राज्यास अपाय करण्याची इच्छा नाहीं.” यानंतर शहाजीची सुटका ज्येष्ठ शु. १५ स सन्मानपूर्वक झाली. पांच लक्षांची जहागिरी आणि तंजावरचा कारभार यांची प्राप्ति होऊन शहाजी कर्नाटकांत रवाना झाला. यानंतर कान्होजी जेधे व दादाजी कृष्ण लोहोकरे यांच्यांत आणि शहाजींत मोंगली अदिलशाही फौजेस विरोध करण्याच्या शपथा झाल्या. शहाजीच्या सुटकेमुळें कोंडाणा व बंगरुळ हे किल्ले विजापूरकरांकडे गेले. शिवरायांवरहि नजर ठेवण्याची जबाबदारी कांहीं अशी शहाजीवर येऊन पडलीच.
- १६ मे १६४९
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2018
TOP