ज्येष्ठ शु. १०

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


गंगा नदीचें अवतरण !

ज्येष्ठ शु. १० या दिवशीं इक्ष्वाकु- कुलांतील प्रसिध्द राजा भगीरथ यानें आपल्या पितरांच्या उध्दारासाठीं मोठया प्रयत्नानें गंगेला प्रसन्न करुन पृथ्वीवर आणिलें.
गंगा स्वगातून विष्णूच्या चरणापासून निघाली ती शंकराच्या मस्तकावरुन खालीं पृथ्वीवर वाहत वाहत आली व हरिव्दार, प्रयाग, वाराणशी वगैरे स्थानांवरुन पूर्व समुद्राला जाऊन मिळाली. याच गंगेमुळें सगराच्या पुत्रांचा उध्दार झाला. त्याचप्रमाणें असत्य भाषण, कठोर भाषण, चहाडी, वृथा वल्गना; चौर्यकर्म,हिंसा, अनीतिकारक विपभोग, परापहार, दुराग्रह व अनिष्ट चिंतन या दहा पातकांचें हरण गंगास्नानानें होत असल्यानें तिला दशहरा असेंहिं नांव आहे. गंगा नदी ही हिंदुस्थानची वरदायिनी माता आहे. अनेक कवींनीं तिचें स्तवन केलें आहे. शंकराचार्य म्हणतात - “हे देवी, तुझ्या जलाचें पान करुन सर्व विषयांपासून मी अलिप्त झालों आहे. आतां भगवंतांचें पूजन करावें अशी इच्छा आहे. तूं तापत्रयाचें निवारण करणारी आहेस” आदि कवि वाल्मीकि म्हणतात, “तुझ्यावरील तरंगांचें सौंदर्य अवलोकन करीत व तुझें जलपान करीत तुझ्या कांठीं मी वास करुन राहावें. तुझें नामस्मरण करीत असतांनाच माझा देह पडो”
गंगेच्या कथेस सामाजिक व ऐतिहासिक महत्त्व आहे “यांत प्राचीन इक्ष्वाकु वंशाचा इतिहास गोंवलेला दिसतो. सगर राजाचे सहस्रावधि प्रजानन पूर्व देश काबीज करण्यासाठीं गेले. त्यांचेंच कार्य पुढें चालवून भगीरथानें आर्याची विजय - पताका ‘गंगासागरावर’ रोविली.‘सगर’ राजाची स्मृति म्हाणून सगरास सागर आणि भगीरथाच्या प्रयत्नानें गंगेच्या कांठचा प्रदेश हस्तगत झाला म्हणून गंगेस भागीरथी हीं नांवें प्राप्त झालेली असावींत” मराठीचे महाकवि मोरोपंत यांनीं म्हटलेम आहे.
“न उपासावे, गंगे देवि ! तुला अंतरोनि पायसदा ।
तुकडा शिळाहि खावा; जवळ करावे तुझेचि पाय सदा”

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP