ज्येष्ठ शु. ४
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
शिवरायांची मुंज !
शके १५९६ मधील ज्येष्ठ शु.४ रोजीं छत्रपति श्रीशिवाजीमहाराज यांची चव्वेचाळिसाव्या वर्षी मुंज झाली.
तीस वर्षाच्या अविरत पराक्रमानें संस्थापलेल्या राज्याला खरे वैभव प्राप्त व्हावें म्हणून राज्याभिषेकाचा विचार शिवरायांनीं केला.परंतु, व्यावहारिक अडचणी पुष्कळ निर्माण झाल्या. भोंसल्यांचे कुळ महाराष्ट्रांतील इतर सरदार हीन समजत असत.धार्मिक आचारहि लुप्त झालेले असल्यामुळें हें क्षत्रिय घराणें शूद्रांत मोडत होतें. शास्त्रोक्त राज्याभिषेक व्हावयास शिवरायांना ‘क्षत्रिय’ होणें जरुर होतें. ‘स्वराज्य नष्ट झाल्यामुळें धर्माचार लुप्त झाले होते. महाराष्ट्रांत तर यादवांचें राज्य संपल्यानंतर राज्याभिषेकाचा विधिच कोणास ठाऊक नव्हता’ शिवाजीचें हें काम करण्यास त्या काळीं महाराष्ट्रांत कोणीहि पंडित तयार नव्हते. कलियुगांत क्षत्रियांचें अस्तित्व नाहीं असें प्रतिपादन शास्त्री,पंडित करुं लागले होते. त्यामुळें शिवाजीस मूळ संशोधन करणें प्राप्त झालें. बाळाजी आवजी चिटणीस यांच्याकडून उदेपूरहून राज्याभिषेक समारंभाची व आपल्या भोंसले - कुलाची पूर्वपीठिका प्राप्त करुन घेतली. गोविंदभट्ट खेडकर वगैर मंडळींस काशीस पाठवून त्या वेळचा सुप्रसिध्द विव्दान् गागाभट्ट यांस दक्षिणेंत येण्याविषयीं शिवाजीनें विनंति केली. रामदासस्वामी व इतर प्रतिष्ठित मंडळींचा सल्ला घेऊन शिवरायानें आपलें इष्ट कार्य करण्यास प्रारंभ केला.
वैशाखाच्या महिन्यांत चिपळुणास जाऊन शिवाजीनें लष्कराची पहाणी केली आणि नंतर परशुरामाच्या मंदिरांत पूजा करुन शिवराय रायगडास आले. नंतर प्रतापगडावर जाऊन त्यांनीं तुळजाभवानीचें दर्शन घेतलें व देवीला छपन्न हजार रुपये किंमतीचें सुवर्णछत्र अर्पण केलें. तेथून परत आल्यानंतर ज्येष्ठ शुध्द ४ रोजीं शिवरायांची मुंज झाली. रायगडावर एक महान् घटना घडणार म्हणून सर्वाचे डोळे शिवरायांकडे लागून राहिले. अनेकांच्या डोळयांचें पारणें थोडयाच दिवसांत फिटणार होतें.
- २९ मे १६७४
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2018
TOP