ज्येष्ठ शु. ७
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
“वीरांगनेप्रमाणें मला मृत्यु येत आहे !”
शके १७८० च्या ज्येष्ठ श. ७ या दिवशीम झांशीच्या लक्ष्मीबाईनीं १८५७ च्या स्वातंत्र्यसमरांत आत्मबलिदान केलें.
“हातांत तलवार आणि कुडींत प्राण आहे तोपर्यंत झांशी माझी आहे” अशी राणीची प्रतिज्ञा होती. परंतु ह्यू रोझ यानें झांशीस वेढा दिलेला परतवितां न येऊन राणी ग्वाल्हेरला आली. तेथेंहि शत्रूचा वेढा पडला. शत्रूची फळी फोडून जाण्याचा प्रयत्न तिनें केला. दोन इंग्रज शिपाई तिच्या पाठीमागें धांवत होते. वाटेंत एक नाला आला. राणीचा घोडा पैलती गांठूं शकला नाहीं. स्वत:चा देह जिवंतपणें दुसर्याच्या हातीं जाऊं नये ही भारतीय स्त्रीची वृत्ति राणीमध्यें उसळून वर आली. यासाठीं तिनें आपली रक्तानें न्हालेली तलवार सरसावली. एका शिपायानें पुढून राणीवर वार केला.दुसर्यानें मागून केला. राणीचें शरीर रक्तानें माखून गेलें. उग्ररुप धारण करुन शेवटचा प्रयत्न तिनें केला. दोनहि शिपाई मारल्यानंतर रणशालिनी लक्ष्मी फिकी पडली. राणीनें शेवटचें वाक्य उच्चारलें, “वीरांगनेप्रमाणें मला मृत्यु येते आहे.” तिच्या मुखावर थोडा उल्हास उमटला आणि या भारतीय स्वातंत्र्यलक्ष्मीनें आपले डोळे मिटले !
वरसईकर विष्णुभट गोडसे यांनीं आपल्या ‘माझा प्रवास’ या लिखाणांत लक्ष्मीबाईचें करुण चित्र रेखाटलें आहे. “झांशीची राणी दृष्टीस पडली. तिचें सर्व अंग धुळीनें भरलेलें होतें.तोंड किंचित् आरक्त असून म्लान व उदास दिसत होतें. बाईस तृषा फार लागली होती. मी रस्सी मडकें विहिरींत सोडणार तोंच बाई म्हणाल्या कीं, तुम्ही विव्दान् ब्राह्मण, मजकरतां पाणी काढूं नाअ.मीच काढून घेतें, ... बाईनीं मृण्मय पात्रांतून ओंजळीनें पाणी पिऊन तृषा हरण केली. दैवगति मोठी विचित्र आहे. नंतर मोठया निराशेनें बोलल्या कीं, “मी अर्धा शेर तांदुळाची धनीन, मजला *** विधवाधर्म सोडून हा उद्योग करण्याची कांहीं जरुरी नव्हती. परंतु हिंदुधर्माचा अभिमान धरुन या कर्मास प्रवृत्त झालें; व याचकरिता वित्ताची, जीविताची सर्वाची आशा सोडली.”
- १८ जून १८५८
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2018
TOP