ज्येष्ठ शु. १
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
श्रीराम - हनुमंत भेट !
ज्येष्ठ शु. १
या दिवशीं पंपा सरोवराकाठीं प्रभु रामचंद्र आणि हनुमंत यांची भेट झाली.
मतंग ऋषींच्या आश्रमांतील शबरीचा पाहुणचार स्वीकारुन रामचंद्र पंपा सरोवराच्या तीरीं आले. सरोवराची शोभा पाहून रामांना सीतेची पुन्हा स्मृति झाली आणि त्यांच्या विलापास सुरुवात झाल्यावर लक्ष्मणानें त्यांना धीर दिला. राम - लक्ष्मण सरोवराच्या कांठानें ऋष्यमूक पर्वताकडे येत असतांना त्यांना सुग्रीवानें पाहिलें. वालीच्या भीतीनें सुग्रीव या पर्वतावर दडून राहिला होता. हे वालीकडून तर कोणी आले नसावेत ना, या शंकेनें सुग्रीव भयभीत झाला. त्यानें मारुतीस तपास करण्यास सांगितल्यावर हनुमंतानें पर्वतावरुन उड्डाण केलें, आणि कपिरुप सोडून भिक्षूच्या रुपानें तो राम - लक्ष्मणापुढें येऊन ठाकला. राम - लक्ष्मणाला त्यानें वालीच्या दुर्वर्तनाची हकीकत सांगून सुग्रीवाशीं सख्य करण्यास विनंति केला. लक्ष्मणानें आपली अयोध्यावियोगापासून सीताहरणापर्यंतची सारी हकीकत निवेदन केली. त्यांनींहि सुग्रीवाच्या भेटीची इच्छा व्यक्त केल्यावर हनुमान मोठया प्रेमानें म्हणाला,“सुग्रीव सीतेच्या शोधांत आपणांस खात्रीनें मदत करील.”
त्यानंतर आपलें मूळचें कपिरुप धारण करुन राम - लक्ष्मणांना आपल्या पाठीवर बसवून मारुतीनें उड्डाण केलें आणि ऋष्यमूक पर्वत ओलांडून मलय पर्वतावर आणून सोडलें. तेथें त्यानें त्यांची आणि सुग्रीवाची भेट घडवली. दोघांनाहि फार आनंद झाला; व त्यांनीं एकमेकांस प्रेमानें आलिंगन दिलें. हनुमानानें याच समयाला काष्ठें आणून अग्रि प्रज्वलित केला. आणि त्याला साक्ष ठेवून राम - सुग्रीवांचें सख्य कायम केलें. त्यानंतर रावणाबरोबर असणार्या सीतेनें कांहीं दागिने टाकलेले होते ते ओळखण्यास सुग्रीवानें रामापुढें टाकले. ते अलंकार पाहून रामाच्या डोळयांत अश्रु जमा झाले. सीतेच्या चरणसेवेंतच मग्न असणार्या लक्ष्मणानें फक्त नूपूर ओळखून हे दागिने सीतेचेच आहेत असा निर्वाळा दिला.
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2018
TOP