ज्येष्ठ वद्य २
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
संघटनेचा प्रवर्तक गेला !
शके १८६२ च्या ज्येष्ठ व. २ या दिवशीं सकाळीं ९ वाजून २७ मिनिटांनीं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटणेचे जनक डाँक्टर हेडगेवार यांनीं अंतिम श्वास सोडला.
आदल्याच दिवशीं त्यांचें लंबर पंक्चर केलें त्या वेळीं त्यांना अतोनात वेदना झाल्या. आदल्या दुपारीं त्यांच्या मानसिक व्यथांची परिसीमा झाली. त्यांच्या अंत:करणांत त्या वेळीं प्रलयकाळाचें तुफान उसळलें होतें. रक्ताचें पाणी करुन जोपासलेल्या व वाढवलेल्या कार्याचें आपल्या मागें काय होईल या आशंकेनें त्यांच्या हृदयांत न भूतो न भविष्यति असा आकांत उडाला होता ... रात्रीं २॥ वाजल्यापासून त्यांना मूर्च्छा आली. ज्येष्ठ व. २ ला पहांटें १०६ पर्यंत तापमान चढलें. निर्दय मृत्यूचें हें क्रूर कर्म भोंवतालच्या मंडळींना पाहवत नव्हतें. सुमारें तासभर ऊर्ध्व चालू होतें ... ९ वाजून २७ मिनिटांनीं श्वासोश्वास बंद होऊन डाँक्टरांनीं मान खालीं टाकली ! सबंध नागपूर शहर दु:खानें हादरुन निघालें. हजारों लोक डाँक्टरांच्या अंत्यदर्शनास येत होते. शवाची मिरवणूक नागपूरच्या इतिहासांत अत्यंत मोठी व अभूतपूर्वच होती. वाटेंत शेंकडों ठिकाणीं हार घालण्यांत आले; पुष्टवृष्टि झाली. छायाचित्रें घेण्यांत आली. रेशीमबाग संघस्थानींच दहनाला परवानगी मिळाली होती. संघाच्या ‘ओ. टी.सी.’ मधील स्वयंसेवकांच्या चाळीस दिवसांच्या तपश्चर्येनें पावन झालेल्या भूमीवरच दहनविधि झाला !
“डाँक्टर लहानपणापासूनच एक उच्चतम ध्येय डोळयांसमोर ठेवून वागत असत. अठरा वर्षे सतत विचार आणि तपश्चर्या केल्यानंतरच त्यांनीं एक विचारसरणी निश्चित करुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्यांनीं आपली विचारपध्दति व कार्यपध्दति अशा कुशलतेनें रचलेली आहे कीं, पक्षोपपक्षांचें वैमनस्य टाळून व सर्व प्रकारच्या पक्षभेदांपासून अलिप्त राहून संघकार्याची अखंडितपणें प्रगतिच होत राहावी.”
हिंदूंच्या अवनतीचें मूळ त्यांच्या मनोदौर्बल्यांत आहे हें डाँक्टर हेडगेवार यांनीं सांगितलें व वैयक्तिक संसाराची तमा न बाळगतां आसेतुहिमाचल हिंडून संघटणेचा महिमा व तंत्र भारतीय समाजाच्या अंत;करणावर खोल बिंबविलें.
- २१ जून १९४०
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2018
TOP