ज्येष्ठ शु. ११

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


शिवरायांची सुवर्णतुला !

शके १५९६ च्या ज्येष्ठ शु. ११ रोजीं श्रीछत्रपति शिवाजीमहाराज यांनीं आपली सुवर्णतुला केली. तिला १६००० होन लागले.
आपल्या संस्कृतींत दानविधीला फार महत्त्व आहे. अग्रिपुराणांत एके ठिकाणीं सानें, घोडा, तीळ, हत्ती, दासी, रथ, भूमि, घर, कन्या व कपिला अशीं दहा महादानें सांगितलीं असलीं तरी त्यांची संख्या तुलापुरुष, हिरण्यगर्भ, ब्रह्मांड, कल्पवृक्ष, गोसहस्र, कामधेनु, हिरण्याश्व, हेमहस्तिरथ, पंचलांगल, हैमधरा विश्वचक्र, कल्पलता, सप्तसागर, रत्नधेनु, महाभूतघट, अश्वरथ - अशीं सोळा समजलीं गेलीं आहे. हीं दानें कोणीं केव्हां कोठें करावींत याविषयीं अग्रि, गरुड, भविष्योत्तर, मत्स्य, लिंग, इत्यादि पुराणांत सांगितलें आहे. दानसागर, दानचंद्रिका, दानमयूरव, दानकल्पद्रुम, वगैरे ग्रंथांतूनहि याची माहिती आली आहे.
अशा प्रकारची महादानें आपल्या देशांत फार पूर्वीपासून चालत आलीं आहेत. “तात्त्विक वाड्गमयात्मक पुराव्यांवरुन या महादानांचे अस्तित्व सातव्या शतकांत होतें असें म्हणावयास हरकत नाहीं. परंतु त्यांच्या अस्तित्वाचा काळ आणखीहि मागें जातो. शिलप्पदिकारंमधील प्रसंग खरोखरीच इ.सनाच्या दुसर्‍या शतकांत झाला असेल तर या दानाचा काळ त्या शतकापर्यंत जाऊन पोंचतो. तुलादान करणारे पुरुष राजे किंवा राजकल्पव्यक्ति असल्या तरी स्त्रिया व राजपुरुषेतर व्यक्ति यांची तुला करण्यास धर्मशास्त्राचा विरोध नाहीं. तुलेकरितां उभारावयाचें तोरण लांकडी असावें असें धर्मशास्त्रांत सांगितलें असलें तरी विजयनगर सम्राटांनीं व त्रावणकोरच्या राजांनीं वारंवार तुला करण्यास सोईचें जावें म्हणून कायमचीं दगडी तोरणें उभारलेलीं होतीं. तुलारोहण सवस्त्र, सायुध व सालंकार करावें असें सांगितलें आहे. त्यामुळें तुला करणार्‍या व्यक्तीचें निश्चित वजन समजणें कठीण पडतें.”
विजापूरच्या सुलतानाचा प्रधान मुरार जगदेव यानें शके १५५५ भाद्रपद अमावास्या (सूर्यग्रहण ) अशा समयीं भीमा व इंद्रायणी यांच्या संगमावर तुला केल्याचें प्रसिध्द आहे.
- ४ जून १६७४

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP