ज्येष्ठ वद्य ७
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
“आणि तूं रांडेसारखा रडतोस ?”
शके १६७७ च्या ज्येष्ठ व ७ रोजीं राणोजी शिंद्यांचा ज्येष्ठ पुत्र जयाप्पा शिंदे याचा खून बिजेसिंग यानें मारेकरी घालून केला.
मेडते येथील लढाई जिंकल्यावर जयाप्पानें नागोरास वेढा दिला. जमीन रेताड असल्यामुळें सुरुंग लावूनहि तटाला खिंडारें पाडणें शक्य नव्हतें. वेढा सात - आठ महिने चालला होता. त्यामुळें शत्रुपक्षाचा बिजेसिंग त्रस्त झाला. शेवटीं ज्येष्ठ व. ७ रोजीं जयाप्पा चौरंगावर स्नान करुन रुमालानें डोळे पुशीत असतां बिजेसिंगांकडून गुप्तपणें आलेल्या तिघां मारेकर्यांनीं दोन सुरे जयाप्पाच्या कुशींत खुपसले. जयाप्पा धाडकन् जमिनीवर पडला. थोरल्या बंधूचा हृदयद्रावक शेवट दत्ताजी शिंद्याला कळतांच तो धांवत आला आणि शोक करुं लागला. बिजेसिंगास जोर चढून तो युध्दास प्रवृत्त झाला. सैन्यांत एकच गोंधळ उडून गेला. जयाप्पा मोठा हिंमतीचा असून अजून सावध होता. डोळे उघडून पाहतो तों धाकटा बंधु दत्ताजी शोक करीत असलेला त्याला दिसला.तेव्हां या शूरानें त्याला धीर दिला
“वैरी युध्दास आला, आणि तूं रांडेसारखा रडतोस ? हें क्षात्रधर्मास उचित नाहीं. आतां मजला कांहीं होत नाहीं. तुम्हीं शत्रूचा पराभव करावा.” या भाषणानें दत्ताजीस ईर्षा चढून त्यानें शत्रूशीं जोराचा सामना दिला. निकराचें युध्द होऊन बिजेसिंगाचा पराभव झाल्यावर दत्ताजी परत भावापाशीं आला. तों जयाप्पाचें निधन झालें होतें. दत्ताजीचा शोक अनावर झाला. ताऊस सरोवर म्हणजे मोराच्या सरोवराजवळ जयाप्पाची छत्री आहे.
जयाप्पा मोठा पराक्रमी होता. शके १६७३ मध्यें फर्रुखबादची लढाई करुन त्यानें रोहिल्यांचा मोड केला. ज्या वेळी सुरजमल्लानें तेजराम यास जयाप्पा शिंदे याजकडे पाठवून आपला बचाव मल्हाररावापासून करण्यास विनवलें तेव्हां त्याने त्यास तसें आश्वासन दिलें; पण यामुळें शिंदे - होळकर यांचें वैमनस्य वाढलें.
- ३० जून १७५५
--------------------
ज्येष्ठ व. ७
“नानांचा हात लंगडा पडला !”
शके १७१६ च्या ज्येष्ठ व. ७ रोजीं पेशवाईतील प्रसिध्द मुत्सद्दी हरिपंत फडके याचें निधन झालें.
मराठयांच्या इतिहासांतील हा काळ अत्यंत विपरीत असा होता. या सालाच्याच आसपास महादजी शिदे, सवाई माधवराव, अहिल्याबाई होळकर, कवि मोरोपंत आदि कर्ती माणसें निघून गेल्यामुळें मराठेशाही पोरकी झाली. नाना फडणिसांच्या घरीं बाळंभट नांवाचा एक भिक्षुक होता. त्याचा हा मुलगा. माधवराव पेशवे यांनीं कारकुनाच्या जागीं याची नेमणूक केली. नारायणरावाच्या वधानंतर बारभाईच्या कारस्थानास मिळून त्यानें मोरोबादादाचें कारस्थान उघडकीस अणलें. माहीतीरीं राघोबाचा पाठलाग करुन त्याची फौज त्यानेंच उधळून लावली. कर्नल कीटिंग राघोबासह पुण्यावर चाल करुन आला तेव्हां त्याच्याशीं सामना हरिपंतांनींच दिला. हैदराकडे त्याची नेमणूक झाली तेव्हां मानाजी फांकडे व बाजीपंत बर्वे या फितुर लोकांस, यशवंतराव मान्याला तोफेच्या तोंडीं देऊन त्यानें आळा घातला. इंग्रज - मराठे युध्द,टिपूंवरील स्वार्या यांमध्यें याचा पराक्रम विशेष आहे. नाना फडणिसांच्या पूर्ण विश्वासांतील हरिपंत होता. आपल्या पूर्वायुष्यांत हरिपंत फडके सावकार वानवळे यांच्या घरीं नोकर होते. पुढें नांवारुपाला आल्यानंतरहि फडके आपल्या धन्याच्या श्राध्ददिना दिवशीं नियमित जेवावयास जावयाचे. “बोलावणे घेण्याचा आमचा मान नाहीं. आम्ही वेळेला येत जाऊं” असें त्यांनीं सांगून ठेवलें होतें. वानवळे यांच्या घरीं असतांना जी धाबळी व जें भांडें वापरीत ती धाबळी आणि तेंच भांडें यजमानाच्या घरीं आपल्या लौकिकाच्या काळींहि वापरीत. अशी त्यांची निष्ठा होती. ज्येष्ठ व. ७ रोजीं सिध्दटेक येथें गणपतीची सेवा करीत असतांना पोटदुखीच्या विकारानें त्यांचें निधन झालें. नानांचा हात लंगडा पडला ! कारण त्यांच्या पूर्ण विश्वासांतील हरिपंत होते. फडके यांचे पुत्र बाबा उर्फे रामचंद्र खडर्याच्या लढाईत जरीपटक्यावर होते. हरिपंतांना चिंतामण, लक्ष्मण व माधव असे आणखी तीन मुलगे होते.
- १९ जून १७९४
N/A
References : N/A
Last Updated : September 20, 2018
TOP