ज्येष्ठ शु. ८

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


“तुझ्या पापाचें हेंच प्रायश्चित्त” !

ज्येष्ठ शु. ८ या दिवशीं प्रभु रामचंद्रांनीं सुग्रीवाचा बंधु वाली याचा वध केला.
वाली दुराचरणी होता. सुग्रीवाच्या बायकोचें हरण करुन वालीनें त्याला देशोधडीला लावलें होतें. वाली मोठा बलाढय असा राजा होता. तेव्हां त्याला शासन करण्याचेम रामानें ठरविलें. दोघां भावांमधील वाली ओळखतां यावा म्हणून गजवेलीची माळ सुग्रीवाच्या गळयांत रामांनीं घातली. राम, लक्ष्मण, हनुमान, इत्यादि मंडळी झाडींत दडून बसल्यावर सुग्रीवानें मोठयानें भू:भूकार केला; आणि वालीस हांक ठोकली. रंगमहालांत असलेला वाली त्वेषानें बाहेर येऊं लागला तेव्हां त्याच्या पत्नीनें न जाण्याविषयीं वालीला विनवणी केली. पण वाली न ऐकतांच किष्किंधा नगरीच्या बाहेर आला. भावाभावांचें युध्द पुन: सुरु झालें. त्यांनीं एकमेकांना लाथांनीं बुक्क्यांनीं, थपडांनीं व झाडांच्या फांद्यांनीं यथेच्छ झोडपलें, पण कोणीहि हार जाईना. सुग्रीवाची बाजू पडती दिसूं लागल्यावर रामांनीं एक बाण सोडून वालीला विव्हल केलें. बाण वर्मी लागल्यामुळें त्याचा प्राण गेला नाहीं. झाडाआडून बाण मारल्यामुळें वालीनें रामास पुष्कळ दोष दिला. तेव्हां रामांनीं त्याला सांगितलें; “हल्लीं तूं कामांध होऊन धर्माचरण सोडून निंद्य कर्म करीत आहेस. भावाच्या पत्नीवर नजर ठेवण्यात तुझेकडून केवढें पाप होते आहे ! तुझ्यासारख्या पातक्याला वध हीच शिक्षा आहे.” वालीनें रामाचें म्हणणें मान्य केलें. आपल्या पुत्राचा, अंगदाचा सांभाळ करण्यास वालीनें रामापाशीं विनंति केली. वालीवधाची बातमी तारेला त्याच्या पत्नीला समजतांच तिनें अतोनात शोक केला. सुग्रीवहि किंकर्तव्यमूढ होऊन बसला होता. त्याला वालीचें उत्तरकार्य करावयास लक्ष्मणानें सुचविलें. चंदनकाष्ठेच्या चितेवर सुग्रीव व अंगद, यांनीं वालीचा देह उचलून ठेविली आणि त्याला यथाशास्त्र अग्रि दिला. याप्रमाणें रामांनीं आपल्या समक्ष वालीच्या उत्तरकार्याचा समारंभ पार पाडला. शूरांचें वैर मरणानंतर संपतें. अशा प्रकारें दुराचारी वालीस रामानें मुक्त केलें.

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP