ज्येष्ठ वद्य ५
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
“या उज्ज्वल कल्पनेला काळें फांसूं नका !”
शके १८३० च्या ज्येष्ठ व. ५ रोजीं मराठींतील ध्येयवादी लेखक व शुध्द स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते कै. शि. म. परांजपे यांच्या ‘काळ’ कचेरीला सकाळीं सहा वाजतां पोलिसांचा गराडा पडला.
स्वदेशभक्तीला राजद्रोहाचें रुप देऊन ब्रिटिश राजवटींत जे खटले झाले त्यांमध्यें शिवरामपंत परांजपे याच्या या खटल्याचें महत्त्व विशेष आहे. आपल्या ध्येयवादित्वामुळें ‘काळ’ पत्रानें चांगलाच लौकिक मिळविला होता. सरकारी संक्रांत ‘काळ’ वर अनेक प्रसंगीं आली होती. ‘सरकारविरुध्द अप्रीतीचे मनोविकार वाढविण्याचे प्रयत्न करणें’ हा मुख्य आरोप असला तरी ‘हिंदुस्थानांत बाँबगोळे येण्याला कारण इंग्लिश लोकच’ हा लेख मुख्यत: कारणीभूत झाला. या खटल्याच्या वेळीं शिवरामपंत यांनीं केलेलें भाषण अति तेजस्वी होतें. या भाषणावरहि सरकारनें बंदी घातली होती. हायकोर्टात शिवरामपंत यांनीं सांगितलें, “हें न्यायाचें कोर्ट आहे आणि येथूनच मला न्याय मिळावयाचा आहे ही गोष्ट माझ्या पूर्ण ध्यानांत आहे. माझ्या लिखाणांत राजद्रोहाचा हेतु मुळींच नव्हता. वस्तुत: माझे लेख स्वदेशभक्तीनें लिहिलेले आहेत ... मी सरकारविरुध्द राजद्रोह पसरवीत नव्हतों, मी तो थांबवीत होतों. ... मीं माझ्या देशासाठीं आपले प्राण झिजविले आहेत; आणि यांत मीं कांहीं दोषास्पद गोष्ट केली नाहीं; या माझ्या कार्यात प्रत्यक्ष न्यायदेवता साहाय्य आहे. या कामांत परमेश्वर माझा पाठिराखा आहे ... वाटेल तर मला आपण दोषी ठरवून शिक्षा करा, मी ती भोगण्यास तयार आहें; पण देशभक्तीसारख्या उज्ज्वल कल्पनेला गुन्हेगारीचें काजळ फांसूं नका !” या परिणामकारक भाषणानंतर शिक्षा सांगतांना जस्टिस दावर बोलले, “तुमच्यासारख्या विव्दान् व गुणी गृहस्थावर हा प्रसंग यावा हें पाहून मला फार वाईट वाटतें. ... या गुन्ह्यास जन्मठेप, काळया पाण्याची किंवा पुष्कळ वर्षाच्या कैदेची शिक्षा सांगितली आहे हें तुम्हांस माहीत आहेच. अगदीं सौम्य शिक्षा म्हणून राजद्रोहाच्या अपराधाबद्दल पंधरा महिने व जातिव्देषाबद्दल चार महिने सक्तमजुरीची शिक्षा तुम्हांस दिली नाहीं तर मीं आपलें कर्तव्य केलें नाहीं असें होईल.”
- १९ जून १९०८
N/A
References : N/A
Last Updated : September 20, 2018
TOP