मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|
जाहली घाई सांग ना, सुचत न...

के. नारायण काळे - जाहली घाई सांग ना, सुचत न...

मराठी शब्दसंपत्ति


जाहली घाई
सांग ना, सुचत नच कांहीं ! ॥ध्रु०॥
युवराजांची खाशी स्वारी
दारावरुनी आज दुपारीं
जाइल, म्हणुनी तया अवसरीं -
सजव मज आई ! ॥
अंगीं घालूं काय भूषणें ?
केश रचूं मी कुण्या तर्‍हेनें
तोडे किम्वा गेंद पैजणें -
घालुं ग पायीं ? ॥
आश्चर्यानें होऊन बावरि,
बघशी कां गे अशी भिरभिरी ?
बघेल स्वारी कधीं नच वरी !
कळत का नाहीं ?
जरी मना हें पुरतें ठावें,
तरी पुन्हां तें तिकडे धांवे;
कामधाम मग कसें सुचावें ?
स्वस्थता नाहीं ! ॥
क्षणांत जातिल नयनांपुढुनी -
बघतां, बघतां, मात्र दुरूनी -
मृदु मुरलिध्वनि येईल कानीं,
कळतसे हेंही ! ॥
असो कसेंहि; परी तयांची
स्वारी इथुनी अजि जायाची -
वस्त्रभूषणें लेइन उंची -
म्हणुन मी बाई ! ॥

*    *
दारावरुनी युवराजांचा -
सुवर्णरथ गे ! गेला साचा;
चमकत किरणीं तरुण रवीच्या !
काय नवलाई ! ॥
केला बुरखा मी बाजूला
हृदयावरची माणिक - माला -
काढीं; मार्गीं फेंकीं तिजला;
भान नच राही !
आश्चर्यानें होउन बावरि,
बघशी कां गे अशी भिरभिरी ?
उचलिल स्वारी कधीं नच वरी !
कळत कां नाहीं ?
रथचक्राच्या पडतां खालीं,
असंख्य ठिणग्या घेती उसळी;
साक्ष रक्तिमारूपें उरली
धुळीमधिं पाही !
काय अर्पिते प्रेमी बाला,
आणि अर्पिलें तिनें कुनाला,
कळावयाचें जड जगताला -
कधींही नाहीं ! ॥
असो कसेंही, गोष्टी घडली: -
युवराजांची स्वारी गेली,
रथमार्गीं मीं माळ फेंकिली,
काय नवलाई ! ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP