दा. अ. कारे
मराठी शब्दसंपत्ति
( जाति - कोकिला )
विश्व पेटलें सारें भवतीं
चढे रौद्र तेजाला भरती
ज्वालांवर ज्वाला धगधगती
झळा तापल्या चाटुनि जाती
त्या ज्वालांचीं नभांत होती असें नील विलीन !
सिंधुलहरि कंपित चमचमती
रणरण करितें ऊन सैकतीं !
झुळुक येतसे तुरळक पळती
तरुपर्णें सळसळुनि नाचती
क्षणैक उज्ज्वल क्षणैक श्यामल यापरि झगमगती !
सावलिसाठीं तळमळतें मन
प्रखर तीव्र उज्जवलतेनें दिन
असह्य तळपे; मिटतात नयन
झांपड पडतें सवेंच येउन
भरे ग्लानिमय नि:स्तब्धपणा उन्हासवें जगतांत !
घरट्यांत दडे विहंगावली
लपे वस्तुंची तळीं सावली !
महालांत श्रीमंती निजली
सुखोपचारी शीतल रमली
कामकरी कुणी परि रस्त्यावरि खपती निथळित घाम !
N/A
References : N/A
Last Updated : January 22, 2018
TOP