मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|
कृष्णाजी नारायण आठल्ये

कृष्णाजी नारायण आठल्ये

मराठी शब्दसंपत्ति


जवळ पवन धांवे सायकाच्या गतीनें
नदिपति खवळे हा त्याचिया संगतीनेंप;
अहह ! कहर केला आजि या फार वातें,
बसति कितिक झोके आमुच्या तारवातें ॥१॥

पुरुषभर उडोनी मागुती येत खालीं,
खळ खळ खळ येतें आंत जैशा पखाली !
भरुनि भरुनि त्यातें श्रांत झाले खलाशी,
सुजन सदुपदेशा जेविं देतां खलाशीं ॥२॥

उसळति लहरी या पर्वतप्राय तुंग !
बघुनि मति भयानें होतसे सर्व गुंग;
क्षणहि भरंवसा या येइना तारवाचा,
विकल वदनिं चाले घोष चिंता - रवाचा ॥३॥

बघुनि मन थरारे सिंधुची उग्र मुद्रा,
व्यसनसमयिं धांवे तूं दयेच्या समुद्रा !
फिरफिरुनि उठे हा घोर कल्लोळ लाटीं,
विधिलिखित कळेना काय आहे ललाटीं ! ॥४॥

बहुत कठेण घोघो वाहतो काय वारा !
क्षणभरि गवसेना प्राणिमात्रा निवारा;
अटपुनि अवजारें फाटकीं छिन्न भिन्न,
दिसति मनिं खलाशी जाहले फार खिन्न ॥५॥

म्हणति शरण आम्ही तार रे वायुदेवा ?
विसरुन चुकलीसे कोणती सांग सेवा,
नवस करुनि भावें फोडिती श्रीफलांतें,
घडि घडि अठवीती बायकांतें मुलांतें ॥६॥

डुलत डुलत तारूं आपटे एक बाजू,
धरणि पडत जोंवीं एकभारें तराजू,
प्रतिसमयिं तडाका अब्धिची लाट हाणी,
हिकडुनि तिकडे हें खेळतें सर्व पाणी ॥७॥

किति तरि लहरींची होय मोठी कमान,
वळणसुद दिसे ती पर्वताच्या समान;
गगनिं जळ चढोनी होतसे छत्र काळें,
वदन पसरलें हें खावया काय काळें ॥८॥

चढुनि चढुनि लाटा झांकिती सूर्यबिंब,
स्थळ वसन भिजोनी जाहलें सर्व चिंब,
हुडहुडि भरुनियां अंग झालें बधीर,
अझुनि मनिं धरावा कोठपर्यंत धीर ॥९॥

अवजड परि जोरें डोलकाठीहि हाले,
कर कर ऐसा सारखा शब्द चाले,
तट तट तट जाती दोरखंडें तुटोनी,
शिव शिव ! हृदयींचा धीर गेला सुटोनी ॥१०॥

कवळुनि तुळयांतें बैसलों एक ठायां,
गर गर फिरतें कीं, शक्ति नाहीं उठाया;
फिरुनि फिरुनि डोकें पित्त आलें कपाळा,
अतडिं तुटुनि गेलीं ओकतां, विश्वपाळा ॥११॥

बहुत दिवस झाले अन्न नाहींच पोटा.
विकल सकल गात्रें येति पोटांत वेटा,
बुरसुन दशम्याही जाहल्या त्या निकामी,
कधिंच पडशि झाली लाडवांची रिकामी ॥१२॥

भरुनि जळमटानें नासले सर्व पोहे,
विपरित विधि झाल्या वांकडें काय नोहे ?
हर हर ! पडले कीं, गोड पाण्यांत जंतू,
अजि तर तुटतो हा वाटतें प्राणतंतू ॥१३॥

वरति दिसत सारें शून्य आकाश मात्र,
जलमय भय वाटे खालतें सिंधुपात्र,
गगनिम दिसत नाहीं एकही आज पक्षी,
कठिण समय आला, ह्यांतुनी कोण रक्षी ॥१४॥

तरु नगहि दिसेना येत कैची जमीन,
सभय पळत जाती मोठमोठेहि मीन,
एतर जलचरेंही धांवती सैरवैरा,
व्यसनसमयिं हा हा ! टाकुनी लोभवैरा ॥१५॥

गलबत खुटवीलें टाकुनी नांगराशीं,
तरिहि जलधिसंगें ना टिके संगराशीं;
अधिक अधिक वारा होतसे फार जोर,
अहह ! तुटला कीं नांगराचाहि दोर ॥१६॥

भडकुनि पवनानें स्वैर तारूं निघालें,
किति तरि न कळे हे दैव घालील घाले !
जलद हल खलाशी टाकिती दूसरा हो,
अझुनि तरि दमानें बापुडें स्थीर राहो ॥१७॥

फिरुन जरि हलाचा दोर नोहे हलाचा,
तरि मग सकलांचें संपलें खास आयू !
गमत मम मना हा दोर नोहे हलाचा,
प्रगट निवळ तंतु जीविताच्या बलाचा ॥१८॥

घडि घडि जइं होतो वायुचा फार जोर,
दचकुनि तुटला कीं पाहतों काय दोर,
निशिदिनिं सकलांना लागला तोचि घोर,
व्यसनसमयिं होतो नीचही फार थोर ॥१९॥

रडुनि रडुनि झालों काय हो दीनवाणी ।
नयन सुकुनि गेले आटलें सर्व पाणी,
उगिच करुनि होतों स्वस्थ ऐसा विवेक,
नविन नविन तों तों संकटें एक एक ! ॥२०॥

निबिड गगनिं आल्या मेघपंक्ती भरून,
सळ सळ जळधारा ओतती कीं वरून,
गड गड गड अंगा गर्जना कांपवी, ते
जलद जलद आला साह्य व्हाया पवीतें ॥२१॥

चम चम चम नाचे काय विद्युल्लता ही !
कड कड कड शब्दें नाद कोंदून राही,
घसरुनि पडते ही वाटतें मस्तकांत,
खचित खचित आलों मृत्युच्या मी मुखांत ! ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP