करुणासागर - पदे ७५१ ते ८००
नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.
आतां तुम्हींच द्रवावें । मज दर्शन द्यावें ॥ माझें समाधान करावें । नमन करितों म्हणोनी ॥५१॥
माझिये थोडके जीवित्वासाठीं । काय करविसी आटाआटी ॥ समर्थ असोनि संकटीं । पाडीलें मज ॥५२॥
आतां सोडवीं दातारा । तुजविण मजला नाहीं थारा ॥ भिक्षा घालीं पूर्ण उदारां । अभय देईं मज वेगीं ॥५३॥
आतां कैसा धीर धरूं । कोणता उपाय करूं ॥ कोठें राहूं कोठें फिरूं । दयासिंधो सद्गुरो ॥५४॥
देवा आतां अती वेळा झाली । माझी अन्तवेळा आली ॥ दयाघना उडी घालीं । आतांचि गुरो ॥५५॥
शरआण्गतातें काय छळणें । दुःखितासी दुःख देणें ॥ मेल्याशींच मारणें । श्लाघ्य नव्हे तुज देवा ॥५६॥
क्षणक्षणा वाट पाहें । भावें करुणा भाकिताहें ॥ सद्गुरो आतां दावीं पाय । नमन करितों तुज देवा ॥५७॥
तूंच अनाथाचा नाथ अससी । नाना संकटांपासोनि सोडविसी ॥ शरणागताचा अंगें करिसी । संभाळ तूं ॥५८॥
दुःखिताचें दुःख दवडिसी । प्रणताचें पाळण करिसी ॥ भिक्षुकाचा समाचार घेसी । अचलदान देवोनी ॥५९॥
मजविषयींच काय झालें । करुणासामर्थ्य कोठें गेलें ॥ सद्गुरूराया आपुलीं पाउलें । दावीं आतां ॥७६०॥
तूं जैसा असावा तैसा अससी । तत्काळचि धांवसी ॥ विलम्ब कासया लाविसी । परम दयाळो ॥६१॥
बोलितेंच बोलिलें । निवेदिलेंच निवेदन केलें ॥ आतां काय राहिलें । दत्तात्रेया दयाळा ॥६२॥
अजूनि कैसा ना द्रवसी । दयाळू असतां अन्त पाहसी ॥ सर्वज्ञ असतां न येसी । धांवोनि आतां ॥६३॥
दत्तात्रेया माझे आई । माथा ठेवितों तुझे पायीं ॥ आतांचि धांवोनि दर्शन देईं । मनोरथ पुरवीं दासाचे ॥६४॥
सत्ता तुझी सारखी । सर्वदा वर्ते त्रिलोकीं ॥ माझेकडे अवलोकीं । कृपावन्ता ॥६५॥
तुझे सत्तेनें दिनकर । तुझे सत्तें समीर ॥ तुझे सत्तें वैश्वानर । वर्ते लोकीं ॥६६॥
तुझे सत्तें जळधर । तुझें सत्तें फणिवर ॥ तुझेच सत्तें सागर । मर्यादा न सांडी ॥६७॥
तुझेचि सत्तें ब्रह्मा आपण । करी जगताचें सृजन ॥ विष्णू करितो पालन । तुझेचि सत्तें ॥६८॥
तुझे सत्तें महेश । करि जगताचा नाश ॥ तुझे सत्तें सुरेश । इन्द्रपद भोगी ॥६९॥
तुझे सतें सुरनर । सिद्ध गन्धर्व किन्नर ॥ ऋषी मुनी चराचर । तुझे सत्तें वागती ॥७७०॥
मृत्यु तुझेच सत्तें । वागे, ग्रासो सर्वांतें ॥ तुझी सत्ता मृत्यूतें । मारणारी ॥७१॥
तुझे सत्तें तारागण । अम्बरीं वागे निशारमण ॥ तुझे सत्तें सकल भुवन । वर्ते निकें ॥७२॥
तुझे सत्तें वनमाळी । वृक्ष औषधी नाना वल्ली ॥ फळती काळीं अकाळीं । तुझी सत्ता अपार ॥७३॥
दत्तात्रेया, तुझे सत्तें । लक्ष्मी सर्वत्र वागते ॥ जगज्जननी बोलिजे ते । तुझे सत्तें सद्गुरू ॥७४॥
ऐसी तुझी अपार सत्ता । सर्वदा वागे सद्गुरुनाथा ॥ आतांच मजला अभय देतां । कोठें गेलां गुरुवर्या ॥७५॥
तूं कालत्रयीं सारिखा । समदर्शी सर्वसखा ॥ मजविषयीं लक्ष्मीनायका । उदासीनता न धरीं तूं ॥७६॥
माझें काय काय कृत्य स्मरसी । काय काय माझे अंगीं लाविसी ॥ कितीक आतां अपराध गणिसी । सद्गुरूराया ॥७७॥
आतां किती विलंब लाविसी । कितीतरी अपेष्टा करिसी ॥ आतां मधीं कृपा करिसी । दयासिंधो समदर्शी ॥७८॥
तुझेचि हातीं दिधले हात । आतां न करीं माझा घात ॥ ब्रीद तुझें विख्यात । भुवनत्रयीं सद्गुरो ॥७९॥
कष्ट देवोनि तुष्ट होणें । हें तूतें अश्लाघ्यवाणें ॥ म्हणोनि आतांचि धांवणें । दत्तात्रेया ॥७८०॥
चोराचेंही अंतर द्रवतें । कैसी करुणा नये तूतें ॥ श्रमविसी शरणागतातें । सर्वज्ञ समर्था दयाळो ॥८१॥
कैसा माझा विसर पडला । तुझा स्वभाव कोठें गेला ॥ सखया आतां कोणता राहिला । विनंतीचा प्रकार ॥८२॥
त्रैलोक्याचें पोषण करिसी । नमन करितां मारिसी ॥ शरण येतां हांकूनि देसी । दयाळू हें अनुचित ॥८३॥
सांग आतां दयाळा । कां नये माझा कळवळा ॥ किती राहिली वेळा । दर्शन द्यावयाचीं ॥८४॥
देवा कांहींच अवधी राहिली नाहीं । तूंचि विचारूनि पाहीं ॥ आतां विलंब कांहीं । लावूं नको दयाळा ॥८५॥
चिन्ताडोहीं बुडालों । वाट पाहत बैसलों ॥ सद्गुरू माये दयाळो । येईं आतां ॥८६॥
देवा आतांच अंगिकारीं । मातें हृदयीं धरीं ॥ माझें समाधान करीं । सर्वज्ञ देवा ॥८७॥
आजपर्यंत देवें कांहीं । शरणागत उपेक्षिला नाहीं ॥ येवोनि पडलों तुझें पायीं । त्याग माझा न करीं तूं ॥८८॥
आतां कितीक वेळ लाविसी । कधीं माझा समाचार घेसी ॥ वाट पाहत परदेशी । बैसलों आहें ॥८९॥
करोनियां तांतडी । अकस्मातची घालीं उडी ॥ तुझे पराक्रमाची प्रौढी । अपार आहे ॥७९०॥
आतांचे आतां । काय एक न करिसी रमाकान्ता ॥ सर्व गुण सकळकळावन्ता । सर्वज्ञ देवा ॥९१॥
तूतें सर्वथा शरण आलों । नको विलंब लावूं दयाळो ॥ तार आतां घाबरलों । दीन दयाळो सर्वज्ञा ॥९२॥
रामा कृष्णा गोविन्दा । दत्तात्रेया सच्चिदानंदा ॥ दयासागरा निर्द्वद्वा । धांव आतां ॥९३॥
माथा ठेविला तुझे पायीं । धांव आतां सद्गुरू आई ॥ आतांचि देवा अनंत उपायीं । रक्षीं मज ॥९४॥
आतां सर्व बोलणें सरलें । माझे कंठीं प्राण उरले ॥ धांव धांव पाउलें । दाखवीं आतां ॥९५॥
हातीं घेईं सुदर्शन । गुरुराजा दया - पूर्ण ॥ येईं धांवोन । अवधी नाहीं राहिली ॥९६॥
आतां कोणती अवधी । समर्थ असतां पाहसी ॥ अजुनि कोणता विचार करिसी । सर्वज्ञ दयाळा ॥९७॥
आतां स्वामी उठावें । धांवतचि यावें ॥ अंगेंचि आतां सांभाळावें । तुझा आहें म्हणोनी ॥९८॥
समर्थासी माकिली करुणा । व्यर्थ न करीं नारायणा ॥ नको आतां यातना । दाखवूं दयाळा ॥९९॥
यावा आतां कळवला । अत्री - अनसूयेच्या बाळा ॥ आतांचि येईं अनंतबळा । महापुरुषा सर्वज्ञा ॥८००॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP