मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
पदे १३०१ ते १३५०

करुणासागर - पदे १३०१ ते १३५०

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


जो जाणे सर्वभावा । जो वंद्य महादेवा ॥ तेणें माझा आतां घ्यावा । समाचार ॥१॥
जो देव कालत्रयीं असतो । त्याची वाट पहातों ॥ त्यातेंच हाका मारितों । दत्तात्रेया ये आतां ॥२॥
तुजवीण माझें कोणी नाहीं । मस्तक ठेविला तुझे पायीं ॥ येऊनि माझा समाचार घेईं । आतांच देवा ॥३॥
आतां माझी गती । सर्वज्ञ देवा तुझे हातीं ॥ माझा सांभाळ कृपामूर्ती । करावा आतां निजांगें ॥४॥
देवा आतां काय करूं । कोठें राहूं कोठें फिरूं ॥ कैसा वांचूं कैसा मरूं । कांहीं देवा सुचेना ॥५॥
आतां अंत न पहावा । माझा समाचार घ्यावा ॥ प्राण माझा देवाधिदेवा । जाऊं पाहे सर्वज्ञा ॥६॥
आधीं माझा मनोरथ पुरवावा । मग माझा प्राण जावा ॥ माझा हेतू देवाधिदेवा । तुझे चरणीं गुंतला ॥७॥
आतां कोणती वाट पहाशी । कोठें देवा गुंतलासी ॥ पुढें आतां किती करिसी । दुर्दशा माझी सर्वज्ञा ॥८॥
पुरे आतां सिमा झाली । करुणासिंधो धांव घाली ॥ माझी आशा पुरविली । पाहिजे आतां सर्वज्ञा ॥९॥
माझी विटंबना व्हावी । मी महा विपत्ती भोगावी ॥ शरण असतांही पहावी । समर्थानें हें कैसें ॥१३१०॥
मी कोणाचे मुखाकडे पाहूं । कोठें जाऊं कैसा राहूं ॥ आतां कैसा शरण येऊं । सर्वज्ञ देवा ॥११॥
आतां माझें कोण आहे । कोण मातें रक्षी पाहें ॥ तूंच आतां सद्गुरुमाये । रक्षीं मज ॥१२॥
तुझें वात्सल्य अपार असे । तुझेसारिखा सखा नसे ॥ फार कष्टी होतसे । दास तुझा सर्वज्ञा ॥१३॥
आतां माझी यावी करुणा । नको दाखवूं यातना ॥ सर्वज्ञ देवा दयाघना । धांव घालीं समर्था ॥१४॥
माझें धैर्य गेलें । माझें सत्त्व बुडालें ॥ देवा माझे पांगुळे । पाय झाले सर्वज्ञा ॥१५॥
माझी बुद्धी गेली । माझी धृती डळमळली । भांबावल्याची अवस्था झाली । माझी देवा ॥१६॥
काय करूं हें सुचेना । कांहीं केल्या राहवेना ॥ चहूं फेर यातना । झाल्या मज ॥१७॥
सर्वज्ञ जाणसी सांगूं काय । तूंच माझा बाप माय ॥ दत्तात्रेया वंदितों पाय । धांव घालीं आतां तूं ॥१८॥
नित्य मंगल तुझें रूप । ब्रह्मानंद आपेंआप ॥ देवा माझा संताप । दूर करीं तूं दयाळा ॥१९॥
आतां कोठवरी सांगावें । किती तरी लिहावें ॥ कैसें किती कळवावें । सर्वज्ञ देवा ॥१३२०॥
धांव आतां दयालो । वाट पहात बैसलों ॥ फार आतां भागलों । सर्वज्ञ देवा ॥२१॥
माझें समाधान करावें । धांवोनि मातें दर्शन द्यावें ॥ लळे माझे पुरवावे । दीन दयाळा समर्था ॥२२॥
आतां अवकाश राहिला नाहीं । तूं सर्व जाणसी पाहीं ॥ धांव आतां करूं काई । पाया पडतों सर्वज्ञा ॥२३॥
तुझे द्वारीं दत्तात्रेय । व्याघ्रें धरिली गाय ॥ आतां सोडवीं दावोनि पाय । अनंतबळा सर्वज्ञा ॥२४॥
भक्त तुझे भजन करिती । त्यांची असावी अनुरूप वृत्ती ॥ म्हणोनि त्यांतें विपत्ती । जाणत असतां दाविसी ॥२५॥
भक्ताच्या हाका ऐकसी । भक्ताचें दुःख जाणसी ॥ मागें पुढें वागसी । सांभाळ करिसी भक्ताचा ॥२६॥
जवळचि अससी । ठेस लागतां हात देसी ॥ तहान भुकेचा समाचार घेसी । निरंतर ॥२७॥
शीत उष्ण सर्व दुःख । भक्ताचें निवारी देख ॥ पाहसी भक्ताचें मुख । आवडीनें ॥२८॥
भक्ताची वाणी । ऐकसी आड ठाकोनी ॥ वैकुंठातें टाकोनि । भक्तसन्निध राहसी ॥२९॥
सांडोनि लक्ष्मीची ममता । करिसी भक्ताची चिंता ॥ भक्तभार वाहसी माथां । कौतुकें तूं ॥१३३०॥
भक्ताचें करिसी स्मरण । करिसी भक्ताचें ध्यान ॥ करिसी भक्ताचें सेवन । निजांगें तूं ॥३१॥
भक्त तुझा देव । भक्त तुझा ठाव ॥ भक्त तुझा जीव । जीवन कळा ॥३२॥
भक्ताचें जाणसी गुज । करिसी भक्ताचें काज ॥ राखिसी भक्ताची लाज । दयाळूपणें ॥३३॥
तुज भक्ताचें वेड असे । भक्त तुझ्या हृदयीं वसे ॥ भक्तावाचोनि कोणी नसे । तुझें देवा ॥३४॥
ऐसा भक्ताचा हितकारी । राहे भक्ताचे बरोबरी ॥ आघात संकट निवारी । आपुल्या अंगें ॥३५॥
भक्तासन्निध राहसी । मक्तकौतुक पाहसी ॥ भक्त दुःखी होऊं न देसी । समर्थ देवा ॥३६॥
ऐसा दयाळू अससी । सर्वदां सांभाळ करिसी ॥ परंतु बहुधा राहसी । आडपणें ॥३७॥
भक्तानें अधिक भजावें । सर्व कांहीं विसरावें ॥ अखंड ब्रह्माकार व्हावें । म्हणोनि असें करिसी तूं ॥३८॥
तुझें गंभीर मत । तुझी करणी अघटित ॥ करिसी भक्ताचें हित । सर्वथा तूं ॥३९॥
हें सर्व सत्य आहे । माझें हितचि करिसी पाहें ॥ परंतु आतां समय नव्हे । आडपणाचा सर्वज्ञा ॥१३४०॥
आडपणाची अवधी सरली । आतां निर्वाण वेळा आली ॥ मातें हलहळ फार झाली । सर्वज्ञा देवा ॥४१॥
आडपणाची वेळ नाहीं । आतां उडीच घालीं पाहीं ॥ प्रत्यक्ष येऊनि दर्शन देईं । शरण आलों म्हणोनि ॥४२॥
आतां जरी विलंब लाविला । तरी तुझा पुरुषार्थ गेला ॥ प्राण माझा कळवळला । अंतरीं देवा ॥४३॥
खरा खोटा पापी कुश्चळ । अन्यायी कपटी कुटीळ ॥ शरण येतां तमालनीळ । भक्त तुतें प्रिय असे ॥४४॥
कैसा तरी तुझा भक्त । तुतें असे तो उचित ॥ अंगें करिसी त्याचें हित । आपला जाणोनि ॥४५॥
मी कैसातरी तुझा आहें । आतां मजकडे पाहें ॥ माझा प्राण जाऊं पाहे । धांव आतां सर्वज्ञा ॥४६॥
साक्षात् हरीचे द्वारीं आलों । हरीसन्मुख उभा ठाकलों ॥ हरीचे पायीं येऊनि पडलों । हरी जाणे सर्व हें ॥४७॥
हरीतें करितों विनंति । हरीच माझी गती ॥ आतां हरी कृपामूर्ती । लज्जा राखो दयाळो ॥४८॥
देवा तुझें नाम हरी । माझें दुःख क्लेश हरीं ॥ माझें समाधान करीं । आतांच देवा ॥४९॥
भक्तातें मार्ग दाखविसी । शरणागतातें रक्षिसी ॥ आपला जाणोनि सुबुद्धि देसी । सर्वज्ञ तूं ॥१३५०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP