मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
पदे ४५१ ते ५००

करुणासागर - पदे ४५१ ते ५००

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


देवा आतां काय करूं । लोकीं कैसा धीर धरूं ॥ वांचूं किंवा मरूं । मातें कांहीं सुचेना ॥५१॥
प्राण तरी कैसा देऊं । तुजवीण कैसा राहूं ॥ सद्गुरू आतां कोठें जाऊं । कोठें राहूं कवणेपरी ॥५२॥
अंतरीं दुःख होय । कोणतें सांगतांही नये ॥ तूंच जाणसी सद्गुरूमाये । काय सांगूं सर्वज्ञा ॥५३॥
माझी अंतरींची हळहळ । तूंचि करिसी शीतळ ॥ देवा माझी कळवळ । तूजच असे ॥५४॥
तूंच जरी कृपा करिसी । धांवोनि माझें समाधान करिसी ॥ तरीच माझा हृषीकेशी । प्राण राहे ॥५५॥
नाहीं तरी वाहवलों । चिंताडोहीं बुडालों ॥ काढीं आतांच दयाळो । अनंतबळा सद्गुरो ॥५६॥
जीव जाय तोंवरी अंत । काय पाहसी दयावंत ॥ माझा तूतें लक्ष्मीकांत । भार झाला फारसा ॥५७॥
माझा प्राण जातां । तुम्ही स्वस्थ होऊनि पाहतां ॥ ऐसा कैसा तत्त्वतां । विचार केला अंतरीं ॥५८॥
जरी माझा प्राण गेला । तुझेच ठायीं हेतू गुंतला ॥ तूतें न सोडीं दयाळा । जीत मेल्या कदापि ॥५९॥
सूर्य अंधारीं लोपला । भुंगीनें हत्ती गिळिला ॥ देवा तैसा उणा झाला । सद्गुरूचा पराक्रम ॥४६०॥
माझा अंगिकार करितां । शंका वाटे लक्ष्मीकांता ॥ मज पाउलें दाखवीं आतां । खंतीं वाटे अंतरीं ॥६१॥
मी काय तुझें हिरोनि घेतों । किंवा तूतें कैद करितों ॥ काय तुझा नाश होतो । दर्शन देतां पायांचें ॥६२॥
कैसा त्यागिसी अधोक्षजा । अनादिसिद्धा आनंदबीजा ॥ कंठीं प्राण आला माझा । लज्जा कैसी सोडिली ॥६३॥
माझा होतसे अंत । तूं तों बैसलासी निवांत ॥ ऐसा कैसा रमाकांत । शरणागतवत्सल तूं ॥६४॥
विनंतीची सीमा झाली । मति माझी भांबावली ॥ जैशी माझी गति झाली । देवा तैसी जाणसी तूं ॥६५॥
देवा आयुष्य चालिलें वांया । रोगें व्यापिली काया ॥ विलंब लाविसी दत्तात्रेया । अत्यंत दयाळु असतांही ॥६६॥
आधींच थोडें जीवन । तेंही चालले निघून ॥ अजूनिही स्वामीचे चरण । दृष्टी न पडती ॥६७॥
अंतकाळ जवळ आला । करुणा भाकीं वेळोवेळां ॥ स्वामीसेवेचा सोहळा । कधीं पाहावा सर्वज्ञा ॥६८॥
आयुष्य निघोनि गेलें । अंतीं जरी दाविलीं पाउलें ॥ तेणें माझें काय झालें । समाधान ॥६९॥
झालें कंठा अवरोधन । कैसें करावें गुणवर्णन ॥ कोणत्या प्रकारें सेवन । अंतीं घडे मज देवा ॥४७०॥
माझे मनींचा उल्हास । मनीं जिरला जगन्निवास ॥ कांहींच माझी हौस । पुरविली नाहीं समर्था ॥७१॥
मनांत होतें चरण पहावे । चरण सेवूनि रहावें ॥ लोकीं सोहळे भोगावे । सद्गुरूचे सेवेचे ॥७२॥
सद्गुरूचें उच्छिष्ट । खाऊनि रहावें संतुष्ट ॥ गुण वर्णावे स्पष्ट । सद्गुरूचे ॥७३॥
स्वामीमुखाची वाणी । नित्य ऐकावी कानीं ॥ स्वामीचे आज्ञेकरूनी । वर्तावें जगीं ॥७४॥
स्वामी आज्ञा करतील जेथें । आनंदें रहावें तेथें ॥ स्वामीसेवेस भावार्थें । लोक लावावे ॥७५॥
नित्य दर्शन घ्यावें । तीर्थप्रसाद सेवावे ॥ हितगूज आपुलें सांगावें । नित्य स्वामीतें ॥७६॥
स्वामीतें प्रश्न पुसावे । स्वामींनीं समाधान करावें ॥ आपुला म्हणोनि वागवावें । लोकीं मज ॥७७॥
हृदयीं स्वामीचे चरण । धरोनि रहावें आनंदघन ॥ नित्य करावें कीर्तन । स्वामीपुढें ॥७८॥
असावा स्वामींचा आधार । स्वामींनींच घ्यावा समाचार ॥ इतर लोकांसी पदर । पसरूं नये म्यां ॥७९॥
मज कोणाची आशा नसावी । स्वामींनीं वृत्ती चालवावी ॥ स्वामी सांगतील तैसी व्हावी । वर्तणूक माझी ॥४८०॥
कोणाचेही आधीन । म्यां न व्हावें दयाघन ॥ अखंड स्वामींचे चरण । सेवूनि रहावें ॥८१॥
महानुभव संतांची । संगती असावी सद्भक्तांची ॥ सेवा घडावी साधूंची । अंगेंच मज ॥८२॥
कांहीं काळ देवाधिदेवा । ऐसी करावी तुझी सेवा ॥ मग माझा देह पडावा । तुझे चरणीं ॥८३॥
हा देह पावतां पतन । तत्काळचि दुसरा देह धरीन ॥ स्वामीचे बरोबरीच राहीन । निरंतर ॥८४॥
घालीन स्वामीतें स्नान । मांडीन स्वामीचें आसन ॥ आपुले हातीं धुवीन । वस्त्रें स्वामींचीं ॥८५॥
स्वामींसी पाहिजे तैसें अन्न । तत्काळचि सिद्ध करीन ॥ आपुले हातीं वाढीन । जेवितील स्वामी ॥८६॥
काढीन स्वामींचें ताट । सेवीन स्वामींचें उच्छिष्ट ॥ स्वामींपुढें वागेन स्पष्ट । सेवक होवोनि ॥८७॥
तांबूल देईन । मीच उगाळ घेईन ॥ स्वामींचे गुण गाईन । ऐकेन कानीं ॥८८॥
वेदसार सिद्ध बोल । स्वामी सांगतील सखोल । अकोनि निश्चळ । सन्निध राहीन स्वामींचे ॥८९॥
निकट वर्तेन समोर । उभा राहीन निरंतर ॥ सद्गुरूचे सेवेसी तत्पर । राहीन मी ॥४९०॥
स्वामींची शेज घालीन । गुरू करतील शरन ॥ करीन पादसेवन । सद्गुरू स्वामींचें ॥९१॥
हितगुजाच्या गोष्टी । स्वामी सांगतील कृपादृष्टीं ॥ होईल आनंदाची वृष्टी । सेवितां चरण ॥९२॥
स्वामींचे आज्ञेंकरून । सन्निधची करीन शयन ॥ प्रातःकाळीं उठोन । उठवीन स्वामींतें ॥९३॥
अंतरीं धरोनि हेवा । करीन स्वामींची सर्व सेवा ॥ माझें सेवन सद्गुरूदेवा । गोड वाटावें ॥९४॥
ऐसें स्वामीचें सेवन । कल्पकोटी करीन ॥ कदापि स्वामीचे चरण । सोडणार नाहीं ॥९५॥
मी तों स्वामींचे जवळ । अखंड राहीन सर्वकाळ ॥ सद्गुरूतें अर्धपळ । विसंबणार नाहीं ॥९६॥
जेव्हां जेथें ज्ञानविग्रह । स्वामी अवतरती निःसंदेह ॥ तेव्हां तेथें माझा देह । सेवेसि व्हावा स्वामीचे ॥९७॥
ऐसा माझा सद्गुरूचा । अखंड योग राहो साचा ॥ सदा राहीन स्वामींचा । शिष्य सद्गुरूचा । शिष्य होवोनी ॥९८॥
जें तुमचें आदिपीठ । ज्यातें बोलती वैकुंठ ॥ मातें नलगे सांगतों स्पष्ट । सद्गुरूस्वामी ॥९९॥
एवं माझा मनोरथ । सर्वज्ञा जाणतोसी यथार्थ ॥ आतांच पूर्ण कराया समर्थ । तूंच अससी ॥५००॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP