मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
पदे ७०१ ते ७५०

करुणासागर - पदे ७०१ ते ७५०

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


आतां मातें दर्शनची द्यावें । देऊनि समाधान करावें ॥ आपुले पायींच ठेवावें । सेवा करवोनी ॥१॥
वारंवार भाकितों करुणा । कैसें हृदय द्रवेना ॥ सर्वज्ञ करुणेच्या घना । दत्तदेवा ॥२॥
माझी वेडी वांकुडी वर्तणूक । सत्यासत्य बोलणूक ॥ नाना छंड नाना कौतुक । पाहोनि तुम्हीं विटू नये ॥३॥
तूतेंच सर्व प्रकारें आहें शरण । यांत कांहींच संशय नसे जाण ॥ हें मिथ्या असेल तरी पतन । पावेन मी ॥४॥
सर्व प्रकारें रुजूचि आहें । तुझीच वाट पाहताहें ॥ तुजवीण दुसरें कांहीं न साहें । आण तुझी सर्वज्ञा ॥५॥
तूंचि माझी विश्रांती । तूंचि माझी गती ॥ हे अन्यथा असत्य वचनोक्ती । अधोगती घडो मज ॥६॥
ऐसें असतां पाहीं । प्रारब्धें विपरीत घडलें कांहीं ॥ जाणोनि पारखा न होईं । सर्वज्ञ देवा ॥७॥
सर्वज्ञासी कांहीं । सांगायाचें प्रयोजन नाहीं ॥ परंतु राहवेना म्हणोनि पाहीं । निवेदन करितों ॥८॥
तूं सर्वज्ञ आहेसी । म्हणोनि धोका नाहीं मानसीं ॥ सर्व कांहीं जाणसी । अंतरभाव सदसत ॥९॥
माझें करणें सर्व कांहीं । तुझे साठींच पाहीं ॥ माझें स्वहित तुझेचि पायीं । असे सत्य ॥७१०॥
म्हणोनि माझी कांहीं करणी । बरी वाईट घडली भुवनीं ॥ लक्षांत आणोनि अंतरज्ञानी । त्याग माझा न करावी ॥११॥
मी तुझें खोडकर लेंकरूं । मूर्ख चपळ भीतरू ॥ आळसी अपवित्र अधीरू । अंगिकारीं सद्गुरो ॥१२॥
माझे ठायीं दुर्गुण अशेष । मी कलंकी अपराधी निःशेष ॥ आतां मूर्तिमंत दोषाचा दोष । काय पाहसी समदर्शी ॥१३॥
ऐशाही दोषांचा राशी । शरण आलों हृषीकेशी ॥ भरंवसा धरोनि समदर्शी । तुझे ब्रीदांचा ॥१४॥
तूं अंगिकार करशील सत्य । भरंवसा आहे सत्य सत्य ॥ तूंचि मजला त्रिसत्य । आधार आहेसी ॥१५॥
मातें देशील दर्शन । पाहिजे तैसें अभयदान ॥ दर्शन देऊनि करिशील समाधान । आतांच माझें ॥१६॥
ऐसा दृढ भरंवसा । धरोनि शरण आलों जगदीशा ॥ सामान्य म्हणोनि उपेक्षा । न करीं माझी सद्गुरो ॥१७॥
आतां अवधी राहिली नाहीं । दारुण वेळा आली पाहीं ॥ अजूनि बैसविली कांहीं । धांव दयाळा सद्गुरो ॥१८॥
आतां धांवोनि भेटी देईं । माथा ठेवितों तुझे पायीं ॥ मनोरथ पुरवीं माझे आई । दत्तात्रेया सद्गुरो ॥१९॥
नाना अन्याय होती । नाना विघ्नें कोसळती ॥ नाना प्रकारचीं येती । आडवीं द्वंद्वें ॥७२०॥
मी तों आधींच अज्ञानराशी । माझी परीक्षा काय पाहसी ॥ आहें तैसा जाणसी । सर्वज्ञ देवा ॥२१॥
माझे अंगीं कर्माकर्म । नानाविध धर्माधर्म ॥ लावूं नको जाणसी वर्म । सर्वातीता निष्क्रिया ॥२२॥
दोन्ही मांडव साजिरे । तूतेंच करणें सारे ॥ ऐसें असतां सांवळ्या कांरे । छळिसी मज ॥२३॥
तुझा आहें म्हणोनी । माझे गुणदोष न गणीं ॥ आतांचि धांव घालोनी । शरणागतातें सांभाळीं ॥२४॥
आतां सांगावें कैसें । सर्व जाणसी आपैसें ॥ कोठेंही चैन नसे । केवीं राहूं दयाळा ॥२५॥
थकले सारे उपाय । आतां स्वामी करावें काय ॥ कोण माझे अपाय । दूर करी तुजविणें ॥२६॥
आतां स्वामी त्वरा करावी । माझी आशा पुरवावी ॥ आतां वृथा न दवडावी । गुरुसेवेची नरतनू ॥२७॥
देवा फार वाटते खंती । प्राण माझे कालवती ॥ तुझा असें मी विपत्ती । न करीं माझी सद्गुरो ॥२८॥
मशकावरी वज्रपात । पिपिल्लिकेवरी पर्वत ॥ तैसा माझा अपघात । शरणागताचा न करावा ॥२९॥
आली अवगतीची वेळा । उडीं घालीं गोपाळा ॥ नको उपेक्षूं कृपाळा । दत्तात्रेया सद्गुरो ॥७३०॥
तूं परम कृपावंत । नको पाहूं माझा अंत ॥ फार वाटताहे खंत । सर्व कांहीं जाणसी ॥३१॥
जैसा चक्षु - पाद - हीन । कंठीं उरला प्राण ॥ समाचार घ्यावया कोणी आन । जवळ नाहीं ॥३२॥
ऐशी अवस्था माझी झाली । बुद्धि चिन्ता - डोहीं बुडाली ॥ व्यर्थ माझी चालिली । वयसा देवा ॥३३॥
पाव दयाळूच्या राजा । क्षमावंत अनंतभुजा ॥ अनंतनेत्रा आहें तुझा । अनंतश्रोत्रा सद्गुरो ॥३४॥
अनंतचरणा अनंतमुखा । अनंतनामागुणा अनंतसुखा । अनंतबळ तूं माझा सखा । विलंब आतां न लावीं ॥३५॥
माझी काय पाहसी करणी । समदर्शी तूं माझा धनी ॥ आतां माझी जांचणी । फार झाली ॥३६॥
आतां यावी माझी करुणा । हात जोडॊनि लागतों चरणा ॥ आतां न दावीं यातना । दत्तात्रेया दयाळा ॥३७॥
तूं माझी माउली । याच वेळे धांव घालीं ॥ आतांच माझी आशा पुरविली । पाहिजे देवा ॥३८॥
जें जें कांहीं निवेदावें । तें तें सरलें आघवें ॥ काय आतां सांगावें । सद्गुरूराया ॥३९॥
ऐसें काय राहिलें । जें तुज नाहीं समजलें ॥ सर्वज्ञासी काय ठेविलें । चोरोनि आम्हीं ॥७४०॥
आतां कैसी विनंती । करावी हे कमळापती ॥ कैसा तरी काकूळती । येऊं स्वामी ॥४१॥
कोठवरी दुःख सांगूं । कैसी तरी भिक्षा मागूं ॥ आतां कोठवरी भोगूं । वियोग स्वामींचा ॥४२॥
तुझी आशा मोठीच धरिली । तूं तों निष्ठुरता वरिली ॥ तुझी ब्रीदावळी काय पुरिली । नेवोनि कोणी ॥४३॥
काय झालें हें दयाळा । कां न येई कळवळा ॥ करुणा भाकितों वेळोवेळां । कैसें द्रवेना अंतर ॥४४॥
यापुरतें काय करावें । कोणत्या प्रकारें रिझवावें ॥ वेगीं आतीं कळवावें । रिझसी जेणें ॥४५॥
जेणें तुम्हीं रिझावें । तेंचि मज हातीं करवावें ॥ रिझणें रिझवणें आघवें । सर्व तुम्हांकडे जी ॥४६॥
मी सर्व प्रकारें रुजू आहें । स्वामीतें ठाऊकचि आहे ॥ तुझे साठीं देवा पाहें । काय एक न करीं मी ॥४७॥
तूंचि माझी विश्रांति । परी सर्व तुझे हातीं ॥ सर्व कांहीं माझी गती । तूंचि देवा ॥४८॥
शरण आलों जीवेंभावें । आतां मातें सांगावें ॥ माझें हातीं तें करवावें । जेणें दर्शन देसी तूं ॥४९॥
माझें सामर्थ्य सरलें । तुज सर्व निवेदिलें ॥ आतां माझा कांहीं न चाले । उपाय देवा ॥७५०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP