करुणासागर - पदे १०५१ ते ११००
नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.
तुझे मनास आलें । तेथें कोणाचें काय चाले ॥ सर्व कांहीं तुझें केलें । होय देवा ॥५१॥
जंव जंव मातें दुःख होतें । तंव तंव तुझें अंतर कळतें ॥ मातेचें चित्त द्रवतें । बाळ कष्टी पाहोनी ॥५२॥
जे गर्भश्रीमंत असती । ते दुसर्याचें दुःख नेणती ॥ मूढपणें मदांध होती । क्षुद्र जन ॥५३॥
लक्ष्मीचे अंशलेशें । मूर्ख जनातें लागतें पिसें ॥ दुसरा दुःखी होतसे । हें न कळे तया ॥५४॥
तूं अनादिच श्रीमंत अससी । साक्षात् लक्ष्मी तुझी दासी ॥ तथापि देवा जाणसी । दुःख शरणागताचें ॥५५॥
प्राण्यांचें दुःख जाणसी । परदुःखें दुःखी होसी ॥ समर्था तूं दूर करिसी । कृपाळूपणें ॥५६॥
अनंत ब्रह्मांडांचें प्रभुत्व । अनंत लक्ष्मीचें स्वामित्व ॥ असतां एवढें दयाळुत्व । ऐसा तूंच अससी सद्गुरो ॥५७॥
देवा शरणागतासाठीं । धांव घालिसी उठाउठी ॥ नसतां भक्ताचे अदृष्टीं । सौख्य देसी समर्था ॥५८॥
ऐसें जाणोनि शरण आलों । तुझे पायीं येऊनि पडलों ॥ आतां माझी गती दयालो । काय करिसी सर्वज्ञा ॥५९॥
माझा आधार तूंच अससी । अझूनि तरी काय काय म्हणसी ॥ आतां कोठें कोठें हांकोन देसी । दयासिंधो सर्वज्ञा ॥१०६०॥
आतां अवकाश राहिला नाहीं । धांव देवा पडतों पायीं ॥ तुझे पोटांत घातली डोई । दत्तात्रेया सर्वज्ञा ॥६१॥
तुझे पाया शरण आलों । तुझे भरंवशावरी बैसलों ॥ सद्गुरुराया वायांच गेलों । ऐसें न करावें ॥६२॥
समर्था तुतेंच आहे शरण । सत्य देवा तुझी आण ॥ माझे मनोरथ पूर्ण । करीं आतां समर्था ॥६३॥
तूं समर्थाहूनि समर्थ । मी तुझाच आहें यथार्थ ॥ वंध्या माझें मनोरथ । न करीं देवा ॥६४॥
चित्तीं धरिली जे कामना । ती आतांच पुरवीं नारायणा ॥ अंतरिच्या जाणूनि खुणा । सर्व देवा ॥६५॥
मी कांहीं साधन करावें । शून्य जाणायाचें नांवें ॥ तुम्हींच मजला पोटीं धरावें । नमन करितों म्हणोनी ॥६६॥
मी साधना योग्य आहे किंवा नाहीं । हा शोध घेतलाच आहे पाहीं ॥ आतां सांगूं कायी । सर्वज्ञासी ॥६७॥
मज कांहीं पुरवेना । धैर्य नाहीं नारायणा ॥ वाट पाहें जगज्जीवना । केव्हां येसी म्हणोनी ॥६८॥
मज कोठें नेसी । कोठें काय करविसी ॥ हें तूंच जाणसी । सर्वज्ञ देवा ॥६९॥
मी तों तुझेच आधीन । तुझेच वंदितों चरण ॥ हेंच माझें साधन । आणीक न कळोनि घडेना ॥१०७०॥
भरंवसा मोठा धरिला । सर्वसमर्थ सद्गुरु वरिला ॥ आतांच माझा मनोरथ पुरविला । पाहिजेच देवा ॥७१॥
आतां कासया श्रमविसी । कोठें कोठें हिंडविसी ॥ दयालो दुर्दशा काय करिसी । सर्व समर्थ असतांही ॥७२॥
मज कष्टी केलें । तेणें तुज सामर्थ्य अधिक आलें ॥ अधिक अंतर संतुष्ट जाहलें । ऐसें नव्हे ॥७३॥
तूं सामर्थ्यवंत अससी । स्वयंतृप्त प्रतापराशी ॥ टाळाटाळी काय करिसी । दयाळू असतांही ॥७४॥
कोणता किंतू आला । एवढा विलंब कां लाविला ॥ विलंबास हेतू दयाळा । कांहींच नाहीं ॥७५॥
देवा कलियुग आलें । म्हणोनी बहुतेकांचें सत्त्व गेलें ॥ तुझें सत्त्व कैसें नेलें । कलियुगें देवा ॥७६॥
पृथ्वी मंदफला झाली । मेघाची शक्ती गेली ॥ लोकांची बुद्धि नाशली । अधर्म वसे ॥७७॥
ब्राह्मणांचे धर्म बुडाले । स्त्रियांचें पातिव्रत्य गेलें ॥ वृक्षौषधींनीं सोडिलें । सत्त्व आपुलें ॥७८॥
तैसें काय तुज झालें । तुतें कैसें कलियुग भोंवलें ॥ तुझें सत्त्व कैसें गेलें । सदैकरूपाचें ॥७९॥
तूं अचल शक्ती आहेसी । सदां शरणागत रक्षिसी ॥ माझाच कैसा त्याग करिसी । शरआण्गतवत्सल तूं ॥१०८०॥
तुजवीण माझा कोणी । रक्षक नाहीं चक्रपाणी ॥ आतांच येईं धावोनी । नमन करितों सर्वज्ञा ॥८१॥
मी तुझाच अंकित आहें । ऐसें सर्वत्र प्रसिद्ध झालें पाहें ॥ माझी लज्जा सद्गुरुमाये । रक्षीं आतां सर्वज्ञा ॥८२॥
माझे अंगीं खोटायी । नको लावूं पडतों पायीं ॥ मी तुझाच शिष्य आहें पाहीं । दत्तात्रेया सद्गुरू ॥८३॥
आणिक जें कांहीं केलें । तें तुझेंच संबंधीं झालें ॥ लज्जा धरोनि शेवटा नेलें । पाहिजे सर्वज्ञा ॥८४॥
तुझा लौकिक ऐकोनि कानीं । शरण आलों चक्रपाणी ॥ त्रासूं नको तूं अभयदानी । प्रसिद्ध अससी दयाळा ॥८५॥
लोकीं दाते असती । याचकांतें दान देती ॥ उडी पडतां त्रास घेती । याचकांचा अंतरीं ॥८६॥
यांते दाते न म्हणावे । हे दांभिक स्वभावें ॥ जेथें समत्वाचे नांवें । शून्याकार ॥८७॥
मुख पाहूनि देती । येरा गाळीप्रदान करिती ॥ राग येतां पिटोनि लाविती । दीन जाणोनि ॥८८॥
हें दान नव्हे । हें छळण होये ॥ यानें बाधूं नये । दानब्रिद ॥८९॥
रघु हरिश्चंद्रादि नृपती । हेही दानशूर असती ॥ शरणागतातें रक्षिती । सर्व प्रकारें ॥१०९०॥
हे मानवी राजे असती । हेही शरणागताचा अभिमान धरिती ॥ ज्याची त्रैलोक्यांत ख्याती । प्रसिद्ध आहे ॥९१॥
तूं ब्रह्मांडाधीश अससी । मी अभयद ऐसें बोलसी ॥ मागें पुढें काय पहासी । सर्वज्ञ समर्थ असतांही ॥९२॥
शरणद ऐसें म्हणावें । बिरुदही बाळगावें ॥ शरणागतातें छळावें । विलंब लावोनी ॥९३॥
हें काय दयाळूपण । शरणागताचा घेसी प्राण ॥ ऐसें असतां ब्रीद भूषण । वागवावें कां व्यर्थ ॥९४॥
देवा ओघास येतें । म्हणोनि बोलावें लागतें ॥ रागास येसी तरी मातें । कोण रक्षी तुजवीण ॥९५॥
एवढी अवकृपा केली । समदर्शी असतां उदासी धरिली ॥ माझी दुर्दशा कां आरंभिली । सर्वज्ञ समर्थ दयालो ॥९६॥
आतां दयाळा कोठें जावें । कोठें काय अचरावें ॥ कैसें रहावें वागावें । सर्वज्ञ देवा ॥९७॥
मज कोठेंही राहवेना । कोठेंच नाहीं ठिकाणा ॥ तुजवांचोनि नारायणा । समाधान नाहीं ॥९८॥
माझी जैसी अवस्था झाली । सर्व तुतें कळों आली ॥ आतांच देवा सांभाळीं । तुझा आहें सर्वज्ञा ॥९९॥
माझी योजना काय केली । काय माझी वृत्ती योजिली ॥ धांव आतां उडी घालीं । दत्तात्रेया समर्था ॥११००॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP