करुणासागर - पदे ४०२ ते ४५०
नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.
श्रीगणेशाय नमः ॥
न करितां सायास । करित असतां नाना दोष ॥ अनंत ब्रह्मांडांचा अधीश । पाहीन म्हणतों आतांची ॥२॥
अनंत जन्में साधन करितां । नव्हे ज्याची प्रसन्नता ॥ त्यापासोनि म्हणतों आतां । अभयदान घेईन मी ॥३॥
मी दुर्दैव ठायींचा । कृतघ्न दोषी अपराधी साचा ॥ परी अंकीत झालों सद्गुरूचा । तेणें भरंवसा आहे मज ॥४॥
आलों सद्गुरूतें शरण । हात जोडोनि करितों नमन ॥ आतांच देईं अभयदान । व्हावें तैसें सद्गुरू ॥५॥
आतां नलगे साधन । अथवा कांहीं पुरश्चरण ॥ माझा स्वामी दावील चरण । दयाळुत्वें आतांची ॥६॥
माझे अपराध अनंत । क्षमा करील रमाकांत ॥ पापें जाळोनियां शांत । करील मातें सद्गुरू ॥७॥
मी अत्यंतचि दुर्दैव । स्वामि आतांचि करतील सुदैव ॥ अनंत कला सदैव । वागती अंगीं जयाचे ॥८॥
मज स्वामीचा भरंवसा आहे । उगाच बैसोनि वाट पाहें ॥ स्वामी सर्व जाणताहे । भार वाहे दासाचा ॥९॥
मज ऐसा दुर्भाग्य रंग । मागतों मी गुरूसीं भीक ॥ मनोरथ न पुरतां देख । ब्रीदें बुडती सद्गुरूचीं ॥४१०॥
मज ऐशा दुर्भाग्याचे । मनोरथ पुरवावया साचे ॥ सामर्थ्य आहे सद्गुरूचें । संशय नाहीं यदर्थीं ॥११॥
सर्व सामर्थ्य सर्व गुण । सद्गुरूचे अंगीं असती जाण ॥ ऐसेंच जाणोनि आलों शरण । सद्गुरू स्वामीतें ॥१२॥
गुरु क्षमावंत गंभीर । अति उदार दानशूर ॥ समदर्शी करुणासावर । पतीतपावन सर्वज्ञ ॥१३॥
ऐशा स्वामीतें शरण आलों । येऊनि आशाबद्ध झालों ॥ जरी पातकें आचरलों । स्वअपराधी ॥१४॥
तथापि शंका नाहीं अंतरीं । शरण आलों घेईल पदरीं ॥ स्वामी पतितातें तारी । म्हणोनियां ॥१५॥
विश्वास धरोनि आलों शरण । भावें वंदितों तुझे चरण ॥ आतांच येऊनि दर्शन । अभय देईं सद्गुरो ॥१६॥
देवें शरणागत त्यागिला । ऐसा नाहीं आयकिला ॥ मजविषयीं दयाळा । कठोर कैसा झालासी ॥१७॥
उर्ध्वबाहू हाकां मारी । कांसे लावूनि तारीं ॥ तुझिये दारींचा भिकारी । नको दवडूं माघारा ॥१८॥
आतां कोणती अवधी राहिली । जांचणूक फार झाली ॥ जाणत असतां वनमाळी । निर्वाण कैसें मांडिलें ॥१९॥
आतां भेट द्यावी पाहीं । दुसरा उपायची नाहीं ॥ प्राण जातो करूं काई । दीनबंधो सर्वज्ञा ॥४२०॥
तुझीं पाउलें देखिल्याविण । नव्हे माझें समाधान ॥ जरी देसी इंद्रभुवन । सर्व सिद्धि ॥२१॥
इन्द्रपदाचा भोग । तुजवीण गमे महारोग ॥ आतां आपले चरणाचा योग । घडवीं मज ॥२२॥
जरी स्वामी ऐसें म्हणती । जे ब्रह्मादिकां दुर्लभ असती ॥ ते चरण मंदमती । कैसा पाहूं इच्छिसी ॥२३॥
ऐसें म्हणाल जरी । गोष्ट आहे ऐसी खरी ॥ परंतु होऊनि भिकारी । भीक मागें स्वामीतें ॥२४॥
श्रीगुरूचें उदारपण । शीलसमता अनंत गुण ॥ वात्सल्य गांभीर्य सामर्थ्य पूर्ण । श्रवण केलें मी कर्णीं ॥२५॥
म्हणोनि नाना साधनें सायास । जपतपादी अभ्यास ॥ टाकोनि सारे सद्गुरूस । शरण आलों भिक्षार्थी ॥२६॥
भिक्षा मागतां पाहीं । कोणी विन्मुख दवडिला नाहीं ॥ ऐसें स्वामीचें दृडव्रतही । श्रवण केलें ॥२७॥
म्हणोनि भेटीची आशा धरिली । स्वामीतें अंजुळी पसरिली ॥ ॐ भवति भिक्षा घालीं । दर्शन देईं आतांची ॥२८॥
आतांच द्यावें दर्शन । व्हावें तैसें अभयदान ॥ देऊनि करीं समाधान । ऐसी भिक्षा मागतों ॥२९॥
जरी दैवहीन करंटा । अपराधी दोषी महा खोटा ॥ तथापि आलों दारवंटा । भिक्षार्थीं सर्वज्ञ स्वामीचे ॥४३०॥
समर्थाचे द्वारीं आलों । तुझा म्हणोनि पायों पडलों ॥ भिक्षा घालीं म्हणतां दयाळो । कैसा न देसी मज भिक्षा ॥३१॥
आतांच भिक्षा देणार नाहीं । ऐसी मातें शंकाच नाहीं ॥ म्हणोनि आशा धरिली पाहीं । दर्शनाची स्वामीच्या ॥३२॥
मी तों भाकिली करुणा । आतांच न दाविसी चरणा ॥ तरी होसील लाजिरवाणा । लोकीं ब्रीदें वागवितां ॥३३॥
मुनी म्हणतील हृषीकेशी । कासया ब्रीदें वागविशी ॥ क्षुद्र जाणोनि शरणागतासी । कैसा त्यागेल दयाळ ॥३४॥
ऐसा उपहास होईल पाहें । ब्रीदें जातां करसील काय ॥ म्हणोनि आतांच दावोनि पाय । अभय देईं मज देवा ॥३५॥
सर्वज्ञाचा विश्वास । समर्थ म्हणोनि धरिली कांस ॥ देवा न लावीं अवकाश । दर्शन देईं आतांची ॥३६॥
दैव माझें आडवें पडलें । म्हणोनि येणें तुझें न घडलें ॥ गगन कोसळोनि पडलें । देवा कैसें मजवरी ॥३७॥
कोणता प्रतिबंध झाला । वाटे येतां पडला घाला ॥ किंवा माझा त्यागचि केला । सर्व लज्जा टाकुनि ॥३८॥
ऐसें कैसें विपरीत झालें । पायीं पडतां लोटोनि दिलें ॥ शरणागतातें उपेक्षिलें । समर्थानें ॥३९॥
आतां कैसें वांचावें । वांचोनि दुःखचि भोगावें ॥ प्राणासी मुकावें । हेंचि बरें ॥४४०॥
स्वामीचा वियोग साहिना । सर्वज्ञ स्वामी ऐकेना ॥ मज कोठेंही राहवेना । नमन करितों सद्गुरूतें ॥४१॥
कालभयें शरण आलों । तुझे पाठीं रिघालों ॥ कैसा धरोनि देसी दयाळो । धनुर्धरा श्रीरामा ॥४२॥
कैसी लज्जा धरोनि देसी दयाळो । धनुर्धरा नमन करितां कापिसी । मान देवा दीनाची ॥४३॥
लोकीं दुष्टें गांजिलें । त्यातें तुम्हीं सोडविलें ॥ स्वयें तुम्हींच त्यागिलें । तरी कैसें करावें ॥४४॥
आतां कोणाचें करावें स्मरण । कोण करील समाधान ॥ देवा तूतेंच करितों नमन । रक्ष आतां दयाळा ॥४५॥
मातेनें बाळ परतें केलें । रागें जरी सोडिलें ॥ तथापि रुदन करूनि लोळे । मातेकरितां ॥४६॥
तेंवि माझें जीवन । दत्तात्रेया तुझे चरण ॥ माझा कळवळा दयाघन । येऊं देईं तुज आतां ॥४७॥
वेडावांकुडा अज्ञान । मूर्ख क्षुल्लक बुद्धिहीन ॥ कैसा - तरी तुझा जाण । अंत काय पाहसी ॥४८॥
तूं माय मी बाळ तान्हें । तुजवीण एकटें दैन्यवाणें ॥ सद्गुरू आतां धांवूनि येणें । विलंब देवा न लावीं ॥४९॥
हांका मारितों वारंवार । अंतरीं वाटे हुरहुर ॥ सद्गुरो माझा विसर । पडों न द्यावा ॥४५०॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP