मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
पदे १००१ ते १०५०

करुणासागर - पदे १००१ ते १०५०

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


जैसें लुब्धकाचें धन । का नपूंसकाचें यौवन ॥ जेवीं अजागलस्तन ॥ लोंबती व्यर्थ ॥१॥
तेंच सामर्थ्य तेच गुण । करावें शरणागताचें रक्षण ॥ तेच विद्या तेंचि घन । शरणागतातें दिजे ॥२॥
म्हणोनि आतांच नारायण । येऊनि देईं दर्शन ॥ अभय देऊनि मनोरथ पूर्ण । करी माझे समर्था ॥३॥
आतांचि मातें अभय द्यावें । नातरी बीरुद सोडावें ॥ मजपुढें येऊनि बोलावें । सामर्थ्य नसे मज कांहीं ॥४॥
स्वामी माझा झगडा याचा करावा निवाडा ॥ अभय द्या कीं ब्रीद सोडा । सर्व कांहीं आपलें ॥५॥
तूं ब्रह्मांडाचा ईश । तूंच अससी न्यायाधीश ॥ न्याय करीं तूं हृषीकेश । नीतिनिपुणा आतांचि ॥६॥
आजपर्यंत ब्रीदें वागविलीं । मिथ्या बढायी भोगिली ॥ याची ऊणखूण केली । पाहिजे आतां ॥७॥
निजबीरुदानें केशवा । भुजवूनि मज घातला गोवा ॥ याचाही जाब करावा । लागेल तूतें ॥८॥
तूं समर्थ त्रैलोक्यपति । सर्व तुतें अनुसरती ॥ तुझेसारिखे खुशामती । बोलती ते नायकें मी ॥९॥
सनकादिक योगेश्वर । शुक नारदादि मुनीश्वर ॥ देवा यांच्या समोर । न्याय माझा करावा ॥१०१०॥
हे सत्यशील समदर्शी । तूं यांच्या आधीन अससी ॥ यांचे देखत तुझी मोडसी । जिरवीन मी ॥११॥
धरणें घेतलें तुझे दारीं । आतांच माझा न्याय करीं ॥ कैसा ओढोनि टाकिसी दुरी । दत्तात्रेया अभिज्ञा ॥१२॥
मनुष्यासारिखा कांहीं । तुझे दरवारीं आंधेर नाहीं ॥ म्हणोनि आतांचि तोडीं पाहीं । झगडा माझा सर्वज्ञा ॥१४॥
देवा छळणें फार झालें । सर्व तूंतें निवेदन केलें ॥ इतक्यावरी जरि मज काढून दिल्हें । तरि तुझा दुर्लौकिक ॥१५॥
अपराध करोनि शरण आला । म्हणोनि देवें काढोनि दिला ॥ दत्तदेवा तुझे ब्रीदाला । लागेल कीळें ॥१६॥
लोकपाळांचे वकील । तुझे दर बारीं सर्वकाळ ॥ झाला वृत्तांत सकळ । नित्य लिहिती लोकीं ॥१७॥
तुझे दरबारीं जें होतें । तें त्रैलोक्यांत कळतें ॥ काढूणि देसी जरी मातें । हेंही प्रसिद्ध होईल ॥१८॥
शरणागताचा त्याग केला । देव काय वेडा झाला ॥ दयाभाव कोठें गेला । गूण पौरुष देवाचें ॥१९॥
देवें अनुचित केलें । जें शरणागतातें त्यागिलें ॥ ब्रह्मांडपतीचें कोठें गेलें । ज्ञानबळ ॥१०२०॥
शरणागताचा अंगिकार करिता । व्हावें तैसें अभय देता ॥ काय समर्थाचा उणा होता । भांडार लौकिक ॥२१॥
शरणागताची उपेक्षा केली । एथें देवाची बुद्धि गेली ॥ ऐसी अवाच्यवादांची पुष्पांजली । वाहतील तुज ॥२२॥
हजार अपराध आचरलों । परी तुझे पायीं येऊनि पडलों ॥ एवढा दुराग्रह दयालो । कासया धरिसी सर्वज्ञा ॥२३॥
तूं सर्वज्ञाचा राजा । आतां समाचार घेईं माझा ॥ मी कैसा तरी आहें तुझा । समर्था दयाळा ॥२४॥
माझी बिशाद कायसी । मजवरी शस्त्र कां धरिसी ॥ एवढा कोप कां करिसी । शरणागतवत्सल तूं ॥२५॥
मी तुझे पायींची वहाण । तुझे हातीं माझें जीवन ॥ मी तुझेच आधीन । रुजूं आहें ॥२६॥
जय श्री मुनीमानसविलासी । तुज शरण आलों समर्थासी ॥ माझी दुर्दशा देशीं विदेशीं । सर्वज्ञ दयाळा न करावी ॥२७॥
तुतें निवेदिलें जें जें । त्याचें स्मरण कीजे ॥ आतां येऊनि अभय दीजे । सद्गुरुस्वामी ॥२८॥
करिसील रात्रीचा दिवस । महारवाड्या कैलास ॥ कावळ्याचा राजहंस । अर्ध निमिषें करशील तूं ॥२९॥
गर्धभीची कामधेनू । खद्योताचाच करिसी भानू ॥ जंबुकाचाच पंचाननू । अर्ध निमिषें करिशील तूं ॥१०३०॥
एरंडाचा कल्पतरु करिसी । अस्वलीची उर्वसी ॥ जन्मांधातें दाखविसी । दिव्य नेत्रें निधान ॥३१॥
ऐसी तुझी अघटित करणी । प्रगट सत्ता त्रिभुवनीं ॥ नमन करितों तुझे चरणीं  । धांव आतां सर्वज्ञा ॥३२॥
नाहीं राहिला अवकाश । नको पाहूं गुणदोष ॥ सर्वज्ञ समर्था माझी आस । आतांचि येऊनि पुरवी तूं ॥३३॥
प्राण जाई तंववरी अंत । काय पहासी दयावंत ॥ पाव आतां वाटे खंत । फार तुझी सद्गुरू ॥३४॥
बाळकातें कोणी गांजिलें । तरी माउलीपासीं रडत गेलें ॥ मातेनें जरी त्यागिलें । बापासि सांगे ॥३५॥
उभयतांनीं घेतला त्रास । तरी रक्षी धराधीश ॥ तोही करूं पाहे नाश । मग देवास वाहे ॥३६॥
देवानेंही उपेक्षितां । मग कोठें जावें अनंता ॥ तुजवीण दुसरा त्राता । कोण आहे दीनाचा ॥३७॥
तैसा तैसा मी सर्वत्र भागलों । तुझेच पायीं येऊनि पडलों ॥ आतां कैसा दयालो । त्यागिसी देवा ॥३८॥
आतां कोठें जाऊं फिर्याद । कोठें लागेल माझी दाद ॥ द्रवावें आतां ब्रह्मानंद । सद्गुरुस्वामी ॥३९॥
तूं म्हणशील काय झालें । तरी तुज सर्वही समजलें ॥ आतां माझें समाधान केलें । पाहिजे देवा ॥१०४०॥
मज रोग झाला दारुण । हा तूंच जाणसी नारायण ॥ याचें आहे जें निदान । भवरोगवैद्या जाणसी तूं ॥४१॥
नाना मात्रा रसायण । तुजपासींच असती पूर्ण ॥ धन्वंतरीचा गुरू जाण । तूंचि अससी ॥४२॥
माझे रोगाचें औषध । तुजपासींच आहे सिद्ध ॥ तूंच जाणसी ब्रह्मानंद । ठावें नाहीं इतरातें ॥४३॥
चांगला दिसतो वरीवरी । कुठोनि चाळणी झाली अंतरीं ॥ अखंड चाले सुरी कातरी । जाणसी तूं सर्वज्ञा ॥४४॥
याचा उपाय तुजपासीं । तूंच एक जाणतोसी ॥ सर्वथा न कळे दुसर्‍यासी । सर्वज्ञ देवा ॥४५॥
माझें समाधान कांहीं । दुसरे वस्तू होणार नाहीं ॥ तूंचि समाधान करिसी पाहीं । परब्रह्म सद्गुरो ॥४६॥
दत्तात्रेया तुझी आण । तूंच समाधान करिसी जाण ॥ जाणूनि माझी अंतरखूण । शांत करिसी तूंच मज ॥४७॥
माझा उपाय कांहींच नाहीं । मी तों पडतों तुझे पायीं ॥ दत्तात्रेया माझे आई । धांव आतां सर्वज्ञा ॥४८॥
समर्थ असतां उपेक्षा करिसी । सर्वज्ञ असतां नायकसी ॥ समदर्शी असतां गुणदोष पाहसी । हें उचित नाहीं दयाळा ॥४९॥
आतां कांहींच अवधी नाहीं । धांव आतां पडतों पायीं ॥ आतांच मातें पदरीं घेईं । दत्तात्रेया सद्गुरो ॥१०५०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP