करुणासागर - पदे ८७३ ते ९००
नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.
श्रीगणेशाय नमः ॥
आधीं पोळवावें । मग उपचार करावें । हें कैसें म्हणावें बरवें । दयाळूपण ॥७३॥
धांव घालायाची हीच वेळा । न करीं आतां कंटाळा ॥ सर्वज्ञ समर्था कळवळा । येऊं देईं आतांचि ॥७४॥
तुझिये दयाळूपणाचा भरंवसा आहे मज साचा ॥ ऐकोनी दीनवाचा । धांव घालीं सद्गुरो ॥७५॥
तुझे द्वारीं उत्तम पुरुषा । शरण आलों मथुराधीशा ॥ आतां कोठें लावण्यवेशा । पिटोनि देसी सर्वज्ञा ॥७६॥
लोकांचीं लेकुरें मूर्ख असती । त्यांचा ते समाचार घेती ॥ आपुल्या बाळातें गौरविती । विश्वजन ॥७७॥
मी तुझें दीन बाळक । माझा मायबाप तूं जगज्जनक ॥ आतां निरसीं माझें दुःख । सर्वज्ञ समर्था दयाळा ॥७८॥
अनादि देवा सद्गुरुराया । परब्रह्म दत्तात्रेया ॥ तुजचि आहे माझी माया प्रणतवत्सला उदारा ॥७९॥
धन्य मानवी माउली । बाळकांतें कुरवाळी ॥ भूक लागतां जेऊं घाली । कळवळोनी ॥८८०॥
मातेच्या कळवळ्यापरिस । तुझा अनंतगुणें विशेष ॥ मी बाळ तुझें जगदीश । सांभाळीं समर्था ॥८१॥
नको लावूं काळवेळा । आतां यावा कळवळा ॥ दत्तात्रेया अत्यंत कोमळा । आतांच येईं ॥८२॥
काय करूं राहवेना । म्हणोनि तरंग उठती नाना ॥ नको पाहूं कल्पना । दयापूर्णा धांव रे ॥८३॥
येथें येथें आतां येच समयीं । भेट देईअभय देईं ॥ दत्तात्रेया तुझे पायीं । ठेविला माथा सर्वज्ञा ॥८४॥
आतां माझें सामान्यपण । तुच्छपण पोरपण मलीनपण ॥ सर्व कांहीं हीनपण । नको पाहूं समदर्शी ॥८५॥
मी निंद्यपथाचा ओहळ । तूं ब्रह्मगंगा केवळ ॥ अंगसंगें निर्मळ । क्षणांत करिसी मज हरे ॥८६॥
आतां कांहीं मागें पुढें । नको पाहूं मी पायां पडें ॥ सद्गुरु माये घेईं कडे । दत्तात्रेया सर्वज्ञा ॥८७॥
समर्था तूं कृपा करिसी । मग पूर्वस्थिती राहेल कैसी ॥ आतां मजला विदेशीं । लोटूं नको दयाळा ॥८८॥
तुझें हातीं सर्व आहे । मी तुझाचि असें मजकडे पाहें ॥ मी दुर्बळ मातें न साहे । वियोग तुझा ॥८९॥
देवा जें काय झालें । सर्व तूतें कळलें ॥ सर्व कांहीं शेवटा नेलें । पाहिजे समर्था ॥८९०॥
तुझा आहे म्हणोनी । येऊनि पडलों तुझे चरणीं ॥ दत्तात्रेया दासाभिमानी । अभिमान माझा धरावा ॥९१॥
तुज आपले मनोरथा परिस । भक्तमनोरथ प्रिय विशेष ॥ शरणागताचा परम तोष । संतोष तुझा होतसे ॥९२॥
तूं भक्त - कौतुकी आहेसी । भक्ता संगे राहसी ॥ भक्त संगें क्रीडसी । भक्तास व्हावा तैसा तूं ॥९३॥
भक्ताचे मनोरथ । तोचि तुझा निजस्वार्थ ॥ निज भक्तकार्यार्थ । सदा उद्यत अससी तूं ॥९४॥
भक्ताचा जो व्यवहार । तोचि तुझा संसार ॥ निजभक्ताचा कदापी विसर । न पडे तुज ॥९५॥
भक्तासन्निध अससी । मागें पुढें वागसी ॥ उष्ण लागतां छाया करिसी । पितांबराची ॥९६॥
भक्तास लागतां तहान । तात्काळ होसी जीवन ॥ क्षुधा लागतां दिव्यान्न । होसी स्वयें ॥९७॥
भक्तासि होतां शीण । आड घालिसी सुदर्शन ॥ करिसी भक्ताचें समाधान । निजांगें तूं ॥९८॥
भक्त तुझे कुटुंब असे । भक्त तुझा आत्मा असे ॥ तुझे अंतरीं चिंता वसे । भक्ताकार्याची ॥९९॥
भक्त तुझा इष्टमित्र । भक्त तुझें कुळगोत्र ॥ भक्त तुझें पुत्रकलत्र । सर्व कांहीं ॥९००॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP