मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
पदे १४५१ ते १५००

करुणासागर - पदे १४५१ ते १५००

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


ऋणी केल्यावांचोनि कांहीं । क्षुद्र दैवत पावत नाहीं ॥ म्हणोनि देवता सर्वही । स्वार्थी असती ॥५१॥
जैसें सेवकाचे प्रारब्धीं असतें । तेंच दैवतही देतें ॥ नसल्या स्वप्नीं सांगतें । दैवीं नाहीं म्हणोनि ॥५२॥
म्हणे तुझे दैवीं नाहें । वेगें आतां परतोनि जाईं ॥ पुढिले जन्मीं घेईं । इच्छित आपलें सेवाफळ ॥५३॥
धरोनि देवत्वाचा अभिमान । सेवक कुश्चळ म्हणोन ॥ त्यातें देतां दर्शन । शंका करी ॥५४॥
कांहीं चूक पडली जरी । तात्काळची क्षोभ करी ॥ ऐसीं दैवतें लोकांतरीं । अनेक असती ॥५५॥
कांहीं संबंधी पाहावा । त्याचा अंगिकार करावा ॥ त्याचा मनोरथ पुरवावा । सेवाऋण घेवोनी ॥५६॥
ऋणावांचोनि देइना । भाव कांहीं ओळखेना ॥ ऐसे स्वार्थी देव नाना । अभय देती अतिलघु ॥५७॥
तूं तैसा नससी । हेतूवांचोनि प्रीति करिसी ॥ तुझी प्रीति शरणागतासी । कदा काळीं विटेना ॥५८॥
तुज सेवेची अपेक्षा नाहीं । स्वयंतृप्त अससी पाहीं ॥ ऋण अथवा संबंध कांहीं । तुतें नलगे सर्वज्ञा ॥५९॥
सोज्वळ अथवा कुश्चळ कोणी । शरण येतां चक्रपाणी ॥ तुतें समसमान दोन्ही । प्रियची अससी समदर्शी ॥१४६०॥
तुज कंटाळ नाहीं । शरण येतां ठेविसी पायीं ॥ कुब्जा शबरी वानर हेही । अंगें अंगिकारिले ॥६१॥
अत्यंत अमंगळ असला । जरी तुतें शरण आला ॥ दर्शन देतां कंटाळा । तुतें नाहीं भावज्ञा ॥६२॥
तुझे अंगीं अनंत गुण । न लागतां अर्धक्षण ॥ करिसी आपल्या समान । अमंगळ तें समर्था ॥६३॥
येरवीं तुझ्या योग्य सोज्वळ ऐसा । कोणी नाहीं जगदीशा ॥ म्हणोनि क्षुद्रासही भरंवसा । तुझाच आहे ॥६४॥
मी अत्यंत अमंगळ असें । माझे सारिखा पातकी नसे ॥ परी सद्गुरूतें सह्रण असें । काया वाचा मनेंसी ॥६५॥
मी कुश्चळ पातकाची खाण । तथापि आतांच देसी दर्शन ॥ तुझा आहें तुतेंच शरण म्हणोनि देवा सर्वज्ञा ॥६६॥
तूं जरी कृपा करिसी । क्षुद्र स्थिति राहील कैसी ॥ क्षुद्र जळ मी पापराशी । शुद्ध करीं तूं गुरुगंगे ॥६७॥
माझें कांहीं असावें । तें मी तुतें द्यावें ॥ मग देवें ही व्हावें । ऋणी माझें ॥६८॥
माझें कांहींच नाहीं । देवा तुतें देऊं काई ॥ नामरूप सर्वही । तुझेंच असे ॥६९॥
सेवा करोनि रिझवावें । हेंही कैसें म्हणावें ॥ माझें कांहीं असावें । तेणें सेवा करावी ॥१४७०॥
पंच भूतांचा देह । भूतें तुझीच निःसंदेह ॥ देवता प्राण इंद्रिय समूह । तोही तुझाच सर्वज्ञा ॥७१॥
चित्तचतुष्ट्य अंतःकरण । तीनी शक्ती तीनी गुण ॥ हेही तुझेच असती जाण । पंचविस या समवेत ॥७२॥
मीही तुझाच अंश असें । तुझे वेगळा मीही नसें ॥ तुझेच सामर्थ्यैं होतसे । सर्व कांहीं सदसत् ॥७३॥
माझे स्वसत्तात्मक कांहें । सेवेयोग्य सर्वथा नाहीं ॥ ज्याची वस्तू त्याचेंच पाहीं । असे सत्य ॥७४॥
ज्याची वस्तू त्यास द्यावी । त्याची मर्जी संपादावी ॥ ऐसी कैसी म्हणावी । योग्य सेवा ॥७५॥
त्याचेच हातें । त्याचें चंदन लाविलें त्यातें ॥ देवा ऐशा सेवनातें । सेवा कैसी म्हणावी ॥७६॥
तुझा सारा इंद्रियगण । तुझे सारे द्रव्यगुण ॥ तुझे सत्तें तुझें सेवन । काय केलें यांत मी ॥७७॥
म्हणोनि मी कांहीं करावी सेवा । हेंही सर्वथा दुर्घट देवा ॥ सेवा करोनि रिझवावा । सर्वज्ञ कैसा ॥७८॥
म्हणोनि उगा बैसलों आहें । भरंवसा धरोनि वाट पाहें ॥ येईं आतां सद्गुरू माये । तुझाच आहें सर्वथा ॥७९॥
देवा पुरता विचार करिसी । तरी माझा ऋणी अससी ॥ माझ्या ऋणाचे व्याजांत जासी । वैकुंठ लक्ष्मी समवेत ॥१४८०॥
देवा सत्य सांग मातें । तुज स्वामित्व तरी कोठें होतें ॥ मीच दिधली तुतें । स्वामित्व पदवी ॥८१॥
मीच शिष्यत्व केलें । मीच तुतें गुरुत्व दिल्हें ॥ तुझे प्रत्ययास आलें । प्रमाण वचन ॥८२॥
गुरुत्वाचे मोलास कांहीं । दुसरी वस्तूच नाहीं ॥ माझा ऋणीच अससी पाहीं । जन्मवरी ॥८३॥
यास बहुत साक्षी असती । वेद शास्त्रें ग्वाही देती ॥ माझा ऋणी श्रीपती । असे सत्य ॥८४॥
म्हणोनि आतां श्रीहरी । येईं माझा हिशेब करीं ॥ व्याजांत मातें अंगिकारीं । व्हावें तैसें सर्वज्ञा ॥८५॥
माझें ऋणही फिटेना । तुझा संगही सुटेना ॥ तेणें करीन बंदिखाना । हृदयदरींचा ॥८६॥
ऐक आतां ब्रह्मानंद । यद्यपि तूं निर्द्वद्व ॥ तथापि तुझा संबंध । अनादि असे ॥८७॥
त्वत्संबंधीं जगत् आहे । मीच एकला कैसा नोहे ॥ दत्तात्रेया सर्वथा पाहें । त्वत्संबंधीं आहें मी ॥८८॥
गार जलसंबंधीं असे । बुडबुडा जलसंबंधीं विलसे ॥ तरंगचि कैसा नसे । जलसंबंधीं सर्वज्ञा ॥८९॥
मृत्तिकेसंबंधीं घट । तंतूसंबंधीं पट ॥ हेमसंबंधीं नग चोकट । असे जेवीं ॥१४९०॥
तेवीं तुझे संबंधीं । मीही आहें अनादि ॥ ऐसें जाणोनि इष्ट सिद्धी । करीं माझी सर्वज्ञा ॥९१॥
त्झी माझी नीति । सर्वज्ञ देवा अनेक असती ॥ तुतें आहे माहिती । सांगूं काय ॥९२॥
तुझा पुत्र तो बंधु माझा । माझे पुत्राचा तूं आजा ॥ माझा काका तो सहोदर तुझा । जाणसी तूं ॥९३॥
तुझी स्त्री माझी आई । ऐसें आसतां सांगूं काई ॥ पाहिजे तें शोधूनि पाहीं । आवडे तें सिद्ध असे ॥९४॥
सर्व प्रकारें तुझा असें । आतां दयाळा दाखवीं पाये ॥ सर्वज्ञ देवा करूं काये । न सुचे कांहीं न घडे मज ॥९५॥
याच वेळे मुहूर्त आहे । येईं आतां मजकडे पाहे ॥ वियोग आतां न साहे । आण तुझी सर्वज्ञा ॥९६॥
जाणसी माझें अंतर । आतां नको लाऊं उशीर ॥ येऊनि माझा समाचार । आतांच घेईं समर्था ॥९७॥
देवा विपरीत दशा झाली । तुतें सारी कळों आली ॥ म्हणोनि आतांछ उडी घालीं । सर्वज्ञ देव ॥९८॥
विनंति जे करायाची । सर्व तुतें केली साची ॥ खूण माझे अंतरीची ॥ ठाउकी तुज ॥९९॥
जैसी माझी मती होती । तैसी केली विनंती ॥ जी काय असेल तुझी युक्ती । तीच खरी ॥१५००॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP