मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
पदे १५०१ ते १५५०

करुणासागर - पदे १५०१ ते १५५०

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


माझें क्षुद्र शहाणपण । देवा तुझे अनंत गुण ॥ तेथें सहजचि लाजिरवाण । बोलणें माझें सर्वज्ञा ॥१॥
मी सर्व कांहीं निवेदिलें । शहाणपणही खर्चिलें ॥ परी तुझे मनास आलें । पाहिजे देवा ॥२॥
बा जिन्नस योग्य असतां । समर्थानें त्रास घेतां ॥ कोण त्याची मान्यता । न करी मग ॥३॥
प्रबल सत्ता समर्थाची । करील तीच होईल प्राची ॥ तेथें युक्ती दीनाची । काय चाले ॥४॥
करिशील शरणागताचा नाश । कोण ठेवील तुतें दोष ॥ समर्थातें दूषण विशेष । भूषण होय ॥५॥
मज अत्यंत छळिलें । शरण येतां उपेक्षिलें ॥ कोण तुतें बोल्बोले । ऐसें न करीं म्हणोनि ॥६॥
अनंत गुण तुझेपासीं । सर्व सत्तावंत होसी ॥ बरें वाईट काय करिसी । सर्व साजे तुज देवा ॥७॥
तूं समर्थ गोसावी । कोण तुतें शब्द ठेवी ॥ परंतु आतां करुणा यावी । दत्तात्रेया सद्गुरो ॥८॥
नमन करितों याची लाज । आतांच देवा रक्षीं मज ॥ समर्था तुतें आहे सहज । रक्षण माझें सर्वज्ञा ॥९॥
प्रसिद्ध व्हावयाचें तें झालें । बहुतेकांस कळों आलें ॥ दत्तात्रेयाची पाउलें । पाहीन म्हणतों ॥१५१०॥
आतां माझे सारिखे क्षुद्राचा । अंगिकार केला साचा ॥ दर्शन देतां स्वामीचा । लौकिक कांहीं जाईना ॥११॥
करूं नये ती चावटी । देवा केली हाटोहाटी ॥ तथापि देवा कृपादृष्टी । लौकिक कांहीं जाईना ॥१२॥
देवा तुतें कांहीं । सर्वथा अशक्य नाहीं ॥ सद्गुरुराया आतां येईं । दर्शन देईं पायाचें ॥१३॥
तुझें भजन करावें । लोक भजनीं लावावे ॥ तुझें भजनीं असावें । चित्त माझें ॥१४॥
म्हणोनि खरें खोटें बोलिलों । बरें वाईट आचरलों ॥ रागास येऊनि दयालो । नको त्यागूं भावज्ञा ॥१५॥
जें न होणें तें झालें । बोलायाचें बोलिलें ॥ आतां सर्व शेवटा नेलें । पाहिजे तुतें ॥१६॥
प्रसंग येतां मागुतें । तेंच बोलणें घडतें ॥ सर्व कांहीं घडोनि येतें । शुभ अशुभ कर्म ॥१७॥
बोलिल्या केल्याची सिद्धी । पाहिजे तैसी कृपानिधी ॥ करीं मातें दर्शन आदीं । देईं आतां सर्वज्ञा ॥१८॥
आतां याचा राग न यावा । पडला प्रसंग शेवटा न्यावा ॥ मजकडूनि तों अपराध व्हावा । घडला घडतो मागुती ॥१९॥
मी तों सर्व सेवाच करितों । तुतें कांहीं अपराध गमतो ॥ क्षमा करीं तूं नमन करितों । क्षमावंता सर्वज्ञा ॥१५२०॥
घडायाचें तें नारायणा । घडलें तें तों पालटेना ॥ आतां प्रस्तुत योजना । करणें तुतें सद्गुरो ॥२१॥
मर्जीस येईल तें योजावें । तैसेंच मातें सांगावें ॥ व्हावें तैसें वागावें । मातें दर्शन देवोनी ॥२२॥
अपराध केले दारुण । नित्य करितों नारायण ॥ आहें तुतें अनन्य शरण । आतां कैसा त्यागिसी ॥२३॥
आहे तैसा तुझा आहें । धांव आतां दावीं पाये ॥ दत्तात्रेया वंदिताहें । पाय तुझे सर्वज्ञा ॥२४॥
आतां पाहसी काय । माझा कांहींच नाहीं उपाय ॥ सद्गुरुराया दाखवीं पाय । सर्वज्ञ राजा ॥२५॥
देवा माझी सामान्यता । नको पाहूं अमंगळता ॥ करीं माझा प्रतिपाळ आतां । सर्वज्ञ समर्था समदर्शी ॥२६॥
धेनू करितां वासरूं । कष्टी होतें न धरी धीरु ॥ तैसें झालें काय करूं । जाणसी तूं सर्वज्ञा ॥२७॥
दयाळा तूं धांव घालीं । पद्मकरें तूं कुरवाळीं ॥ तुझें बाळ मी वनमाळी । जगज्जनका समर्था ॥२८॥
त्रैलोक्य वाटे शून्याकार । दुःख रजनी झाली घोर ॥ थरथरां कांपे अंतर । जाणसी तूं ॥२९॥
नाना विकल्प चोर । प्राणघातक चौफेर ॥ वागती आतां विचार । न सुचे मज ॥१५३०॥
भवारण्यांत येऊनि पडलों । ऐसें असतां वाट भुललों ॥ संतसंगा अंतरलों । चोरसंगें ॥३१॥
चिंतावणवा लागला । विरहवन्ही धडकला ॥ हृदयाकाशीं कोंदला । अज्ञानधूम ॥३२॥
कल्पनेची झाडी । भयव्याघ्र आरोळी फोडी ॥ पातकभिल्लाची धाडी । येऊनि पडली ॥३३॥
काळव्याळ गिळूं आला । सन्मार्ग दिसेनासा झाला ॥ सत्त्व चंद्र अरुता गेला । प्रकाश नाहीं ॥३४॥
मदमतंग अनर्गळ । मारूं आला अत्यंत प्रबळ ॥ कामदैत्य आकाश पाताळ । व्यापोनि आला गिळाया ॥३५॥
नाना अविचारअस्वलें । देश कंटकवृक आले ॥ येऊनि आडवे पडले । मनोरथांचे पर्वत ॥३६॥
तृष्णामेघ वळोनि आला । प्रारब्धपवन प्रचंड सुटला ॥ शरीर ब्रह्मांड गोळा । कांपवितो ॥३७॥
आशानदीतें पूर आला । मोहग्राह सरसावला ॥ ममतापंकीं निमग्न झाला । दास तुझा दयाळा ॥३८॥
नाना विषयांचे कंटक । अंग छेदिती देख ॥ ऐसिया अरण्यीं एकला एक । कष्टी होतो सर्वज्ञा ॥३९॥
आतां लक्ष्मीनायका । सकळ दुःख संहारका ॥ मार्गदर्शका प्रतापअर्का । उदया येईं सद्गुरो ॥१५४०॥
सर्वज्ञ देवा ऐशा वेळीं । न करीं आतां टाळाटाळी ॥ जरी नाहीं माझे कपाळीं । तुझा आहें समर्था ॥४१॥
आतांच दयाळा घालीं उडी । मज दुःखापासोनि काढीं ॥ करीं आतां तांतडी । सर्वज्ञ समर्था ॥४२॥
नको पाहूं माझी करणी । शरण आहें तुझे चरणीं ॥ आतांच दयाळा येवोनि । रक्षीं मातें समर्था ॥४३॥
आतां कोणते दिशेकडे जाऊं । कोठें जाऊनि कैसा राहूं ॥ कोणत्या प्रकारें पाहूं । पाय तुझे ॥४४॥
देवा राहतां अथवा जातां । मरतां किंवा वाचतां ॥ तुजवांचोनि रमाकांता । गत नाहीं सर्वज्ञा ॥४५॥
आतां निष्ठुरता सोडीं । मज वियोगदुःखापासोनि काढीं ॥ देवा माझे घालीं तोंडीं । विज्ञानकवळ ॥४६॥
दत्तात्रेया लक्ष्मीवरा । अतिथी आलों तुझे द्वारा ॥ आतां मातें माघारा । नको दवडूं समर्था ॥४७॥
पळ पळ पाहें तुझी वाट । आतां न मानीं माझा वीट ॥ यद्यपि मी अत्यंत शटः । तुझा आहें कैसा तरी ॥४८॥
कोठें वेदस्तवन सखोल । कोठें माझे बाळबोल ॥ कैसी तुतें कळवळ । येईल माझी ॥४९॥
माझें सामर्थ्य होतें । आळविलें तैसें तुझिये सत्तें ॥ आतां माझीं सर्वज्ञातें । करुणा यावी ॥१५५०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP