मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
पदे १२०१ ते १२५०

करुणासागर - पदे १२०१ ते १२५०

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


प्राण दिल्यानें जात नाहीं । हा सिद्धांत पाहीं ॥ येथें उपाय कांहीं । नाहीं कोणाचा ॥१॥
कोणी प्राण द्यावा । दिला असतां मग जावा ॥ ऐसी सत्ता केशवा । नाहीं जनाची ॥२॥
जेव्हां आयुष्यास येईल अंत । तेव्हांच होईल देहपात ॥ परंतु लोकीं निमित्यें । नाना असती ॥३॥
मी निग्रह करावा कांहीं । हें माझें सामर्थ्य नाहीं ॥ निमित्त धणी मात्र पाहीं । होशील तूं ॥४॥
जरी मी कांहीं केलें । तरी माझें काय चाले ॥ देवा तुझे चित्तास आलें । तेंच खरें ॥५॥
मी करावें कांहीं । देवा माझा कातू नाहीं ॥ दुःखचि भोगिलें देहीं । करितां करितां ॥६॥
आतां मी काहीं करावें । अथवा कोठें मरावें ॥ अथवा कोठें वांचावें । हें कांहींच घडेना मजवस्तू ॥७॥
भांबावल्याची अवस्था झाली । न कळे कोणती दशा आली ॥ काय करूं वनमाळी । हेंही सुचेना ॥८॥
ऐसी अवस्था झाली । तुज कळों आली ॥ धांव आतां सांभाळीं । प्रणतवत्सला सर्वज्ञा ॥९॥
जें आहे तें ऐसें आहे । धांव आतां पाहसी काये ॥ समर्था तुझे वंदितों पाये । दत्तात्रेया सद्गुरू ॥१२१०॥
फार झाली हळहळ । देवा झालों विकळ ॥ आतांच येऊं दे कळवळ । मायबापा सद्गुरो ॥११॥
जरी तडफडीत राहिलों । भलत्या निमित्यें मेलों ॥ तरी तुझे सेवेसी अंतरलों । आतांच व्हावें तैसा मी ॥१२॥
सर्व कांहीं जाणसी अंत कैसा पाहसी ॥ धांव सद्गुरो हृषीकेशी । उडी घालीं समर्था ॥१३॥
माझेपुरते अन्नास कांहीं । तुझे घरीं उणें नाहीं ॥ नाना प्रकारें दुर्दशा काई । करिसी माझी श्रीवरा ॥१४॥
जगास अन्नवस्त्र देसी । माझेकरितां उदास होसी ॥ सर्वदा समदर्शी । काय झालें मजविषयीं ॥१५॥
ब्रह्मांडाचा वाहसी भार । माझाच काय झाला फार ॥ दयाळू असतां दुर्विचार । काय करिसी सर्वज्ञा ॥१६॥
तशांत तुतें शरण आहें । तुझीं पाउलें वंदिताहें ॥ आणीक तुझी वाट पाहें । केव्हां येसी म्हणोनी ॥१७॥
तुझाच आहें देवाधिदेवा । माझा त्याग न करीं केशवा ॥ जाणसी माझे अंतरभावा । सर्वज्ञपणें ॥१८॥
आपले उदरीं हृषीकेशी । अनंत ब्रह्मांडें सांठविसी ॥ मातें कैसा काढोनि देसी । जगा नाहीं म्हणोनी ॥१९॥
शरण आलों काय छळिसी । तुझा आहें कां मारिसी ॥ समर्थ आहेसी उपेक्षा करिसी । सर्वज्ञ देवा हें काय ॥१२२०॥
देवा आपला जाणोनी । आतांच येईं धांवोनी ॥ सांभाळ माझा चक्रपाणी । अंगें करीं तूं दयाळा ॥२१॥
जैसी माझी मती । तैसी करितों विनंती ॥ विशेष बुद्धी कमळापती । कोठोनि आणूं ॥२२॥
तुझा अंतरीं प्रवेश असे । म्हणोनि हेही स्फूर्ती प्रकाशे ॥ सर्व तुझेंचि सामर्थ्य असे । सत्तारूपा समर्था ॥२३॥
आतां काय करूं मी दयाळा । तुतें कैसा येईल कळवळा ॥ आतां कोणती काळवेळा । पाहसी तूं ॥२४॥
सर्वांचा सुहृद अससी । निर्दय कैसा झालासी ॥ शरणागताचें पाहसी । दुःख कैसें समर्था ॥२५॥
काय हृदय फोडोनि दाखवावें । किंवा मस्तक तोडूनि वहावें ॥ कितीक तरी रडावें । तुझेपुढें ॥२६॥
तुझें दयाळूपण काय जळालें । समर्थपण काय बुडालें ॥ सर्वज्ञपण काय सामावलें । पाताळांत ॥२७॥
लज्जा कैसी सोडिली । शरणागताची छळणा मांडिली ॥ कोणें तुझी हिरोनि नेली । समशीलता ॥२८॥
काय तुझ्या मनांत आहे । कळों दे तेंही पडतों पाये ॥ घोळ घोळोनि मारिसी काये । दत्तात्रेया सर्वज्ञा ॥२९॥
जरी तुज घेणें प्राण । तरी एकदांच चक्र हाण ॥ आपले जीवींची तहान । शांत करीं ॥१२३०॥
मज छळछळोनि मारिलें । रानोरान रडविलें ॥ यांत तुझे हातां आलें । काय तत्त्व ॥३१॥
एवढा निष्ठुर नको होऊं । नको छळूनि प्राण घेऊं ॥ माझी करणी नको पाहूं । शरण आलों म्हणोनि ॥३२॥
माझा प्राण तुझाच आहे । त्यातें छळूनि घेसी काये ॥ घेणें असल्याच पाहें । एकदांचि घेईं ॥३३॥
देवा छळणेचि सीमा झाली । आतां दयाळा धांव घालीं ॥ अवधी नाहीं राहिली । सद्गुरुराया ॥३४॥
प्राण जावा तंववरी अंत । काय पाहसी दयावंत ॥ कोणें ऐसें संमत । दिधलें तुज ॥३५॥
माझें कांहीं बरें वाईट । कोणी सांगितलें असेल स्पष्ट ॥ आयकोनि माझा वीट । येऊं न देईं ॥३६॥
कोणी माझा हितकारी । लोकीं नाहीं नरकेसरी ॥ म्हणोनि बरें वाईट चित्तावरी । नको घेऊं सर्वज्ञा ॥३७॥
मी तों मुळींच वाईट आहे । सर्व तुजला ठाउक आहे ॥ आतां माझे करतील काये । विघ्नकरते ॥३८॥
तूं अनादि सर्वाधिष्ठान । परब्रह्म परिपूर्ण ॥ ऐशाही स्वामीस येतां शरण । दुःख माझें न जाये ॥३९॥
जें परब्रह्म अनादि सिद्ध । सर्वज्ञ समर्थ निर्द्वद्व ॥ तेथेंच माझा ब्रह्मानंद । सद्गुरु असे ॥१२४०॥
जो परमात्मा पुरुषोत्तम । सच्चिदानंदे परब्रह्म ॥ तोचि माझा पूर्णकाम । स्वामी असे ॥४१॥
जें परब्रह्म अनादी । घनानंद निरुपाधी ॥ तोचि माझा कृपानिधी । वाली असे ॥४२॥
जें अनामरूप निरहंकार । परब्रह्म अगोचर ॥ त्यातेंच करितों नमस्कार । सर्वज्ञातें ॥४३॥
जो भक्ताचा कैवारी । भक्ताकरितां रूपें धरी ॥ त्यातेंच शरण येऊनि हाका मारीं । सर्वज्ञातें ॥४४॥
जो सर्वाचा भर्ता । जो परेहूनि परता ॥ त्यातें शरण सर्वथा । सर्वज्ञातें ॥४५॥
जेथूनि सर्व झाले । जेथूनि वेद प्रगटले ॥ त्याची वंदितों पाउलें सर्वज्ञाचीं ॥४६॥
जो परमात्मा परमेश्वर । मूळ पुरुष सर्वेश्वर ॥ अनादि देव विश्वंभर । त्यातें शरण असें मीं ॥४७॥
जो अनंत ब्रह्मांडाचा धनी । वेद ज्यातें वर्णी ॥ शरण आहें लोटांगणीं । येतों तया ॥४८॥
जो एकला एकचि असे । जेथें नाहीं द्वैत पिसें ॥ सर्वथा त्यातें शरण असें । सर्वज्ञातें ॥४९॥
जो एकलाच स्वतंत्रपणें । क्रीडा करितो अलिप्तखुणें ॥ जो सर्वांचें अंतर जाणे । त्यातें शरण असें मी ॥१२५०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP