मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
पदे १२५१ ते १३००

करुणासागर - पदे १२५१ ते १३००

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


जो सर्वां अधिष्ठान । प्रकृति पुरुषाहूनि विलक्षण ॥ अनादि ब्रह्मपूर्ण । त्यातें शरण असें मी ॥५१॥
आपण सदंकरूप असतो । प्रकृति पुरुष होतो ॥ अवतार धरोनि विलास करितो । त्यातें शरण असें मी ॥५२॥
जो कालत्रयीं सारिखा असे । सर्वत्र सारिखा प्रकाशे ॥ त्यातें सर्वथा शरण असें । सर्वज्ञानें ॥५३॥
जो अनंतशक्तीचा स्वामी । जो ब्रह्मादिकांचा अंतर्यामी ॥ जो अनंतनामी अनामी । त्यातें शरण असें मी ॥५४॥
ज्याचें भय वायू वाहे । सविता ज्याचे आज्ञेंत राहे ॥ इंद्र अग्नि मृत्यु वाहे । भीति त्यातें शरण मी ॥५५॥
ज्यातें शेष स्तवितां शिणला । वेद वाणितां परतला । ब्रह्मा ज्याचा पुत्र झाला । त्यातें शरण असें मी ॥५६॥
जो अनादि अविद्या नाशी । लक्ष्मी ज्याची दासी ॥ भुक्ति मुक्ति पायां पासीं । त्यातें शरण असें मी ॥५७॥
जो समष्टि व्यष्टिरूप । स्वयं कैवल्य आपेंआप ॥ ज्यातें नाहीं नामरूप । त्यातें शरण असें मी ॥५८॥
जो स्वयें तृप्त आहे । परि शरणागताची चिंता वाहे । ब्रह्मादि वंदिती ज्याचे पाये । त्यातें शरण असें मी ॥५९॥
ज्यातें योगींद्र ध्याती । ज्यातें मुनींद्र पूजिती ॥ ज्यातें सुरेंद्र नमिती । त्यातें शरण असें मी ॥१२६०॥
पुराणें ज्यातें स्तविती । शास्त्रें ज्यातें गाती ॥ वेद ज्यातें वर्णिती । त्यातें शरण असें मी ॥६१॥
जो अनंत ब्रह्मांडांचा नायक । ब्रह्मादिक ज्याचे आज्ञाधारक ॥ जो अनंत व्यापक । त्यातें शरण असें मी ॥६२॥
जो वेदांतवेद्य असे । सदैकरूप विलसे ॥ जें परब्रह्म अनादि असे । त्यातें शरण असें मी ॥६३॥
जो अनंत शक्तीचा नायक असे । सर्व सामर्थ्य ज्या अंगीं वसे ॥ जो परब्रह्म दयाळू सरज्ञ असे । त्यातें शरण असें मी ॥६४॥
जेणें प्रल्हादातें रक्षिलें । जेणें ध्रुवातें अभय दिल्हें ॥ जेणें गजेंद्रातें सोडविलें । त्यातें शरण आहें मी ॥६५॥
जेणें पांडवांतें रक्षिलें । सुदाम्यातें दान दिलें ॥ जेणें उद्धवातें ज्ञान दिल्हें । लज्जा माझा त्या असो ॥६६॥
जेणें वानर मित्र केले । बिभीषणातें अभय दिलें ॥ जेणें रावणातें मारिलें । धावणी माझ्या तो धांवो ॥६७॥
जेणें मधुकैटभ वधिले । ब्रह्म्यातें वेद पढविलें ॥ ज्यातें शिवानें ध्यानीं धरिलें । माझी लज्जा त्या असो ॥६८॥
जो शंख चक्र गदाधारी । जो भक्तांचा सहायकारी ॥ जो भवसागरापासोनि तारी । लज्जा माझी त्या असो ॥६९॥
जेणें अनंतु राक्षस वधिले । भक्तांचें रक्षण केलें ॥ जेणें गोपिकांतें आलिंगिलें । लज्जा माझी तो राखो ॥१२७०॥
जेणें अयोध्या वैकुंठा नेली । द्रौपदीची लज्जा रक्षिली ॥ त्याचे चरणीं भावें घालीं । लोटांगण मी ॥७१॥
जो वैकुंठींचा विहारी । निद्रा करितो शेषावरी ॥ भावें त्यातें अंगीं हाका मारी । धांव घालीं असा मी ॥७२॥
जो क्षीरसागरचा वासी । जो सूर्याग्नीतें प्रकाशी ॥ जो ब्रह्मानंद चिद्विलासी । करुणा त्यातें भाकें मी ॥७३॥
जो आनंदघन तेजोराशी । जो परब्रह्म अविनाशीं ॥ जो परमात्मा समदर्शी । नमन त्यातें करितों मी ॥७४॥
ब्रह्मा विष्णु हर । हे ज्याचे आज्ञाधर ॥ ब्रह्म जें कां परात्पर । धांव ऐसें म्हणतों त्या ॥७५॥
जेणें धनुभंग केला । गोवर्धन नखीं धरिला ॥ परब्रह्म म्हणती ज्याला । विनंति त्यातें करितों मी ॥७६॥
जो भक्तांचे संकटीं । धांव घाली उठाउठी ॥ ज्याच्या सत्तें चाले सृष्टी । भिक्षा त्यातें मागें मी ॥७७॥
ज्याचीं ब्रिदें गाती मुनी । जो अनंतबळ चक्रपाणी ॥ ज्याचा महिमा वेद वर्णी । रक्षीं मातें म्हणतों त्या ॥७८॥
जो मातें शरण येतो । त्यातें मी अभय देतों ॥ जो श्रीराम ऐसें म्हणतो । अभय त्यातें मागें मी ॥७९॥
जो अनादि निष्काम । नित्यानंद पूर्णकाम ॥ शंकर जपतो ज्याचें नाम । पूजा त्याची करितों मी ॥१२८०॥
जो बोधरूप विज्ञानघन । सच्चिदानंद परिपूर्ण ॥ परब्रह्म निरंजन । नामें त्याचीं जपतों मी ॥८१॥
जो अव्यय अनंत । ज्यातें शरण असती संत ॥ ज्यातें म्हणती भगवंत । आशा त्याची धरिली म्यां ॥८२॥
जो परब्रह्म परात्पर । ज्यातें ध्याती हरिहर ॥ ज्याचा महिमा अपार । वाट त्याची पाहतों ॥८३॥
जो देवाचाही देव । जेथें नाहीं भावाभाव ॥ दयाळू ज्याचा स्वभाव । दर्शन त्याचें इच्छीतों ॥८४॥
जो विशुद्ध परब्रह्म । ज्यातें नाहीं रूप नाम ॥ दत्तात्रेय पूर्णकाम । ऐसें त्यातें म्हणतों मी ॥८५॥
ज्याचा पार न कळे शेषा । शंकर ध्यातो ज्या परेशा ॥ दत्तात्रेया महापुरुषा । धांव ऐसें म्हणतों त्या ॥८६॥
जें परब्रह्म सच्चिदानंद । जें अनादि निर्द्बंद्व ॥ सदैव करूप ब्रह्मानंद । राम ऐसें म्हणतों त्या ॥८७॥
ज्याचा पार न कळे वेदा । ज्याच्या चरणीं नमी तो वेधा ॥ परब्रह्म दिव्य बोधा । शंकर शंभू म्हणतों मी ॥८८॥
ज्याचे अनंत गुण । जो सगुणाचा निर्गुण ॥ जो परब्रह्म पूर्ण । नाना नामीं स्मरतों त्या ॥८९॥
जो अगोचर अरूप । जें परब्रह्म आपेंआप ॥ जेथें नाहीं पुण्यपाप । ध्यान त्याचें करितों मी ॥१२९०॥
ज्याच्या अंगीं अनंत कळा । जो सर्वांत निराळा ॥ त्याचे सेवेचा सोहळा । भोगीन म्हणतों ॥९१॥
जो निरंतर असंग । जो सर्वदा असंग ॥ त्याचा करीन म्हणतों संग । परब्रह्माचा ॥९२॥
जें परब्रह्म अव्यय । त्याचे वंदितों पाय ॥ त्यापासोनि इच्छितों अभय । आतांच मी ॥९३॥
ज्याचे नामें वाल्मीक तरला । जेणें अजामीळ उद्धरिला ॥ जो मारीच मृगामागें धांवला ॥ वाट त्याची पाहतों ॥९४॥
ज्या प्रभूतें नित्यनेमें । सनकादिक ध्याती अतिप्रेमें ॥ त्यातें दत्तात्रेय ऐशा नामें । भावें हाका मारितों ॥९५॥
जो भक्तपक्षपाती । ज्याची सेवा ब्रह्मादि करिती ॥ माझे हात त्याचे हातीं । आहेत आतां ॥९६॥
जो परमात्मा श्रीपती । ज्याचा महिमा नेणती श्रुती । माझी गती त्याचे हातीं । असे सत्य ॥९७॥
जो जाणे सर्वांतर । द्रष्टा साक्षी परात्पर ॥ तेणें माझा समाचार । घ्यावा आतां ॥९८॥
जेणें शिळेची केली नारी । जो शरणागतातें तारी ॥ तोचि माझा कैवारी । असे सत्य ॥९९॥
जो मन वाणीतें अगोचर । जो परब्रह्म परमेश्वर ॥ तोचि माझा आहे गुरु । स्वामी वाली सद्गुरु तो ॥१३००॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP