मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध|
पदे १०१ ते १५०

करुणासागर - पदे १०१ ते १५०

नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.


तूं सकळगुणसंपन्न । सकळसामर्थ्यैं पूर्ण ॥ म्हणोनि आतांची मनोरथ पूर्ण । करीं माझे दयाळा ॥१॥
माझियेसारखा हतभाग्य पाहीं । तूतें शरण आला नाहीं ॥ आतांच प्रसंग पडला पाहीं । ऐसा तुज ॥२॥
ऐशा प्रसंगीं ऐशा काळीं । ऐसा कामी ऐसा कुश्चळी ॥ एवढाच आला वनमाळी । शरण तुज ॥३॥
स्वामींनीं विरुदें वागविलीं । त्यांची परीक्षा नाहीं घेतली ॥ आतांच वेळा प्राप्त झाली । घेईं परीक्षा ब्रीदांची ॥४॥
घोर कलीचें वागणें । मज ऐशा पामराचें मागणें ॥ मागतों तैसें आतांच देणें । सर्वसमर्था सद्गुरो ॥५॥
मागतों तैसें आतां न देसी । तरी उणीव सामर्थ्यासी ॥ सर्वसामर्थ्यवंत होसी । कैसा मग ॥६॥
ऐशियातें ऐसें पाहीं । आतांच अभय द्यावया कांहीं ॥ प्रभू अंगीं सामर्थ्य नाहीं । ऐसें बोलतील सर्वही ॥७॥
स्वामी सकळगुणसंपन्न । एवढ्याच गुणें आहेसि हीन ॥ ऐशिया ऐसें तत्क्षणींच दान । देत नाहीं ॥८॥
तरी गुणांचा अंत आला । सामर्थ्याचा पार लागला ॥ मग अनंतगुण अनंतशक्ती या बोला । ठाव कैंचा ॥९॥
तुझे अंगीं कोणतें सामर्थ्य नाहीं । कोणता गुण नसे पाहीं ॥ सर्व गुण सर्व सामर्थ्य तुझे ठायीं । असे दयाळा सद्गुरो ॥११०॥
तुझे अंगीं सकळ कळा । समर्थ वागती गोपाळा ॥ अझोनि माझा कळवळा । कां नये दयासागरा ॥११॥
माझियेसारखा अनर्थीं । शरण आला असिआ आर्ती ॥ आतांच भिक्षा द्यावया श्रीकृपामूर्ती । संकट काय पडलें तुज ॥१२॥
हा काय महाप्रसंग पडला । म्हणोन विलंब लाविला ॥ किंवा कांही उणा झाला । पराक्रम स्वामीचा ॥१३॥
अनंतशक्ती अचलशक्ती । अपारशक्ती अमोघशक्ती ॥ अव्ययशक्ती शाश्वतशक्ती । दयासिंधो सद्गुरो तूं ॥१४॥
आतां कोणता विचार करिसी । कायसा विलंब लाविसी ॥ धांव दयाळू हृषीकेशी । दीनबंधो सद्गुरो ॥१५॥
जरी मज आतांच देशी दर्शन । मागतों तें अभयदान ॥ कांहीं तुझें देवा उणें । होणार नाहीं ॥१६॥
ऐसा पामराचा अंगिकार केला । म्हणोनि लौकिक बुडाला ॥ ऐसें कांहीं दयाळा । होणार नाहीं ॥१७॥
आतां सर्वथा पुरुषोत्तमा । सर्वां अपराधां करीं क्षमा ॥ तुझिया बुरुदांचा महिमा । अपार असे ॥१८॥
तूं “ सर्वतश्चक्षुः सर्वतः पाणिः । सर्वतः श्रोत्र ’ वेदवाणी ॥ माझी दीन वाणी तुझिये कर्णीं । कैसी न पडे सर्वज्ञा ॥१९॥
सर्वज्ञासी कैसें सांगावें । कैसें हृदय उकलोनि दाखवावें ॥ सांग आतां काय करावें । दयासिंधो सद्गुरो ॥१२०॥
तूंचि माझा वशिला अससी । शिवपार्वती रूपें धरोनि शोभसी ॥ आतां पदर कवणापाशीं । पसरूं स्वामी सांगावें ॥२१॥
तूं स्वामी तूं गुरू । तूंच वशिला शंकरू ॥ तूतेंच पसरितों पदरू । भिक्षा घालीं दानशूरा ॥२२॥
शरण आलों विज्ञानघना । भावें वंदितों तुझेचि चरणा ॥ आतां धांवोनि करुणाकेतना । भिक्षा घालीं मजलागीं ॥२३॥
अधैर्याचें धैर्य पाहसी । असत्त्वाचें सत्त्व घेसी ॥ दयाळू असतां विचार करिसी । दुःख दावावयाचें ॥२४॥
आतां कोणते वनीं जाऊं । सर्वव्यापकासी कोठें पाहूं ॥ कैसें स्वामी हृदय दावूं । उकलोनियां ॥२५॥
आम्हीं वनोवनीं फिरावें । उपवासही करावे ॥ आणि स्वामींनीं पाहावें ॥ हें कैसें दयाळूफण ॥२६॥
आम्हीं भोगावे कष्ट । मग स्वामींनीं व्हावें तुष्ट ॥ ही करणी कैसी वरिष्ठ । म्हणावी दयासिंधूची ॥२७॥
आम्हीं शीत उषाण्दि दुःखं भोगिलें । तेणें तुमचे हातीं काय आलें ॥ आतांच कृपा करूनि हृदयीं धरिलें । तरि काय गेलें समर्थाचें ॥२८॥
शरणागताची उपेक्षा । कैसी करितोसी सर्वदक्षा ॥ सर्वज्ञ सिद्धा अंतरिक्षा । दत्तात्रेया श्रीरामा ॥२९॥
शरण तरी कैसें यावें । कोणत्या देशांत जावें ॥ किंवा नग्न होउनी हिंडावें । भूमीवरी ॥१३०॥
किंवा सोडूं आतां अशन । किंवा फिरावें रानोरान ॥ किंवा द्यावा आपुला प्राण । गडीगडदीकूपांत ॥३१॥
मी तों सर्वथा शरण आलों । स्वामीचे पायीं पडलों ॥ सन्मुख उभा राहिलों । हात जोडोनी ॥३२॥
तुमचे मनाजोगा शरण । कैसा येऊं दयाघन ॥ नेणे मूढ अज्ञान । दास तूमचा ॥३३॥
माझें शरण येणें आवडेना । माझी विनंती न ये मना ॥ तरि मज सांगावी खुणा । शरण येण्याची ॥३४॥
मी तों पडलों तुझे पायीं । व्हावें तैसें करून घेईं ॥ धांव घालीं माझे आई । आतांचि तूं ॥३५॥
मी तुज सर्व प्रकारें रुजूं आहें । सर्वज्ञ स्वामी जाणताहे ॥ आतांच मजला अभय द्यावें । सर्वज्ञा समर्था सद्गुरो ॥३६॥
त्रिविध तापें तापलों । तुझिये चरणा शरण आलों ॥ आतां कैसा दयाळो । त्याग करिसी दीनाचा ॥३७॥
भिऊन पळालों मृत्यूशीं । लपलों तुझिये पाठीशीं ॥ कैसा मातें धरोनि देसी । शरणागतवत्सल तूं ॥३८॥
तुच्छ मनुष्यांचे पाठीं रिघतां । त्येही रक्षिती सर्वथा । ब्रह्मंडाधीशा अनंता । कैसा त्यागिसी समर्थ तूं ॥३९॥
तूतें येतो काकुळती । आतां अंत पहासी किती ॥ धांव दयाळा रमापती । दत्तात्रेया श्रीरामा ॥४०॥
कोणा भाकूं करुणा । कोण जाणेल जीवींच्या खुणा ॥ तुजवांचोनि नारायणा । दत्तात्रेया सद्गुरो ॥४१॥
मी वधार्ह अपराधी खरा । तुझे पायीं पडलों क्षमासागरा ॥ आतां माझा रमावरा । अंगिकार करीं ॥४२॥
वधायोग्य अपराध करिती । मनुष्यांतें शरण येती ॥ त्यांतें मानवही रक्षिती । दयाळूपणें ॥४३॥
तूं तों त्रैलोक्याचा धनी । चक्रधर चापपाणी ॥ अनंतबल वेद वर्णी । दत्तात्रेया सद्गुरो ॥४४॥
ऐशा स्वामीतें शरण आलों । कैसा त्यागिसी दयाळो ॥ धांव आतां भागलों । फार देवा तुजसाठीं ॥४५॥
आतां अपराधादि नको स्मरूं । न करीं विलंबाचा विचारू ॥ नको आतां दूर धरूं । शरणागतातें मज देवा ॥४६॥
माझें तुज कांहींच आवडेना । तरी कैसें करूं नारायणा ॥ मज सर्वथा राहवेना । तुजवांचोनी ॥४७॥
तुजसाठींच तळमळी । तूतें पसरिली आज झोळी ॥ अभय देऊणी भिक्षा घालीं । रामचंद्रा सद्गुरो ॥४८॥
तुजवीण कोण जाणे दुःख । कोण निवारी तहानभूक ॥ आतां दाखवीं देवा मुख । सद्ग्रुरुराया ॥४९॥
द्रौपदी आणितां शत्रूंनीं । तिची हांक ऐकिली कानीं ॥ धांवोनियां चक्रपाणी । लज्जा अंगीं रक्षिली ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP