शेख महंमद चरित्र - भाग ३०

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


महिपतीबाबा लिहितात की, चंद्रभटाचें मनीं,

‘‘पूर्ण बोध ठसावला जाण । यास्‍तव पालटे नामाभिधान । चांद बोधला त्‍याजकारणें । सर्वत्र जन बोलती ॥७२॥
कांहीं दिवस लोटतां ऐसें । मग जनार्दनासी स्‍वमुखें पुसें । आतां हेतु उपजला असे । कीं समाधीस बैसावें ॥७३॥
त्‍याचें मनोगत जाणोनि पाहीं । समाधीस बैसला विदेही । परी यवन उपद्रव करितील कांहीं । मग एक युक्ति तिहीं योजिली॥७४॥
जैसी अविंधाची मदार जाण । तैसेंच वर रचलें स्‍थान । हिंदु आणि ते यवन । समाधान पावले ॥७५॥ देवगिरीच्या पर्वतावर । तें स्‍थान आहे अद्यापवर । होतसे नाना चमत्‍कार । देखती सर्वत्र दृष्‍टींसी ॥७६॥’’.
अगदी शब्‍दशः हीच कथा केशवानें केलेल्‍या एकनाथचरित्रात आली आहे. परंतु हे चरित्र त्रृटित असें पाहावयास मिळाल्‍याने या केशवाचा काल महिपतीपूर्वीचा की नंतरचा आणि हा केशव व मुकुंदराजाचा शिष्‍य केशव कवि हे एकच याचा उलगडा करून घेतां आला नाही. असो. औरंगाबादच्या ऑर्किऑलॉजिकल सर्व्हे डिपार्टमेंटच्या सुपरिटेंडंटनीं कृपा करून शोध घेऊन ही समाधि (कबरीवजा) दौलताबाद किल्‍ल्‍याच्या मुख्य दरवाजासमोर शाबूत असल्‍याचें कळविलें व फोटोहि पाठविला. ह्या चंद्रभटाची हिंदु-मुसमानांत चांगलीच प्रसिद्धि असल्‍याशिवाय इतक्‍या महत्त्वाचे जागीं त्‍याला ही समाधि घेतां येतीच ना. विशेषतः त्‍यांच्या कायमच्या समाधीस तरी मुसलमानी राज्‍यांत स्‍थान मिळते ना. शिवाय ही कबर जनार्दनपंतांनी बांधली आहे व ही बांधतांना त्‍यांच्या मुसलमान शिष्‍यांची चंद्रभट किंवा चांद बोधले यांचेवरील निष्‍ठा जमेस घेणें भाग पडलें ही महत्त्वाची बाब आहे. परंतु शेख महंमदासारखा श्रेष्‍ठ संत किंवा पीर, की जो मालोजी राजे व बालाजी कोन्हेरे यांनी आपला गुरु मानण्याइतका थोर होता, तो ज्‍या चांद बोधल्‍यांचा शिष्‍य होता व दौलताबादचा बादशहा ज्‍याचे चरणीं लागला होता, त्‍या चंद्रभटाची स्‍मृति एवढ्या प्रमुख जागी चिरकाल पक्‍की करण्यांत आली असली तर नवल कसलें !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP