शेख महंमद चरित्र - भाग १८
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
शेख महंमदानें ‘योगसंग्रामा’च्या पंधराव्या अध्यायाच्या सुरुवातीस आपल्या गुरुबद्दलची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणें गुरूचा महिमा सांगणारा अभंगहि केला आहे. तो महत्त्वाचा असल्यानें सर्वच उद्धृत करतो. तो अभंग असाः ‘‘धन्य चांद बोधले । त्यांनी जानोपंत लोधले । त्यांचे शिष्य (‘त्यांचा शेशें’ मूळांत) धाले । येको जदार्नन ॥१॥
केली भागवत टीका । उद्धार विश्र्वलोकां । तेच दिसे सायेका । स्वामीपाशीं ॥२॥
त्रिपदा पिळिली । कुत्री पान्हांयेली । उच्छिष्ट कृपा लाधली । जानोबासी ॥३॥
स्वामी अगाध तुमचा महिमा । न कळे मेघःशामा । लघिमी केली क्षमा । जयेरामासी ॥४॥
दासीपुत्र विदुर । तैसा मी तुमचा किंकर । सरता जालों साचार । शेख महंमदी ॥५॥’’
या मजकुराला दुजोरा देणारा मुकुंदराजाचा अभंगहि याच संग्रहांत मिळाला. तोहि अप्रसिद्ध असल्यानें समग्रच येथे देत आहे. ‘‘उत्तम हा ठाव नांव दवलताबाद । तेथें योगीराज चंद्र बोधले ॥१॥
महा हे प्रतापी पुण्य आणि पवित्र । वसविलें क्षेत्र देवगिरी ॥२॥
चंद्र बोधल्यांनीं बोधविला बोध । लाधला प्रसाद जनार्दना ॥३॥
जनार्दन म्हणजे आलें शरणागत । करावें पुनित पतितासी ॥४॥
जाला निजलाभ प्रसाद उच्छिष्टाचा । दास हा स्वामीचा जनार्दन ॥५॥
तयाचा अंकित जाला एकनाथ । केले हे सनाथ समर्थांनीं ॥६॥
तयाचे कृपेनें वस्ती गंगातरीं (= गोदातीरी) । एकनाथें केली योगसमाधि ॥७॥
टीपः
शेख महंदबाबा मठ संग्रह, बाड नं. ४, क्र. ५, संदर्भांक ११७.
महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार संग्रह, बाडांक १, क्र. ५३, संदर्भाक १७६.
शेख महंमदबाबा मठ संग्रह, बाडांग ५, क्र. १९ संदर्भांक ११४.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP