शेख महंमद चरित्र - भाग २५
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
शेख महंमदांचा व जयरामस्वामींचा संबंध आला असें चरित्र व अभंग यांत लिहिलें आहे. परंतु हे दोनहि प्रसंग त्यांच्या परंपरेच्या चरित्रांत आलेले नाहीत. तें चरित्र बरेंच उशिराचें असून त्यांत पुष्कळच अवास्तवता आहे. मात्र नंतरच्या कांहीं चरित्रांत जयरामस्वामींच्या समाधीसमयी शेख महंमद आल्यानंतर ते समाधिस्थ झाल्याची वर्णनें आली आहेत. चरित्रांत आलेल्या पहिल्या भेटीच्या प्रसंगांतील सेखा म्हणजे वाघ या शब्दावरील हरदासी कोटिक्रम व जयरामस्वामींच्या लवाजम्याचें अतिशयोक्तीचें वर्णन सोडलें तर बाकीचा संतांच्या भेटीचा मजकूर शक्य कोटीतील आहे. मात्र त्यांची एकच भेट झाली असें मानण्याचें कारण नाही.
तुकाराम व शेख महंमदांचा संबंध महिपतीनें जरी प्रथम ‘भक्तविजयां’त गायला असला तरी तो ‘भक्तलीलामृतां’त गाळला आहे. कदाचित् त्या प्रसंगांतील असत्यता पटल्यानें त्यानें तो पुढें गाळला असेल. तुकोबांचा व शेख महंमदांचा संबंध आला असता तर ज्याप्रमाणे एकनाथांच्या भागवताचा उल्लेख केला आहे तसाच त्यांनी तुकोबांच्या अद्वैतपर पदांचा आपल्या लिखाणांत कोठेंतरी उल्लेख केला असता. परंतु तुकोबांचा उल्लेख त्यांच्या काव्यांत कोठेंहि आलेला नाही. तुकारामास जरी शेख महंमद समकालीन असले तरी त्या वेळी प्रवासाची व प्रसिद्धीची साधने अगदीच थोडी व मर्यादित होती ही गोष्ट अशा संबंधाबद्दल बोलतांना अवश्य लक्षांत घ्यावी लागते.
श्रीगोंद्यांत असा समज आहे की तेथून जवळच मैलभराच्या अंतरावरील शिळेवर शेख महंमद, तुकाराम, गोदडबाबा, प्रल्हादबाबा, व राऊळबाबा असे एकत्र बसून परमार्थाच्या गोष्टी नेहमी बोलत. ही दंतकथा आहे. यास आधार नाही. गोदडबाबा, प्रल्हादबाबा व राऊळबाबा हे तिघेहि अठराव्या शतकात होऊन गेले, हे कागदपत्रांवरून दिसते. या तिघांसहि इनाम जमिनी व वर्षासने आहेत. त्यांच्या सरस्वतीनदीवरील समाध्याहि अठराव्या शतकाच्या उत्तरार्धांतील दिसतात.
शेख महंमदांनीं ईश्वराची लीला ‘योगसंग्रामांत’ वर्णितांना आपल्या आयुष्यांत घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख केला आहे. एका रविवारचे दिवशीं पर्वकाळ होता. त्यावेळी शेख महंमद (बहुधा सरस्वतीनदीतीर) तीरावर ईश्वराच्या सेवेसाठी गेले होते. तेथें त्यांना एका भुजंगाने तीन वेळां डंखून विषबाधा केली.
टीपः
‘जयरामस्वामी वडगांवकर त्यांचे गुरु परमगुरु व शिष्यप्रशिष्य यांच्या चरित्राची बखर’, सं. जनार्दन बाळाजी मोडक, काव्येतिहाससंग्रह, पुस्तक २७ वें, पुणें, १८८९ इ.
अहमदनगर जमाव, श्रीगोंदा रुमाल, पेशवे दप्तर.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP