शेख महंमद चरित्र - भाग ३४
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
शेख महंमदांनीं समाधि गुंफेंतच घेतली. त्या गुंफेवर नंतर कांहीं वर्षांनीं दर्गा बांधला असावा. महंमदबाबास वंश परंपरेने जुन्या मोजणीप्रमाणें पंधरा बिघे व नव्या मोजणीप्रमाणे अठरा बिघे बागाईत जमीन मालोजी राजे भोसले यांनी दिली होती. ती वंशाकडे अव्याहत चालू राहिली. शेख महंमदबाबांच्या शिष्यांनीं तेथे मठ चालू ठेवला होता. गांवकीच्या देवस्थानास मिळणार्या देणग्यांतून कांहीं शेख महंमदांच्या दर्ग्याकडे दिल्या जात. उत्सव दोन होत. एक बालाबाबाच्या पुण्यतिथीचा भाद्रपदांत व दुसरा शेख महंमदांच्या पुण्यतिथीचा फाल्गुन मासांत. शेख महंमदांच्या पुण्यतिथीस ब्राह्मणभोजनहि घालीत व फकीरफकडाहि असे. त्यासाठी कित्येक वर्षे तुपासाठी रु. ५ देवापुढें रुपया एक अशी वर्षासनें होती. नंतर उत्सव मोठ्या प्रमाणांत होऊं लागले. बालाबावाच्या व शेख महंमदबाबाच्या उत्सवास मिळून शंभर रुपये वर्षासन मुक्रर झाले. कांही वर्षें शंभराऐवजी वीसच मिळाले तर कांहीं वर्षे चारच मिळाले. त्याशिवाय नंदादीप, शिवरात्रीनिमित्त केसरी गंधास वगैरे किरकोळ देणग्या मिळतच. परंतु शेख महंमदांच्या शिष्यमंडळींनीं त्यांची परंपरा पुष्कळ वर्षे टिकविली होती. त्यांच्या शिष्यमंडळींत व भक्तांत हिंदूंचाच भरणा अधिक होता. याशिवाय इतर गांवातूनहि वर्षासने होती. ताबूत वगैरे निमित्तानेंहि देणग्या मिळत. उत्तर पेशवाईंत व नंतर शेख महंमदबाबांचे मठांतील मंडळीं हिंडून उत्सवासाठी पैसा मिळवून तो मोठ्या प्रमाणांत करूं लागली. मठांत भजन वगैरे हिंदू पद्धतीप्रमाणें करीत. सारांश, शेख महंमदांचें काव्य, चरित्र व त्यांच्यामागें झालेला परंपरेचा विस्तार पाहिला तर पराविद्येंत त्याकाळी वर्ण, धर्म, जात, वेष आचार, व्रतवैकल्यें ही आड येत नसत असें स्पष्ट दिसते. साधक आपल्या अधिकारी सिद्धापासून ती विद्या शिकून साध्य साधीत यांत शंका नाही. भक्तियोगाचें वैशिष्ट्य याच व्यक्तिस्वातंत्र्यांत आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP