शेख महंमद चरित्र - भाग ३१
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
येथें थोडेंसें विषयांतर करून आराध्य देव अगर ईश्र्वर ‘श्रीगुरु’ म्हणून उपदेश देऊं शकत नाहीं असा संत-साधु-योगी यांत जो समज रूढ आहे तो सांगितला पाहिजे. खास एकनाथी भागवतांत (एकादश स्कंध) हाच समज ठिकठिकाणीं अप्रत्यक्षपणें दिग्दर्शित केला आहे. श्रीराम, श्रीकृष्ण इत्यादिकांनाहि माणूसच गुरु करावा लागला याचा उल्लेख याबाबतीत सर्वच लेखक करतात. शिवाय हा प्रघात तत्त्वज्ञानास धरून आहे. आत्मानुभवास त्रयस्थच लागतो. या समजाचें उदाहरण म्हणून राघव चैतन्याचे चरित्रकथेत आलेला लहानसा भाग (‘चैतन्यलीलें’तील) पुढें देतोः
‘‘तुकया ऐसा महान संत। नयनीं रात्रंदिन दिसत। जवळीं येतां प्रेम बोलत । परि नाहीं (विठोबानें) उपदेशिला ॥७३॥
राघवाची पाहून भक्ति । दत्त बोलती प्रेमें उक्ति । परि तया उपदेश शक्ति । नसे सर्वथा केव्हांहि ॥७४॥’’ (अ. १. चैतन्यलीला).
राघवानें दत्ताची आराधना केली व शेवटी प्राण अर्पित असतां दत्तानें सांगितले कीं, ‘‘चतुःश्र्लोकीत उपाय सांगितला आहे. तो उपदेश मला करतां येत नाही. तसें मी केलें तर त्रिजगताचा अपराध केल्यासारखा होईल. तुला व्यास उपदेश करतील’’ (अ. २ रा). हा झाला खास दत्ताबद्दलचा विचार. परंतु नामदेव, ज्ञानेश्वर आदि संत घ्या, त्यांना मनुष्यच गुरु शोधावा लागला. सारांश जनार्दनपंतांचा गुरु ‘अत्रिनंदन दत्त’ होता असें मानणें पराविद्येंतील रूढ समजाविरूद्ध आहे. असो.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP