शेख महंमद चरित्र - भाग २४

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


 ‘‘चकनामा बामसीखत महाबाबा शेख महंमद दुरुवेष मोकदम मौजे चांभारगोंदें यासी मालोजी राजे भोसले व बालाजी कोन्हेर दिवाण याणी सन १००५ हिजरी (ऑगस्‍ट १५९६ ते जून १५९७) यामध्यें आपण मोकादम समस्‍त दाहीजण कसबे चांभारगोंदें मजकूर याजपासून पांच चाहूर जमीन बारजावरक (?) बातीन खरीद करून त्‍यामध्यें पेठ मकरदंपूर वसऊन त्‍यामधून बारा बिघे जमीन ब गज इलाहि बागाईत बादल थल चेलेकराचे त्‍यांतून मोजून चक बांधून इनाम दिल्‍हा आहे. तरी तुम्‍ही लेकराचेलेकरी अर्जानी कर्णे, यास कोणी हिला हरकत करीत तो गुन्हेगार दिवाणाचा व गोताचा अन्याई. तुम्‍ही आमचे गुरु आहात व आपण तुमचे शिष्‍य आहो. म्‍हणोन पांच चाहुर खरेदी जमिनींतून बारा बिघे तुम्‍हास इनाम मुकरर दिल्‍हा असे. यास जर कोणी दावा करील तर त्‍यास आपण वारू. हा चकनामा लिहिला सही हाद महादुद्‌ बीतपसील जयल (?) पश्चिमेस हाद नाल्‍यापर्यंत. पूर्वेस हाद नगरची वाट राज्‍यमार्ग. दक्षिणेस कबरस्‍थान मुसलमानाची. उत्तरेस हाद जमीन थल चेलेकराचे. यैश्या चारी भुज्‍या मुकरर करून मोजून हाद बांधून दिल्‍ही हे लिहिले.

बि॥ बालाजी कोन्हेरे कुलकर्णी                                
सही
मकरंदपूर                                            
नि॥ नांगर
गोही
गोमाजी नाईक महाजन मुंगी
पेठ मजकूर


या चकनाम्‍यावरून शेख महंमद हे इ. स. १५९२ चें सुमारास मालोजी राजे भोसले यांनीं गुरु मानण्याइतके सिद्धतेप्रत गेले होते यांत शंका नाही. अर्थात्‌ त्‍यांची सिद्ध म्‍हणून ख्याति होण्यास निदान त्‍यापूर्वी ३०-४० वर्षे तरी गेली असावीत. सारांश वरील सर्व उल्‍लेखांचा विचार केल्‍यास शेख महंमदांचा काल कमीत कमी इ. स. १५६५ ते १६६० पर्यंत तरी मानावा लागतो. ते योगी होते, म्‍हणून दीर्घायुषी असणें शक्‍य आहे. त्‍यांचें आयुष्‍यमान अधिकाधिक इ. स. १५६० ते १६६० समजण्यास हरकत नाही. परंतु ते जयरामस्‍वामींचे समाधिकालापर्यंत हयात नव्हते यांत शंका नाही. जयरामांच्या समाधीच्या उत्‍सवर्णनांतच त्‍या वेळी तुकोबा सर्व व्यवस्‍था पाहात होते व शेख महंमद तेथें जाऊन जेवले ते फक्त तुकोबांनाच दिसत होते वगैरे जो मजकूर आहे त्‍यावरूनच त्‍या कथाख्यानांत वास्‍तवतेचा व मूळ माहितीचा अभाव आहे हें स्‍पष्‍टच होते. जयरामसमाधीचें सोहळाख्यान ही केवळ काल्‍पनिक कथा आहे इतकेंच.

शेख महंमदाच्या पूर्व कालांतील माहिती कोणीच दिली नाही. त्‍यांच्या उपर्युल्‍लेखित चरित्रांत त्‍यांचे बाप राजेमहंमद व आई पुन्हलेशा होती व त्‍यांचा जन्म श्रीगोंद्यातच झाला अशी हकीकत दिली आहे. ‘सिजर्‍या’त राजे महंमदांचा उल्‍लेख आला आहे. परंतु शेख महंमदांचा ज्‍या गांवाशीं संबंध येत होता त्‍याचें वर्णन ज्‍या अभंगांत आले आहे त्‍यांत त्‍यांनी आपली ‘‘जन्मभूमी धारूर’’ म्‍हणून लिहिले आहे. राजेमहंमद दौलताबादकडे होते. त्‍यांची कबर धारूरला आहे असे म्‍हणतात. अशा परिस्‍थितीत शेख महंमदांचा जन्म धारूरला होणें साहजिक आहे. शेख महंमदांनीं आपल्‍या मातापित्‍याची माहिती ‘योगसंग्रामांत’ त दिली आहे. त्‍यांत ‘‘याति गोरे (घोरी ?) राजमहंमद पिता । सगुण पतिव्रता फुलाई माता । ते प्रसविली अविनाश भक्ता । शेख महंमदालागीं॥’’ असे सांगितलें आहे. शेख महंमदांनीं आपल्‍या जातीचा उल्‍लेख केला आहे. परंतु त्‍याबरोबर आपले मूळ गांव दिले नाही. स्‍थानिक दंतकथेच्या आधारानें श्री. वागळे आपल्‍या प्रस्‍तावनेंत लिहितात की शेख महंमद रुईवाहिरेचे राहणारे व त्‍यांच्या कुळांत तेथील मुलाणाची वृत्ति होती. परंतु या माहितीत फारसें तथ्‍य आहेसें वाटत नाहीं. शेख महंमदांचें वडील राजेमहंमद हे सुफी पंथीय कादिरी परंपरेंतील होते. त्‍यांचे गुरु व परमगुरु दौलताबाद-ग्‍वाल्‍हेरचे होते. शेख महंमदास मालोजीराजे यांनी दौलताबादेहून आपलेबरोबर आणलें व श्रीगोंद्यास मकरंदपूर पेठ बसवून तेथे स्‍थापिलें. श्रीगोंदे, रुई किंवा वाहिरे येथील कोणतीहि मुसलमानी वृत्ति शेख महंमदाचे घराण्यांत नसावी. निदान अठराव्या शतकांतील कागदपत्रांत तरी त्‍याचा मागमूस नाही. मात्र मुधा पांगुळाला रुई येथील सरोवरीं (लहानसे तळें आहे) प्रथम साक्षात्‍कारी भेट झाली व नंतर वाहिरे येथे पुन्हां साक्षात्‍कारी उपदेश झाला असें तो लिहितो. ह्या दोन्ही गांवाशी मुधोबाचा संबंध आहे, शेख महंमदांचा संबंध नाही. सारांश शेख महंमदांचे घराणे रुई किंवा वाहिरी पूर्वापार राहात आलें होते असें मानण्यास तितकासा आधार नाही.

शेख महंमदांचा जन्म धारुरास झाला. नंतर आपल्‍या बापाचा शिष्‍य चांद बोधले याजजवळ पुढील पठण व योगाभ्‍यास झाला. चांद बोधलेजवळ फार तर ते पहिल्‍या २५-३० वर्षांपर्यंत असावेत. नंतर गुरुमागें त्‍यानेंहि आपले पराविद्येच्या ज्ञानदानांत बस्‍तान बसविलें असावे. त्‍यांत मालोजी राजे व त्‍यांचे दिवाण बाळाजी कोन्हेरपंत यांचा संबंध जडला. त्‍यांनी शेख महंमदांस त्‍यांच्या ३९-४० व्या वर्षी मकरंपुरास आपल्‍याबरोबर आणले. इ. स. १५९६ त त्‍यांना गुंफा वगैरे बांधून दिली.

शेख महंमदांनी आपली योगसाधना गुंडेगांवातील तळ्यावर केली असें महिपतीनें सांगितलें आहे. त्‍यांनी त्‍या तळ्यांत अस्‍थि वगैरे विरण्याचा जो चमत्‍कार सांगितला आहे तो काल्‍पनिक आहे. बाबाजी नांवाच्या एका सत्‍पुरुषाच्या महतीचें वर्णन रसाळ करण्याकरितां पाल्‍हाळ केला आहे इतकेंच. मी गुंडेगांवचे कागदपत्र पाहिले. त्‍यांत ‘अस्‍थि विरण्याच्या’ परंपरेचा कोठेंहि उल्‍लेख नाही. तेथील लोकांसहि ही गोष्‍ट माहित नाही. तेथें त्‍या तळ्यावर किंवा तेथील सुडलेश्र्वर नांवाच्या लहानग्‍या देवालयांत कोणी तपानुष्‍ठान केल्‍याचा उल्‍लेख आढळला नाही. इतकेंच नव्हे तर ज्‍या ज्‍या गांवी शेख महंमदांचा संचार होत होता, त्‍या गावांच्या यादीत गुंडेगांव नाही. मात्र या गुंडेगांवाला एक महंमदशा नांवाचा जहागिरदार नंतर होता. कदाचित्‌ त्‍याच्या नांवाचा उल्‍लेख शेख महंमदांशी भिडवला गेला असावा.

टीपः अहमदनगर जमाव, गुंडेगांव, रुमाल नं. ३५ व ३६ पेशवे दप्तर.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP