मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
ॐ श्रीदत्त, ठाकूर महाराज

दत्तभक्त - ॐ श्रीदत्त, ठाकूर महाराज

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

साठ वर्षांचे ठाकूर महाराज यांची महती एक उरण दत्तभक्त म्हणून मोठी आहे. हे मुंबईजवळ उरण नजीक पोंपूड या गावचे. पण लहानपणापासून यांना चिंतनाचा व परमार्थाचा नाद असल्यामुळे त्यांचे पुढील आयुष्य मुंबई येथे गेले. यांना दत्तात्रेयाचा व नरसिंहसरस्वतींचा लोभ होता. गाणगापूर येथे गेल्यावर यांना स्वामींचा साक्षात्कार झाला. आणि त्यांनी पोंपूड येथे एक दत्तमंदिर बांधून दत्तभक्तीचा प्रचार केला. हे स्थान पुढे दत्तवाडी या नावानेच ओळखू जाऊ लागले. गुरुचरित्र या ग्रंथाची त्यांनी अनेक पारायणे केली. पुढे यांचा परिवार वाढीस लागला. अनेक भक्तगण त्यांच्याभोवती जमा झाले. गुरुवारी यांनी द्त्ताची भजने मोठया सुरात म्हणण्यास प्रारंभ केला. लोक त्यांच्या संगीतप्रेमावर आणि दत्तभक्तीवर लुब्ध झाले.

यांनी अनेक क्षेत्रांच्या यात्रा केल्या. गाणगापूर येथे दत्ताई नावाचे स्थान निर्माण केले. तेथे अनेक भक्तांसहित यांची उपासना चालू असते. सन १९७१ मध्ये यांनी उजैयनी येथील कुंभमेळाचा आनंद उपभोगला. १९७४ साली हरिद्वार येथे हे गेले. त्यानंतर आबू पहाडावरील गुरुशिखरावर यांना ॐ दत्त असा मंत्र मिळाला. १९७५ मध्ये यांनी उरण येथे अवधूत नावाचे स्थान निर्माण केले.

हे प्रथम रेल्वेत नोकर म्हणून होते. १९७६ मध्ये यांनी नोकरीचा राजीनामा दिला. १९७८ मध्ये गाणगापूर येथे यांना नरसिंहसरस्वतींचा प्रसाद मिळाला. १९८० मध्ये चंपकेश्वर येथील कुंभमेळात राहून यांनी ३६ दिवस केवळ दूध पिऊन उपासना केली. सन १९८१ मध्ये यांची वाटचाल परमार्थाच्या मार्गाने सुरू झाली. १९८३ मध्ये उरण येथे दत्तात्रेयांची मूर्ती यांनी स्थापन केली. १९८६ मध्ये महाराज पुन्हा हरिद्वारला कुंभमेळ्यासाठी गेले. १९८९ मध्ये अलाहाबाद येथील कुंभमेळा करून काशीला गेले. तेथील दत्तमठाचा जीर्णोद्धार करण्यासाठी यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा देणगी म्हणून दिले. १९९० मध्ये उरण येथील दत्तमंदिराजवळ यांनी हनुमान, शिवलिंग, लक्ष्मी यांची मंदिरे बांधली. हे स्थान पुढे ‘नवीन पोंपूड’ म्हणून ओळखले जाऊ लागले. क्षेत्र कुरवपूर येथील श्रीपादवल्लभांच्या स्थानासाठी यांनी पाच हजार पाचशे एक देणगी दिली.

आज ठाकूर महाराज यांचे स्थान माटुंगा येथे आहे. येथे अनेकदा गुरुचरित्राचे पारायण होते. ठाकूर यांच्या नावावर अनेक लहानमोठी काव्ये आहेत. श्रीचिलेमहाराज दत्तगीते, दुमदुमली पंढरी, शंकरमहाराज, दत्ताई, वासुदेवानंदसरस्वती अशी यांच्या कँसेटसची व पुस्तकांची नावे आहेत.

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP